Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९
व्यापार-उद्योग

‘जैन इरिगेशन’ला युरोपातील सर्वात मोठे कंत्राट
व्यापार प्रतिनिधी: जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला युरोपातील आपल्या प्रतिष्ठित ग्राहकांकडून डिहायड्रेटेड पांढऱ्या कांद्यांची २७ कोटींची ऑर्डर मिळाली आहे. हे डिहायड्रेटेड ओनियन येत्या वर्षांत जैन इरिगेशन पुरवणार आहे. कंपनी युरोपातील अनेक अन्नउत्पादक व अन्नविषयक सेवा देणाऱ्या कंपन्यांना अन्नघटकांचा पुरवठा करते.

वाहतूकदारांचा ५ जानेवारीपासून बेमुदत ‘चक्का जाम’चा इशारा
सरकारकडे ‘पॅकेज’साठी पुकारा

व्यापार प्रतिनिधी: डिझेल दरकपात आणि करांमधून सवलतीसारख्या आपल्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत येत्या ५ जानेवारी २००९ पासून अमर्याद काळासाठी देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनाची हाक ‘बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन (बीजीटीए)’ या संघटनेने दिली आहे. देशातील रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस’शी बीजीटीएची सक्रिय संलग्नता आहे.

केसरी पाटील यांना यंदाचा ‘उद्योगश्री जीवन गौरव’ सन्मान
व्यापार प्रतिनिधी: उद्योगश्री प्रकाशनातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या उद्योगश्री गौरव सन्मानाच्या निवड समितीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत २००८ सालासाठी म्हणजे १६ व्या वर्षांच्या सन्मानार्थ्यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. उद्योगश्री जीवन गौरव सन्मासाठी केसरी टूर्स प्रा. लि.चे संस्थापक केसरी रावजी पाटील यांची तर उद्योगश्री विशेष गौरव सन्मानासाठी हावरे इंजिनीयर्सचे सुरेश हावरे आणि सचिन ट्रॅव्हल्सचे सचिन जकातदार यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. उद्योगश्री गौरव सन्मान सोहळा येत्या २२ जानेवारी २००९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र चेंबरच्या बाबासाहेब डहाणूकर सभागृहात पार पडेल.

‘अ‍ॅरिस अ‍ॅग्रो’तर्फे ग्रामीण मुलांना शेतीविषयक शिक्षण देणारा उपक्रम
व्यापार प्रतिनिधी : स्पेशालिटी मायक्रोन्यूट्रिएण्ट कंपनी असलेल्या अ‍ॅरिस अ‍ॅग्रो लि.ने ग्रामीण भागातील मुलांना शेतीचे शिक्षण देण्यासाठी ‘बाल कृषक संशोधन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत कंपनीने हा उपक्रम राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि उत्तराखंडात राबवला होता. आता कंपनी कार्यरत असलेल्या सर्वच्या सर्व २२ राज्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

साहिल समूहाच्या साथीने जर्मन कंपनी ‘आरआयएमसी इंटरनॅशनल’चे भारतात आगमन
व्यापार प्रतिनिधी : युरोपात ठळक अस्तित्व असलेली जर्मनीतील एक आघाडीची हॉटेल व्यवस्थापन कंपनी आरआयएमसी इंटरनॅशनल आता भारतीय आतिथ्य क्षेत्रात प्रवेश करीत आहे. यासाठी कंपनीने पुण्यातील साहिल समूहाशी भागीदारी स्थापित केली असून भारतातील तसेच भारतीय उपखंडातील जसे श्रीलंका, मॉरिशस, सेशेल्स आदी ठिकाणचे कामकाज हाताळण्यासाठी आरआयएमसी साहिल हॉस्पिटॅलिटी इंडिया प्रा. लि. नामक नवीन संयुक्त कंपनीची स्थापना केली आहे. सदर कंपनीचे मुख्यालय पुण्यात असेल, अशी घोषणा आरआयएमसी इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय मालक गर्ट प्रांटनर यांनी केली. प्रांटनर यांच्या मते, आरआयएमसीच्या सेवेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे हॉटेल इमारतीवर आरआयएमसी ब्रॅन्ड कधीच दिसत नाही. ही कंपनी स्वतंत्र हॉटेलांचे संशोधन करते व त्यांच्या व्यवस्थापनाचे कामही स्वीकारते. याशिवाय आवश्यकता भासल्यास जगातील काही आघाडीच्या हॉटेलांसमवेत फ्रँचाइझी कंत्राटाद्वारे आंतरराष्ट्रीय संकलनाचे प्रकल्प हाती घेते. हिल्टन, रॅडिसन, गोल्डन टय़ुलिप, फोर पॉइंट्स बाय शेरेटन, हॉलिडे इन, पार्क इन यांसारख्या फ्रँचाइस ब्रॅन्ड्ससमवेत आरआयएमसी युरोपातील कामकाज हाताळते. अशा कामकाजामुळे हॉटेल मालक व गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळते.

व्यापार संक्षिप्त
आता ‘होमस्टॉप’ वाशीमध्ये
व्यापार प्रतिनिधी: शॉपर्स स्टॉप लिमिटेडचा घराच्या सुशोभीकरणाच्या उत्पादनांची विक्री शृंखला ‘होमस्टॉप’ आता वाशी येथील इन-ऑर्बिट मॉलमध्ये सुरू झाले आहे. तब्बल १७,००० चौरस फुटाच्या जागेत विस्तारलेल्या या स्टोअरमध्ये गृहसजावट क्षेत्रातील अनेक विश्वासार्ह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स एकाच छताखाली उपलब्ध झाली आहेत. फर्निशिंग, फर्निचर आणि रिक्लिनर्स, बाथ अ‍ॅक्सेसरीज, बेड अ‍ॅण्ड बेडिंग, किचन अ‍ॅक्सेसरीज् आणि अ‍ॅप्लायन्सेस, मॉडय़ूलर किचन, गॅजेट्स, होम अ‍ॅडोरमेंट्स आदी उत्पादनांचा यात समावेश आहे. ब्रॅण्ड्सवैविध्यामुळे सर्व प्रकारच्या उत्पादनांमध्ये निवडीचे अत्युत्कृष्ठ पर्यायही उपलब्ध झाले आहेत.
व्होडाफोनची फ्रेन्ड्स सर्कल ऑफर
व्यापार प्रतिनिधी: व्होडाफोन एस्सारने आपल्या देशभरातील ग्राहकांसाठी व्होडाफोन फ्रेन्ड्स सर्कल ही सेवा सुरू केली आहे. व्होडाफोन फ्रेन्डस सर्कल ही सेवा घेणाऱ्या ग्राहकांना आपल्या व्होडाफोनचे ग्राहक असलेल्या मित्रांना फक्त २० पैसे प्रति मिनिट या दराने स्थानिक कॉल करता येणार आहे. पोस्टपेड ग्राहकांना असे पाच मित्र निवडता येतील तर प्री-पेड ग्राहकांना असे दहा मित्र निवडता येतील. ही सेवा सुरू करण्यासाठी तसेच तिच्याविषयी आणखी माहिती मिळविण्यासाठी फ्रेन्डस असा एसएमएस पाठवता येईल किंवा या १४४ नंबरला टोल फ्री कॉल करता येईल. या सेवेचा लाभ घेणाऱ्या पोस्टपेड आणि प्री पेड ग्राहकांना त्यांनी या सेवेसाठी निवडलेल्या प्रत्येक नंबरसाठी दरमहा १५ रुपये आकार पडेल. या नंबरवर केलेले सर्व स्थानिक कॉल मिनिटाला २० पैसे या दराने होतील. रोिमग कॉलसाठी आणि एसएमएससाठी मात्र नेहमीचे दर लागू असतील. ग्राहक महिन्याच्या शेवटी आपल्याला हवे असलेले नंबर बदलू शकतील.
सोनीची कार मेड फॉर आयपॉड हेड युनिट्स
व्यापार प्रतिनिधी: सोनीने एक्सप्लोड सीडीएक्स जीटी-४५ सीडी रिसिव्हर बाजारात आणला आहे. यामध्ये मेड फॉर आयपॉड हेडवायर्ड डेडिकेटेड इनपुट केबलसारख्या सुविधा देण्यात आल्या असून, यामुळे आता आयपॉड चार्ज करता येईल. त्याचबरोबर विविध प्रकारच्या आयपॉड्सच्या मेनूंसाठी हे सेट चालू शकतात. सीडीएक्स जीटी ४५ आयपीचे हे हेड युनिट रु. ८४९० मध्ये सोनीच्या दुकानांमध्ये, तसेच सोनीच्या काही विशिष्ट अधिकृत विक्रेत्यांकडे आणि देशभरात पसरलेल्या अधिकृत रिटेल पार्टनर्सकडे उपलब्ध आहे.
बीपीएल मोबाईलवर ‘डॉक्टर ऑन कॉल’
व्यापार प्रतिनिधी : मुंबईतील आघाडीची मोबाईल सेवा कंपनी बीपीएल मोबाईलने आणखी एक अनोख्या अशा ‘डॉक्टर ऑन कॉल’ सेवेचा शुभारंभ केला आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या काळात या सेवेंतर्गत डॉक्टर आणि रुग्णादरम्यान फोनवरून संवाद साधता येण्याची सोय ग्राहकांना उपलब्ध आहे. ‘व्हॅस’ या नावीन्यपूर्ण सेवेंतर्गत बीपीएल मोबाईलने या नवीन सुविधेचे दालन खुले केले आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार वैद्यकीय मदत तत्काळ मिळू शकते. हेल्थकेअर मॅजिक डॉट कॉम (healthcaremagic.com) ने या सेवेला पाठबळ पुरविले असून या सेवेंतर्गत ग्राहकाला फोनवरून आरोग्यविषयक सल्ला दिला जाणार आहे. रुग्णाच्या स्थितीवरून या सेवेमध्ये डॉक्टर निदान करून त्याला ‘अ‍ॅक्युट’, ‘क्रोनिक’ आणि ‘एमर्जन्सी’ या तीनपैकी एका विभागात टाकतात. जे डॉक्टर ग्राहकाचा फोन कॉल घेतील ते रुग्णाच्या स्थितीबाबत तपास करतील आणि ‘अ‍ॅक्युट स्थितीतील’ ग्राहकाला घरच्या घरी उपलब्ध असलेले रोगपरिहारक उपचार सुचवतील. ‘क्रोनिक स्थितीतील’ रुग्णाला फोनवर उपलब्ध असलेले डॉक्टर जीवनशैलीतील बदल, प्रतिबंधात्मक उपाय आणि पुढील व्यवस्थापनाकरिता स्पेश्ॉलिटशी सल्लामसलत करण्याबाबतचे उपाय सुचविले जातील. रुग्ण जर ‘एमर्जन्सी’ या प्रकारात मोडत असेल आणि त्या रुग्णाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करायची गरज असल्यास डॉक्टर तसे सुचवतील. त्यासाठी त्या रुग्णाचा पूर्वेतिहास पाहिला जाईल आणि तो दूरध्वनी त्वरित खंडित केला जाईल.
बोटोक्स व काया स्किन यांच्यात करार
व्यापार प्रतिनिधी: नॉन सíजकल कॉस्मेटिक प्रोसिजरमध्ये जगात आघाडीवर असणाऱ्या बोटोक्स व त्वचेची काळजी घेण्यासाठी सौद्यदर्यशास्त्रात भारतात आघाडीवर असणाऱ्या काया स्किन क्लिनिक यांच्यामध्ये करार झाला आहे. त्यानुसार ग्राहकांना ‘बोटोक्स अ‍ॅट काया’ लारे दर्जेदार, सुरक्षित, आधुनिक व अद्यायावत तंत्रज्ञानयुक्त सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. या करारामुळे भारतीय महिलांना बोटोक्सच्या सौद्यदर्यशास्त्रातील जागतिक दर्जाच्या सेवा मिळणार आहेत. त्वचेचे सौद्यदर्य वाढविणारे आणि काळजी घेणारे बोटोक्सचे तंत्रज्ञान जलद आहे. रोज केवळ १० मिनिटांच्या प्रक्रियेनंतर केवळ दोन आठवडय़ात त्याचा प्रभाव जाणवू लागतो. हा प्रभाव चार ते सहा महिने टिकतो असा कंपनीचा दावा आहे. बोटोक्स हा अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अलरगन इन्कॉर्पोरेशनचा ब्रँड आहे.