Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९
व्यापार-उद्योग

(सविस्तर वृत्त)

‘अ‍ॅरिस अ‍ॅग्रो’तर्फे ग्रामीण मुलांना शेतीविषयक शिक्षण देणारा उपक्रम
व्यापार प्रतिनिधी : स्पेशालिटी मायक्रोन्यूट्रिएण्ट कंपनी असलेल्या अ‍ॅरिस अ‍ॅग्रो लि.ने ग्रामीण भागातील मुलांना शेतीचे शिक्षण देण्यासाठी ‘बाल कृषक संशोधन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत कंपनीने हा उपक्रम राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि उत्तराखंडात राबवला होता. आता कंपनी कार्यरत असलेल्या सर्वच्या सर्व २२ राज्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
अ‍ॅरिस अ‍ॅग्रोने ग्रामीण भागातील नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व बायोलॉजीमधील व्याख्याने घ्यायला सुरुवात केली आहे. अ‍ॅरिसच्या तंत्रज्ञांच्या गटाने आणि अ‍ॅरिस अ‍ॅग्रो कार्यरत असलेल्या विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना म्हणजे भावी शेतकऱ्यांनी भविष्यातील व सध्याच्या परिस्थितीचा अंदाज, माहिती देण्यासाठी आणि त्यासाठी त्यांची तयारी करून घेण्यासाठी ग्रामीण शाळांमध्ये काही व्याख्याने घेतली. कंपनी सध्या ही व्याख्याने २०० जिल्ह्य़ांमध्ये घेत आहे. प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये दर महिन्याला दोन सत्रे घेतली जातात.
कृषी विद्यापीठांतील तज्ज्ञ मंडळी आणि अ‍ॅरिसमधील वरिष्ठ तंत्रज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरता येईल, याचे प्रशिक्षण देतात. पेस्ट मॅनेजमेण्ट, प्रीसिजन फार्मिग, पीक हाताळणी, ऑरगॅनिक फार्मिग आणि शेतीची उत्पादकता वाढविणाऱ्या अन्य पद्धतींचे प्रशिक्षण व माहिती दिली जाते. आपल्याकडील जमिनीची उत्पादकता कशी वाढविता येईल, याचा विचार मुलांमध्ये रुजविणे हा यामागील मुख्य हेतू आहे.
अ‍ॅरिस अ‍ॅग्रो लि.चे कार्यकारी संचालक डॉ. राहुल मिरचंदानी म्हणाले, की अ‍ॅरिस अ‍ॅग्रोने ग्रामीण भागांत जेथे जेथे ही व्याख्याने घेतली तेथे विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद होता. एक जबाबदार कंपनी म्हणून, तसेच विशेष पीक पोषण उत्पादनांबाबत (स्पेशालिटी कॉर्प न्यूट्रिशन) परिपूर्ण, अचूक आणि नेमकी माहिती विद्यार्थ्यांना देऊन अ‍ॅरिसच्या उत्पादनांना भावी ग्राहक तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. संतुलित पीक पोषणासाठी मायक्रोन्यूट्रिएण्ट आणि अन्य पद्धतींच्या वापराचे विज्ञान व कृषी आर्थिक फायदे लक्षात घेण्यासाठी या भावी शेतकऱ्यांना हे ज्ञान उपयुक्त ठरेल.