Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९
जैनाचार्यानी धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, न्यायमीमांसा, न्यायकाव्य, अलंकार, व्याकरण, ज्योतिष वगैरे विषयांवर अभ्यासपूर्ण असे हजारो ग्रंथ लिहिले. त्याच वेळी आयुर्वेदावरही लिहिले. औषधं, आरोग्य, खानपान विषयावर लिहिताना जैन जीवनपद्धती, नियम, धार्मिक नियम, अहिंसा, शाकाहार यावर भर दिला आहे. हजारो वर्षांपूर्वी प्रथम र्तीथकर ऋषभदेव किंवा आदिनाथ यांनी आयुर्वेदाची उत्पत्ती केल्याचा उल्लेख मिळतो. भरताला राज्य देऊन दीक्षा घेऊन ते कैलासपर्वतावर गेले. राज्यात काहीही अडचणी आल्या की, भरत चक्रवर्ती त्यांना सल्ला विचारायला येत. त्यांनी आदिनाथांना विचारलं, ‘प्रभो, भोगभूमीचा काळ सरून कर्मभूमीचा काळ सुरू आहे. लोकांना जीविकेसाठी कामं करावी लागतात; वनस्पती, अन्न शोधावे लागते. कधी विषारी वनस्पतीमुळे, शस्त्राघातामुळे, डोंगरदऱ्यांतून, झाडावरून पडल्यामुळे इजा होते. शीत, उष्ण, वर्षां ऋतुमुळे वात, पित्त, कफ आदी विकार जडतात. अशा वेळी काय उपाय करावा?’
तेव्हा आदिनाथ भगवान म्हणाले, ‘रोगांना दूर ठेवण्यासाठी उपाय आहेत, ते असे.. योग्य ऋतूमध्ये हित, मित आहार-विहार करावा. काम, क्रोध, मोह, हिंसा, मान आदी मन:शांती घालवणाऱ्या शत्रूंपासून दूर राहावे. आरोग्यासाठी वेळोवेळी रसायन द्रव्याचे सेवन करावे. म्हणजे आपोआप रोग दूर होतील किंवा रोग होणारच नाहीत. पण तरीही वात, पित्त, कफाचा उद्रेक झाला तर शुद्ध द्रव्यसेवनाने तो दूर करावा. याला ‘बृहण’ म्हणतात. दोष अधिक वाढला तर त्याला ‘कर्पण’ म्हणतात. प्रमेह, वायुविकार, अशक्तपणा यासाठी ऊस मुख्यत्वे वापरावा. कुष्ठरोगासाठी लेप, उटणे, स्नान वगैरेंचा वापर करवा. चोवीस र्तीथकरांच्या वाणीतून, उपदेशातून जे ज्ञान बाहेर पडलं त्याला ‘द्वादशांग श्रुतज्ञान’ म्हणतात. त्यातल्या बाराव्या अंगाला ‘दृष्टिवाद अंग’ म्हणतात. त्यातल्या एका विभागाला ‘प्राणवाय’ म्हणतात. त्याची पदसंख्या तेरा कोटी मानली गेलीय. प्राणवाय शास्त्रात अष्टांग आयुर्वेदाची रचना केली गेली. कायचिकित्सा, शल्यचिकित्सा, शालाक्य, कौमार, भूतविद्या, भृत्य, अंगद तंत्र, रसायनतंत्र, वाजिकरण यांचा उल्लेख मिळतो. हाच आयुर्वेदाचा वेद समजला जातो. इ.स.च्या पहिल्या शतकात पूज्यपाद देवनंदींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले व वैद्यसार हा ग्रंथ लिहून आयुर्वेदात अमोल भर घातली.
लीला शहा

संयुक्त राष्ट्रसंघाने २००९ साल हे खगोल विज्ञानाला समर्पित वर्ष म्हणून घोषित केले आहे. जनमानसात खगोलशास्त्राबद्दल रुची उत्पन्न करावी, वाढवावी याकरिता सर्व देशात विविध मार्गानी प्रयत्न केले जाणार आहेत. व्याख्याने, रेडिओ-टीव्हीवर कार्यक्रम, प्रदर्शने, तारांगणातील खास शो, पुस्तके आणि लेख यांच्या माध्यमांचा यासाठी वापर होईल. पण या सर्व उपद्व्यापासाठी २००९ साल का निवडण्यात आले? त्यामागचा इतिहास थोडक्यात असा..
चारशे वर्षांपूर्वी -म्हणजे १६०९ साली- गॅलिलिओने एक असा शोध लावला, ज्यामुळे खगोलशास्त्रात एक क्रांती झाली. काही महिन्यांपूर्वी दुर्बिणीचा शोध लागला होता आणि पृथ्वितलावर त्याचा उपयोग किती महत्त्वाचा आहे ते दिसून येत होते. एखाद्या सैन्याच्या सेनापतीला दूरस्थ शत्रूच्या गोटातल्या ‘गुप्त’ हालचाली दुर्बिणीतून पाहता येत. डोंगराळ भागात वाट चुकलेल्या वाटसरूला मार्गी लावायला दुर्बीण मदत करे, तर याच न्यायाने दूरच्या गोष्टी जवळ आणू पाहणारी दुर्बीण आकाशस्थ पिंडांचे स्पष्ट दर्शन घडवून आणेल का?
गॅलिलिओसारख्या इटलीतील भौतिक शास्त्रज्ञाला प्रयोग करायची हौस होती. त्याने सामान्य दुर्बिणीत काही बदल करून तिचे तोंड आकाशाकडे वळवले, तेव्हा १६०९ साल उजाडले होते. दुर्बिणीतून दिसणारे विश्व पाहून गॅलिलिओ चकित झाला. साध्या डोळय़ांनी गुळगुळीत पृष्ठभागाचा वाटणारा चंद्र उंचसखल-डोंगर व विवरे यांनी व्याप्त दिसत होता, तसेच सूर्याच्या प्रकाशित पृष्ठभागावर त्याला चक्क काळे डाग दिसले आणि एक -असाच अनपेक्षित शोध- दुर्बिणीने लावला तो म्हणजे गुरू ग्रहाभोवती फिरणाऱ्या चंद्रांचा! दुर्बिणीच्या या वापराने जनमानसात संभ्रम निर्माण झाला. त्यातून दिसते ते खरोखर तसे असते का? देवाने सृष्टीची निर्मिती निर्दोष स्वरूपात केली असताना चंद्राचा चेहरा ‘खप्पड’ कसा आणि सूर्यावर डाग कसे? आणि सर्व विश्व पृथ्वीभोवती फिरते असे मानणाऱ्या समाजाला गुरूभोवती चार चंद्र फिरतात हे कसे पटावे? त्यामुळे तत्कालीन समाजधुरीणांनी आणि धर्ममरतडांनी दुर्बिणीतून दिसणारे वास्तव नसून मायाजाल आहे, असा फतवा काढला. पण वैज्ञानिक सत्य अखेर मान्य करावेच लागते. गॅलिलिओची दुर्बीण विश्वाच्या वेधांची आजची उपकरणे पाहता लहानशी वाटते, पण ४०० वर्षांपूर्वी तिने केलेले मार्गदर्शन अमोल होते.
जयंत नारळीकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

कोलकाता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापकपद ते रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनचे कुलगुरुपद असा अध्यापनाचा प्रवास करणाऱ्या प्रो. सत्येंद्रनाथ बोस यांचा आज जन्मदिवस. १८९४ च्या नववर्षदिनी कोलकात्यातच जन्म.. हिंदू स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गणितीय भौतिकी या विषयात एमएससी पदवी प्राप्त करणाऱ्या सत्येंद्रनाथांनी १९२१ मध्ये ढाका विद्यापीठातून रीडर म्हणून अध्यापकाला सुरुवात केली. ‘बोस अँड सहा इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ गॅसेस’सारखंच ‘प्लॅक्स लॉ ऑफ रेडिएशन’ हाही त्यांचा शोधप्रबंधाचा विषय. विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी हे शोधसिद्धान्त गॅसच्या अणुरेणूच्या प्रक्रियेवर लागू केले आणि त्यातून जन्म झाला ‘बोस-आईन्स्टाईन सिद्धांता’चा. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळालीच, पण त्या कार्याची दखल लंडनच्या रॉयल सोसायटीनेही घेतली. ते राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त झालेच, पण भारत सरकारने पद्मविभूषण किताब देऊनही त्यांना गौरवले. राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या प्रभावाखाली बोस होतेच, स्वाभाविकपणेच ते स्वातंत्र्यलढय़ातही सहभागी झाले. ४ फेब्रुवारी १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गावातल्या महादेवाच्या मंदिरातल्या नंदीला बघून किसन शेतकऱ्याच्या छकडय़ाच्या ढवळय़ाला फार असूया वाटायची. ढवळय़ा दिसायला सुरेख होता. मोठे वशिंड, मऊ लांब केसांचे शेपूट, डौलदार, भक्कम बांधा, रुंद छाती, पाणीदार टपोरे डोळे, टकरीत समोरच्या कुठल्याही बैलाला सहज लोळवेल असा धष्टपुष्ट! छकडय़ातून माणसांची ने-आण करणे, शेतीसाठी खते, औजारे आणणे, बियाणांची आणि धान्याची पोती ने-आण करणे ही कामे करताना ढवळय़ा फार थकून जाई. त्याला वाटे, हे कष्ट का बरे आपल्या वाटय़ाला? पाठीवरचे जोखड फेकून द्यावे आणि आनंदाने जगावे, महादेवासमोरच्या नंदीसारखे! कष्ट करायला नकोत. देवाआधी लोक याचे दर्शन घेऊन फुले वाहतात, पाया पडतात. मी मरमर कष्ट करतो, कुणी पडते माझ्या पाया? छे! उलट चाबकाचे फटकारेच बसतात. नंदीची मूर्ती हलवायचे ठरले. त्याचा पाय तुटला होता. मूर्ती सांधेपर्यंत देवळात दुसरा नंदी बसवायचा ठरले. ढवळय़ाला निवडले गेले. त्याला फार आनंद झाला. मंदिराच्या सेवकांनी ताकीद दिली. ओरडायचे, झोपायचे नाही. माशा बसल्या म्हणून शेपटाने हाकलायच्या नाहीत. ढवळय़ाने विचार केला. अहाहा! कष्ट, मार, दावे काही नाही. किती सुख! काही दिवस गेले. एके दिवशी दुरुस्त झालेली नंदीची मूर्ती हातगाडीवरून आली आणि स्थापन झाली. ढवळय़ाला पुन्हा कामाला जाणे भाग होते. ढवळय़ाला धड उभेही राहता येईना. मोठय़ा कष्टाने पावले टाकत तो किसनबरोबर घरी गेला. घर, शेत दिसताच त्याचे सारे अंग भरारले. शेपूट उडवून त्याने मेघगर्जनेसारखा आवाज केला. किसनने माया केली. खाऊपिऊ घातले. दुसऱ्या दिवशी किसनने त्याला छकडय़ाला जुंपल्यावर तो आनंदाने छकडा ओढू लागला. कोणासारखे व्हायचा अट्टहास केला की, स्वत:सारखे आपण होत नाही. आपण जे आहोत त्याचा अभिमान धरा. स्वत:मधल्या चांगल्या पाच गोष्टी आज लिहून काढा आणि स्वत:चे कौतुक करा.
ज्ञानदा नाईक