Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईवर हल्ला ‘लष्कर’नेच केला!
झरार शाहची स्पष्ट कबुली
न्यूयॉर्क, ३१ डिसेंबर/पी.टी.आय.

 
मुंबईवरील हल्ल्यात ‘लष्कर-ए-तैय्यबा’ या अतिरेकी संघटनेचा हात होता आणि मुंबई पोलिसांनी जिवंत पकडलेला अतिरेकी अजमल कसाब याने जबानीत दिलेली माहिती खरी आहे, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या ‘लष्कर’च्या एका अतिरेक्याने दिली आहे.
अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. मुंबईवरील हल्ल्यात ‘लष्कर’चा सक्रिय सहभाग होता. या हल्ल्यात भाग घेतलेल्या १० अतिरेक्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. आणि त्यानंतर कराचीहून समुद्रामार्गे बोटीने ते मुंबईला आले, अशी कबुली झरार शाह या ‘लष्कर’च्या एका अतिरेक्याने पाकिस्तानी यंत्रणांना दिली आहे. एवढेच नव्हे तर या हल्ल्यादरम्यान सहभागी अतिरेक्यांशी आपण संपर्कात होतो आणि त्यांना मार्गदर्शन करीत होतो, असेही झरार शाहने सांगितले आहे. मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानने सुरू केलेल्या मोहिमेत हा झरार शाह त्यांच्या हाती सापडला होता. ‘लष्कर’चा कमांडर झाकीऊर रेहमान लखानी याच्याबरोबरच झरारलासुद्धा अटक करण्यात आली होती. मुंबई हल्ल्यातील १० अतिरेक्यांचा ‘लष्कर’शी घनिष्ठ संबंध असल्याचे आता पाकिस्तानी यंत्रणांनी सुरू केलेल्या तपासमोहिमेतही उघड होऊ लागले आहे. या अतिरेक्यांनी कराचीमध्ये किमान काही आठवडे मुक्काम ठोकला होता. नागरी जीवनात अतिरेकी कारवाया कशा घडवून आणायच्या याचे प्रशिक्षण त्यांना या काळात देण्यात आले, असेही या झरार शाहने सांगितले असल्याचे ‘वॉल स्ट्रीट’ने या तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे. झरार शाहच्या या कबुलीजबाबामुळे मुंबई हल्ल्याची सूत्रे पाकिस्तानातच होती आणि त्यासाठी आता पाकिस्तानने त्या सूत्रधारांना शासन तरी करावे अथवा त्यांना भारताच्या हवाली करावे, असा दबाव आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानवर टाकला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. झरार शाहचा हा कबुलीजबाब खरा असल्याचा आणखीनही एक पुरावा अमेरिकेच्या हाती लागला आहे. ताजवर हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याशी झरार शाहचे झालेले संभाषण अमेरिकी गुप्तचरांनी टॅप केले आहे.

लखवीला भारताच्या ताब्यात देण्यासाठी अमेरिकेचे पाकिस्तानवर दडपण
इस्लामाबाद : दरम्यान, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार समजला जाणारा ‘लष्कर’चा कमांडर झाकिर ऊर रहमान लखावी याला भारताच्या ताब्यात दिले जावे असा जोरदार दबाव अमेरिकेने पाकिस्तानवर टाकला आहे. लखावी आणि ताजमहाल हॉटेलवर हल्ला करणारा एक अतिरेकी यांच्यातील संभाषणाची टेप अमेरिकेने पाकिस्तानला दिली असल्याचे म्हटले जात आहे. या टेपमधील संभाषण खरे असून त्यातील आवाज लखावीचाच असल्याचा निर्वाळाही तज्ज्ञांनी दिला आहे. एका अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने ‘डॉन’ या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.