Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

प्रादेशिक

झोपी गेलेला विरोधी पक्ष अखेर जागा झाला!
संदीप प्रधान
मुंबई, ३१ डिसेंबर

नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून शिवसेना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विलासराव देशमुख यांची निवड झाल्यापासून भाजपचे शक्तीशाली नेते गोपीनाथ मुंडे आपण विरोधी बाकांवर बसलो आहोत हे विसरून गेले होते. मुख्यमंत्रीपदावरून विलासराव देशमुख यांची उचलबांगडी झाल्यानंतर आणि नारायण राणे यांचे मुख्यमंत्रीपद हुकल्यावर झोपी गेलेला (खरे तर झोपेचे सोंग घेतलेला) विरोधी पक्ष जागा झाल्याचे चित्र नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात दिसले.

माजी सैनिक कोटय़ातून पोलीस फौजदार नेमण्यास स्थगिती
मुंबई, ३१ डिसेंबर/प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००५ मध्ये जाहिरातीस अनुसरून माजी सैनिक कोटय़ातून निवड झालेल्या व नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठविलेल्या ७४ पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्त्या देण्यास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्थगिती दिली आहे.लोकसेवा आयोगाने ही जाहिरात पोलीस उपनिरीक्षकांच्या एकूण ४९८ पदांसाठी दिली होती. त्यापैकी १५ टक्के म्हणजे सुमारे ६५ पदे माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. चाळणी व अंतिम लेखी परीक्षा, शारीरिक तपासणी व तोंडी मुलाखती झाल्यावर आयोगाने यंदाच्या १ जुलै रोजी प्रथम निवड यादी जाहीर केली होती.

ब्लॉकच्या काळात सर्व कल्याण लोकल रद्द
कल्याणमध्ये रविवारी नऊ तासांचा विशेष ब्लॉक

मुंबई, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी

पादचारी पुलाच्या उभारणी कामासाठी येत्या रविवारी कल्याण स्थानकात सुमारे नऊ तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे अनेक लोकल रद्द करण्याखेरीज मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्याने प्रवाशांचे हाल-बेहाल होण्याची शक्यता आहे. कल्याण स्थानकात उभारण्यात येणाऱ्या १२ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे लोखंडी गर्डर उभारण्याच्या कामासाठी फलाट क्रमांक तीन व चारदरम्यान हा विशेष ब्लॉक केला जाणार आहे.

उत्तर भारतीयांना मारहाण; मुंबई पोलिसांच्या भूमिकेबद्दल काँग्रेसची नाराजी
मुंबई, ३१ डिसेंबर / खास प्रतिनिधी

मनसेच्या आंदोलनात उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण झालेली नाही, असे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी केल्याबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार कृपाशंकर सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय परीक्षार्थींना केलेली मारहाण वृत्तवाहिन्यांवर साऱ्यांनीच पाहिलेली असताना मुंबई पोलिसांना ती कशी दिसली नाही, असा सवाल कृपाशंकर सिंग यांनी केला आहे.

कॉर्पोरेट शुभेच्छांना ‘ब्रॅण्डेड कात्री’ !
समर खडस
मुंबई, ३१ डिसेंबर

नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये देण्यात येणाऱ्या पेनसेटपासून ते उंची मद्याच्या बाटल्यांपर्यंत अनेक गिफ्ट आर्टिकल्सचा व्यवसाय यंदा ३० ते ३५ टक्क्यांनी घसरला आहे. त्यातही याचा सर्वाधिक फटका चिनी वस्तूंना बसला असून निकृष्ट दर्जा हेच यामागील प्रमुख कारण असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जगभरातील मंदीचा परिणाम आता कॉर्पोरेट क्षेत्रात दिसू लागला आहे.

माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर
मुंबई, ३१ डिसेंबर / खास प्रतिनिधी

रामटेक लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी बंडखोरी केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
दोनदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेल्या देशमुख यांनी दोन वर्षांंपूर्वी रामटेक लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक अपक्ष म्हणून लढविल्याने त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मध्यंतरी देशमुख हे बसपात जाण्याच्या तयारीत होते. मात्र तेथे त्यांचे बिनसले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व केंद्रीय वाणिज्यमंत्री कमलनाथ यांच्याशी देशमुख यांचे चांगले संबंध असून यातूनच देशमुख यांच्या काँग्रेस परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अलीकडेच देशमुख यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली होती. विदर्भात देशमुख यांना मानणारा काँग्रेस पक्षात
कार्यकर्त्यांचा चांगला संच आहे. रामटेकमध्ये अपक्ष म्हणून लढलेल्या रणजित देशमुख यांना ८० हजारांच्या आसपास मते मिळाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. यातूनच देशमुख यांना पक्षात पुन्हा घेतले जाणार असल्याचे समजते. देशमुख हे स्वत: निवडणूक लढणार नसले तरी त्यांचा पुत्र विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहे. देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

आयआयटीच्या संचालक पदावर देवांग खखर
मुंबई, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी

मुंबई आयआयटीचे नवनियुक्त संचालक प्रा. देवांग खखर उद्या, १ जानेवारी रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रा. अशोक मिश्रा यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये संचालक पदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी नव्याने निवडप्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात खाखर यांची निवड झाली. प्रा. खखर यांनी दिल्ली आयआयटीमधून १९८१ साली बी.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केला असून १९८६ साली मॅसॅच्युसेटस् अमेर्स्ट विद्यापीठातून पी.एचडी. संपादन केली. त्यानंतर १९८७ साली ते मुंबई आयआयटीच्या केमिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षक म्हणून रूजू झाले. आतापर्यंत ते याच विभागात होते. संचालक पदावर निवड झाल्यानंतर आयआयटीमध्ये विविध शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय खखर यांनी व्यक्त केला आहे.

नव्या वर्षांत सीईटीच्या तयारीकडे लक्ष
मुंबई, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आता नव्या वर्षांत विविध ‘सामायिक प्रवेश परीक्षां’च्या (सीईटी) तयारीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षांतील सीईटींच्या तारखा जाहीर होऊ लागल्या आहेत. राज्यातील खासगी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद इत्यादी महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी २४ मे रोजी ‘सामायिक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) घेण्यात येणार असल्याचे ‘असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल डेंटल कॉलेजेस्’ने जाहीर केले आहे. एमबीए अभ्यासक्रमासाठी येत्या १५ फेब्रुवारी तर एमसीए अभ्यासक्रमासाठी १ मार्च रोजी सीईटी घेण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने नुकताच जाहीर केल्यानंतर खासगी वैद्यकीय अभ्यासक्रमांचीही सीईटी जाहीर झाली आहे.
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सरकारी सीईटीची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी अंदाजे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात ही सीईटी घेण्याचे प्रस्तावित असल्याचे संचालनालयाचे संचालक डॉ. वासुदेव तायडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सरकारी महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांची सरकारी आणि खासगी महाविद्यालये यांच्याकरीता संचालनालयाच्या वतीने एकत्रित सीईटी घेण्यात येते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची संघटना मात्र स्वतंत्ररित्या सीईटीचे आयोजन करते. त्यानुसार संघटनेने २४ मे रोजी सीईटीची तारीख जाहीर केली असून दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत ही परीक्षा होईल. परीक्षेसाठी प्रवेश अर्ज, माहितीपत्रक इत्यादी बाबतची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाईल, असे असोसिएशनचे सक्षम प्राधिकारी ए. एम. वरे यांनी म्हटले आहे.

कसाबवर कस्टम, युपीए आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गतही कारवाई
मुंबई, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब याच्यावर आज गुन्हे शाखेने कस्टम अ‍ॅक्ट, बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा (युएपीए) आणि परदेशी नागरिक कायदाही नव्याने लावला आहे. कसाबवर आतापर्यंत परदेशी नागरिक कायदा लावण्यात आला नव्हता. परंतु आता त्याच्यावर परदेशी नागरिकत्त्व कायदाही लावण्यात आल्याने तो पाकिस्तानी असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कसाबवर १२ गुन्हे दाखल असून त्याच्यावर भादंवि कायद्याची खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे आदी आरोपांसोबत शस्त्रास्त्र कायदा आणि स्फोटके कायद्या अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. मात्र कसाबने चौकशीत दिलेली माहिती तसेच महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर दिलेला कबुलीजबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य ठरावा यासाठी त्याच्यावर कस्टम कायदा लावण्यात आलेला आहे. कसाब हा पाकिस्तानी असून त्याने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून येथील कायद्याचा भंग केल्याने त्याच्यावर परदेशी नागरिक कायदा लावण्यात आल्याचे सह आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सचिवासह चार अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, ३१ डिसेंबर / खास प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात त्यांचे सचिव म्हणून नेमले गेलेले चिंतामण संगीतराव यांच्यासह भारतीय प्रशासन सेवेतील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज राज्य सरकारने केल्या. पुणे विभागीय आयुक्तपदी असलेले नितीन करीर हे आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे सचिव म्हणून काम पाहतील. तर संगीतराव यांची बदली अबकारी कर आणि परिवहन सचिव म्हणून गृह विभागात करण्यात आली आहे.
प्रधान सचिव आणि प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी बी. पी. पांडे यांची बदली अन्न व नागरी पुरवठा विभागात करण्यात आली असून त्यांच्या जागी कार्यरत असलेल्या के. पी. बक्षी यांना सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) प्रधान सचिवपदी नेमण्यात आले आहे.