Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मराठी चित्रपटांचेही आता ट्रेड गाईड!
सुनील डिंगणकर

 
मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या दरवर्षी वाढत आहे. चित्रपटांचे बजेटही वाढलेले आहे. असे असले तरी निर्माते, दिग्दर्शक, वितरक आणि चित्रपटक्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना मराठी चित्रपटांविषयीची व्यावसायिक आकडेवारी मिळण्याचा एकही स्रोत उपलब्ध नव्हता. कोणत्या चित्रपटांची निर्मिती सुरू आहे, किती चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले, चित्रपटाने प्रत्येक टेरिटरीमध्ये किती गल्ला गोळा केला याबद्दलची माहिती मिळण्याची काहीच सोय नव्हती. नवीन वर्षांत ही समस्या दूर होणार आहे. मराठी चित्रपट व्यावसायिकांना उपयोगी पडणारी माहिती देणारे ‘माझा सिनेमा’ हे मराठीतील पहिलेच साप्ताहिक ट्रेड गाईड जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होत आहे.
मराठी चित्रपटनिर्मितीच्या संख्येत वाढ होत आहे, तंत्रज्ञान आधुनिक होत चालले आहे. ‘माझा सिनेमा’मधून चित्रपट व्यावसायिकासाठी या उद्योगाबद्दल आवश्यक असणारी सर्व माहिती देण्यात येणार आहे, असे ‘माझा सिनेमा’चे मुख्य संपादक भालचंद्र कुबल यांनी सांगितले. इचलकरंजीच्या एखाद्या चित्रपटगृहात डॉल्बी डिजिटल यंत्रणा बसविण्यात आली आहे, हे प्रत्येक निर्माता किंवा वितरकाला माहित असेलच असे नाही. त्यामुळे त्या ठिकाणी साधी प्रिंट पाठवावी की डॉल्बी डिजिटल प्रिंट पाठवावी याबद्दलही तो साशंक असतो. ही आणि अशा प्रकारची सर्व माहिती या साप्ताहिकातून मिळणार आहे. क्रिशन खदेरिया यांच्या ‘नव व्ह्यू मल्टिमीडिया लिमिटेड’ या कंपनीतर्फे हे मासिक प्रकाशित करण्यात येणार आहे. चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्यांप्रमाणेच तंत्रज्ञ, वितरक, चित्रपटगृहांचे मालक, स्टुडिओ चालक यांनाही या साप्ताहिकाचा लाभ होईल, असा विश्वास कुबल यांनी व्यक्त केला.