Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

विविध

२.६० कोटींच्या चोरीवरून भाजपमध्ये गटबाजी
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर/खास प्रतिनिधी

भाजप मुख्यालयातील तिजोरीतून लंपास झालेल्या २ कोटी ६० लाख रुपयांच्या रकमेच्या प्रकरणात पक्षाचे कोषाध्यक्ष रामदास अग्रवाल यांच्या निष्काळजीपणाला दोष दिला जात असून त्यांची गच्छंती व्हावी, अशी आक्रमक भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनीही घेतल्याचे समजते. पण या मुद्यावरून भाजपमध्ये अडवाणीविरुद्ध राजनाथ सिंह असे दोन गट पडल्याचे मानले जात आहे. भाजपच्या तिजोरीतून २ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम ‘गहाळ’ होण्याच्या धक्कादायक प्रकारामुळे अडवाणी संतप्त झाले आहेत.

शांतिप्रक्रियेसाठी ओमर अब्दुल्ला आग्रही
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर/पी.टी.आय.

भारत आणि पाकिस्तानात शांतता प्रस्थापित सुरू करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न चालूच राहावेत, अशी इच्छा व्यक्त करीत जम्मू आणि काश्मीरचे भावी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी या प्रक्रियेत काश्मीरतर्फे सकारात्मक भूमिका बजाविण्याची ग्वाही दिली.केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्याशी मंगळवारी रात्री चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जम्मू आणि काश्मीरमधील जनतेने शांतता आणि विकासाच्या बाजूने कौल दिल्याचेही अब्दुल्ला यांनी नमूद केले.

झरदारी-गिलानी यांचे बिनसले
इस्लामाबाद ३१ डिसेंबर/पी.टी.आय.

पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी व पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यातील संबंध बिघडले असून झरदारी यांच्याकडून रोजच्या कारभारात सतत हस्तक्षेप होत असल्याने गिलानी वैतागले आहेत. गेल्या काही आठवडय़ात दोघांमधील मतभेद वाढले असून आता ते उघडपणे व्यक्त होऊ लागले आहेत.
‘द न्यूज’ या पाकिस्तानी दैनिकाने सरकारी सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे की, पंतप्रधान गिलानी यांच्या कारभारात हस्तक्षेप होत असल्याने आता त्यांची सहनशक्ती संपली आहे.

‘एनआयए’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर/पी.टी.आय.

राष्ट्रीय तपास संस्था विधेयक आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक विधेयक (दुरुस्ती) या दोन विधेयकांना आज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी मंजुरी दिली. त्यामुळे या दोन्ही विधेयकांचे आज कायद्यात रुपांतर झाले ही दोन्ही विधेयके संसदेच्या गेल्या अधिवेशनात मंजूर झाली होती.दोन्ही विधेयकांना आज राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याचे केन्द्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी सांगितले.

ग्रीटिंग कार्डाची जागा घेतली ई-मेलने!
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर/पी.टी.आय.

सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागत करताना शुभेच्छापत्रे अर्थात ग्रीटिंग कार्ड हे अगदी हक्काचे आणि खात्रीचे साधन होते. आपल्या भावना विविधरंगी, आकर्षक आणि नाना तऱ्हेच्या शुभेच्यापत्रांच्या माध्यमातून दुसऱ्याला पोहोचविणे हा अनेकांच्या आनंदाचा भाग होता. परंतु २००९ चे स्वागत करण्यासाठी मात्र अनेकांनी या प्रदीर्घ परंपरेला फाटा देऊन तंत्रज्ञानाचे अर्थात ई-मेलचे साहाय्य घेतले आहे. एकूणच शुभेच्छापत्रांची सद्दी हळूहळू संपू लागली आहे.

बचावासाठी अंतराळवीरांना मिळाले होते अवघे ४१ सेकंद!
कोलंबिया दुर्घटनेबाबत नासाचा अहवाल

ह्य़ूस्टन, ३१ डिसेंबर / पी.टी.आय.

इ.स. २००३ मध्ये झालेल्या कोलंबिया अवकाश यान दुर्घटनेदरम्यान भारतीय वंशाची अंतराळयात्री कल्पना चावला हिच्यासह सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. नासाच्या तज्ज्ञांनी या दुर्घटनेचा अहवाल सादर केला असून अंतराळयात्रींना कोलंबिया यानात स्फोट होण्यापूर्वी सूचना मिळाल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्यासाठी फक्त ४१ सेकंदाचा अवधी मिळाला होता, असे म्हटले आहे. अंतराळयात्रींना स्फोट होणार असल्याची सूचना मिळाली आणि अवघ्या ४१ सेकंदात कोलंबियात स्फोट होऊन सारे काही क्षणार्धात संपले, असेही या अहवालात म्हटले आहे.

शेख हसीनांचे सकारात्मक राजकारणाचे संकेत; पण झियांनी निकालच नाकारले!
ढाका, ३१ डिसेंबर/पी.टी.आय.

बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजयी झालेल्या अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी विरोधकांनाही देशाच्या विकासासाठी आवाहन करीत सकारात्मक राजकारणाचे संकेत दिले असले तरी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्या व हसीना यांच्या कडव्या विरोधक खलिदा झिया यांनी मात्र निवडणुकीचे निकाल नाकारले आहेत.
बांगलादेश नॅशनल असेंब्लीच्या ३०० पैकी २६२ जागा हसीना यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीने जिंकल्या आहेत. मात्र निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाले असून हे निकालही बोगस असल्याची टीका ६३ वर्षीय खलिदा झिया यांनी केली आहे. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या पाच तासांच्या बैठकीनंतर झिया यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले. त्याबाबत ६१ वर्षांच्या हसीना यांनी सांगितले की, या निवडणुका पारदर्शक झाल्याचे जगाने पाहिले आहे. तेव्हा पूर्वीचे शत्रुत्व विसरून देशउभारणीसाठी झिया यांनी सकारात्मक सहकार्याची भूमिका ठेवावी. नॅशनल असेंब्लीतील विरोधकांचे महत्त्व व प्रतिष्ठा यांची जपणूक सरकार करील, असेही त्यांनी सांगितले. हा विजय एकटय़ा अवामी लीगचा किंवा आमच्या मित्रपक्षांचा नाही. हा संपूर्ण देशाचा विजय आहे. देशात लोकशाही प्रक्रिया पुन्हा स्थापन व्हावी यासाठी लोकांनी दिलेला हा कौल आहे. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत, असेही हसीना यांनी सांगितले. विशेष म्हणजे निवडणुका झाल्या त्या दिवशी खलिदा झिया यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले होते व आपणचजिंकू, असा विश्वासही व्यक्त केला होता.

गाझावासियांना अमेरिकेचे साह्य
वॉशिंग्टन, ३१ डिसेंबर/पी.टी.आय.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गेले पाच दिवस भरडल्या जात असलेल्या गाझा पट्टीतील विस्थापितांसाठी अमेरिकेने ८५ दशलक्ष डॉलरचे साह्य देऊ केले आहे. संयुक्त राष्ट्र मदतनिधीच्या माध्यमातून नागरिकांच्या अन्न, निवारा आदी दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी हे साह्य देण्यात आले आहे.

मोदींचे कौतुक नडले!
कुन्नूर : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ए. पी. अब्दुल्लाकुट्टी यांनी दुबईतील कार्यक्रमात गुजरातच्या विकासाबाबत नरेंद्र मोदी यांचे केलेले कौतुक त्यांना नडण्याची चिन्हे आहेत. पक्षाने त्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्याचे ठरविले आहे. मोदी यांच्यावर जातीय दंगलींचा ठपका पक्षाने ठेवला असताना हे कौतुक झाल्याने पक्षात अस्वस्थता आहे.

गोळीबार : आमदारपुत्रास अटक
आग्रा : समाजवादी पक्षाचे आमदार सुभाष यादव यांचा पुत्र धीरज याच्यासह त्याचा एक मित्र व त्याचा वाहनचालक अशा दोन साथीदारांना आग्रा विद्यापीठ परिसरात गोळीबार केल्याप्रकरणी आज अटक झाली. धीरजने हवेत दोनदा गोळीबार केल्यावर एकच धावपळ उडाली होती. आपण रिव्हॉल्वरची चाचणी घेत होतो, असे धीरज याने नंतर सांगितले. आपल्यावर कोणीतरी हल्ला केल्याने स्वसंरक्षणासाठी हा गोळीबार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

दिल्ली पोलिसांना लाखाचे इनाम
नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात सामील असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या फरारी अतिरेक्यांना पकडून देणाऱ्या दिल्ली पोलिसांनाही प्रत्येकी एक लाख रुपयाचे इनाम दिले जाणार आहे. हा स्फोट घडविलेल्या १३ अतिरेक्यांपैकी पाच अतिरेक्यांना पोलिसांनी पकडले आहे. गेल्या १३ सप्टेंबरला ४० मिनिटांच्या अवधीत झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये २६ जण ठार झाले होते.

अ‍ॅसिड हल्ला : तरुणीचा मृत्यू
हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये अ‍ॅसिड हल्ल्याचा बळी ठरलेल्या तरुणीचा आज येथे मृत्यू झाला. तिच्यावर हल्ला करणारे गुंड पोलीस चकमकीत मारले गेले आहेत. अ‍ॅसिड फेकल्यामुळे भाजलेली स्वप्निका अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला शिकत होती. सोमवारी रात्री तिला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. मात्र त्यानंतरही तिची प्रकृती खालावत गेली. शेवटपर्यंत ती मनाने खंबीर होती, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

अणुप्रकल्प माहितीचे आदानप्रदान
नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्दय़ावरून भारत आणि पाकिस्तान या उभय राष्ट्रांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला असला तरी १८ वर्षांंच्या जुन्या करारानुसार हे दोन्ही देश आपल्या आण्विक तळांच्या माहितीचे परस्परांना उद्या येथे आदानप्रदान करणार आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या आण्विक तळांवर हल्ले करावयाचे नाहीत, असा करार १८ वर्षांंपूर्वी करण्यात आला होता. त्यानुसार हा वार्षिक सोपस्कार उद्या पार पाडला जाणार आहे.

दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई: झरदारी
इस्लामाबाद : ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर’ दहशतवाद्यांना कारवायांसाठी आपल्या भूभागाचा वापर यापुढे करू दिला जाणार नसून, या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानकडून कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज.डब्ल्यू. बुश यांना दिली. झरदारी यांनी आज सायंकाळी बुश यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दहशतवादाच्या विषयावर चर्चा केली.

मणिपूरमध्ये बंडखोर ठार
इम्फाळ : मणिपूर कॅपिटल कॉम्प्लेक्सजवळ सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईमध्ये कग्लेइपाक कम्युनिस्ट या अतिरेकी गटाचा म्होरक्या अकोइजाम श्यांबी ऊर्फ कोक्कई हा मारला गेला. फोक्कई (६१) हा काही दिवसांपूर्वी इम्फाळला परतला होता. पोलीस व आसाम रायफलच्या जवानांनी संयुक्तरितीने काल रात्री कोईरेंजई भागामध्ये छापा घालून ही कारवाई केली, असे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांना शस्त्रसाठाही मिळाला आहे. या वर्षांमध्ये मणिपूरमध्ये हिंसाचार व चकमकींत ४५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.