अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या बरळण्यातून कधी विनोद होतात तर कधी जगभरात युद्धखोरीला उधाण येते. जोवर हे केवळ शाब्दीक असते तोवर ठीक पण प्रत्यक्ष त्यानुसार काही घडामोडी घडताना आजूबाजूला दिसू लागतात तेव्हा मात्र त्याचे परिणाम जागतिक पातळीवर दिसू लागतात. त्याची सुरुवात अनेकदा जागतिक शेअर बाजारापासून होते. चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या व्यापरयुद्धाने गेल्या काही महिन्यांमध्ये अशाच प्रकारे अर्थव्यवस्थेला ग्रासण्याचे काम केले. एका बाजूला हे सुरू असताना दुसरीकडे आता पर्शिअन आखातामध्ये युद्धाचे ढग जमू लागले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकन विमानवाहू युद्धनौकांचा ताफा आणि क्षेपणास्र यंत्रणाच आखातामध्ये तैनात केली आहे. शिवाय पर्शिअन आखातावरून जाणाऱ्या सर्व नागरी विमानसेवांनाही त्यांनी सूचना जारी केली असून मार्ग बदलण्यास सांगितले आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, तसे झाल्यास अमेरिकन सरकार त्यास जबाबदार राहणार नाही, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अचानक अशा प्रकारे युद्धाचे ढग जमण्याच्या कारणाचा शोध घेतला तर असे लक्षात येते की, ट्रम्प यांची कारकीर्द दोन महत्त्वाच्या बाबींवर उभी आहे. त्यातील पहिले म्हणजे त्यांनी स्वदेश आणि स्वहिताची भाषा करण्यास सुरुवात केली. जगभरात सध्या अशा नेत्यांना त्या त्या देशांमध्ये चांगले दिवस आले आहेत, अमेरिकाही त्याला अपवाद नाही. दुसरे म्हणजे बराक ओबामा यांच्या धोरणांना विरोध. त्यांनी इराणसोबत केलेला अणुकरार ट्रम्प यांनी संपुष्टात आणला, अर्थात त्याला इराणही कारणीभूत आहेच. परिणामी सध्या पर्शिअन आखातावर युद्धाचे ढग जमा झाले आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या घटनाक्रमाकडे लागून आहे. अमेरिका आजही महासत्ता आहे आणि ती महासत्ता आहे, हे सातत्याने जगाला दाखविण्याची खुमखुमी ट्रम्प यांना स्वस्थ बसू देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सातत्याने ते जगाचा रक्षणकर्ता असल्याचा आव आणून आपली खुंटी बळकट करण्याचे काम करतात.

यापूर्वी झालेल्या आखाती युद्धाचे कारणही अमेरिकाच होती. त्यानंतरचा येथील घटनाक्रम हा इतिहास म्हणून जगासमोर आहे. त्यातून हाती काहीच लागले नाही. अमेरिका तंत्रज्ञानाच्या बाबतीत वरचढ आहे आणि जगात काहीही करण्याची क्षमता राखते, हे त्या निमित्ताने अधोरेखित झाले. गेल्या काही दिवसांत तर अफगाणिस्तानातून फौजा मागे घेण्यासाठी अमेरिकेची दहशतवाद्यांसोबत थेट बोलणी सुरू आहेत. युद्धाचा भार अमेरिकेला आता  सर्वार्थाने सोसेनासा झाला आहे. मात्र स्वत सुरू केलेल्या कारवाया अशाच सोडून देणेही परवडणारे नाही, असे अमेरिकन त्रांगडे आहे. इराण हा तुलनेने लहान देश असला तरी युद्ध अमेरिकेच्या हिताचे नाही, इराणच्या तर नाहीच नाही. मग असे असतानाही युद्धखोरी कशासाठी तर त्या निमित्ताने स्वसामर्थ्यांचे प्रदर्शन करता येते आणि आपण बलशाली आहोत हे जगाला दाखवता येते. आजवरच्या इतिहासात असे लक्षात आले आहे की, साम्राज्ये वाढायची थांबली की त्यांचा ऱ्हास होतो. सद्यस्थितीत साम्राज्ये वाढण्याऐवजी त्याची जागा आता युद्धखोरीने घेतली आहे. गणित तेच आहे त्याच्या आतील परिमाण बदलले आहे इतकेच. त्यातही मग राष्ट्राध्यक्ष ज्युनिअर बुश असतील किंवा मग ट्रम्प तर मग पहायलाच नको, अशी अमेरिकेची अवस्था आहे. युद्ध तर कुणालाच परडवणारे नाही. मग बळी तो कान पिळी हे कळणार कसे? त्यासाठीच युद्धखोरीचा वापर आता शस्त्र म्हणून सुरू आहे!

@vinayakparab

vinayak.parab@expressindia.com