Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

क्रीडा

बांगलादेश हरला पण, सन्मानाने
ढाका, ३१ डिसेंबर / एएफपी

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज यजमान बांगलादेशचा १०७ धावांनी पराभव झाला पण, यजमान संघाने या कसोटी सामन्यात फलंदाजीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या ५२१ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा दुसरा डाव आज पाचव्या व अंतिम दिवशी ४१३ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद अश्रफूलने (१०१) झुंजार शतक झळकावले तर अश्रफूलचा कालचा नाबाद साथीदार शाकिब अल हसनने कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी करताना ९६ धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या लढवय्या फलंदाजीमुळेच श्रीलंकेला या कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध सहजासहजी विजय नोंदवता आला नाही. शाकिब अल हसन सामनावीराचा मानकरी ठरला.

ऑस्ट्रेलियन युगाचा अंत; प्रसारमाध्यमांकडून ताशेरे
मेलबर्न, ३१ डिसेंबर / पीटीआय
ऑस्ट्रेलियन क्रिकेट मृतवत झाले आहे, अशा अर्थाच्या मथळ्यांनी आज ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या दारुण पराभवावर सडकून टीका केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या देदिप्यमान युगाचा अंत झाल्याचेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
द डेली टेलिग्राफने म्हटले आहे की, मेलबर्न क्रिकेट मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियन क्रिकेटची कत्तल झाली. खराब फलंदाजी, अपयशी गोलंदाजी, वाईट नेतृत्व आणि अकार्यक्षम निवड समिती सदस्य या सर्वांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या या दुरवस्थेला हातभार लावला.

ऑस्ट्रेलियन संघ दुखापतीने बेजार
मेलबर्न, ३१ डिसेंबर/ पीटीआय
२००८ हे वर्ष वाईट गेले असले तरी २००९ सुद्धा ऑस्ट्रेलियाला चांगले जाईल असे वाटत नाही, कारण पराभवाने मानसीक वार्धक्य आलेले त्यांचे खेळाडू नव वर्षांच्या सुरूवातीलाच दुखापतीने बेजार झालेले आहेत. ब्रेट ली, अ‍ॅन्ड्रयू सायमन्डस, शेन व्ॉटसन, स्टुअर्ट क्लार्क, शॉन टेट, फिल जॅक्स, अ‍ॅश्ले नॉफ्के आणि ब्रायस मॅकगेन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या दुखापतीच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये ब्रेट ली आणि अ‍ॅन्ड्रयू सायमन्डस दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाचे टेन्शन अधिकच वाढलेले आहे. दुसऱ्या कसोटी दरम्यान पहिल्या डावात गोलंदाजी करताना ली चा घोटा दुखावला गेला होता. यावर्षभरात ली ने ५८०.१ षटके टाकली असली तरी त्याला लौकिकाला साजेसी कामगिरी करता आलेली नाही. बायकोबरोबर झालेल्या घटस्फोटानंतर ली ला सूर गवसलाच नाही.

क्रोनिए ‘ब्रिगेड’ पेक्षा स्मिथ आर्मी’ सरस
मेलबर्न, ३१ डिसेंबर/पीटीआय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर अखेरच्या कसोटीपूर्वीच २-० अशी विजयी आघाडी घेत मोहोर उमटवणाऱ्या ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघ १९९० मध्ये हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघापेक्षा सरस आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू व्यक्त करीत आहेत.
१९६९-७० मध्ये खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ सवरेत्कृष्ट होता यात वाद नाही पण, ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत पराभव करत इतिहास घडवला, असे मत स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या १९६९-७०च्या दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या अली बाकर यांनी व्यक्त केले.

आसिफबाबतचे ‘ते’ वृत्त खोटे
कराची, ३१ डिसेंबर / पीटीआय

पाकिस्तानचा निलंबित वेगवान गोलंदाज महंमद आसिफ ‘अमली पदार्थसेवन चौकशी’ न्यायाधिकरणाच्या बैठकीपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होणार असल्याच्या वृत्ताचा त्याचे वकील शाहीद करीम यांनी इन्कार केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगने नेमलेल्या या न्यायाधिकरणाची बैठक २४ जानेवारी रोजी लंडन येथे होणार आहे.
हे वृत्त कुठून प्रसिद्ध झाले माहीत नाही परंतु स्पर्धेत खेळणे आता शक्य नसून न्यायाधिकरणाचा निर्णय होईपर्यंत वाट पाहावी लागेल. चाचण्यांची पुनर्तपासणी करणे शक्य नसून ते आंतरराष्ट्रीय कायद्याविरोधात आहे, असे करीम यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.

इंग्लंडमध्ये आयपीएल खेळवणार नाही- मोदी
नवीदिल्ली, ३१ डिसेंबर/ पीटीआय

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) ट्वेंन्टी-२० स्पर्धेचे दुसरे पर्व भारताबरोबर संयुक्तरीत्या इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात चालू होती. पण आज आयपीएलचे कमिशनर ललीत मोदी यांनी आज या वृत्ताचे खंडन केले असून या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत असले तरी ही स्थानिक स्पर्धा आहे. त्यामुळे आयपीएल इंग्लंडमध्ये खेळवण्याचा प्रश्नच येत नसून ही स्पर्धा फक्त भारतातच खेळवण्यात येईल. त्यामुळे ही स्पर्धा इतर कोणत्याही देशात खेळविण्यात येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

चंदरपॉलच्या तंदुरुस्तीची विंडीजला प्रतीक्षा
क्वीनस्टॉन, ३१ डिसेंबर / पीटीआय

मनगटाच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या शिवनरेन चंदरपॉल लवकरच तंदुरुस्त होण्याची प्रतीक्षा वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला आहे. दुखापत झाल्याने चंदरपॉल पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. किमान दुसऱ्या सामन्यात तरी तो खेळेल, अशी आशा विंडीज संघाला आहे. येथे झालेल्या वेस्ट इंडिज - न्यूझीलंड विरुद्धचा पहिल्या एकदिवसीय सामन्यावर आज पावसाने पाणी फेरले.
३६ व्या षटकांत वेस्ट इंडिजची धावसंख्या ५ बाद १२९ असताना पावसामुळे सामना न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाणेफेक जिंकून विंडिजला फलंदाजीसाठी निमंत्रित करण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या पथ्यावर पडला. डावाची खराब सुरुवात व त्यात चंदरपॉलच्या दुखापतीने विंडिजचे नशीब आज चांगले नसल्याचे दिसले.
त्यांच्या डावाची सुरुवात तशी खराबच झाली. कर्णधार ख्रिस गेल हा पंचांच्या निर्णयाचा बळी ठरला. कर्णधार कायले मिल्सच्या गोलंदाजीवर ब्रेन्डेन मॅकमिलनच्या हातात झेल देऊन बाद झाला. पंच बेन्सन यांनी तो बाद देत चेंडूला बॅटचा स्पर्श झाला होता अथवा नाही हे दूरचित्रवाणी कॅमेरालाही टीपता आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर चंदरपॉलच्या जागेवर वर्णी लागलेला सेवनरिन चॅटरगून हाही १४ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या रामनरेश सरवनने झेव्हीयर मार्शलला मदतीला घेत ६० धावांची भागीदारी केली.

सातत्य राखल्यास भारतीय संघाचे दार नक्कीच उघडेल- पुजारा
राजकोट, ३१ डिसेंबर/ पीटीआय

भारतीय संघातील प्रवेशाबद्दल मला कसलीही काळजी नाही. फलंदाजीमध्ये सातत्य राखल्यास भारतीय संघाचे दार माझ्यासाठी नक्कीच उघडेल, असे मत यंदाच्या मोसमात तीन त्रिशतके ठोकून आपले नाणे खणखणीत वाजवून सौराष्ट्रचा आधारस्तंभ बनलेल्या चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे.
भारतीय संघात निवड झाली किंवा नाही याबद्दल मी कोणताही विचार करीत नाही. मी जर सातत्याने चांगली फलंदाजी केली तर मला नक्कीच भारतीय संघात स्थान मिळेल, असे २० वर्षीय पुजाराने सांगितले.
पुजाराने कर्नाटकविरूद्धच्या उपान्त्यपुर्व सामन्यात नाबाद ११२ धावांची खेळी करून सौराष्ट्रला अद्भूत विजय मिळवून दिला होता. त्याच्या या खेळीमुळेच सौराष्ट्रने सामन्याच्या शेवटच्या दिवशी ३१५ धावा करण्याचा पराक्रम करून उपान्त्य फेरी गाठली आहे. त्यांचा उपान्त्य फेरीतील सामना चेन्नईमध्ये मुंबईविरूद्ध होणार आहे.
कर्नाटकविरूद्धच्या सामन्यात मला राहुल द्रवीडकडून बऱ्याच मौल्यवान गोष्टी शिकता आल्या. जो खेळाडू गेली दहा वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करतोय, ज्याने संघाचे कर्णधारपद भूषविले आहे, ज्याच्या नावावर दहा हजार धावा आहेत त्याची एखाद्या नवीन खेळाडूबरोबर तुलना करणे योग्य नाही, असेही पुजाराने सांगितले.चेन्नईतील उपान्त्य फेरीतील सामन्यात सचिन तेंडुलकर आणि झहीर खान हे दोघेही ‘दादा’ खेळाडू खेळणार असून या दोघांनाही भेटण्यासाठी पुजारा उत्सुक आहे.

बुद्धिबळ: सोलापूरच्या पवारला विजेतेपद
सोलापूर, ३१ डिसेंबर/प्रतिनिधी

बुद्धिबळ प्रसारक मंडळाच्या वतीने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या ‘जल्लोष’ बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू रोहित पवारने ९ पैकी ८ गुण मिळवून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत रोहितने आपला उत्कृष्ट खेळ करीत ६ पैकी ६ गुण मिळवून आघाडी घेतली. तर सातव्या फेरीत पुण्याच्या रेंज्यू सनी विरुद्धचा डाव बरोबरीत सोडवत आघाडी कायम ठेवली. आठव्या फेरीत रोहितने या स्पर्धेचे वैशिष्टय़ असलेल्या व ७ पैकी ७ फेऱ्या जिंकलेल्या संगणकाचा धक्कादायक पराभव करीत स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. नवव्या फेरीत बरोबरी स्वीकारून रोहितने आपल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत राज्यातील ९५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या वर्षी स्पर्धेतील मानांकित रोहित पवारने बरीच वर्षे पुणेकरांकडे असलेले स्पर्धेचे विजतेपद सोलापूरच्या वाटय़ाला आणून दिले.

जयेंद्र मयेकर ‘भंडारी श्री २००८’
मुंबई, ३१ डिसेंबर/क्री.प्र.

भंडारी शारीरिक क्रीडा समितीने २८ डिसेंबर रोजी भंडारी मंडळ सभागृह, दादर येथे आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागच्या स्लिमवेल व्यायाम शाळेच्या जयेंद्र मयेकर याने भारत व्यायाम शाळेच्या गणेश कांबळी व मॅक्स जिम्नॅशिअमच्या संजय मयेकर यांच्यावर मात करून ‘भंडारी श्री २००८’ च्या किताबाचा मानकरी ठरला. त्याला रोख रु. २५००/- आकर्षक चषक व फिरता चषक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोद साळवी यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.
निकाल - ६० कि.पर्यंत गट- १) संजय मयेकर (मॅक्स जिम्नॅशियम) २) सुयोग कांबळी (शिवनेरी) ३) सिद्धेश बांगे (समर्थ, घाटकोपर).६० कि. ते ६५ कि.- १) जयेंद्र मयेकर (स्लिमवेल) २)परेश मोर्वेकर (समर्थ) ३) स्वप्निल मोरे (बोवलेकर).६५ कि. वरील गट- १) गणेश कांबळी (भारत) २) गुरुदास पारकर (शिवनेरी) ३) नीळकंठ पाटील (शिवनेरी).