Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

नव्या वर्षांची नवी किरणे घेऊन येती.. समृद्धीचे लेणे!
प्रतिनिधी / नाशिक

आर्थिक मंदी, मुंबईवरील दहशतवादी हल्ला यासारख्या अप्रिय घटनांचे मळभ दूर होऊन नववर्षांची पहाट सकारात्मकतेचे आणि आनंदाचे पर्व घेऊन उजाडावी, अशी मनोमन प्रार्थना नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांद्वारे करीत सरत्या वर्षांला निरोप देण्यात आला. प्रत्येकाने आपापल्यापरीने नववर्षांचे स्वागत केले खरे, पण त्यामध्ये नेहमीसारखा जोश दिसून आला नाही. मुंबई हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर अनेकांनी अत्यंत साधेपणाने नवीनवर्षांचे स्वागत केले.

काँग्रेसच्या गटबाजीचा युतीला लाभ
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक विश्लेषण

वार्ताहर / धुळे

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे सुधीर जाधव आणि उपाध्यक्षपदी भाजपाचे भारत ईशी यांची झालेली निवड धुळ्याच्या राजकीय इतिहासाच्या परिवर्तनाची ठरू शकेल, या निष्कर्षांप्रत राजकीय जाणकार आले आहेत. राज्यात काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या धुळे जिल्ह्य़ात काँग्रेसमधील गटबाजी वाढली आणि एकमेकांना सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस अंतर्गतच अनेकदा व्यूहरचना आखली गेल्याची काही उदाहरणे देता येऊ शकतील. यामुळे गेल्या चार दशकातील सत्तेची परंपरा काँग्रेसने स्वहस्ते खंडित केल्याचे दु:ख काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्ते आणि अडगळीत टाकण्यात आलेल्या नेत्यांना पचवावे लागत आहे.

वाहतूक सुविधांपेक्षा असुविधाच जास्त
उद्योग विश्वावरील अवकळा (३)

नाशिकला उद्योगनगरीचा दर्जा बहाल करण्यात येथे असणाऱ्या निरनिराळ्या ऑटोमोबाईल प्रकल्पांचा मोठा हातभार आहे. तथापि, मंदीच्या पाश्वभूमीवर सध्या बहुसंख्य उद्योग संकटात सापडले असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला तर त्याचा तडाखा सर्वाधिक बसला आहे. परिणामी, नाशिक व परिसरातील उद्योग विश्वावर अवकळा पसरू लागली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यासाठी नेमके काय करणे शक्य आहे, त्याबाबत कोणत्या उपाययोजना तातडीने हाती घ्यायला हव्यात याविषयी अपेक्षा व्यक्त करतानाच नाशिकच्या एकूणच उद्योग क्षेत्राचा नाशिक इंडस्ट्रीज् अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (निमा) माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी मांडलेला लेखाजोखा ..

व्हिजनरी!
जेथे पोहचायला धड रस्ता नाही की सुरळीत वीज पुरवठा नाही, अशा दुर्गम आदिवासी भागात संगणक प्रशिक्षण देण्याचा प्रवास सर्व दृष्टीने खडतरच. पण, अल्पावधीत या खडतर मार्गाचे रुपांतर चक्क प्रगतीच्या ‘मेगा हायवे’मध्ये करून ‘हार्डवेअर नेटवर्कीग’ प्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशाच्या सीमा ओलांडत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ‘बँड्र’ पोहचविण्याची किमया प्रमोद आणि निलेश या गायकवाड बंधूंनी केली आहे. ‘सिलीकॉन व्हॅली’ची नाशिकमध्ये स्थापना करून गायकवाड बंधूंना उणीपुरी दहा वर्षेही झाली नसताना आय.टी. प्रशिक्षणाच्या क्षेत्रात या संस्थेने आपला एवढा दबदबा निर्माण केला की, प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेला थेट चीनच्या स्थानिक प्रशासनाकडून पाचारण करण्यात आले आहे.

सेवाशुल्क प्रकरणी दाव्यास न्यायालयात आव्हान देण्याचा महापालिकेचा निर्णय
वार्ताहर / जळगाव

सेवाशुल्क वसूल करणे वा आकारण्याचा अधिकार महापालिकेला नाही, या प्रकरणी शहरातील व्यापाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याला महापालिकेतर्फे जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या सभेत या आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
महापालिका स्थायी समितीची सभा सभापती विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त रामनाथ सोनवणे, नगरसचिव गोविंद वानखेडेसह स्थायीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. महापालिकेस सेवाशुल्क आकारण्याचा अधिकारच नाही असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे असून त्यांनी या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. स्थायी समिती सभेत या विषयावर चर्चा होऊन जिल्हा न्यायालयात आव्हान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाला गिरणा टाकी येथे वायू प्रदूषणमापक यंत्र बसविण्यासाठी जागा देणे, दापोरा पंपिग स्टेशनच्या दुरूस्ती खर्चाला मान्यता, अहवालाची महिती घेणे आदी अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले.