Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९
व्यापार-उद्योग

(सविस्तर वृत्त)

केसरी पाटील यांना यंदाचा ‘उद्योगश्री जीवन गौरव’ सन्मान

 

व्यापार प्रतिनिधी: उद्योगश्री प्रकाशनातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या उद्योगश्री गौरव सन्मानाच्या निवड समितीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत २००८ सालासाठी म्हणजे १६ व्या वर्षांच्या सन्मानार्थ्यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. उद्योगश्री जीवन गौरव सन्मासाठी केसरी टूर्स प्रा. लि.चे संस्थापक केसरी रावजी पाटील यांची तर उद्योगश्री विशेष गौरव सन्मानासाठी हावरे इंजिनीयर्सचे सुरेश हावरे आणि सचिन ट्रॅव्हल्सचे सचिन जकातदार यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. उद्योगश्री गौरव सन्मान सोहळा येत्या २२ जानेवारी २००९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र चेंबरच्या बाबासाहेब डहाणूकर सभागृहात पार पडेल. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार्थीची निवड कॅम्लिन लि.चे सुभाष दांडेकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केली. या निवड समितीत ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अन्नपूर्णा महिला मंडळाच्या प्रेमाताई पुरव यांनी सदस्य म्हणून तर ‘उद्योगश्री’चे संपादक भीमाशंकर कठारे यांनी निमंत्रक म्हणून काम पाहिले. ‘उद्योगश्री गौरव सन्माना’साठी निवड झालेल्या उद्योजकांमध्ये जय बायोटेक इंडस्ट्रीजचे राजेंद्र पाटील (नाशिक), नलवडे शुगर मिल्स लि.चे संग्रामसिंह नलवडे (कोल्हापूर), ए. के. जिनींग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीचे नामदेव कटकमवार (नांदेड), श्रीकृष्ण भवनचे सुधाकर जोशी (पुणे), अभ्यंकर ब्रदर्स (मसालेवाले)चे किशोर अभ्यंकर (अकोला), अ‍ॅरोमॅटिक इंडस्ट्रीयल केमिकल्स प्रा. लि.चे गणपत पाटील (अंबरनाथ), व्ही.एस.आर. इलेक्ट्रिकल व इन्स्ट्रुमेंटेशन कंपनीचे विजय तावडे (डोंबिवली), पॅसिफिक इंजिनीयरिंग कॉर्पोरेशनचे सुरेश बापट (नवी मुंबई), वरद एंटरप्रायझेसच्या सुचेता उमर्जीकर (नाशिक) आणि ए.ए.ए. इंजिनीयरिंग सव्‍‌र्हिसेसच्या विजया पाटील (नाशिक) यांचा समावेश आहे.