Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

सिनेगॉगमध्ये..
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची दखल जगभर घेतली गेली आणि त्यानंतर लगेचच चर्चा सुरू झाली ती भारतात असलेल्या ज्यू धर्मियांविषयी, निमित्त होते ते नरिमन हाऊस. नरिमन हाऊस ही ज्यू धर्मियांची इमारत. इथे असलेल्या ज्यू धर्मियांची दहशतवाद्यांनी अतिशय क्रूरपणे हत्या केली, त्याची प्रतिक्रिया केवळ इस्रायलमध्येच नव्हे तर जगभरात उमटली. खरेतर भारतात वर्षांनुवर्षे वास करून असलेल्या या इस्रायलींना बेने इस्रायली म्हणतात. काही शतके हा समाज इथे राहतोय. १९४७च्या सुमारास इस्रायलही स्वतंत्र झाला आणि भारतातील अनेक बेने इस्रायली इस्रायलला परत गेले. पूर्वी हा समाज ५० ते ६० हजारांच्या आसपास होता तो आता केवळ साडेचार हजारांवर आला आहे. या समाजाची प्रार्थनास्थळेही वेगळी आहेत आणि दफनभूमीही

 

वेगळ्या आहेत. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग म्हणतात. मुंबईतील असेच एक जुने सिनेगॉग सात रस्त्याजवळ वसलेले आहे. मागेन हासिदीम सिनेगॉग. मागेन हासिदीम म्हणजे सात्विक लोकांची ढाल किंवा भाविकांचा कैवारी. सर्वसाधारणपणे पारसी अग्यारीत इतर धर्मियांना जसा प्रवेश मिळत नाही त्याचप्रमाणे सिनेगॉगमध्येही इतर धर्मियांना प्रवेश मिळत नाही. मात्र मागेन हासिदीमने ‘लोकसत्ता’साठी खास आपले दरवाजे खुले केले आणि एक वेगळेच विश्व समोर उभे राहिले..
सर्वसाधारणपणे एखाद्या मोठय़ा हॉलप्रमाणेच या सिनेगॉगची रचना आहे. वरच्या बाजूस खास सज्जा पाहायला मिळतो. खालच्या हॉलमध्ये पुरुषांना तर महिलांना केवळ सज्जामध्ये प्रवेश असतो. डोक्यावर टोपी त्याला किप्पा असे म्हणतात, ती घालूनच आत प्रवेश करावा लागतो. जुन्या चर्चमध्ये प्रवेश केल्यानंतर अनुभवास येणारे वातावरणच इथेही अनुभवास येते. या सिनेगॉगमध्ये तीन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असते. मधोमध एक चौथरा असतो. त्याला तेबा असते म्हणतात. यावर धर्मगुरू उभे राहून पवित्र धर्मग्रंथांचे वाचन करतात. हिंदूूंच्या मंदिरामध्ये ज्या प्रमाणे देवाची मूर्ती असते, तशी मूर्ती इथे नसते. इथे असते ते एक पवित्र कपाट ज्याला एखाल म्हणतात. त्याला सजवलेले असते आणि त्याच्या आतमध्ये असतात विशेष पवित्र मानले गेलेले धर्मग्रंथ. त्याला तोरा म्हणतात. याचा विशेष सांगताना सिनेगॉगचे अध्यक्ष विश्वस्त आब्राहम सॅमसन म्हेडेकर म्हणाले की, तोरा कागदावर नव्हे तर हरणाच्या चामडय़ावर लिहिले जाते. त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्याला हात लावण्याची परवानगी कुणालाही नाही. ते विशिष्ट प्रकारे गुंडाळी करून जपले जाते. सिसिद परिधान केलेली व्यक्तीच त्याला सिसिदच्या माध्यमातून स्पर्श करू शकते. सिसिद प्रार्थनासभेला आलेल्या प्रत्येकाला परिधान करावे लागते. सिनेगॉगमध्ये प्रवेश केल्यापासून आपण वेगळ्या वातावरणात असतो कारण आजूबाजूला सर्वत्र हिब्रू लिपीतील मजकूर आपल्याला पाहायला मिळतो. (पाहायला एवढय़ाचसाठी कारण तो वाचणे आपल्याला शक्य नसते.)
ज्यूंच्या या सिनेगॉगमध्ये सर्वाधिक मानले जाते ते एलियाहू हन्नाबी यांच्या खुर्चीला. सजवलेल्या दोन खुच्र्या तोराच्या दोन्ही बाजूस ठेवलेल्या असतात. तोराच्या डाव्या बाजूला असलेली खुर्ची हन्नाबीची पवित्र खुर्ची असते. तर उजवीकडची खुर्ची ही लहान मुलाची सुंता करण्यासाठी वापरली जाते. याबाबत माहिती देताना आहारोन शिमशोन दिघोरकर म्हणाले की, जन्मानंतर बरोब्बर आठवडय़ाने सुंता केली जाते. त्यावेळेस या दोन्ही खुच्र्या बाजूबाजूला ठेवल्या जातात. लहान मुलाला हन्नाबीच्या खुर्चीवर ठेवून नंतर दुसऱ्या खुर्चीवर मुलाच्या घरातील ज्येष्ठास बसवून नंतर मुलाची सुंता केली जाते. हन्नाबींनी अग्निरथातून देवाची भेट घेतली असे मानले जाते. हन्नाबीची कथा ही तुकोबांच्या पुष्पक विमानाप्रमाणेच आहे.
तोराच्या वरच्या बाजूस एक दिव्याची हुंडी पाहायला मिळते, यात २४ तास दिवा तेवत असतो, त्याला तामीदचा दिवा म्हणतात. यात खोबरेल तेल वापरले जाते. आजूबाजूला अनेक ठिकाणी देवाच्या १० आज्ञा लिहिलेल्या असतात. (ख्रिश्चन धर्मियांमध्ये नवीन आज्ञा आहेत तर ज्यूंमध्ये प्राचीन आज्ञा म्हटल्या जातात.) सिनेगॉगच्या प्रवेशद्वारावर मेजुजा पाहायला मिळतो. त्याविषयी माहिती देताना डॅनियल ऐझ्ॉक चौलकर म्हणाले की, या डिझाईनमध्ये खालच्या बाजूस जेरुसलेम, मधल्या बाजूस वेलिंग वॉल पाहायला मिळते. हा मेजुजा प्रत्येक ज्यूंच्या घरावर पाहायला मिळतो. तो शुभ मानला जातो.
ज्यूंमधील प्रथा प्राचीन असून त्या आजही पाळल्या जातात. ज्यूंच्या नियमांनुसार, काही व्यक्तींना प्रशिक्षण देऊन मासांहारासाठी प्राणी कापण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मुळात प्राण्यांना त्रास होणार नाही किंवा कमी त्रास होईल, अशी पद्धत त्यांना शिकवली जाते. त्यांनी कापलेले प्राणीच मांसाहारासाठी भक्षण केले जातात. मुळात प्राण्यांना कोणताही विकार झालेला नाही ना, याची खात्री या प्रशिक्षित व्यक्तीकडून केली जाते. दर शनिवारी शब्बाद असते. म्हणजे तर वर्षभरातून एक दिवस किपूर डे साजरा केला जातो.
एरव्ही या सिनेगॉगमध्ये चपला, बूटांसह प्रवेश केला तर चालू शकतो. मात्र त्या दिवशी सारे जण पायताण बाहेर उतरवतात आणि हातून घडलेल्या पापांसाठी क्षालन म्हणून माफी मागितली जाते. सारे जण पांढरे स्वच्छ कपडे घालून त्या दिवशी सिनेगॉगमध्ये येतात.. ज्यूंमध्ये एकूण ४० दिवस उपास केला जातो. हा कडक उपास असतो. पाणीही प्राशन केले जात नाही. किपूर डेचा उपासही असाच कडक उपास असतो. त्या दिवशी सिनेगॉगमध्येच काळ्या मनुकांचे सरबत तयार करून उपास सोडला जातो. हा उपास साधारणपणे ३० तासांनंतर सोडला जातो..
मागेन हासिदीमचे सदस्य अनेक प्रथा- परंपरा सांगत होते. आणि सिनेगॉग पाहता पाहता नवे विश्व उलगडत होते.. प्रश्न पुन्हा येऊन ठेपला तो नरिमन हाऊसपाशीच. त्यावर सर्वजण एकसुरात म्हणाले, आजवर भारतात आम्हाला कोणत्याही धर्मियांकडून कधीही एवढय़ा शतकांमध्ये त्रास झालेला नाही.. आताही हल्ला झाला तो विदेशी व्यक्तींकडून. या देशवासीयांकडून नाहीत. आणि आम्ही बेने इस्रायली तर इथल्याच मातीतले आहोत.. सारे काही इथेच.. भारतात! याच मातीत! जन्मही आणि मृत्यूदेखील!
vinayakparab@gmail.com

नीताई दास यांची जहांगीरमध्ये चित्रकथी
चित्रकार नीताई दास यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या जहांगीर कलादालनात भरले आहे. लोककथा, पौराणिक कथा, दंतकथा यांच्यावर आधारित चित्रे निताई यांनी रेखाटली आहेत. पौराणिक कथांमधील नाव चालविणाऱ्या महिला, त्यांचा पारंपरिक पेहराव, गायींना चारायला नेणारी गुराखी महिला, आधुनिक काळातील शृंगार करणारी महिला, कवेमध्ये मुलाला सांभाळणारी माता, लोकनृत्य करणारे ग्रामीण कलाकार, ढोलकी, नगारा वाजविणारे कलाकार, गिटाराच्या तालावर मंत्रमुग्ध झालेली तरुण पिढी यांचे चित्रण नीताई दास यांनी केले आहे. नीताई दास यांच्या आगळ्या शैलीमुळे चित्रे देखणी झाली आहेत. अ‍ॅक्रेलिक रंगाचा वापर चित्रांमध्ये करण्यात आला आहे. आकर्षक रंगसंगतीमुळे ही चित्रे वेधक वाटतात.
हे प्रदर्शन सध्या जहांगीर आर्ट गॅलरी, काळाघोडा, मुंबई येथे भरले आहे. मंगळवार, ६ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सर्व चित्ररसिकांना पाहता येईल.
प्रतिनिधी

सेजल आर्ट गॅलरीमध्ये समूह चित्रप्रदर्शन
चित्रकार मधुमीता भट्टाचार्य, मधु मोहिले, राखी बैद व गीता माटे यांचे समूह चित्रप्रदर्शन सध्या कांदिवली येथील सेजल एन्कासा आर्ट गॅलरीमध्ये भरले आहे. हिरव्या रंगातील गौतम बुद्धाची प्रसन्न मुद्रा, खळखळणाऱ्या समुद्रातील बोट, संतांची रुपे, फुलांचे आकर्षक आकार या प्रदर्शनात पाहायला मिळतात. तैलरंगातील चित्रे, बुद्धाचा शांततेचा संदेश, चित्रांतील विविध पोतकाम, निसर्गाची विविध रुपे, देवाचा संदेश चित्रांतून व्यक्त करण्यात आला आहे. हे प्रदर्शन सेजल एन्कासा आर्ट गॅलरी १७३/१७४, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम) मुंबई- ६८ येथे सध्या भरविण्यात आले आहे. सोमवार, ५ जानेवारी २००९ पर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान पाहता येईल.
प्रतिनिधी