Leading International Marathi News Daily                                     गुरुवार , १ जानेवारी २००९

‘थर्टी फर्स्ट’ कडक सुरक्षेतला!
मुंबई, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी
जुने वर्ष सरते आणि नवीन वर्ष येते.. हा दरवर्षीचाच शिरस्ता आहे.. सगळेजण जुन्या वर्षांतील कडू-गोड आठवणींना मागे ठेवून जल्लोषपूर्ण वातावरणात नव्या उमेदीने नव्या वर्षांचे स्वागत करतात.. यंदा मात्र नववर्षांच्या स्वागतावर दहशतवादाची काळी छाया होती.. दहशतवाद्यांनी मुंबईकरांच्या मनावर खोलवर क्रुरतेचे व्रण उमटवले आहेत.. पण या व्रणांना कवटाळत न बसता त्यावर फुंकर घालत मुंबईकरांनी या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस आणि निष्पाप नागरिकांचे स्मरण करून सरत्या वर्षांला निरोप दिला व २००९च्या नव्या, उमेदपूर्ण आणि सप्तरंगी पिसाऱ्यांनी फुललेल्या पहाटेचे स्वागत केले!
मात्र नववर्षांचे स्वागत करताना रस्त्या-रस्त्यावर पोलीस होते. थर्टी फर्स्टसाठी फेव्हरिट असलेल्या गेट वे ऑफ इंडियाला मेटल डिटेक्टरमधून जावे लागत होते. कुलाबा, जुहू परिसरात काही ठिकाणी पार्किंगसाठीही बंदी घालण्यात आली होती.. दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर रस्त्यावरील जल्लोषासाठी पोलिसांनी रात्री साडेबाराची मुदत घातल्याने अनेकांनी घराबाहेर पडण्याऐवजी घरच्या घरीच नववर्षांचे स्वागत करणे पसंत केले.
आधीच जागतिक मंदी आणि त्यातच गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे नव्या वर्षांच्या स्वागताला बाहेर पडलेल्या मुंबईकरांमध्ये दरवर्षीचा जोश दिसत नव्हता. ३१ डिसेंबरच्या रात्री गेट वे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी ही ठिकाणे माणसांनी फुलून गेलेली असतात. या वर्षी मात्र सर्वत्रच गर्दीचे प्रमाण कमी होते. मुंबईत विविध लहान-मोठय़ा पबमध्ये ३१ डिसेंबरच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूडमधील कलाकारांनीही ३१ डिसेंबर घरच्यांचासमवेत साजरा केला तर काही जण कामानिमित्त परदेशात होते. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने कार्यालयातून लवकर बाहेर पडल्याने दुपारपासूनच लोकलला गर्दी होती. दरवर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री पूर्व आणि पश्चिम उपनगरांतून माणसांचे जथ्थेच्या जथ्थे दक्षिण मुंबईच्या दिशेने येतात. यंदा मात्र दक्षिणमुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या रोडावली होती.

मुंबईवर हल्ला ‘लष्कर’नेच केला!
झरार शाहची स्पष्ट कबुली

न्यूयॉर्क, ३१ डिसेंबर/पी.टी.आय.
मुंबईवरील हल्ल्यात ‘लष्कर-ए-तैय्यबा’ या अतिरेकी संघटनेचा हात होता आणि मुंबई पोलिसांनी जिवंत पकडलेला अतिरेकी अजमल कसाब याने जबानीत दिलेली माहिती खरी आहे, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या ‘लष्कर’च्या एका अतिरेक्याने दिली आहे. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात ही माहिती दिली आहे.

काळ, काम आणि वेगाचे गणित साधत पुन्हा सत्तेवर येणार
संदीप आचार्य
मुंबई , ३१ डिसेंबर

कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर आली आहे याची पूर्ण जाणीव आहे. हाती असलेला कार्यकाळ लक्षात घेऊन काम, काळ आणि वेगाचे गणित साधण्याचा प्रयत्न राहणार असून त्यामुळे काँग्रेस आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेपर्यंत त्याचा थेट लाभ पोहोचविण्याचा आपला नववर्षांचा संकल्प असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्यातील विजेच्या टंचाईपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तसेच वाढती बेरोजगारी, सिंचनाचे प्रकल्प, विदर्भ आणि मराठवाडय़ाचा अनुशेष भरून काढणे अशी अनेक आव्हाने सरकारसमोर आहेत.

पांडेने दिलेल्या जबानीमुळे पुरोहित अडकणार?
मुंबई, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी

मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याच्या आरोपावरून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेला स्वयंघोषित धर्मगुरू दयानंद पांडे याने या कटाची कबुली देताना दिलेल्या जबानीत सध्या भारतीय लष्करात असलेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह आणखीही काही सूत्रधारांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) उपायुक्तांनी पांडेची जबानी नोंदविल्यामुळे ती न्यायालयातही ग्राह्य धरली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास पुरोहितला लष्करी कारवाईला सामोरे जावेच लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.
स्वयंघोषित धर्मगुरू म्हणविणाऱ्या दयानंद पांडे याने या कटाची संपूर्ण माहिती दिल्याचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. मात्र याबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला आहे. पांडे याच्याकडील लॅपटॉपवर सापडलेल्या एका ध्वनिचित्रफितीमुळे मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट उघड झाला आहे. या चित्रफितीत नाशिक येथे २००७ मध्ये झालेल्या बैठकीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या बैठकीला आठजण उपस्थित होते. या बैठकीला पांडे मार्गदर्शन करीत होता. त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अन्य आठजण कोण होते याचीही ओळख पटली असून या जबानीचा योग्यवेळी वापर केला जाणार असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. दहशतवादी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या करकरे यांनी त्याचवेळी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला होता आणि मोक्का कायद्यानुसार आरोपींच्या जबानी नोंदविण्यास सुरूवात केली जाणार होती. त्यानुसार एकेक आरोपीची जबानी नोंदविली जात असून पांडेची जबानी हादेखील त्याचाच भाग असल्याचे सांगण्यात येते.

गृहकर्जदारांना नववर्षांची भेट
आयसीआयसीआयने केली अर्धा टक्क्याची कपात
मुंबई, ३१ डिसेंबर/ व्यापार प्रतिनिधी

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या गृहकर्जदारांना नव्या वर्षांचे सहर्ष स्वागत करता येईल. विद्यमान त्याचप्रमाणे नव्या गृहकर्जदारांना आता व्याज दरात अर्धा टक्क्यांच्या कपातीचा लाभ नवीन वर्षांपासून आयसीआयसीआय बँकेने देऊ केला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वाहनांसाठी तसेच घरासाठी ‘फ्लोटिंग’ प्रकारातील कर्ज घेतलेल्या ग्राहकांना आजपासून १४.२५ टक्क्यांऐवजी नवीन १३.५ टक्के व्याजाचा दर लागू होईल, असे बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे बँकेने मुदत ठेवींवरील व्याजाच्या दरातही अर्धा ते पाऊण टक्क्यांनी कपात लागू केली आहे. दरम्यान एचडीएफसीनेही १ जानेवारीपासून घरांसाठी व गृहप्रकल्पांसाठी कर्जावर अर्धा ते सव्वा टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. तर स्टेट बँकेनेही नव्या वर्षांत आपल्या प्रधान ऋण दरात पाऊण टक्क्यांची कपात केली जाईल, असे सूचित केले आहे.

धुळ्यानजीक अपघातात पाच महिला ठार
धुळे, ३१ डिसेंबर / वार्ताहर

तालुक्यातील कावठी येथून लोणखेडीकडे निघालेल्या अॅपे रिक्षाला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील पाच महिला जागीच ठार झाल्या. कुसुंबा गावाच्या पुढे लोंढी नाल्याजवळ झालेल्या या अपघातातील सर्व मृत महिला कावठी येथील रहिवासी होत्या. अपघातात अन्य सहा महिला गंभीर जखमी झाल्या असून अपघाताच्या वृत्ताने परिसरावर शोककळा पसरली आहे. शेतमजुरीसाठी या महिला अॅपे रिक्षातून लोणखेडीकडे निघाल्या होत्या. सकाळी साडे दहाच्या सुमारास झालेल्या या भिषण अपघातात शोभा चतुर पाटील (२९), सुनंदाबाई पाटील (३२), मीराबाई पाटील (५०), मोणबाई पाटील (२८) व बेबीबाई पाटील (३९) या जागीच ठार झाल्या तर विमलबाई पाटील, मालुबाई पाटील, विमलबाई पारधी, सुनंदाबाई सापीट, भागाबाई धोबी व सुनंदा पाटील या गंभीर जखमी झाल्या.

राष्ट्रवादीची घोडदौड सुरू
धुळे व नगरमध्ये महापौरपदे पटकावली
मुंबई, ३१ डिसेंबर / खास प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषदेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने धुळे आणि नगर महापालिकांची महापौरपदे आज पटकावली. राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पद्धतशीर व्यूहरचना सुरू केली आहे.
नगर आणि धुळ्यात सर्वाधिक जागाजिंकल्यानंतर काँग्रेस व अन्य छोटय़ा पक्षांची मोट बांधून दोन्ही शहरांमध्ये राष्ट्रवादीने महापौरपदे पटकावली आहेत. जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमध्ये चांगले यश मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकांमध्ये पीछेहाट झाली होती. या पाश्र्वभूमीवर धुळे आणि नगरमध्ये महापौरपद पटकावून राष्ट्रवादीने शहरी भागात जम बसविण्याच्या दृष्टीने सुरुवात केल्याचे मानले जात आहे. नगरमध्ये महापौरपद मिळविण्यासाठी १० पेक्षा जास्त नगरसेवकांची गरज असताना जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला. धुळे व नंदुरबार हे वर्षांनुवर्षे काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जात होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसचा धुव्वा उडविला. यापाठोपाठ धुळे महापालिकेचे महापौरपद पटकावून उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा निश्चितच फायदा होईल.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी

दिवाळी २००८