Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

मच्छिंद्राक पालिका इसारली
संजय बापट

चोखंदळ अभिनयाच्या माध्यमातून मराठी नाटकं आणि मालवणी भाषा अटकेपार नेणारे ज्येष्ठ नाटय़निर्माते- कलावंत दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी गडकरी रंगायतनच्या तालीम हॉलला त्यांचे नाव देण्याचा निर्णय होऊन वर्षांहून अधिक काळ लोटूनही या हॉलचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मनोदय आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनानेही ‘बाबूजीं’कडे दुर्लक्ष केल्याने नाटय़रसिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

कळवा परिसरातील २० हजार टेलिफोन ग्राहकांना दिलासा
मे मध्ये सुरू होणार नवे एक्स्चेंज

ठाणे/प्रतिनिधी : सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून कळवा येथे महानगर टेलिफोनचे नवे अद्ययावत टेलिफोन एक्स्चेंज मे महिन्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असून त्यामुळे कळवा, खारेगाव व विटावा परिसरातील सुमारे २० हजार दूरध्वनी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे येथील चरई हे मुख्य टेलिफोन एक्स्चेंज सुरू होऊन अनेक वर्षे झाली. या केंद्रातून ठाणे शहरातील काही भाग व कळवा, खारेगाव, विटावा ते रेतीबंदपर्यंतच्या ग्राहकांना टेलिफोनची सेवा देण्यात येते.

लांब पल्ल्याच्या तीन गाडय़ांना ठाण्यात थांबा!
ठाणे/प्रतिनिधी

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस ते औरंगाबाद जनशताब्दी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचिवेल्ली गरीबरथ आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनौ एक्सप्रेस या तीन लांब पल्ल्याच्या गाडय़ा १ जानेवारीपासून ठाणे रेल्वे स्थानकात थांबणार असून ९ जानेवारी रोजी ठाणे-नेरुळ लोकलचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री नरेंद्र राठवा यांच्या हस्ते होईल. ही शिवसेना खासदार आनंद परांजपे यांच्या प्रयत्नातून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मिळालेली नववर्षांची भेट आहे.

गौरव गाडगीळला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक
ठाणे/प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठात अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे व माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या नावाने देण्यात येणारे सुवर्णपदक यंदा गौरव गाडगीळ या विद्यार्थ्यांने पटकाविले. मुंबई विद्यापीठाच्या सर्व शाखांमधून एकाची या सुवर्ण पुरस्कारासाठी निवड केली जाते. मंगळवारी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गौरव गाडगीळ याला सुवर्ण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गौरवने इतिहास विषयात एम. ए. केले असून त्याला आयएएस व्हायचे आहे.विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व शास्त्र तसेच वैद्यक शाखांतील पदवीच्या विद्यार्थ्यांमधून एकाची या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. शैक्षणिक क्षेत्रातील त्या विद्यार्थ्यांची एकूण कामगिरी, विविध पातळीवर मिळालेले यश, क्रीडा क्षेत्रातील यश, नेतृत्वगुण तसेच व्यक्तिमत्त्व आदी विविध पातळ्यांवर ही निवड केली जाते.

आंतर बी.एड्. महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
ठाणे प्रतिनिधी

मुंबईतील हुंडाविरोधी चळवळ या सामाजिक संस्थेच्या वतीने शासकीय अध्यापक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाशी संलग्न आंतर बी.एड्. महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्त्री जगेल तरच जग तरेल, हुंडाविरोधी चळवळीत शिक्षकांची भूमिका, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांना परावृत्त करण्याचे उपाय, असे विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत. गुरुवार, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शासकीय अध्यापक महाविद्यालय, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मेट्रोसमोर, मुंबई येथे होईल.
विख्यात शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री सुलभा पाणंदीकर स्मृती व्याख्यानमालेनिमित्त गेल्या पाच वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यंदा व्याख्यानमालेचे ३१वे पुष्प मनोवैज्ञानिक प्रा. प्रतिमा हवालदार ‘मी एक शिक्षक- मनात डोकावतानाह्ण या विषयावर गुंफणार आहेत. संपर्क- आशा कुलकर्णी, कार्यवाह हुंडाविरोधी चळवळ- ९५२२-२६८३६८३४, ९८१९३७३५२२.

रविवारपासून आयुर्वार्ताची पंचकर्म केंद्र व्यवस्थापन कार्यशाळा
ठाणे प्रतिनिधी

येथील आयुर्वार्ता प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने रविवार, ४ जानेवारीपासून सातवी पंचकर्म व्यवस्थापन कार्यशाळा सुरू होत असून, त्यात सलग १२ रविवारी यासंदर्भातील विविध विषयांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.पंचकर्म केंद्र कसे असावे, उपलब्ध जागेचा वापर कसा करावा, काळानुरूप केंद्रात कोणकोणती साधने वापरावीत, पंचकर्म का व कधी करावे, कोणत्या परिस्थितीत पंचकर्म टाळावे, विद्ध तसेच अग्निकर्म आदी नावीन्यपूर्ण चिकित्सांची प्रात्यक्षिके, पंचकर्मविषयक कायदेशीर बाबी आदी विषयांचा ऊहापोह या तीन महिन्यांच्या कार्यशाळेत केला जाणार आहे. या प्रशिक्षणात एकूण २० व्याख्याने आणि १५ प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश असेल.
प्रवेश मर्यादित असून, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. संपर्क- वैद्य उदय कुलकर्णी, द्वारा पंचकर्म केंद्र, घंटाळी मंदिराजवळ, नौपाडा, ठाणे (प) दूरध्वनी- २५४३३०३६.

डोंबिवलीतील फेरीवाल्यांची शिवसैनिकांकडून धुलाई
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकालगत गेली अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांना शिवसैनिकांनी आज आपला हिसका दाखवीत पिटाळून लावले. गेल्या आठवडय़ात शिवसेनेने फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेला इशारा दिला होता, परंतु तरीही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांना मारझोड करीत पिटाळून लावले.
शहरप्रमुख शरद गंभीरराव, महिला आघाडीप्रमुख स्मिता बाबर, उपशहरप्रमुख प्रभाकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांना हटविण्याची कामगिरी दीडशे शिवसैनिकांनी पार पाडली. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या, त्यामुळे पोलीसही हैराण झाले होते. त्यामुळे कारवाईच्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणे पसंत केले.
शिवसैनिकांनी मारझोड करीत, फेरीवाल्यांचे पदपथ, रस्त्यावरील टेबल उलथून टाकत, सामान इतस्तत फेकत कारवाईला सुरुवात करताच फेरीवाल्यांची पळापळ झाली. पाटकर रोडवरील फेरीवाले, मधुबन, केळकर रोड, इंदिरा चौक, रॉथ रोडवरील फेरीवाल्यांवर शिवसैनिकांनी हल्ला चढविला.
फेरीवाल्यांकडून हप्ते घेणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनाही शिवसेनेने धडा शिकवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जिल्हा नियोजन समितीवर चौघे बिनविरोध
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे जिल्हा नियोजन समितीसाठी २३ जानेवारी रोजी निवडणूक होत असून, मंगळवारी छाननीत २२ अर्ज बाद ठरल्याने रिंगणात ४० जागांसाठी आता १०३ उमेदवार उतरले आहेत, तर ग्रामीण मतदारसंघ (जिल्हा परिषद) मधून डॉम्निक पास्कल, डाबरे, हर्षदा चंद्रकांत तरे, शारदा सुरेश म्हात्रे या सर्वसाधारण महिला गटातून आणि दत्तात्रय नारायण पवार हे अनुसूचित जमाती प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या ४० जागांसाठी १२५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत २२ अर्ज अवैध ठरले. महापालिका मतदारसंघात २४ जागांसाठी ६३, नगरपालिका मतदारसंघात चार जागांसाठी १५, तर जिल्हा परिषद मतदारसंघात १२ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी असून, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. राष्ट्रवादीतर्फे विजय म्हात्रे, कपिल पाटील, विनायक धानके, देवराम भोईर, चव्हाण आदींनी तर कॉंग्रेसतर्फे मायकल फुटर्य़ाडो, नरेंद्र काळे आदींनी अर्ज भरले. भाजपने आदिवासींसाठी राखीव जागा न ठेवल्याबद्दल अपील दाखल केले असले तरी पक्षातर्फे काळूराम धनगर, लाल पंजाबी, आशीष गोळे, सिसिलिया, राजीव दळवी आदींनी अर्ज भरले आहेत.

‘दिवा महोत्सवामुळे मिळाली मराठी माणसाला बाजारपेठ’
ठाणे/प्रतिनिधी

दिवा महोत्सवामुळे मराठी माणसाला नवी बाजारपेठ मिळाली असून, अशा महोत्सवातून मोठय़ा प्रमाणात मराठी व्यापारी निर्माण होतील, असा विश्वास खासदार आनंद परांजपे यांनी व्यक्त केला.
धर्मवीर मित्रमंडळाने आयोजित केलेल्या दिवा महोत्सवाचे उद्घाटन परांजपे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर स्मिता इंदुलकर, सभागृह नेता पांडुरंग पाटील, शहरप्रमुख रमेश वैती, माजी स्थायी समिती सभापती राजन किणी आदी उपस्थित होते. दिवा महोत्सवाच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे, नागरिकांना एकत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे स्थानिक नगरसेवक व कला-क्रीडा सांस्कृतिक सभापती रमाकांत मढवी यांनी सांगितले. या महोत्सवात भजन, व्याख्याने, विविध स्पर्धा, धार्मिक प्रवचने व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबरनाथमध्ये उद्या मराठा आरक्षण परिषद
ठाणे/प्रतिनिधी : मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून सर्व क्षेत्रांत ३५ टक्के आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मराठा सेवा संघप्रणीत संभाजी ब्रिगेडने २ जानेवारी रोजी अंबरनाथमध्ये मराठा आरक्षण परिषद भरविली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटनांकडून आंदोलने केली जात असून आरक्षणाची सर्वप्रथम मागणी केल्याचा दावा मराठा सेवा संघाने केला आहे. इतर सर्व ओबीसींच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करावा, आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात व सरकारी, राजकीय व खासगी क्षेत्रात लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अशा आरक्षणामुळे समाजातील जाती व्यवस्था नष्ट होईल व संपूर्ण बहुजन समाज एक होऊन सर्वाचे हक्क अबाधित राहतील, या उद्देशाने अंबरनाथमधील लक्ष्मीनारायण सभागृहात सायं. ४ वाजता मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समन्वय समितीचे प्रवक्ता गंगाधर बनबरे, बामसेफचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील तर मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन मोकाशी हे परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. बाळकृष्ण परब, रंगनाथ तांगडी यांची प्रमुख उपस्थिती असेल.

रिक्षा भाडेवाढ कमी करण्यासाठी शिवसेना-भाजपचा आंदोलनाचा इशारा
कल्याण/प्रतिनिधी

पेट्रोलचे दर कमी होऊनही रिक्षाचालक यापूर्वी केलेली रिक्षा भाडेवाढ कमी करीत नसल्याने डोंबिवलीतील शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरवाढ कमी केली नाही तर शिवसेनेने आंदोलन तर भाजपने उपोषण करण्याचा इशारा ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला आहे.
गेल्या तीन महिन्यापूर्वी पेट्रोलची दरवाढ होणार, याची माहिती मिळताच रिक्षाचालक, त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच भाडेवाढ लागू केली. प्रवाशांनी निमूटपणे इंधन दरवाढ झाली म्हणून भाडेवाढ देण्यास सुरुवात केली. परंतु गेल्या महिन्यापासून पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. यापुढे तर ते अधिक कमी होण्याची माहिती आहे. मग रिक्षाचालक, मालक यापूर्वी वाढविलेली भाडेवाढ कमी करीत नाहीत. ही दरवाढ कमी करण्यास आपण पुढाकार घेतला नाही तर आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आरटीओची असेल, असा इशारा सेनेचे सावंत यांनी निवेदनात दिला आहे.
भाजपचे परिवहन समिती सदस्य राजन सामंत यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना रिक्षा भाडेवाढ तात्काळ कमी करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी खाडे यांच्याशी नागपूर येथून दूरध्वनीवर चर्चा करून तात्काळ भाडेवाढ कमी करावी व प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.