Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

काळ, काम आणि वेगाचे गणित साधत पुन्हा सत्तेवर येणार
संदीप आचार्य
मुंबई , ३१ डिसेंबर

 

कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर आली आहे याची पूर्ण जाणीव आहे. हाती असलेला कार्यकाळ लक्षात घेऊन काम, काळ आणि वेगाचे गणित साधण्याचा प्रयत्न राहणार असून त्यामुळे काँग्रेस आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेपर्यंत त्याचा थेट लाभ पोहोचविण्याचा आपला नववर्षांचा संकल्प असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्यातील विजेच्या टंचाईपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तसेच वाढती बेरोजगारी, सिंचनाचे प्रकल्प, विदर्भ आणि मराठवाडय़ाचा अनुशेष भरून काढणे अशी अनेक आव्हाने सरकारसमोर आहेत. या साऱ्याची आपल्याला जाणीव असून येत्या वर्षभरात यावर ठोस काम झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. एमबीए असलेले अशोक चव्हाण यांनी आठ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. शासन अनेक चांगले निर्णय घेत असते. त्याची ठोस अंमलबजावणी निश्चित वेळेत केली जाते की नाही, याची कसोशीने तपासणी केली जाईल. सनदी अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी परफॉर्मन्स हाच एकमेव निकष लावला जाईल असे सांगून चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप आवर्जून मारली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी खास नमूद केले. त्याच वेळी कामचुकार अधिकाऱ्यांची गय करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. विलासराव मुख्यमंत्री असताना जे प्रशासन होते तेच प्रशासन आताही आहे. अशावेळी कामाला गती कशी देणार, असा प्रश्न उपस्थित केला असता अधिकाऱ्यांच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जाईल व आवश्यकतेनुसार फेरबदलही केले जातील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आपल्यावर आली असून मुंबईच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. नक्षलवाद्यांचा प्रश्नही कठोरपणे हाताळला जाईल असे सांगतानाच दहशतवाद हा आता धंदा झाला आहे. ‘अल कायदा’सारख्या संघटनांकडे प्रचंड पैसा आहे. त्या जोरावर ते दहशतवाद पसरवतात. मात्र अतिरेक्यांच्या कारवाया मोडून काढण्यासाठी पोलीस दलाला सर्वार्थाने शस्त्रसज्ज व प्रशिक्षित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील एक कोटी ४२ लाख शेतकऱ्यांपैकी ७८ लक्ष शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. पंतप्रधान पॅकेज तसेच राज्याने केलेल्या कर्जमाफीनंतरही अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न शिल्लक असल्यामुळे नव्याने पॅकेज जाहीर केले असून त्याचा लाभ ४० लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.