Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

पालिका मुख्यालयासाठी १२५ कोटींची निविदा
अभियांत्रिकी विभागाला धक्का

 

नवी मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कामातील अडथळ्यांची शर्यत संपता संपत नसून या मुख्यालयाचे काम किफायतशीर दरांमध्ये करून देईल, असा ठेकेदार आता अभियंता विभागास सापडेनासा झाला आहे. बेलापूर किल्ल्यानजीक ‘पाम बीच’ मार्गावर लागूनच उभारल्या जाणाऱ्या या नव्या कोऱ्या मुख्यालयासाठी ७४ कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने अपेक्षित धरला होता. मात्र, हे काम करण्यासाठी पुढे आलेल्या ठेकेदारांनी मूळ रकमेपेक्षा तब्बल ६८ टक्के जादा दराने निविदा भरल्याने महापालिकेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेष म्हणजे, ७४ कोटींचे हे काम थेट १२५ कोटींच्या घरात गेल्याने न्यूनतम निविदा भरलेल्या ठेकेदाराने कामाची रक्कम कमी करावी, यासाठी आता अभियंता विभागाने वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
‘मोरबे’ धरण खरेदी करून राज्यात स्वत:ची मान उंचावून घेणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचा कारभार अजूनही भाडय़ाच्या इमारतींमधून चालतो. या शहराचे पालकत्व भूषविणाऱ्या महापालिकेच्या मालकीचे मुख्यालय असावे, यासाठी मागील दशकभरापासून सातत्याने प्रयत्न होत आहेत. तत्कालीन आयुक्त मुकेश खुल्लर यांच्या काळात मुख्यालयाच्या प्रस्तावाने वेग धरला होता. मात्र, सुनील सोनी यांनी वाशीत मुख्यालय उभारणीस विरोध केला आणि बेलापूर किल्ल्याजवळ ‘पाम बीच’मार्गास लागूनच मुख्यालयाची जागा निश्चित केली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत या मुख्यालयाचे भूमिपूजनही करण्यात आले. मात्र, त्यानंतर हे काम सातत्याने अडचणींच्या फेऱ्यात सापडले. रडत-रखडत सुरू असलेले मुख्यालयाचे काम परवडत नाही म्हणून मध्यंतरी जुन्या ठेकेदाराने करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने नव्याने या कामाची आखणी केली. त्यामुळे एरवी ४० कोटींच्या घरात असलेले हे काम थेट ७४ कोटींच्या घरात पोहोचले. महापालिकेने या कामाच्या नव्याने निविदा मागविल्या, मात्र या निविदा प्रक्रियेत दाखल झालेल्या तीन निविदा पाहून महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मुख्यालयाच्या कामासाठी सर्वात कमी दराची निविदा मूळ किमतीपेक्षा ६६ टक्के जादा दराने भरण्यात आली आहे. आयव्हीसीआरएल या जुन्याच कंत्राटदाराची ही निविदा आहे. यामुळे ७४ कोटींचे हे काम थेट १२५ कोटींच्या घरात पोहोचले आहे. आता ही किंमत कमी करावी यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. असे असले तरी या वाटाघाटीनंतरही महापालिकेच्या पदरात काय पडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पनवेलमध्ये दोन ठिकाणी आग
पनवेल/प्रतिनिधी : पनवेल आणि नवीन पनवेल येथे आज एकाच वेळी दोन ठिकाणी आग लागल्याने काही काळ खळबळ माजली. नवीन पनवेलमधील सिडको मिनी मार्केटमध्ये असणाऱ्या शृंगार कलेक्शन या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे पाच लाखांचा माल भस्मसात झाला. अन्य एका घटनेत मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवीण हॉटेलला अचानक आग लागली. या दोन्ही घटनांत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
नवीन पनवेलच्या सेक्टर तीनमध्ये डीएव्ही शाळेजवळ सिडकोतर्फे मिनी मार्केट उभारण्यात आले आहे. या मार्केटमध्ये ६५ गाळे असून, त्यातील शृंगार कलेक्शन या दुकानाला आज दुपारी १२ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या दुकानदाराच्या घरी वाढदिवस असल्याने आज हे दुकान बंद होते. या आगीत दुकानातील सौंदर्यप्रसाधने जळून खाक झाली आणि सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले, मात्र दुकान बंद असल्याने जीवितहानी टळली. काही दिवसांपूर्वीच सुमारे तीन लाख रुपयांचा माल भरल्याची माहिती या दुकानदाराने दिली.
सिडकोतर्फे हे मार्केट तात्पुरत्या अवस्थेत उभारण्यात आल्याने तेथे आवश्यक सुविधा नसल्याचा आरोप काही दुकानदारांनी केला. या मार्केटमध्ये ६५ गाळे असून, वीज मीटर मात्र केवळ ५५ असल्याने शॉर्टसर्किट झाले असावे, असा अंदाजही काही दुकानदारांनी व्यक्त केला. सिडकोने या गाळ्यांचे हस्तांतरण केल्यास काँक्रिटचे पक्के बांधकाम करता येईल, तसेच अग्निशमन यंत्रणाही बसवता येईल, असे दुकानदारांनी सांगितले. शृंगार कलेक्शनला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब त्वरित दखल झाले.
मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या प्रवीण हॉटेलला आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पनवेल नगरपालिका व सिडको अग्निशमन दलाच्या बंबांनी ही आग त्वरित आटोक्यात आणली. ठ

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नवी मुंबई आरटीओतर्फे विविध कार्यक्रम
बेलापूर/वार्ताहर : रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व नवी मुंबई शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे १ ते ७ जानेवारीपर्यंत रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, वाहतूकविषयक विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर, एड्स विषयावर पथनाटय़ व चित्र प्रदर्शन, अपघातानंतर प्रथमोपचार कसा करावा, रस्ता सुरक्षेविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे १ जानेवारी ते ३० जानेवारी हा पूर्ण महिना रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले. नवी मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय पत्तिवार, एनएमएमटी व्यवस्थापक जितेंद्र पापळकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तुषार तुंगार, आरटीओ प्रशिक्षण केंद्रात होणाऱ्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता दुचाकी व चारचाकी वाहनफेरी वाशी ते सीबीडी पामबीच मार्गावर काढण्यात येणार आहे. याद्वारे रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुण वर्गाची संख्या मोठय़ा प्रमाणावर असल्याने, तरुणांना मार्गदर्शनपर चर्चासत्र ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वाशीतील भावे नाटय़गृहात आयोजित करण्यात आले आहे.