Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९
विशेष लेख
सूर्यकेंद्री सिद्धांताची चारशे वर्षे
चारशे वर्षांपूर्वी गॅलिलिओ गॅलिलीने आपली दुर्बिण आकाशाकडे वळविली, सूर्य स्थिर असून पृथ्वी आणि इतर ग्रह त्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला आणि..
इतिहासातील एका महत्त्वाच्या घडामोडीची आठवण म्हणून २००९ साल हे खगोलशास्त्र वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे.. चारशे वर्षांपूर्वी गॅलिलिओ गॅलिलीने आपली दुर्बिण आकाशाकडे वळविली, सूर्य स्थिर असून पृथ्वी व इतर ग्रह त्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला त्याची ही आठवण. गॅलिलिओने हे प्रतिपादन केल्यावर त्याला धर्मगुरूंनी अटकेत टाकले, त्रास दिला व त्याच्याकडून ते प्रतिपादन चूक आहे असे कबूल करवून घेतले.. पण कोंबडे झाकले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. धर्ममरतडांचा हा उपाय निकामी ठरला. ‘ज्याचा पुरावा आहे तेच सत्य,’ असे मानणाऱ्या आधुनिक विज्ञानयुगाचा हा जन्म मानला जातो.
 

इतिहासात बारकाईने बघितल्यावर दुरून सुंदर दिसणाऱ्या जगातील खाचखळगे दिसू लागतात. कधी एखाद्या वीरासोबतचे तेवढेच मोठे पण विस्मृतीत गेलेले साथीदार दिसतात, तर कधी त्याच वीराचे मातीचे पाय दिसतात. गॅलिलिओच्या बाबतीत असेच काहीसे आहे. पृथ्वीकेंद्री विश्व ते सूर्यकेंद्री विश्व या वैज्ञानिक प्रवासात अनेक महत्त्वाचे दुवे आहेत. अनेक संस्कृतींच्या शेकडो वर्षांच्या अभ्यासानंतर हे सत्य समजले. गॅलिलिओ हा या प्रक्रियेतला एक भाग होता.
चांद्र महिना, भरती-ओहोटी, वर्ष व ऋतू यांचा नियमितपणा माणसाला तसेच इतर काही प्राण्यांना आदिकालापासून माहीत असावा. सूर्याचा राशिप्रवेश व ऋतुबदल, तसेच चंद्राच्या गतीचा भरती-ओहोटीशी असलेला संबंध हेदेखील बहुतेक प्रगत संस्कृतींमध्ये फार पूर्वीपासून माहीत होते. यापुढचा टप्पा म्हणजे ग्रहताऱ्यांचा अभ्यास. टॉलेमी व अ‍ॅरिस्टॉटल हे पृथ्वीकेंद्री विश्व या समजुतींचे प्रणेते मानले जातात.
मार्गक्रमण करताना आपण खाणाखुणा, रस्त्यावरील माहिती आणि आसपास राहणाऱ्यांची मदत घेतो. पण समुद्रात किंवा वाळवंटात प्रवास करताना ते शक्य नसते. अशा वेळी दर्यावर्दी व वाळवंटातील लोक खगोलशास्त्राची मदत घ्यायचे. आपण नेमके कुठे आहोत हे जाणायचे असेल तर आपली मोजमाप करणारी यंत्रणा व आकाशातील ताऱ्यांचे नेमके ठिकाण हे दोन्ही अचूक असावे लागते. साहजिकच खगोलशास्त्रात नेमकेपणा आला. गॅलिलिओच्या शंभर वर्षे अगोदर ख्रिस्तोफर कोलंबसने पृथ्वी गोलाकार आहे हे गृहीत धरून भारताचा शोध पश्चिमेकडून करायचा प्रयत्न केला होता तो याच सगळ्याच्या बळावर..
आजही पृथ्वी सपाट आहे असे मानणारे लोक आहेत. पृथ्वी सपाट आहे व आकाश हे तिचे छत आहे अशा समजुती पुरातन कालापासून होत्या. पण लोक पर्यटन करू लागले तशी पृथ्वीच्या गोलाईबद्दल शंका राहिली नाही. लहान लहान बेटावरील दर्यावर्दी आदिम लोकांनाही पृथ्वीचा गोलावा माहीत होता. याचे कारण अक्षांशाप्रमाणे अगदी डोक्यावर दिसणारे तारेदेखील बदलतात. पृथ्वी गोल आहे हे कळल्यावर खाली व वर या संज्ञांना अर्थ उरत नाही व गुरुत्वाकर्षण मान्य करावे लागते. गोलाकार पृथ्वी कशावर उभी आहे अशा समजुतीत तेव्हाचे लोक होते. पण ती ज्या कशावर उभी आहे ते कशावर उभी आहे? हा प्रश्न एका ग्रीक तत्त्ववेत्त्याला पडला होता व त्यावरून त्याने असे ठरवून टाकले की ती कशावरच उभी नाही. हा विचार इतरांना मान्य झाला नव्हता.
तेव्हाचे लोक सूर्य, चंद्र यासोबत बुध, शुक्र, मंगळ, गुरू व शनी या पाच ग्रहांच्या गतीबाबतही अंदाज करू लागले होते. टॉलेमीच्या काळापासून त्यांचे गणिती अंदाज बांधणे सुरू झाले होते. एकदा पृथ्वी स्थिर असे गृहीत धरले तर ग्रहांची गती वेडीवाकडी दिसू लागते. म्हणजे एखादा ग्रह आपल्या प्रवासात पुढे जात असताना अचानक मागे फिरताना दिसे. आपल्याकडे शनी वक्री आला हे म्हटले जाते त्याचा हाच अर्थ आहे. त्यामुळे ग्रहगती गणित मांडताना तो कधी वक्री जाणार याचेही गणित मांडणे गरजेचे असे. वक्रगतीचे गणित नेहमीच्या गतीत सुधारणा करण्यासाठीचे असे. जसजसे निरीक्षण वाढत गेले तसतसे हे सुधारणांचे गणित वाढत गेले.
त्रिकोणमितीहून कठीण अशी गोलाकार त्रिकोणमिती असते. या त्रिकोणमितीत हजारभर सुधारणा करून अंदाज करणे हे अशक्यप्राय होऊन बसले. त्यामुळे पृथ्वीला अस्थिर मानण्याची कल्पना पुढे आली. पहिल्यांदा अशी कल्पना मांडली गेली की पृथ्वी स्थिरच आहे पण इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात. हे मान्य केल्यावर ग्रहगतीच्या गणितातील सुधारणांच्या अनेक आकडेमोडी गळाल्या. कोपर्निकसने सूर्य हा स्थिर आहे आणि तो विश्वाच्या केंद्रस्थानी स्थिर आहे असा सिद्धांत मांडला व परिणामी गणितीय आकडेमोड कमालीची कमी झाली. मात्र कोपर्निकसच्याही आधी आपल्याकडे आर्यभट्ट व ग्रीकांमध्ये अँरिस्टार्कस यांनी ही हा विचार मांडला होता. अनुयायी न मिळाल्याने तो टिकला नाही.
कोपर्निकस हा गॅलिलिओच्या शतकभर पूर्वीचा. त्याच्या प्रतिपादनामुळे आकडेमोड एवढी सोपी झाली की बहुतेकांनी टॉलेमीची सुधारणांची पद्धत टाकून दिली. त्यानंतर केप्लरने लंबवर्तुळाकार गतीचा सिद्धांत मांडला. त्यामुळे ग्रहगतींचा नेमका शोध लागला. केप्लर गॅलिलिओचा समकालीन होता. याच दरम्यान दुर्बिणीचा शोध लागला. गॅलिलिओ हा सूर्यकेंद्री सिद्धांताचा प्रथम उद्गाता नव्हता. तो मान कोपर्निकसकडे जातो. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला नाही. त्याचे कर्तृत्व नेमके काय? त्याला एवढा रोष का सहन करावा लागला? असे प्रश्न पडणे साहजिक आहे. यासाठी त्यावेळेच्या धार्मिक व राजकीय परिस्थितीकडे बघितले पाहिजे. युरोपच्या इतिहासात प्रबोधनकाल हे एक महत्त्वाचे पर्व आहे. हे अंदाजे तीनशे वर्षांचे पर्व साधारणपणे चौदाव्या शतकात सुरू झाले. एका युद्धाच्या निमित्ताने अरबांनी राखून ठेवलेले जगभरचे साहित्य युरोपियनांना मिळाले. यात भारतीय गणित, बीजगणिताबरोबर ग्रीक पुस्तके होती. अरबी पंडितांनी जगभरचे साहित्य नीट जोपासले होते. ते इतके की काही संस्कृत ग्रंथ हे आपल्याकडे उपलब्ध नाहीत, पण अरेबिकमध्ये आहेत. याचप्रमाणे मूळ युरोपियन असे ग्रीकांचे साहित्य अरबांकरवी त्यांना परत मिळाले. पंधराव्या शतकात गुटेनबर्गने युरोपातील पहिला छापखाना टाकून हे साहित्य कितीतरी जास्त लोकांपर्यंत पोहोचवले. या ज्ञानलाभाने युरोपात वैचारिक क्रांती झाली.
मध्ययुगात म्हणजे प्रबोधनकालापूर्वी युरोपात धार्मिक व राजकीय सत्ता एकाच ठिकाणी एकवटलेली होती. ठिकठिकाणचे राजे चर्चची सत्ता मानायचे. प्रबोधनकालात चर्चची पुरोहित व्यवस्था नाकारणारी लोकचळवळ झाली. त्यापाठोपाठ राजकीय व धार्मिक सत्तांची फारकत झाली. या दरम्यान धर्मासनावर बसणाऱ्यांचे अध:पतन झाल्याचे जाणवते. त्यामुळे लोकही त्यांच्याबाबत अनास्था बाळगून होते. गॅलिलिओची परिस्थिती मात्र थोडी वेगळी होती.
गॅलिलिओचा जन्म १५६४ साली इटलीतल्या पिसा येथे झाला. त्याला धर्माबद्दल इतकी आस्था होती की त्याच्या दोन मुली नन झाल्या. रोमच्या जवळ राहत असल्याने ख्रिश्चन धर्मगुरूंबरोबर त्याचे संबंध सौहार्दपूर्ण होते. त्यातील काही त्याच्या मित्रपरिवारातील होते. त्याचे सुरुवातीचे शिक्षण पिसा येथेच झाले. नंतर तेथे तो शिकवू लागला. वैज्ञानिक संशोधनात नवे विचार येणे स्वाभाविक आहे आणि नवे विचार हे नेहमीच प्रस्थापित विचारांना धक्का देतात. त्या विचारांना विरोध होतो. हे चक्र गॅलिलिओसाठी धर्मगुरूंच्या विरोधाच्या आधीच येऊन गेले. भिन्न वजनाच्या वस्तू एकाच वेगाने खाली पडतात हे त्याने सप्रमाण दाखवून दिले. यामुळेच प्रस्थापित मताचा रोष होऊन पिसा गावातील विश्वविद्यालय त्याला १५९१ साली सोडावे लागले.
प्रत्यक्ष प्रयोग व त्यानंतर अनुमान हे विज्ञानाचे तत्त्व स्वीकारणारा तो पहिला वैज्ञानिक मानला जातो ते याच कारणाने. लंबकाची गती, ध्वनीचा वेग, प्रकाशाचा वेग काढण्याचे प्रयत्न असे अनेक प्रयोग तो करत राहिला. तो उत्तम गणिती होता. वेळ व वेग यांचे गणिती संबंध त्याने स्थापिले. पृथ्वीच्या आकर्षणामुळे वेगात होणारे बदल ही र्सवकष गुरुत्वाकर्षणाच्या शोधापूर्वीची महत्त्वाची पायरी त्यानेच गाठली. गॅलिलिओ हा उपकरणे निर्माण करणारा व हाताळणारा तरबेज कारागरीही होता. दुर्बिणीच्या शोधाचा परिचय झाल्यावर त्याने १६०९ साली स्वत: इतक्या उत्तम दुर्बिणी तयार केल्या की, काहीजण त्यालाच दुर्बिणीचे जनकत्व देतात.
निरीक्षणातून येणारे ज्ञान हे प्रस्थापित मतांच्या बाजूने असो वा नसो, तेच सत्य असते या बाण्यातून त्याने आकाशाचे निरीक्षण केले. चंद्राचे खळगे, सूर्यावरचे डाग, शुक्रावरच्या कला व गुरूचे उपग्रह या सर्वाचे त्याने निरीक्षण केले. कोपर्निकसचा सिद्धांत त्या वेळी त्याच्या गणिती सहजतेमुळे वापरात होताच, पण त्याला एव्हाना एक गणिती क्लृप्ती असेही मानत असत. तत्कालीन धर्मसंकल्पनेत मानवाचे व पर्यायाने पृथ्वीचे जगात एक विशिष्ट स्थान आहे असे मानले जात असे. सर्व जग त्याभोवती फिरते हे त्यातले एक स्वाभाविक रूप होते. गॅलिलिओच्या निरीक्षणातून जे बाहेर पडत होते ते या मताला धक्का देणारे होते.
स्वत: गॅलिलिओचा असा विश्वास होता की, बायबलमधील वाक्यांचा अर्थ शब्दश: काढू नये. त्याला असेही वाटत असावे की त्याच्या निरीक्षणाला व बायबलबद्दलच्या मताला धर्मगुरूंची मान्यता मिळेल. हे सर्व ध्यानात घेऊन त्याने आपल्या मताचे प्रतिपादन करणारे पुस्तक लिहिले. १६१३ साली लिहिलेल्या पुस्तकात त्याने आपल्या मताला बायबल दुजोरा देत आहे असे लिहिले होते. आपल्या मताचा हवाला देण्यासाठी त्याने धर्मगुरूंना दुर्बिणीतून आकाश निरीक्षण करविले.
वेळोवेळी त्याला या मताबद्दल समज देण्यात आली. शेवटी त्याला असे सांगण्यात आले की, चर्चच्या म्हणण्याचे प्रतिपादन करेल असे पुस्तक लिही. मग त्याने जे पुस्तक लिहिले त्यात चर्चचे मत होते. पण ते अशा रीतीने लिहिले होते की, त्यात या मतातील फोलपणा वाचकाच्या लक्षात यावा. हे पुस्तक १६३२ साली प्रकाशित झाले. यानंतर मात्र त्याला चर्चचा रोष पत्करावा लागला. तुरुंगवास, एकांतवास यासोबत, आपण चुकीचे बोलला असे त्याच्याकडून वदवून घेण्यात आले. अशी आख्यायिका आहे की त्याने त्या वेळी , ‘पृथ्वी स्थिर आहे, पण तरी ती फिरते आहे’ असे म्हटले! १६४२ साली तो मृत्युमुखी पडला तेव्हा ज्ञानामुळे व संघर्षांमुळे त्याची ख्याती जगभर झाली होती.
प्रमोद सहस्रबुद्धे
pramod_sahasrabuddhe@rediffmail.com