Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९
साठी बुद्धी नाठी!
वय वाढेल त्यानुसार माणसांमध्ये परिपक्वता अधिक यायला हवी. कारण काही व्यक्ती त्यास अपवाद असतात. वय वाढले तरी त्यांच्या वागण्यात योग्य तो बदल होताना दिसत नाही. काही लोकांचे वागणे तर विचित्रच असते. त्यातूनच काहींच्या बाबतीत ‘साठी बुद्धी नाठी!’ची प्रचीती येते. या म्हणीची प्रचीती येईल असे वागणे जपानमधील प्रौढ व्यक्तींचेही होऊ लागले आहे, असे जपानच्या न्याय खात्याला एका पाहणीत आढळून आले आहे. प्रौढ व्यक्तींना भेडसावणारी आर्थिक विवंचना आणि एकाकीपणा यावर ‘उपाय’ म्हणून काही प्रौढ लोकांनी भुरटय़ा चोऱ्या करण्याचा मार्ग अनुसरला असल्याचे या पाहणीत आढळले आहे. वाहतूक नियमांचा भंग केल्याच्या व्यतिरिक्त अन्य स्वरूपाचे गुन्हे केल्याबद्दल २००७ मध्ये ६५ आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ४८ हजार ६०५ जणांना अटक करण्यात आली होती.

समस्त वारकऱ्यांना आणि माऊलीच्या भक्तांना आवाहन
संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी नेवाश्याला १२९० साली जे अप्रतिम गीताभाष्य केले ती ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत १८४५ साली प्रकाशित झाली. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आजपर्यंत अनेक संपादकांनी संपादित केला. १८६४ साली गणेश बापुजी मालवणकर यांनी शिळाप्रेसवर ज्ञानेश्वरीची दुसरी मुद्रणप्रत सिद्ध केली. नंतर अनेकांनी या ज्ञानेश्वरीच्या मुद्रणाला सुरुवात केली. कुंटे यांनी ज्ञानेश्वरीची प्रत सिद्ध करताना तळटीपा दिल्या. काही महत्त्वाच्या ओव्यांचे अर्थ स्पष्ट करून सांगितले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९०९ साली जी संशोधित ज्ञानेश्वरी प्रसिद्ध केली तेव्हा त्यांचा एकच उद्देश होता की, लोकांच्यासमोर ‘खरी ज्ञानेश्वरी’ ठेवायची. त्यांना नाथपूर्व ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित सापडले होते. या ज्ञानेश्वरीच्या संपादनात आणि अर्थविवरणात बाळकृष्ण अनंत भिडे यांची १९२८ साली प्रसिद्ध केलेल्या ज्ञानेश्वरीने लोकांची मने जिंकून घेतली.

जुनीच घराणी पुन्हा झाली वतनदार!
सोलापूर व सांगली, सातारा, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजे राजकारणात ठरावीक घराण्यांचीच मक्तेदारी असे समीकरणच पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या राजनीतीमुळे पुन्हा एकदा सरंजामशाहीची घराणेशाही सुरू होते की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. या दोन्ही पक्षांमुळे या सरंजामशाहीला खतपाणी घातले जात आहे. राज्य मंत्रिमंडळात मुंबई, पुणे व सांगली जिल्हय़ाला प्रत्येकी तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. सांगली जिल्हय़ातील कॅबिनेट दर्जाच्या तीनही मंत्र्यांना राज्यातील महत्त्वाची खाती मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांना गृहमंत्री, काँग्रेसच्या डॉ. पतंगराव कदम यांना महसूल, तर प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळालेल्या मदन पाटील यांच्याकडे पणन, महिला व बालविकास खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. या तीनही मंत्र्यांच्या घराण्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून मंत्रिपदाचा राबता आहे.