Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९
अग्रलेख
दुरितांचे तिमिर जावो..
अथांग म्हणजे ज्याचा थांग किंवा पत्ता लागत नाही ते. अथांग हा शब्दप्रयोग बव्हंशी मानवी मनाच्या संदर्भात केला जातो. मनाचा जसा थांग लागत नाही तसेच त्याचे काळाचे गणितही अद्याप कुणाला उकलता आलेले नाही. कदाचित म्हणूनच समर्थ रामदास म्हणाले,
 
‘अचपळ मन माझे..’! ते क्षणात एव्हरेस्टवरही पोहोचू शकते आणि क्षणात सागरतळाशीही. ..पण काही गोष्टी मात्र अशा असतात की, माणसाच्या या मनाला त्या नवा तजेला देतात, नवा उत्साह देतात. नवे वर्ष म्हणजे नव्या उत्साहाचा असाच ओनामा करणारी बाब. गोड गुलाबी थंडीत उगवणारी नववर्षांची पहाट, अनेकांना नव्या उत्साहासाठी, नव्या गोष्टींच्या प्रारंभासाठी, आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी तर कधी नव्या संकल्पांसाठी प्रेरित करत असते. नववर्षांचा हा उत्साह आणि उत्सव हा तोच क्षण असतो, ज्यावेळेस माणसाने पुढल्या हाका सावध ऐकत आपला प्रवास निश्चित करावा..! हे नवे वर्ष म्हणजेच २००९ साल, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. एक आगळाच योगायोग या साऱ्या बाबतीत आहे. माणूस आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना आणि दिसणाऱ्या गोष्टी यांच्याबाबतीत व्यक्त होत असतो. लाखो वर्षांपूर्वीही तो असाच व्यक्त होत होता. आजूबाजूला पाहात होता. मानवाचा पहिला अंश म्हणूया हवे तर त्याला. त्याने आकाशात पाहिले, त्याच्या नजरेस पडला तो चंद्र. कारण तोच त्याला दिसणारा सर्वात जवळचा आणि साध्या डोळ्यांनाही आकाराने मोठा दिसणारा असा ग्रह होता. हजारो वर्षांतून विकसित होत चाललेल्या मानवी आकलनशक्तीच्या लक्षात आल्या त्या चंद्राच्या कला आणि चंद्राचे धरतीवरच्या भरती-ओहोटीशी असलेले नाते. मानवाला वाटले या चंद्राचा आपल्याशी थेट संबंध आहे. त्याचा आपल्या आयुष्यावर आणि पृथ्वीवरही परिणाम होत आला आहे. मग त्याने हळूहळू त्याही पुढे जाण्याचा प्रयत्न केला. उत्तरोत्तर त्याला इतर ग्रहांचेही अस्तित्व जाणवले. मग त्याला वाटले की, या साऱ्या ग्रहांचाही आपल्या आयुष्यावर परिणाम होत असणार.. त्यातूनच पुढे आले भविष्यसूचन. त्यावेळेस माणसाला आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी आणि त्याबद्दल त्याची असलेली निरीक्षणे एवढेच हाती होते. त्यानंतर प्रदीर्घ कालावधी असाच सरला आणि अगदी पाच-सहाशे वर्षांपर्वी पुनरुत्थानाच्या कालखंडात काही शोधक जन्माला आले. तिथे आधुनिक विज्ञानाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. दुर्बिणी तयार झाल्या, त्या ग्रहांच्या दिशेने रोखल्या गेल्या. पूर्वी केवळ निरीक्षणे होती, त्याच्या वैज्ञानिक नोंदी होऊ लागल्या. त्याचा अभ्यास- संशोधन होऊन मग त्यातून निष्कर्ष काढले जावू लागले. माणसाला हेही कळले की, सूर्य पृथ्वीभोवती नव्हे, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे. केवळ पृथ्वीच नव्हे तर सारे ग्रहमंडळ स्वतभोवती भ्रमण करता करता सूर्यालाही प्रदक्षिणा घालते आहे. या साऱ्यांची तयार झाली आहे एक आकाशगंगा. जशी आपली आकाशगंगा आहे, तशाच कोटय़वधी आकाशगंगा या विश्वाच्या पसाऱ्यात आहेत. आपल्या आकाशगंगेपेक्षाही शतपटीने मोठय़ा असणाऱ्या आकाशगंगा या अखिल विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आहेत आणि मग मात्र हे वास्तव जसजसे खगोलविज्ञानाने लक्षात आणून दिले तसतशीे माणसाला त्याच्या क्षुद्रत्वाची जाणीवही झाली. या संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यात आपण एक क्षुद्र जीव आहोत, हे त्याला जाणवले. या विश्वाच्या पसाऱ्यात, इतर कोणत्या ना कोणत्या आकाशगंगेमध्ये मानवासारखे अस्तित्व असेलही, पण आपल्याला ज्ञात असलेले आपले अस्तित्व हेच सध्या तरी विष्टद्धr(२२४)वातले एकमात्र मानवसदृश अस्तित्व आहे, याची जाणीवही त्याला झाली. एका बाजूला हे सारे खगोल आणि विज्ञान- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असताना त्याला हेही पुरते कळून चुकले होते की, अखिल विश्वाचा पसारा एवढा मोठा, आपल्या कल्पनेपलीकडेही पोहोचलेला आहे, की अशा स्थितीत ग्रहगोलांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत आला आहे, असे मानणे हे विज्ञानाला पटणारे नाही. मग त्याने विज्ञान- तंत्रज्ञानाची कास धरली आणि प्रगतीला सुरुवात झाली. औद्योगीकरण आले. त्यातून उत्पादन आणि मग उत्पादनाच्या खरेदी- विक्रीतून कृषीच्या पलीकडे जाणारी अशी वेगळी नवी अर्थव्यवस्था अस्तित्वात आली. तोपर्यंत व्यवहार हा केवळ वस्तूंच्या विनिमयापुरताच मर्यादित होता. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था अस्तित्वात आली. मुक्त बाजारपेठ, भांडवली, साम्यवादी असे करत जगाला मुक्त मात्र तरीही नियंत्रित बाजारपेठेचा सुवर्णमध्यही सापडला. माणसाची संस्कृतीच मुळी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील बदलांचा परिणाम आपसूकच त्याच्या जीवनावरही होत गेला. समृद्धीच्या दिशेने जाणारा माणूस मग मंदीच्याही फेऱ्यात अडकला. त्याच्या आर्थिक कुवतीनुसार त्याची समाजव्यवस्थाही घडत होती. त्या समाजव्यवस्थेतही चढउतार होत, तो स्थिरावत होता. या साऱ्याला व्यापून राहिले होते ते राजकारण. राजकारण हा कळीचा मुद्दा असणार याची जाणीव त्याला झाली. अर्थसत्तेप्रमाणेच राजकारण, पर्यायाने सत्ताकारण वेग घेत होते. जगाने यातही वेगवेगळे प्रयोग करून पाहिले आणि त्यातही त्याला लोकशाहीचा सुवर्णमध्य सापडला. पण हे सारे होत असताना मानवी मन मात्र सुरुवातीपासून अगदी तसेच राहिले आहे. त्यामुळे त्या अथांग मनाने असंख्य गोष्टींना जन्म दिला. त्यात राग-लोभापासून ते मोह- मत्सरापर्यंत सारे काही होते. वेगवेगळ्या वेळी ते मानवाने वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवले इतकेच. म्हणजे महाभारत घडले यावर विश्वास ठेवायचा तर माणसाचे तेच गुणावगुण आजही आहेत. तेव्हाही भाऊबंदकी होती, आजही आहे. तेव्हाही लढाई होती, आजही युद्ध आहे, युद्धखोरी आहे. जगावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. हे सारे करत असताना ज्या मूळ खगोलविज्ञानाच्या बळावर आपण इथवर पोहोचलो, त्या विज्ञानाने दिलेली दृष्टी आणि दृष्टिकोन मात्र आपण हरवत चाललो आहोत. अखिल विश्वाच्या या पसाऱ्यात म्हटले तर आपण अतिक्षुद्र आहोत, याची जाणीव याच खगोलाने मानवाला करून दिली होती. पण आपणच परमताकदवान आहोत, असे त्याला वाटू लागले. मग जाती-धर्म सुटून त्याचा प्रवास मानव्याच्या समृद्ध परंपरेच्या दिशेने होण्याऐवजी उलटाच सुरू झाला. अर्थव्यवस्था, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रवास मुळाच्या दिशेने केला तर माणसाला शहाणपण येईल अशी स्थिती आहे आणि मूळ विसरलो तर प्रवास सर्वनाशाच्या दिशेने सुरू होईल.. पण याचे भान तर यायला हवे ना? मस्तीत असलेल्या आजच्या माणसाला हे भान देण्याचे काम या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षांच्या निमित्ताने आले तरी ते पुरेसे असेल. समर्थ रामदासांनी सांगितले, ‘तिसरे ते सावधपण सर्वविषयी’. या नव्या वर्षांत पुढले पाऊल टाकताना या सर्वच क्षेत्रांत सावधपणाची सर्वाधिक गरज आहे. त्यासाठी ते पाऊल टाकण्यापूर्वी आपल्यासमोर असलेल्या जागतिक मंदी, दहशतवाद, मूलतत्त्ववाद, पराकोटीची धार्मिकता, संकुचित धर्मवाद, धर्माला राष्ट्राशी जोडण्याची वृत्ती या साऱ्या विनाशकारी बाबी देत असलेल्या हाका सावधपणे ऐकायला हव्यात, समजून घ्यायला हव्यात. तरच आपल्याला आपल्या मनाची तयारी करतानाच, योग्य ते नियोजनही करता येईल. तसे केले तरच आपण या नव्या वर्षांचे स्वागत करून नव्या अडथळ्यांवर सक्षमतेने मात करू शकू! आज आपल्या जीवनाचा कब्जा दुष्ट शक्तींनी घेतला आहे. त्यांनीच माणसाला दुरित - गरीब - केले आहे. त्यांचा सामना करायचा तर आपल्या परिस्थितीचे ज्ञान आणि आत्मभान येण्याची गरज आहे. आत्मभान ही ज्ञान आल्यानंतरची पायरी आहे. तसे झाले तर भविष्यसूचन निश्चित करता आले नाही तरीही येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्याची ताकद आपल्यात येईल आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केलेली प्रार्थना प्रत्यक्षात येईल- दुरितांचे तिमिर जावो..!