Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९
लोकमानस
वैज्ञानिकांना साथ देण्याचा संकल्प करुया
सरत्या वर्षांकडे वळून पाहताना नोव्हेंबर या एकाच महिन्यात घडलेल्या दोन परस्परविरोधी घटना ठळकपणे लक्षात आल्या. चांद्रयानाची चांद्र-संशोधक मुख्य कुटी यशस्वीपणे चंद्रभूमीवर उतरली ती नोव्हेंबरमध्ये. आणि महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात कधीही न पुसला जाणारा घाव झाला!
आपल्या अंतराळ संशोधन संस्थेने- इस्रोने- अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले चांद्रयान वैशिष्टय़पूर्ण होते. भारतीय संशोधकांनीच स्वतंत्रपणे त्याचा आराखडा तयार केला होता. यानाचे प्रवासाचे नियोजित सर्व टप्पे अचूक पार पाडून चांद्र-संशोधक मुख्य कुटी अलगदपणे चंद्रभूमीवर उतरली तेव्हा देशाचा तिरंगाही चंद्रभूमीवर दाखल झाला!
 

या क्षेत्रातील आद्य भारतीय शास्त्रज्ञ डॉ. होमी, भाभा व विक्रम साराभाई यांच्यापासून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि विद्यमान माधवन् नायर आणि त्यांचे सहकारी यांच्यापर्यंत सर्व शास्त्रज्ञांच्या सातत्यपूर्ण व सांघिक कार्यामुळेच हे यशाचे शिखर गाठता आले. या शास्त्रज्ञांची अविचल कार्यनिष्ठा, सखोल अभ्यास, अथक परिश्रम आणि देशाशी अतूट बांधिलकीमुळेच भारताला हा गौरव झाला.
आमच्या शास्त्रज्ञांनी ही गगनभरारी मारली, त्या काळात आमच्या देशाच्या प्रत्यक्ष भूमीवर काय घडत होते? शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आपल्यातच काही जणांनी केलेले बॉम्बस्फोट, निरनिराळ्या राजकीय पक्षांचे निषेधमोर्चे व दगडफेक असे भीषण प्रकार सर्वत्र चालू होते! आम्ही यादवीच्या चिखलात पाय रुतवत होतो.
‘ते’ चित्र आणि ‘ह’े चित्र यांची तुलना मनात होत असतानाच २६ नोव्हेंबर रोजी रात्री घडलेल्या घटनांतून या भीषण विसंगतीचे विदारक प्रत्यंतर आले. केवळ १०-१२ अतिरेक्यांनी आकस्मिक हल्ला करताच आपली गुप्तहेर यंत्रणा, सुरक्षा-व्यवस्था, शासकीय यंत्रणेची कार्यतत्परता, नेत्यांची आकलनक्षमता या सर्वाचीच विदारक अवस्था जगाच्या वेशीवर टांगली गेली!
आपण बौद्धिकता, विचार, तात्त्विक बैठक अशा सर्व मूलभूत बाबी झुगारून देऊन भावनात्मक आवाहन, राजकीय ‘सोय’, वैयक्तिक स्वार्थ आणि त्यासाठी झुंडगिरी यांनाच महत्त्व देऊ लागलो आहोत, सखोल अभ्यास, शास्त्रीय विचार आणि सच्ची अंमलबजावणी हे आज घडीला आपले राष्ट्रीय धोरण राहिलेलेच नाही, हे यावरून पुन्हा दिसले.
राजकीय नेतृत्वाची लाजिरवाणी अवस्था पाहून आमच्या ‘लोकशाही’ला परिपक्व दशेत येण्यासाठी ‘लक्षावधी मैलांचा प्रवास’ करायला हवा आहे, याची जाणीव झाली. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातून भारताला हिमालयीन उंचीचे नेते लाभल्याची नोंद इतिहासकारांनी करून ठेवली असली तरी राष्ट्राला दिलेल्या अभिवचनांची पूर्तता करण्यासाठी अजून कित्येक मैलांचा प्रवास करणे आवश्यक असल्याची जाणीव पं. नेहरूंना झाली होती. ती अस्वस्थता एका इंग्रजी कवीच्या काव्यपंक्तींच्या रूपात त्यांनी दैनंदिनीत लिहून ठेवली होती.I have promises to keep : And miles to go before I sleep...
या चिंतनादरम्यान एवढेच वाटते की गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकांप्रमाणे आपणही प्रामाणिकपणे कर्तव्ये बजावूया!
उमाकांत कामत, बोरिवली, मुंबई

ज्योतिषशास्त्राचे भ्रामक उदात्तीकरण
‘ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाला परदेशात मागणी’ (१८ डिसेंबर) ही बातमी वाचली. त्यात म्हटले आहे की, ‘आकाशस्थ ग्रह, राशी, नक्षत्रांचा परिणाम प्राणिमात्रांवर होतो, हे अपवाद वगळता, सर्वमान्य आहे’. हे विधान पटते पण ज्योतिषशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान कोणालाही नाही हेही सर्वविदित आहे, तथापि आशानिराशा अगतिक मानवाला मन:शांतीसाठी ज्योतिष्यांकडे वळवतात, हे नजरेआड करून चालणार नाही.
ज्योतिषशास्त्राचे दोन विभाग आहेत. १) कुंडली विज्ञान आणि २) फलज्योतिष (हॉरोस्कोप आणि प्रेडिक्शन). प्रथम विभागात संपूर्ण गणितच आहे, पण ते अभ्यासक्रमांत सामिल करण्याइतके विस्तृत नाही आणि दुसरे फलज्योतिष तर केवळ ग्रहाधारित तर्कशास्त्र आहे. ते संपूर्ण सत्याच्या कसोटीवर सिद्ध झालेले नाही. रामायणकाळापासून आजपर्यंत या शास्त्रात तसूभरही प्रगती, नवीन संशोधन नाही. असे असताना ‘राजकीय आकसामुळे याला अभ्यासक्रमात समाविष्ट केले जात नाही’, असे बातमीत म्हणणे बरोबर नाही.
काही महिन्यांपूर्वी पुण्यात विद्वानांनी ज्योतिषशास्त्राची चाचणी घेतली होती ती अगदी मर्यादित स्वरूपाची होती तरीही त्यातून काही विशेष निष्पन्न झाले नाही. काही ज्योतिषांचे तर्क बरोबर निघाले होते, तेही ढोबळ मानाने. तीन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ने ज. परवेझ मुशर्रफ यांची कुंडली देऊन भाकित वर्तवायला सांगितले होते, पण त्यातून काही उलगडा झाल्याचे दिसले नाही.
प्रस्तुत मजकुरामध्ये ‘चरित्र्य’ हा शब्द वापरला आहे. सरकारचा व ज्योतिषींचा आपल्या ज्ञानावर विश्वास असेल व त्याला यच्चयावत जनतेची मान्यता असेल तर सर्व अधिकारी /कर्मचारी, नेते, लोकप्रतिनिधींची कुंडली मांडून, ते चारित्र्यवान आहेत का, हे तपासून नियुक्ती करावी. म्हणजे भारत सुधारण्यास वेळ लागणार नाही. पण ज्योतिषी चारित्र्यवान नसले तर तेही पैसे खाऊन खोटे प्रमाणपत्र देतील, त्याचे काय?
द. वि. थत्ते, डोंबिवली

पर्यावरण रक्षण साधले
ल्ल दिव्याचे अनधिकृत बांधकाम तोडल्याबद्दल सर्व पोलीस, पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे, अभिनंदन. तिवरांची कत्तल करून केले गेलेले हे अनधिकृत बांधकाम पाडणे पर्यावरणाविषयी गरजेचे होते. २६ जुलै २००५ ला फुगलेल्या खाडीचे पाणी पसरायला जागा मिळाली नाही याला कारण या सखल भागात झालेले अनधिकृत बांधकाम.
भविष्यात पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या सायन-कुल्र्याला गाडय़ा बंद पडतात तशाच त्या येत्या काही वर्षांत दिवा-मुंब्रा-डोंबिवलीलाही बंद पडून मुंबईचा उर्वरित महाराष्ट्राशी रेल्वेने संपर्क नक्की तुटणार आहे. हे टाळण्यासाठी हे तिवराचे क्षेत्र सुरक्षित राखणे गरजेचे आहे.
याबाबत सध्याची मोहीम स्तुत्य आहे. उशीरा का होईना ही कारवाई झाली हे पाहून दिलासा वाटला.
मकरंद जोशी, ठाणे

‘शतक’ नको, ‘पॅकेज’ हवे!
ल्ल ऐतिहासिक चेन्नई कसोटी विजयानंतर सचिन तेंडुलकरने २६ नोव्हेंबरच्या शहीदांना, तसेच बळींना आपले ४१ वे कसोटी शतक अर्पण केले. सचिनने हे ‘स्पेशल शतक’ अर्पण केल्यानंतर देशातील सर्वच वर्तमानपत्रांनी सचिनच्या पराक्रमावर स्तुतिसुमने उधळून रकानेच्या रकाने भरले. सचिनने ज्या भावना व्यक्त केल्या, त्याच भावना देशवासीयांनी मेणबत्त्या लावून, रक्तदान करून, शांतता मेळावे/यात्रा यांचे आयोजन करून व्यक्त केल्या. आपले ४१वे शतक अर्पण करताना सचिनने ज्या भावना व्यक्त केल्या, त्या शहीदांचे उद्ध्वस्त झालेले संसार सावरू शकणार नाहीत हे तेवढेच सत्य आहे. सचिनने या ‘स्पेशल’ शतकांबरोबर एक ‘स्पेशल आर्थिक पॅकेज’ जाहीर केले असते तर तीच खरी आदरांजली ठरली असती.
चंद्रकांत पाटणकर, माहीम, मुंबई