Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

नव्या वर्षांत लोकल पंधरा डब्यांची!
* पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीकडून पुढाकार
* आरडीएसओच्या मदतीने तांत्रिक चाचण्या
* राइटस्चा अहवाल जानेवारी अखेपर्यंत अपेक्षित
प्रतिनिधी

 
नऊ डब्यांच्या बहुतांशी लोकल बारा डब्यांच्या करण्यात आल्या. दोन लोकलमधील कालावधी पाचऐवजी तीन मिनिटांवर आणण्यात आला. एमयूटीपीच्या नव्या लोकल मुंबईत दाखल झाल्या.तरीसुद्धा मुंबईच्या लोकलमधील गर्दी कमी होताना दिसत नाही. ‘सुपर डेन्स क्रश लोड’ प्रकारच्या या गर्दीवर मात करण्यासाठी पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याच्या दृष्टीने रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
गर्दीवर उपाययोजना म्हणून पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी पश्चिम रेल्वेने चाचपणी सुरू केली आहे. रेल्वेच्या ‘रिसर्च डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिस ऑर्गनायझेशन’ (आरडीएसओ) या उपक्रमाच्या मदतीने त्या सुरू आहेत. ‘पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याच्या आम्ही गेल्या महिन्यापासून तांत्रिक चाचण्या घेत आहोत. रात्रीच्या वेळी घेण्यात येणाऱ्या या चाचण्यांसाठी आरडीएसओचे पथक मुंबईत आले होते. या पथकाने चाचण्यांबाबत आवश्यक नोंदी घेतल्या असून, येत्या तीन-चार महिन्यांत आरडीएसओकडून सदर अहवाल अपेक्षित आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एस. एस. गुप्ता यांनी दिली.
पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याबाबत पश्चिम रेल्वेच्या पातळीवर सुरू असलेल्या या उपाययोजनांखेरीज मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडूनही (एमआरव्हीसी) यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. मुंबईत उपनगरी रेल्वेवर पंधरा डब्यांच्या लोकल चालविणे कितपत शक्य आहे, याबाबतचा अभ्यास करण्याचे काम एमआरव्हीसीने रेल्वेच्या ‘राईटस्’ या उपक्रमाकडे सोपविले. ‘साधारणत: तीन महिन्यांपूर्वी ‘राईटस्’वर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, जानेवारी महिन्याच्या अखेपर्यंत त्याबाबतचा अहवाल अपेक्षित आहे’, अशी माहिती एमआरव्हीसीच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
बाराऐवजी पंधरा डब्यांच्या लोकल चालविल्यास प्रत्येक लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता ३० टक्क्यांनी वाढू शकेल. लोकलमधील गर्दी कमी होऊन, दोन स्थानकांतील अंतर घटण्यास मदत होईल. याखेरीज मुंबईतील उपनगरी लोकलमध्ये वातानुकूलित सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनेही पंधरा डब्यांच्या लोकल अतिशय उपयुक्त ठरतील. मुंबईत वातानुकूलित लोकलची मागणी जोर धरू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर पंधरा डब्यांच्या लोकलला जोडण्यात येणाऱ्या तीन नव्या डब्यांपैकी एखादं-दुसरा वातानुकूलित डबा जोडणे सहजशक्य होईल, असे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे.
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रलसह दादर, अंधेरी, बोरिवली, वसई, विरार ही स्थानके टर्मिनस म्हणून विकसित करण्यात आली आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ांना या स्थानकांवर थांबे देण्यात येत असल्याने, तेथे पंधरा डब्यांच्या लोकल सहजी थांबू शकतात. फारसा वेळ न दवडता पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्यांच्या लोकल चालविणे शक्य आहे, असे पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
याआधी १९८६ साली रेल्वेने लोकलच्या डब्यांची संख्या वाढविली होती. त्यावेळी नऊ डब्यांच्या लोकल बारा डबा लोकलमध्ये रुपांतरीत करण्याची सुरू झालेली प्रक्रिया आजतागायत सुरू आहे. आजच्या घडीला पश्चिम व मध्य रेल्वेच्या ताफ्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकल बारा डबा लोकलमध्ये रुपांतरीत करण्यात आल्या असून, त्यांच्या मदतीने ५०० हून अधिक फेऱ्या चालविल्या जातात.
मुंबईत सर्वप्रथम १९२० च्या सुमारास तीन डब्यांच्या लोकल सुरू झाल्या. लोकसंख्या वाढीबरोबर वेळोवेळी लोकलच्या डब्यांची संख्याही वाढत गेली. १९५० पासून मुंबईत सहा डब्यांच्या लोकल धावू लागल्या. त्यानंतर १९७० मध्ये नऊ डब्यांच्या लोकल सुरू करण्यात आल्या. लोकलच्या डब्यांची संख्या वाढण्याबरोबर रेल्वे स्थानकांच्या फलाटांची लांबीही वाढत गेली. बारा डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी २७० मीटर करावी लागली होती. पंधरा डब्यांच्या लोकलसाठी आता ती आणखी ९० मीटरने वाढवावी लागणार आहे.