Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९
व्यक्तिवेध
गॅलिलिओने लावलेल्या दुर्बिणीच्या शोधाला ४०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सारे जग यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष म्हणून साजरे करीत असतानाच मूलभूत विज्ञानात रस असणारे प्रा. देवांग खखर यांच्या मुंबई आयआयटीच्या संचालकपदी होत असलेल्या नियुक्तीमुळे एक समसमा योग जुळून आला आहे. प्रा. अशोक मिश्रा यांच्या तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर आणि मुंबई आयआयटी एकावन्नाव्या वर्षांची वाटचाल सुरू करीत असताना प्रा. खखर ही सूत्रे स्वीकारीत आहेत, यालाही विशेष महत्त्व आहे. दिल्ली आयआयटीमधून बी. टेक. पूर्ण केल्यानंतर पी.एचडी.साठी मॅसॅच्युसेटस विद्यापीठात दाखल झालेल्या प्रा. खखर यांना, खरे तर त्यांच्या संशोधनाच्या मौलिक विषयामुळे थेट अमेरिकेतच राहणे सहज शक्य होते. पण तसे न करता व अमेरिकेतील सुखवस्तू जीवनाचा थोडासाही मोह पडू न देता खखर भारतात परतले व थेट मुंबई आयआयटीच्या केमिकल इंजिनीअरिंग विभागात रुजू झाले. अध्यापनाची मूळचीच आवड असणाऱ्या खखर यांनी त्यामुळेच पुढल्या २१ वर्षांत खाजगी क्षेत्राविषयीची आकर्षणे वाढत असतानाही तसा यत्किंचितही विचार मनात येऊ न देता आयआयटीतच राहणे पसंत केले. मुंबई आयआयटीला केमिकल इंजिनीअरिंग विभागात अध्यापनासाठी व विशेषत: पॉलिमर्सच्या क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याासाठी त्यांच्या रूपाने गुणवंत प्राध्यापक
 
उपलब्ध झाला ही गोष्ट नजरेआड करता येणारी नाही. डायनामिक्स ऑफ पार्टिक्युलेट सिस्टिम्स, पॉलिमरायझेशन ऑफ रिजिड मॉलेक्युल्स, फ्ल्युइड मिक्सिंग हे खखर यांच्या विशेष आवडीचे संशोधनाचे विषय. त्यांचे दीडशेहून अधिक शोधनिबंध आजवर प्रसिद्ध झाले असून त्यातल्या काहींना तर ‘नेचर अ‍ॅण्ड सायन्स’मध्येही स्थान मिळाले आहे. संशोधन क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी ते अनेकदा गौरविलेही गेले आहेत. मानाचा भटनागर पुरस्कार ९७ सालीच त्यांच्या वाटय़ाला आला असून पाठोपाठ ९८ साली स्वर्णजयंती फेलोशिपचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ इंजिनीअरिंग, इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमी आणि इंडियन अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस यासारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांवर त्यांना फेलो म्हणून मानद स्थान देण्यात आले आहे. अतिशय शांत, ऋजू स्वभावाचे खखर, पी.एचडी.साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, एरवी छोटय़ा छोटय़ा कारणांसाठी नडणाऱ्या-अडवणूक करणाऱ्या गाइडसारखे न भासता ते मोठय़ा भावासारखे वाटतात यातच त्यांच्या नेतृत्त्वकुशलतेचे रहस्य दडलेले आहे. ‘घार हिंडते आकाशी..’ या म्हणीचा प्रत्यय तर कामानिमित्ताने परदेशात गेल्यानंतर इमेलद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क राखणाऱ्या खखरांच्या रूपाने अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मुंबई आयआयटीची विद्यार्थी संख्या आज पाच हजारांच्या घरात आहे, नजिकच्या काळात ती आठ हजारांवर जाईल अशी शक्यता दिसते आहे. त्यासाठी सर्वच पायाभूत सुविधांमध्ये दुपटीने वाढ करावी लागणार आहे. भौतिक सुविधा उपलब्ध होऊ शकतात, पण उत्तम प्राध्यापक मिळणे व त्यांना खाजगी क्षेत्राचा मोह पडू नये एवढे वेतन देता येणे हे मोठेच आव्हान खखर यांच्यापुढे आहे. किंबहुना त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून, आयआयटीतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या व २५ वर्षे पूर्ण झालेल्या, माजी विद्यार्थ्यांकडून मोठय़ा रकमेची गुरुदक्षिणा आयआयटीला मिळवून देण्याचा एक उपक्रम हाती घेतला गेला आहे. तब्बल सव्वा कोटी रुपये त्यातून आजवर जमा झालेही आहेत. शिक्षकी पेशाकडे चांगल्या व्यक्तींनी वळावे, अशा शिक्षकांना पगाराव्यतिरिक्त मानधन, बोनस इत्यादी सुविधा देता याव्यात असा एक हेतू या गुरुदक्षिणेमागे आहे. प्रशिक्षणाचा वाढता दर्जा, पदवीधर विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधी, भारतीय उद्योगांबरोबर जागतिक उद्योगांशी प्लेसमेंटसाठी घातली जाणारी सांगड अशा अनेक पैलूंवर खखर यांनी दिशादर्शक काम सुरूही केले आहे. त्या कामाला शुभेच्छा.