Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९


दोन महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्याच्या खोदाईचे काम नागरिकांनी थांबवले
िपपरी, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी

अवघ्या दोन महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता केबलच्या कामासाठी पुन्हा खोदण्याचा प्रकार आज चिंचवडच्या मोहननगर परिसरात घडला. या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांनी हे काम थांबविले. मोहननगर येथील स्वागत कमान ते काळभोरनगर येथील मेहता हॉस्पीटल दरम्यानच्या रस्त्यावर केबलच्या कामासाठी खोदाईचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. हा रस्ता दोनच महिन्यापूर्वी जवळपास ५० लाख रुपये खर्च करून तयार केला आहे. त्यामुळे चांगल्या अवस्थेतील रस्त्यावर खोदाईकाम सुरू असताना काही नागरिकांनी आक्षेप घेतला. याबाबतची कल्पना स्थानिक नगरसेवक मारुती भापकर यांनाही दिली. साडेअकराच्या सुमारास भापकर यांनी काही नागरिकांसमवेत जाऊन हे काम थांबविले. महापौर अपर्णा डोके यांना दूरध्वनी करून तेथे येण्याची विनंती भापकर यांनी केली. त्यानुसार, महापौर तेथे पोहोचल्या. तोपर्यंत नागरिकही जमा झाले होते. पालिकेचा नियोजनशून्य कारभार पाहून महापौरांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांनी शहर अभियंता एकनाथ उगिले यांच्याकडे याबाबतची विचारणा केली. रस्ते खोदाई करताना योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी उगिले यांना दिल्या. दरम्यान, रस्ते खोदाईसाठी पालिकेनेच परवानगी दिल्याची बाब नगरसेवक भापकर यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली. या कामासाठी संबंधित कंत्राटदाराकडून रीतसर शुल्कआकारणीही करण्यात आल्याचे सांगत पालिकेचा भोंगळ कारभार त्यांनी उघड केला. यापुढील काळात रस्ते खोदाई करताना अन्य संस्था तसेच खासगी कंपन्यांशी समन्वय ठेवावा, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.
द्रुतगती मार्गावर सिम्बायोसिसचे तीन विद्यार्थी अपघातात ठार
वडगाव मावळ, ३१ डिसेंबर / वार्ताहर
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटारकार रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात पुणे येथील सिम्बायोसिस विधी महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली (ता. मावळ) गावच्या हद्दीत आज दुपारी अडीचच्या सुमारास झाला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जाणारी अल्टो मोटारगाडी (डीएल ३ सीएझेड ४०२२) आज दुपारी पिंपळोली येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटारगाडी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या खडकावर आपटली. गाडीला वेग असल्याने उजवीकडे वळून रस्ता दुभाजकाला मोटारगाडी धडकली. यामध्ये गाडीचा पुढील भाग चेपला आहे. या अपघातात पुणे येथील सिम्बायोसिस विधी महाविद्यालयाचे वरुण ब्रायन नॉबी (वय १९, रा. मॉडेल कॉलनी, पुणे, मूळ रा. बेंगलोर), कु. मैत्रियी बालचंद्रन नायडू (वय २०, रा. पुणे, मूळ रा. नवी दिल्ली), तारुश असीम सुधान (वय १९, रा. पुणे, मूळ. रा. नवी दिल्ली) हे विद्यार्थी जागीच ठार झाले. के. झेड कुरियन (वय २०, रा. पुणे, मूळ. रा. केरळ), मोटारगाडी चालक रवनक अशोक कामत (वय २१, रा. पुणे) हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांना निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारार्थ दाखल केले आहे. मृत वरुण नॉबी हा सिम्बायोसिस विधी महाविद्यालयात द्वितीय वर्षांत, तारुश सुधान तृतीय वर्षांत तर मैत्रियी नायडू चौथ्या वर्षांत शिकत होती. चालक रवनक कामत विधी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षांत तर के. झेड. कुरियन तिसऱ्या वर्षांत शिकत आहेत.दरम्यान, कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत करीत आहेत.

मंदीच्या वातावरणातही पुणेकरच वाहन खरेदीच्या रेसमध्ये आघाडीवर
सुनील कडूसकर, पुणे, ३१ डिसेंबर

जागतिक मंदीने खप घटू लागल्याने उत्पादकांना वाहनांच्या किमती कमी करण्याबरोबरच ब्लॉक क्लोजरसारख्या उत्पादन कमी करण्याच्या उपाययोजना कराव्या लागल्या असल्या, तरी सरत्या वर्षांत पुणेकरांनी मात्र दरवर्षीप्रमाणेच विक्रमी वाहन खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहन खरेदीच्या या रेसमध्ये पुणेकर आघाडीवर असल्यानेच शहरातील वाहनांची संख्या साडेसतरा लाखांवर गेली आहे. परिणामी, वाहन संख्येतील आपले अग्रस्थान शहराने या वर्षीही कायम राखले आहे. चालू आर्थिक वर्षांत नोव्हेंबरअखेर संपलेल्या आठ महिन्यांत पुण्यामध्ये एकूण ९२ हजार ५५४ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ६५ हजार दुचाकी तर २१ हजारांहून अधिक मोटारींचा समावेश आहे. गेल्या वर्षी या काळात ८० हजार ९६९ वाहन नोंदणी झाली होती. त्यामध्ये ५५ हजार दुचाकी तर १५ हजार ६२३ मोटारींचा समावेश होता. ही आकडेवारीच पुण्यातील वाहन विक्रीवर मंदीचा फारसा परिणाम झालेला नाही, हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. जागतिक मंदीचा परिणाम भारतात जुलैनंतर जाणवू लागला, असे गृहीत धरले तरी पुण्यातील वाहन विक्रीवर त्याचा विशेष परिणाम झाल्याचे दिसत नाही. जुलैनंतर पुण्यात झालेल्या वाहन नोंदणीवरूनही हेच स्पष्ट होते. या वर्षी जुलैमध्ये एकूण ११ हजार १९५ वाहने नोंदविण्यात आली. गेल्यावर्षी ही संख्या ११ हजार ८२८ होती. ऑगस्टमध्ये ९८९९ (ऑगस्ट ०७- ११ हजार ४०२), सप्टेंबरमध्ये ९९९९ (सप्टें. ०७- ९२१०), ऑक्टोबरमध्ये १४ हजार ४३२ (ऑक्टोबर ०७- १० हजार १९३) तर नोव्हेंबरमध्ये १२ हजार ७१४ (नोव्हें. ०७- ९६७७) वाहने नोंद झाली आहेत. म्हणजेच गेल्या वर्षीच्या जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांमध्ये पुण्यामध्ये झालेल्या वाहन नोंदणीची तुलना करता या वर्षी झालेली वाहन नोंदणी त्यापेक्षा अधिकच असल्याचे स्पष्ट होते. गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत पुण्यामध्ये ५२ हजार ३१० वाहने नोंदविण्यात आली होती. या वर्षी मंदीचा प्रभाव असतानाही त्यामध्ये तब्बल सव्वासहा हजारांनी वाढ होऊन ती ५८ हजार २३९ वर गेली आहेत. या वाहननोंदणीमधील केवळ दुचाकी व मोटारींचाच विचार केला, तरी त्यांच्या नोंदणीतही लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हौशी पुणेकरांवर मंदीचा विशेष परिणाम झालेला नाही, असेच म्हणावे लागले. पुण्यात असलेल्या १७ लाख ४९ हजार २४२ वाहनांमध्ये १२ लाख ७९ हजार दुचाकी तर अडीच लाख मोटारींचा समावेश आहे. हे आकडे केवळ पुणे शहराचे असून त्यामध्ये पिंपरी-चिंचवड व बारामती येथे नोंद होणाऱ्या वाहनांचा समावेश केल्यास जिल्ह्य़ाची वाहन संख्या २०-२२ लाखांवर जाईल.

‘महाम्बरेंच्या निधनाने मराठी साहित्याचे नुकसान’
पुणे, ३१ डिसेंबर/प्रतिनिधी
आकाशाएवढे व्यक्तिमत्त्व असूनदेखील, अतिशय साध्या स्वभावाने अनेक माणसांना जोडणाऱ्या गीतकार गंगाधर महाम्बरे यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. अशा शब्दात विविध क्षेत्रातील नामवंतांनी गीतकार गंगाधर महाम्बरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. महाम्बरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षस्थानी डॉ. वि. मा. बाचल, माधवी वैद्य, कुमार सप्तर्षी, मंगेश कश्यप, डॉ. सतीश देसाई, अरुण जाखडे, फैयाज खान आदी उपस्थित होते. वाङ्मयाचे विविध प्रकार हाताळणाऱ्या महाम्बरे यांच्या कवितेने समाजात नव्या जाणिवा निर्माण केल्या आहेत. नवोदितांना त्यांनी सतत प्रोत्साहित केले, असे मिलिंद जोशी यांनी सांगितले. महाम्बरे त्यांच्या अनेक गीतांमधून आपल्यामध्ये अजरामर झाले आहेत. एक कवी, गीतकार म्हणून ते मोठे होतेच, पण माणूस म्हणूनदेखील ते मोठे होते.अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग होता, असे डॉ. वि. मा. बाचल म्हणाले. प्रतिभा मोडक, मंगेश वाघमारे, बाळ पंडित, सुहास जोशी, राजकुमार लोढा, जयंती भिडे, सुरेश रानडे, राजीव बर्वे आदींनी महाम्बरे यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी परिषदेच्या वतीने शोक ठरावाचे वाचन करण्यात आले.

‘शेतमाल तारण योजना’ लवकरच-पाटील
पुणे, ३१ डिसेंबर/प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे खेळावा, त्यांच्या उद्योगांना भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ‘शेतमाल तारण योजना’ जाहीर केली असून या योजनेची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री मदन पाटील यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि काजू उत्पादक संघ व महाग्रेप्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘काजू, बेदाणा व गूळ महोत्सवाच्या’ समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. या प्रसंगी आमदार दिलीप मोहिते-पाटील, राज्याचे अप्पर आयुक्त भास्कर शेळके, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक एस. पी. सांगळे, सुनील पवार, संतोष पाटील, पुण्याचे निबंधक तोष्णीवाल आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले की ग्राहक आणि उत्पादक यांच्यात ओळख निर्माण होण्यास असे महोत्सव महत्त्वाचे ठरत आहेत. अशा महोत्सवामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत असून ग्राहकांपर्यंत थेट माल पोहचवता येतो. त्यामुळे मोठय़ा शहरांबरोबरच आपापल्या भागात असे महोत्सव होण्याची गरज आहे. हवामानात सतत बदल होत आहेत. त्यामुळे पर्यावरणामध्ये संतुलन राखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न चालू आहेत. आज शेतकऱ्यांचे उत्पादन चांगले असते, परंतु जाहिरात करण्यात तो कमी पडतो, परंतु अशा महोत्सवांतून त्यांच्या मालाची जाहिरात होऊ शकते. यावेळी काजू, गूळ उत्पादकांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले. मोहित पाटील म्हणाले की, या महोत्सवामुळे ग्राहकांना उत्तम प्रतीचा माल कमी किमतीत उपलब्ध होत आहे. आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. तरीही शेतीस आतापर्यंत न्याय मिळालेला नाही. शेती व्यवसाय विकसीत करायचा असेल तर त्यामध्ये सोई सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. राज्यात बहुतांश मालाची विक्रीही कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे केली जाते. परंतु या समित्या आजारी पडल्यानंतर त्यांना आधार देण्याची कोणतीही यंत्रणा राज्य सरकारकडे नाही, तसेच प्रत्येक कृषी उत्पन्न समितीस समान न्याय द्यायला हवा. पुणे, मुंबई व नागपूर या कृषी उत्पन्न समितीची निवडणूक घ्यावी, अशी मागणीही मोहिते पाटील यांनी यावेळी केली. देशाचा आधारस्तंभ हा शेतकरी आहे. परंतु त्यांच्या समोर अनेक अडचणी आहेत. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पणन मंडळातर्फे प्रयत्न केले जातील. शेतकरी सुधारला तर देशात नक्कीच क्रांती होऊ शकेल, असे मत शेळके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. पी. सांगळे यांनी केले तर संतोष पाटील यांनी आभार मानले.

नोंदणी व मुद्रांक विभागातील गैरव्यवहार एक निलंबित, तर २९ जणांच्या बदल्या
पुणे, ३१ डिसेंबर/ प्रतिनिधी
कामात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून एका सह दुय्यम निबंधकाला निलंबित करण्यात आले असून शहर व परिसराच्या कार्यालयांमधील तीन दुय्यम निबंधकांसह २९ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागांच्या विविध कार्यालयांतील गैरव्यवहार ‘लोकसत्ता’ने नुकताच चव्हाटय़ावर आणला होता. त्याची दखल घेत काल ही कारवाई करण्यात आली.

वीजवाहिन्यांच्या कामामुळे आज शहरातील निम्म्या भागातील वीजपुरवठय़ावर परिणाम
पुणे, ३१ डिसेंबर/ प्रतिनिधी
लोणीकंद - थेऊर व फुरसुंगी- थेऊर या दरम्यानच्या वीजवाहिन्यांवर ‘महापारेषण’कडून तातडीचे काम करण्यात येणार असल्याने उद्या (गुरुवारी) मुंढवा, खराडी व थेऊर या उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या भागामध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी पाच या वेळेत वीजपुरवठा कमी दाबाने किंवा खंडित होईल, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.

पिंपरी महापालिकेचा अजब कारभार
हिवाळ्यासाठीची स्वेटर खरेदी आता उन्हाळ्यात! होणार,विद्यार्थी थंडीने गारठणार

पिंपरी, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या खरेदीच्या राजकारणात जवळपास १७ हजार विद्यार्थ्यांचे ऐन थंडीत चांगलेच हाल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिवाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना अद्याप स्वेटर मिळालेले नाहीत. आणखी किमान महिनाभर तरी हीच अवस्था राहणार असल्याची कबुली प्रशासनानेही दिली आहे. शिक्षण मंडळाकडून बालवाडी आणि इयत्ता पहिलीच्या सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना स्वेटर देण्यात येणार आहे.

जागल्या
सावध राहा!

मुकुंद संगोराम
नव्या वर्षांचं स्वागत करत असतानाच आपल्या सगळ्यांच्या मनात काही शंकाकुशंकांनी घर केले आहे. गेल्या दोनतीन महिन्यांत असुरक्षितता आणि आर्थिक मंदीने आपल्या सगळ्यांना घेरले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसारखी शहरे आता महानगरे होण्याच्या वाटेवर आहेत. देशातील सहा महानगरांच्या यादीत पुण्याचा क्रमांक लागेल, हे वरवर सुखद असले, तरी त्यामुळे निर्माण होणारे सगळे प्रश्न आत्तापासूनच आ वासून उभे राहिले आहेत. शहरातील वाहतूक दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे.

मोटार प्रशिक्षण योजनेतील मागासवर्गीय तरुण भत्त्यापासून वंचित
पुणे, ३१ डिसेंबर/प्रतिनिधी
समाजकल्याण विभागाच्या मोटार प्रशिक्षण योजनेअंतर्गत मागासवर्गीय तरुणांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण भत्याची एक कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम थकीत असून राज्यातील पाच हजार प्रशिक्षणार्थी या लाभापासून वंचित आहेत.

‘याद करो कुर्बानी..’ द्वारे हुतात्म्यांना श्रद्धांजली
पुणे, ३१ डिसेंबर/प्रतिनिधी
मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची सर्वानी काळजी घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत पोलीस उपायुक्त रघुनाथ खैरे यांनी येथे व्यक्त केले.

नगर रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा
पुणे, ३१ डिसेंबर/प्रतिनिधी
नगर रस्ता रुंदीकरणातील नियोजनाचा अभाव, समस्या आणि अडथळ्यांमुळे कामाचा वेग मंदावला असून, त्यामुळे वाहतुकीची कोंडी वारंवार होत आहे. शास्त्रीनगर चौक ते रामवाडी जकातनाका दरम्यानच्या रस्त्यात दुभाजक आणि विजेचे दिवे नाहीत, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक
पुणे, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी
गांजा, चरस विक्री करणाऱ्या दोघांसह खरेदीदार अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्याची दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बुद्रुक यांनी आज दिले. गिलबर्ट विल्यम ओव्हाळ (वय २९, रा. काळेवाडी), ज्योती गुलाबराव बेंडे (वय ३०, रा. येरवडा) आणि साहा मोईस गोलीवाला (वय २५, रा.कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. कोरेगाव पार्कमध्ये सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींकडून एक लाख ६९ हजार ६६० रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यांच्याकडून मारुती झेन गाडी जप्त करण्यात आली. आरोपी ओव्हाळ आणि बेंडे या दोघांनी गोलीवाला याला चरस विक्रीसाठी त्याच्याकडे आले होते. बेंडे हिने घरात माल ठेवल्याची कबुली दिली.हा माल कुलू मनाली येथून ईश्वर नावाटय़ा व्यक्तीकडून अजय नावाचा व्यक्ती आणून देत होता. यामुळे चरस विक्रीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. आणखी साथीदार कोण आहेत. तसेच आरोपी गोलीवाला हा त्यांचा नेहमीचा ग्राहक असून अन्य ग्राहक कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. शिल्पा महातेकर यांनी काम पाहिले.

घरफोडी करुन दीड लाखांचे दागिने पळविले
पुणे, ३१ डिसेंबर / प्रतिनिधी
कुटुंबासह देवदर्शनाला बाहेर गेल्याचा फायदा घेऊन बंद असलेल्या वाडय़ात प्रवेश करणाऱ्या चोरटय़ाने घरफोडी करून सोन्याचे एक लाख ४९ हजार रुपये किमतीचे दागिने पळविले. याप्रकरणी वत्सला माधववराव जाधवराव (रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जाधवराव यांचा कसबा पेठेत दोन मजली वाडा आहे. त्या देवनदर्शनासाठी कुटुंबासह बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे गेटला कुलूप लावले होते. त्यावेळी चोरटय़ाने त्यांच्या शेजारच्या घराच्या छतावरून चढून जाधवराव यांच्या छतातून घरात प्रवेश केला. ही घटना रविवारी ते सोमवारी रात्री घडली. चोरटय़ाने शेजारच्या किराणा दुकानाच्या गल्ल्यातील पाच हजार रुपये तर जाधवराव यांच्या घरातील सोन्याचे दागिने असा एक लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून पळविल्याचे उघडकीस आले आहे. फौजदार आर. एस. बोंटे तपास करीत आहेत.

साखरेच्या भावात २५ रुपयांनी घसरण
पुणे, ३१ डिसेंबर/प्रतिनिधी
खुल्या विक्रीसाठी मुबलक साखर उपलब्ध झाल्याने साखरेची भाववाढ थांबली आहे. आज येथील घाऊक बाजारात साखरेच्या भावात २५ रुपयांनी घसरण झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी खुल्या विक्रीचा कोटा अपुऱ्या प्रमाणात जाहीर झाल्याने साखरेच्या भावात मोठी वाढ झाली होती. कोटय़ाच्या घोषणेपूर्वी (दि. २९ डिसेंबर) घाऊक बाजारात साखरेचा प्रतिक्विंटलचा भाव १९२५ रुपयांपर्यंत कडाडला होता. काल सायंकाळी कोटय़ाची घोषणा झाल्यानंतर भाववाढीस आळा बसला. आज सकाळी बाजार उघडताच कालच्या तुलनेने भाव २५ रुपयांनी कमी झाला. आज सायंकाळी घाऊक बाजारात साखरेचा प्रतिक्विंटलचा भाव १८९० ते १९०० रुपये होता. दरवाढ रोखण्यासाठी खुल्या विक्रीसाठी मुबलक कोटा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याचा विचार करून केंद्र सरकारने काल तिमाहीसाठी एकूण ४६ लाख टन साखर खुल्या विक्रीसाठी जाहीर केली. जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी प्रत्येकी १५ लाख टन तर मार्चकरिता १६ लाख टन साखरेचा कोटा देण्यात आला आहे. याशिवाय या तिमाहीत राखीव कोटय़ातील चार लाख टन विकण्याची कारखान्यांना मुभा देण्यात आली आहे. गतवर्षीच्या ४१ लाख टनाच्या तुलनेने हा कोटी मुबलक आहे. यामुळेच भाववाढीस ‘ब्रेक’ लागला असून भावात आणखी बरीच घट अपेक्षित आहे. मात्र कारखान्यांकडून विक्रीस कसा प्रतिसाद मिळेल यावरच ही घसरण अवलंबून असेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.