Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मराठी चित्रपटांची उलाढाल शंभर कोटींवर!
प्रतिनिधी

 
‘गजनी’ पाहायला जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन मराठी चित्रपटासाठीही दीडशे रुपये खर्च करू लागला आहे. गेल्या वर्षभरात ४२ चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित झाले आणि त्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसादही दिला. त्यामुळे बजेट वाढण्याबरोबरच मराठी चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येतही वाढ होत आहे, अशी आकडेवारी आढळली आहे. महेश कोठारे, महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, अजय सरपोतदार या चित्रपटनिर्मात्यांप्रमाणेच झी आणि रिलायन्ससारख्या कॉर्पोरेट कंपन्यांनीही मराठी चित्रपटक्षेत्रात गुंतवणूक केल्यामुळे या आर्थिक वर्षांत मराठी चित्रपटांची उलाढाल १०० कोटींवर जाऊन पोहोचली आहे. नवीन वर्षांत प्रदर्शित करण्यासाठी सुमारे ३५ चित्रपट आत्ताच तयार आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीदेखील आता ‘इंडस्ट्री’ होऊ लागली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी सांगितले की, २००८ वर्षांत सुमारे शंभर मराठी चित्रपटांना सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले. एकूण ६६ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी ४६ चित्रपट शहरांमध्ये तर २० गावांमध्ये प्रदर्शित करण्यात आले. मल्टिप्लेक्सचालकांतर्फे आवर्जून मराठी चित्रपटांचे खेळ लावण्यात येत आहेत. त्यामुळे एक व्यवसाय म्हणून हळुहळू मराठी चित्रपटसृष्टीचा आवाका वाढत आहे. ते पुढे म्हणाले की, हिंदी आणि मराठी चित्रपटांचे लोकप्रिय होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. हिंदीप्रमाणेच मराठीतही दूरचित्रवाणी कलाकार आणि चित्रपटात काम करणारे कलाकार यांची वेगळी ओळख निर्माण होत आहे. मराठी मालिकांप्रमाणेच मराठी चित्रपट हेही कलाकारांसाठी नियमित उत्पन्नाचे साधन होऊ लागले आहे. अभिनेत्यांना मिळणाऱ्या मानधनाविषयी विचारणा केली असता सरपोतदार म्हणाले की, आता मराठी चित्रपटांतील कलाकारांच्या मानधनाची रक्कम दहा लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे येत्या वर्षांत मराठी चित्रपटांचे पाऊल पुढेच पडेल, अशी खात्री सरपोतदार यांनी व्यक्त केली.