Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९
राज्य

आदिवासी कुटुंबांची उपासमार
एमआरईजीएसवर राबणाऱ्या ५१ हजार मजुरांची साडेतीन कोटी रुपये मजुरी सरकारने थकविली

सोपान बोंगाणे
ठाणे, ३१ डिसेंबर

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार (एमआरईजीएस) योजनेंतर्गत वन विभागाच्या कामावर तब्बल सहा महिने राबलेल्या ५१ हजार १६७ आदिवासी मजुरांना आठ महिन्यांच्या मजुरीपासून सरकारने वंचित ठेवले आहे. त्यामुळे या सर्व मजुरांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधीच कुपोषणग्रस्त असलेल्या जव्हार व डहाणू या आदिवासी तालुक्यातील हे सर्व मजूर असून, त्यांची तीन कोटी ३७ लाख २५ हजार रुपये एवढी मजुरी सरकारनेच थकविली असल्याची खळबळजनक व गंभीर बाब उघड झाली आहे. रोजगार हमी योजनेवर मागेल त्याला काम देण्याच्या बाता मारणाऱ्या सरकारने कामाच्या बदल्यात दाम अदा न करण्याचाही निर्णय घेतला आहे काय, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

काळ्या मातीचे वरदान,
पण पडीक असल्याचा शाप!

एखादी जमीन कितीही सुपीक असेल आणि जर ती वहिवाटीखाली नसेल तर तिच्या कसदारपणाचा कोणाला फायदा होणार? परभणी हा असाच काळ्या मातीचे वरदान लाभलेला जिल्हा; पण दृष्टिहीन राजकीय नेत्यांच्या बेफिकिरीने तो विकासाच्या बाबतीत पडीकच राहिलेला! म्हणूनच गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रात पिछाडीवर राहण्याचा मान परभणी जिल्ह्य़ाने मिळविला आहे. जमीन काळी, सर्वाधिक सिंचनाचा लाभ आणि मनुष्यबळ असतानाही जिल्ह्य़ात एकही कृषिपूरक उद्योग गेल्या काही वर्षांत उभा राहू शकला नाही. कापसाचे बोंडही न पिकणाऱ्या सांगोलीसारख्या दुष्काळी भागात सूतगिरण्या उभ्या राहतात आणि विक्रमी कापसाचे उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्य़ातील सहकारी सूतगिरणी बंद पडू शकते.

साडेसात हजारांसाठी डॉक्टरांकडून माता-पुत्राचे अपहरण; मुलाची विक्री
दिलीप शिंदे
ठाणे, ३१ डिसेंबर

रुग्णालयाचे साडेसात हजार रुपयांचे बिल देण्यास असमर्थ ठरलेल्या मातेला तिच्या नवजात बालकासह डॉक्टर पिता-पुत्रांनी अपहरण करून कोंडून ठेवल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी डॉक्टर पिता - पुत्रास आज सायंकाळी अटक केली आहे. रुग्णालयातून गायब करण्यात आलेल्या त्या दोन महिन्याच्या मुलाची विक्री करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याचा तपास केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांदरे यांनी दिली. डॉ. हरकिसन भन्साली आणि डॉ. अंकुश भन्साली अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

अलिबाग समुद्रकिनारी सशस्त्र नागरिक पकडण्यात मेटल डिटेक्टर यंत्रणा ठरली अपयशी
जयंत धुळप
अलिबाग, ३१ डिसेंबर

अलिबाग समुद्रकिनारी मेटल डिटेक्टर फ्रेम व स्टेनगन धारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ समुद्रावर जाणाऱ्या व येणाऱ्या पर्यटकाने या मेटल डिटेक्टर फ्रेम मधुनच जाणे पोलिसांनी बंधनकारक करून संध्याकाळी सहा वाजता ही यंत्रणा कार्यान्वित केली़ अनेक पर्यटक या मधुन जा-ये करित होत़े पर्यटकांची तपासणी योग्य प्रकारे चालू आहे, असा दावा येथे उपस्थित पोलीस अधिकारी देखील करीत होत़े त्याच वेळी रिव्हॉल्व्हरधारी नागरिक जयपाल पाटील हे या मेटल डिटेक्टर फ्रेममधून गेले असता, त्यांच्याकडे शस्त्र असुनही या यंत्रणेने तसे सुचित करणारा संदेश दिला नाही़ पाटील यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी ही बाब उपस्थित पोलिसांच्या लक्षात आणून दिली असता, ही मेटल डिटेक्टर सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षात बंद असल्याने निरूपयोगी ठरली असल्याचे यावेळी स्पष्ट झाल़े
मुंबईत झालेल्या अतिरेकी कारवाया आणि त्या पाश्र्वभुमीवर संपुर्ण कोकण किनारपट्टीतील समुद्र किनाऱ्यांवर थर्टी फर्स्ट सेलीब्रेशनकरिता पर्यटकांची झालेली प्रचंड गर्दी यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये याकरिता रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर रायगड पोलिसांनी खास सशस्त्र व मेटल डिटेक्टर यंत्रणेसह सुरक्षा व्यवस्था तैनात केली असल्याचा दावा रायगड जिल्हा पोलिसांनी केला आह़े
मात्र अलिबाग समुद्र किनारी तनात मेटल डिटेक्टर फ्रेम ही सुरक्षा व तपासणी यंत्रणा केवळ शोबाजी असल्याचा प्रत्यय आज संध्याकाळी या किनाऱ्यावर उपस्थित पर्यटकांसह पोलीस व पत्रकार यांनाच आला आह़े
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातीलच समुद्र किनारी रायगड पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचे असे दिवाळे वाजल्यावर, जिल्ह्यातील उर्वरित समुद्रकिनारी नेमकी काय सुरक्षा व्यवस्था असेल, याचा अंदाज बांधण्याकरिता हे पुरेसे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही़

कोलशेत खाडी किनाऱ्यावर संशयित अतिरेक्यांचा शोध
ठाणे,३१ डिसेंबर/प्रतिनिधी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काही अतिरेकी इतरत्र पळाले असण्याची भीती व्यक्त केली जात असताना ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कोलशेत खाडी किनारी तीन तरुण संशयितरित्या राहत असल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. ते अतिरेकी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने त्यांचे रेखाचित्र काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी दिली.
२६ डिसेंबर रोजी गणेश तरे हा ग्रामस्थ कोलशेत खाडी किनाऱ्याकडे गेला असता काही तरुण संशयितरित्या राहत असलेले आढळले. "हम लोग कितने दिन से यहा सड रहे है" अशा प्रकारचा संशयास्पद संवाद तरे यांच्या कानावर पडला. त्यांनी हटकल्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल घडून आला. त्यांच्याकडे असलेल्या बॅगा व हालचाली पाहिल्यानंतर ते अतिरेकी असावेत, असा संशय येऊन ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले.
मात्र ठोस कारवाई न झाल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी तरे यांच्यासह आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सर्व हकिगत सांगितली. तेव्हा त्या संशयितांचे रेखाचित्र काढून शोध घेण्याचे आश्वासन आयुक्त ढेरे यांनी शिष्टमंडळाला दिले.