Leading International Marathi News Daily

गुरुवार , १ जानेवारी २००९

टी टाइम
ही आहे व्हिवा सोसायटी. या सोसायटीमधली वेगवेगळी कुटुंबं, त्यातले सदस्य वाचकांच्या भेटीस येतील ‘घरोघरी’ मधून..
सुरेश : सुधा, ए सुधा.. सुऽऽऽऽ धाऽऽऽऽऽ
आजी : अरे, का ओरडतो आहेस? सुधा घरात नाहीये.
सुरेश : आई, तू इथं बसली आहेस होय. मी आपलं घरभर सगळ्यांना शोधतोय. आणि इतक्या सक्काळी सक्काळी सुधा कुठे गेलीय?
आजी : जिमला. अरे, विसरलास का? आज एक तारीख ना! मग आजपासून तिचं जिमला जाणं नाही का सुरू झालं?
सुरेश : अरे, हो! बाईसाहेबांचं न्यू इयर रेझोल्यूशन नाही का? चला, म्हणजे पहिल्या दिवशी तरी गेली म्हणायची. अर्थात नवीन वर्षांचे संकल्प म्हणजे तेरडय़ाचे तीन दिवस. वर्ष पुढं पुढं जात राहातं आणि संकल्प मागं मागं पडत जातात.

 

आजी : मला नाही वाटत, सुधाच्या बाबतीत असं काही होईल म्हणून. तिनं एकदा मनानं घेतलं ना, मग ती ते करणारच.
सुरेश : बघू या. कळेल लवकरच. पण आता बाईसाहेब सकाळी जिमला जाणार, मग माझ्या चहाचं काय? आई, तू कर ना चहा. ते अमृततुल्य पेय पोटात गेल्याशिवाय सकाळची सुरुवात होत नाही बघ..
आजी : असं म्हणतोस? बरं चल मी करून देते तुला चहा..
सुधा : आई, तुम्ही कशाला चहा करताय?
सुरेश : अरे सुधा, तू कधी आलीस? आणि कसा होता जिमचा पहिला दिवस!
सुधा : एकदम मस्त. इतकं फ्रेश वाटतंय ना आता..
आजी : अग सुधा, सुरेशबरोबर तुझाही चहा टाकू का?
सुधा : नको, नको. कारण आजपासून मी चहाही घेणार नाहीय.
सुरेश : चहाही सोडलास? अग, काय झालंय काय तुला?
सुधा : सगळं अगदी पहिल्यांदाच ऐकतोय, असा आव आणू नका. पंधरा दिवसांपूर्वीच मी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षांच्या माझ्या संकल्पांबद्दल व्यवस्थित सांगितलंय. सकाळचं जिम आणि संध्याकाळचा गाण्याचा क्लास. त्यामुळे घरात कोणाकोणाला काय जबाबदाऱ्या घ्यायला लागतील तेही सांगितलंय. त्यामुळे मिस्टर साने, मी चहा घेणार नाही आणि चहा करणारही नाही.. आणि मी चहा करणार नाही, म्हणजे आईंनाही वेठीला धरायचं नाही.
सुरेश : अरे, पण मग मला चहा कोण देणार सकाळी?
सुधा : कोणी देणार नाही. तुम्हीच तुमचा चहा करून घ्यायचा.
सुरेश : अग पण तुला चहा करायचा नसेल तर नको करूस. पण आई चहा करून द्यायला तयार आहे ना, मग तुझी काय हरकत?
सुधा : आहे.. हरकत आहे.. कारण मी त्याच दिवशी सांगितलंय की, मी घराबाहेर जाणार म्हटल्यानंतर प्रत्येकानं आईंना वेठीला धरायचं नाही. ‘गृहीत’सुद्धा धरायचं नाही. तेव्हा यापुढं सकाळचा तुमचा चहा तुम्ही करून घ्यायचा.
सुरेश : अरे, पण मला चहा येत नाही ना.
सुधा : मग शिकून घ्या. ते रमेशराव बघा. सगळा स्वयंपाक येतो त्यांना. ते तर या जन्मी जमणार नाही तुम्हाला. तुम्ही निदान चहा तरी शिकून घ्या.
सुरेश : आता या वयात या गोष्टी शिकायला लावणार तू?
सुधा : का? तुम्ही नाही मला सारखं हे शिक, ते शिक म्हणून सांगता!
सुरेश : पण तू शिकलीस का?
सुधा : नाही शिकले? आज बँकेचे, पोस्टाचे व्यवहार, सतराशे साठ बिलं भरणं, हप्ते भरणं.. कोण करतं सगळं? तरी नवनवीन गोष्टींसाठी ‘शिक शिक’चा धोशा असतोच तुमचा!
सुरेश : हा धोशा लावला तेव्हाच तर तू इतकी स्मार्ट, हुशार वगैरे झालीस ना!
सुधा : ते खरं आहे हो! पण त्याचबरोबर तुमच्या जबाबदाऱ्या माझ्यावर ढकलून मोकळे झालात, त्याचं काय?
सुरेश : काहीतरीच काय! संसारात असं जबाबदाऱ्या ढकलणं वगैरे काही नसतं ग. उलट संसार रथाची दोन चाकं ना आपण. मग जोडी जोडीनंच सगळ्या जबाबदाऱ्या उचलायच्या.
सुधा : हो नं. म्हणूनच सांगतेय. आता ही सकाळच्या चहाची जबाबदारी तुम्ही घ्या. आणि चहा म्हणजे नुसता चहा नाही. चहा झाल्यावर भांडी- कप विसळून टाकायचे. ओटा स्वच्छ आवरायचा..
सुरेश : सुधा सुधा, आता हे अती होतंय. तू एकेका कामांची यादी वाढवत चालली आहेस. ही कामं बायकांची आहेत आणि घरात तीन- तीन बायका असताना ही वेळ माझ्यावर यावी? आईला सांगायचं नसेल तर सायलीला सांग. लग्नाचं बघतोय ना आता तिच्या. यायलाच हवं तिला सगळं.
सुधा : त्याची काळजी करू नका. ब्रेकफास्टची जबाबदारी तिला दिलीच आहे. शिवाय रविवारचा स्वयंपाकही आहेच.
सुरेश : पण मग ब्रेकफास्टबरोबर एक कप चहा करायला काय हरकत आहे?
सुधा : तो ती करेलच. पण सकाळचा चहा मात्र नाही करणार.
सुरेश : मग सुधा, आपण असं करू या का?
सुधा : काय?
सुरेश : तू जिमला जाण्याआधी चहा करून ठेवत जा!
सुधा : मी सकाळी सहाला जाते. म्हणजे मी चहा करून ठेवणार साडेपाचला. तुम्ही उठणार साडेसहाला. मस्तपैकी ‘कोल्ड टी’ तयार होईल. चालेल?
सुरेश : मग थर्मासमध्ये भरून ठेव.
सुधा : थर्मासमधला चहा तरी कुठे आवडतो तुम्हाला?
सुरेश : स्वत: चहा करून पिण्यापेक्षा आणि त्याहीपेक्षा मागची आवराआवरी करण्यापेक्षा थर्मासमधला चहा चालेल मला!
सुधा : पण मला नाही ना चालणार. कारण मी काही जिमला जाण्याआधी चहाबिहा करून जाणार नाही.
आजी : सुरेश, अरे, एक सकाळच्या चहाचं काम तुला दिलंय तर किती ताणून धरतो आहेस?
सुरेश : आई, अगं, इतकी र्वष रोज सकाळी न चुकता आयता चहा हातात मिळत होता. या वर्षीपासून हे जिमचं खूळ हिनं डोक्यात घेतलं..
सुधा : नुसतं जिमच नाही. संध्याकाळी गाण्याच्या क्लासलाही जाणार आहे, मी, ते लक्षात आहे ना!
सुरेश : अरे, हो. मी विसरलोच होतो. त्यासाठीच तू साहिलला डुप्लिकेट किल्ल्या करायला सांगितल्या होत्यास ना! केल्या का त्यानं? साहिल, ए साहिल.!
साहिल : काय बाबा?
सुरेश : कुठे होतास तू? केव्हाचा हाका मारतोय मी..
साहिल : बाबा, मी रोज सकाळी टेनिसच्या प्रॅक्टिसला जातो. विसरलात की काय!
सुरेश : अरे हो. सकाळी चहा मिळाला नाही ना, त्यामुळे असं झालंय.
साहिल : चहा नाही मिळाला? का?
सुरेश : अरे, आजपासून तुझी आई जिमला जायला लागली आहे ना..
साहिल : ओ येस.. So how was baby's day out?
सुरेश : baby's day out was ekdam मस्त मस्त. बघ गाल कसे टॉमेटोसारखे लालबुंद झालेत. पण माझी सकाळ मात्र एकदम वाईट्ट वाईट्ट.
साहिल : बाबा, चहा मिळाला नाही एवढंच ना. What a big deal!
सुरेश : हो हो. तू पण तिचीच बाजू घे. Not a big deal म्हणे. आणि काय रे, तुला डुप्लिकेट किल्ल्या करून आणायला सांगितल्या होत्या. केल्यास का?
साहिल : अरे, त्या किल्ल्या प्रकरण मी साफ विसरून गेलो. आई, तू तरी आठवण नाही का करायचीस!
सुधा : का? मी काय तुझी किंवा फॉर दॅट मॅटर, सगळ्यांची सेक्रेटरी आहे? म्हणजे आधी कामं सांगा. मग त्या कामाची आठवण करून द्या.. ज्याला जे काम सांगितलंय, ते त्यानं आठवणीनं करावं.
सुरेश : तुझ्या त्या जिममध्ये व्यायामाबरोबर चुरूचुरू बोलायला पण शिकवतात वाटतं?
सुधा : नाही. हे खूप दिवस मनात येत होतंच. पण तुमची कामाची धावपळ, मुलांची वयं लहान, असं करत मनातले विचार मनातच राहत होते. आता मुलं मोठी झाली आहेत. तुमचंही काम कमीच झालंय. त्यामुळे आता मी माझ्यासाठी काही वेळ जगायचं ठरवलंय.
सायली : खरंच आहे आई, आतापर्यंत तू कधी तक्रार केली नाहीस. तर आम्ही तुला गृहीतच धरून टाकलं. पण आता यापुढं नाही. तू तुझा सगळा बॅकलॉग भरून काढ.
साहिल : परफेक्टली. अम्माजी, तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ है.
सुरेश : अरे, लुच्च्यांनो, तुमची कामं तुम्ही केली नाहीयेत. म्हणून तिला लाडीगोडी लावताय.
सायली : बाबा, your guess is completely wrong.
सुरेश : ६१ल्लॠ कसा? ब्रेकफास्ट तुला करायचाय ना! आणि आता तुला वेळ नसेलच. कारण ही तर तुझी रोजची निघायची वेळ. नेहेमीप्रमाणे उशिरा उठायचं, घाईघाईनं आवरायचं, कसाबसा ब्रेकफास्ट करायचा, ही तुझी रोजची सवय आणि आज कसं काय जमणार? आता उठलात ना आपण, मग आता गोड गोड बोलून आईच्या गळ्यात टाकायचं असेल काम?
सायली : पुन्हा चुकलात बाबा! तुमच्या कोणाच्याही आपापली कामं लक्षात नव्हती. पण आजचा ब्रेकफास्ट.. ! आजपासून ब्रेकफास्ट मला करायचा आहे, हे माझ्या पूर्ण लक्षात आहे. त्यामुळे मी सकाळी आईबरोबरच उठले. चटणी करून ठेवली. आता फक्त इडल्यांचा कुकर लावायचाय.
सुरेश : नशीबच म्हणायचं. म्हणजे सकाळचा चहा नाही तर नाही. ब्रेकफास्ट तरी मिळतोय.
सायली : बाबा, वर्षांच्या पहिल्या दिवसाची पहिली सकाळ आहे, सुरुवात अशी चिडचिड करून नका नं करू. आजपर्यंत आईनं कधी स्वत:चा विचार केला नाही. आता करतेय तर करू द्या नं, त्यासाठी ती आपल्याकडून फार काही मोठय़ा अपेक्षा करत नाहीये. त्यांची सवय व्हायला थोडा वेळ लागेल. पण आपण करू.
साहिल : Yes. She must get her own space and time... she deserves it.
सुरेश : सुधा, मुलं खरंच मोठी झाली गं आता.. आणि सायली, तू म्हणतेस ते अगदी पटलं. वर्षांची सुरुवात खूप आनंदानं, छान करू म्हणजे सगळं र्वष कसं छान जातं.
सायली : बाबा, अहो ही तुमचीच वाक्यं आहेत. तुम्हीच तर दरवर्षी सांगता ना..
सुरेश : हो गं.. पण आज सकाळी चहा मिळाला नाहीये ना त्यामुळे डोकच चालत नाहीये बघ.
सुधा : काय हो तुम्ही तरी, एक सकाळचा चहा करून घ्या म्हटलं तर किती कटकट करताय..चला, बोलत बसण्यापेक्षा मी चहाच टाकते कशी!
सायली : आई, थांब. मी टाकते चहा.
सुरेश : तुम्ही दोघीही थांबा. मीच करतो फक्कडसा चहा. अर्थात सायलीबाई, तुमची मदत लागेल बरं का. आणि हो, सुधा, घोटभर चहा घेशील ना माझ्याबरोबर?
सुधा : छे! छे! मी चहा सोडलाय ना आजपासून..
सुरेश : माहीत आहे ग. पण घेऊन तर बघ माझ्या हातचा चहा..
सुधा : मला माहिती आहे तुमचा डाव. मी काय आज ओळखते काय तुम्हाला.
सुरेश : घ्या. ऐका. नुसतं चहा घे म्हटलं तर त्याच्यात तुला काळंबेरं दिसतय होय?
सुधा : मग काय.. असं गोड गोड बोलाल आणि मी चहा घेतला की चिडवाल तेरडय़ाचे रंग तीन दिवस म्हणून..
shubhadey@gmail.com