Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

‘स्लमडॉग मिलिअनेअर’च्या पडद्यामागचा मराठी चेहरा
लाँग शॉटमध्ये धरावीचा धोबीतलाव दिसतो.. कॅमेरा जवळ जातो आणि धारावीचे नागरिक त्या धोबीतलावात कपडे धुत असतात. कॅमेरा अँगल बदलून पुन्हा तोच धोबीतलाव आणि त्यात खेळणारी लहान मुले पडद्यावर दिसतात. यावेळी दिसणारा धोबीतलाव हा वास्तवातली नसून पेणला जसाच्या तसा धोबी तलाव आणि धारावी झोपडपट्टी उभी करण्यात आली आहे. जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांत ‘स्लमडॉग मिलिअनेअर’ या चित्रपटातील प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला भिडविण्यात या चित्रपटातील वास्तववादी चित्रणाचा मोलाचा वाटा आहे. या चित्रपटातील ‘टॉर्चर रूम’, धारावी झोपडपट्टी, कामाठीपुरा, आग्रा येथील काही ठिकाणे जशीच्या तशी उभी करण्यामागे अभिषेक रेडकर या मराठी कलादिग्दर्शकाचे कौशल्य आहे.

नृत्यालिका महोत्सवात सलग १२ तास नृत्याविष्कार
नृत्यसंस्थेचा वर्धापन दिन नृत्याच्या सादरीकरणाने होणे यात काही वेगळेपण नाही. ‘नृत्यालिका’ या संस्थेचा वर्धापन दिनही त्याच पद्धतीने साजरा केला जातो पण त्याचे वैशिष्टय़ म्हणजे गेली २१ वर्षे दरवर्षी सलग १२ तासांचे सादरीकरण असते. किशु पाल यांनी स्थापन केलेल्या ‘नृत्यालिका’ या संस्थेच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त या वर्षी ३ जानेवारी रोजी परळ येथील दामोदर सभागृहात सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ‘नृत्यालिका महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नृत्यालिकाच्या ३६ शाखांमधील ३५० विद्यार्थी कलाकार शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, समूहनृत्य, पाश्चिमात्य नृत्य असे एकूण १११ नृत्यप्रकार सादर करणार आहेत. परळ येथे स्थापन झालेल्या या संस्थेच्या मुंबई, पुणे, नाशिक, चिपळूण, हैदराबाद या ठिकाणी शाखा असून सुमारे १२०० विद्यार्थी या ठिकाणी नृत्याचे धडे घेत आहेत.

चित्रपटवेडय़ांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा असतो. एकाच दिवशी चार-पाच चित्रपट प्रदर्शित झाले तर कोणता चित्रपट पाहायचा हे ठरवणार कसे? म्हणूनच ‘चॉइस इज युवर्स’ या सदरातून दर शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या कथेविषयी, दिग्दर्शक-कलाकारांविषयी चटपटीत माहिती पुरविणार आहोत. या माहितीमुळे तुमचा संभ्रम थोडा-फार दूर होऊन, नक्की कोणत्या चित्रपटात पैसे वसूल होऊ शकतात, याची किंचितशी कल्पना येईल. बाकी ‘चॉइस इज युवर्स’!

आपल्याकडल्या वितरकांना एकाएकी साक्षात्कार झाला की काय, असा प्रश्न ‘आऊटसोस्र्ड’ या चित्रपटाच्या येथील प्रदर्शनावरून पडू शकतो. पण नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच वितरकांमधला हा सकारात्मक बदल आहे हेही नाकारता येणार नाही. दिग्दर्शक जॉन जेफकॉट दिग्दर्शित आणि २००६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही जगभरातल्या चित्रपट महोत्सवांमध्ये पारितोषिके मिळवतोय. इथल्या प्रेक्षकांची आवड बदललीय, भारतावरच्या येणाऱ्या इंग्रजी चित्रपटांमधली निर्बुद्ध विनोदबुद्धी नाहीतर चित्रपटगृहांकडे कुणी फिरकणारही नाही असा गंभीर विषय अशी अगदी दोन टोकाच्या विषयांची पाश्र्वभूमी संपलीय, क्लासिक साहित्याच्या रुपांतरातून पोसलेल्या ‘र्मचट आयव्हरी’च्या फेजमधून भारतीय इंग्रजी सिनेमा बाहेर पडलाय अशातलाही भाग नाही. तरीही ‘आऊटसोस्र्ड’ आपल्याकडे रिलिज होतोय ही इथल्या प्रेक्षकांसाठी चांगली गोष्ट म्हणावी लागेल.
काही वर्षांंपूर्वी भारतीय दिग्दर्शकांच्या भारतीय कथासूत्रसलेल्या इंग्रजी चित्रपटांची एक लाटच आली होती. त्यानंतर ‘हिंग्लिश’ भाषेचा आधार घेणाऱ्या अनेक सुमार पटांना आपल्याला सामोरं जावं लागलं. या फेजमधील काही निवडक चित्रपटच लोकांना रुचले. बाकी ‘डॉलर ड्रीम’, ‘फ्रिकी चक्रा’, ‘लेट्स एंजॉय’, अनुष्का शंकर हिची भूमिका असलेला ‘डान्स लाईक ए मॅन’ असे चित्रपट कधी आले आणि कधी गेले हे कळलंच नाही. प्रेक्षकांनी अशा चित्रपटांना नाकारल्यानंतरही दिग्दर्शक अंजान दत्त ‘बो बराक फोरेवर’, ‘बाँग कनेक्शन’ सारखे रद्दड इंग्रजी सिनेमे बनवून आपलं हसं करून घेत होते. गेल्या वर्षीपासून भारतावर चित्रपट बनविणाऱ्या परदेशी दिग्दर्शकांच्या सिनेमांची सुरुवात ‘दार्जिलिंग लिमिटेड’ या चित्रपटाने करून दिली. त्यानंतर विक सॅरीन यांचा ‘पार्टीशन’ हा चित्रपट दोनएक महिन्यांपूर्वी आपल्याकडे प्रदर्शित झाला. या वर्षांत ‘स्लमडॉग मिल्येनर’सोबत आणखी अनेक परदेशी दिग्दर्शकांचे भारतीय चित्रपट येण्याच्या वाटेवर आहेत. त्यातले बहुतांशी अमेरिका आणि युरोपमध्ये बऱ्याच आधी प्रदर्शित झाले आहेत. या मालिकेची सुरुवात अमेरिकन दिग्दर्शक जॉन जेफकॉट यांच्या ‘आऊटसोस्र्ड’ने होतेय. शिकागोमधील एक अमेरिकन कंपनी मुंबईजवळ ‘कॉलसेंटर’ उभारून तेथून आपले काम ‘आऊटसोर्स’ करण्याचा निर्णय घेते. त्यासाठी मुंबईत सारी यंत्रणा उभारण्याकरीता आलेल्या अमेरिकन व्यक्तीचा उडालेला फज्जा यावर चित्रपटाचे कथानक आधारले आहे.
शिकागो सन टाइम्सच्या ‘रॉजर एबर्ट’सारख्या दिग्गज समीक्षकानेही चित्रपटाला गौरविले आहे (ज्याचा वापर आपल्या पोस्टरवर करण्याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे). भारतातली गरीबी, दारिद्रय़ यांचेच उगाच प्रदर्शन करणारे, येथील लोकांच्या जगण्यावर सातत्याने सुमार विनोद करत राहणारे चित्रपट यापुढे आले तरी लोकं स्वीकारणार नाहीत. त्यांना यापेक्षा नवं काहीतरी हवं आहे. कॉल सेंटर संस्कृती आपल्याला नवीन नाही. ‘वन नाईट अॅट कॉल सेंटर’वर आधारलेला ‘हॅलो’ प्रेक्षकांनी नाकारला होता. त्यासाठी त्याचे ढिसाळ ‘टेकिंग’ही कारणीभूत होते. या चित्रपटाला मात्र टोरंटो, व्हँकूअर, लॉस एंजेलिस आणि जगभरातील प्रमुख चित्रपट महोत्सवांमध्ये असे एकूण १६ चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
चित्रपट : ‘आऊटसोस्र्ड’
दिग्दर्शक : जॉन जेफकॉट
कलाकार : जोश हॅमिल्टन, आयेशा धारकर

अत्यंत मोजके चित्रपट केले असले तरी बझ लुहरमन यांच्या चित्रनिर्मितीची तुलना थेट ‘टायटॅनिक’च्या जेम्स कॅमरूनशी नाहीतर ‘ज्युरासिक पार्क’च्या स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्याशी केली जाते. भव्य दिव्य सेट्स, तगडी स्टार कास्ट आणि तितकीच हाईप होऊन त्यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन होते. यापूर्वी रोमियो - ज्युलियट (लिओनाडरे-डीकॅपरीओचा) आणि ऑस्करला उत्कृष्ट चित्रपटासाठी मानांकन झालेल्या ‘मॉलिन रूज’ (२००१) नंतर सात वर्षांच्या विरामानंतर लुहरमन यांनी ‘ऑस्ट्रेलिया’ बनविला आहे. त्यामुळे जगभरातून ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाच्या या चित्रपटाकडे यंदाचा ऑस्करच्या यादीत स्थान मिळवू शकणारा चित्रपट म्हणून पाहिले जात आहे. ऑस्ट्रेलियात बराच कालावधी राहणाऱ्या आपल्या नवऱ्यावर निर्माण झालेल्या संशयामुळे इंग्लंडमध्ये राहणारी चित्रपटातील नायिका सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात येते, ही या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना. चित्रपटाचा कालावधी हा १९३९ ते ४२ या दुसऱ्या महायुद्धाचा आहे आणि रचना ‘अॅक्शन’, ‘अॅडव्हेंचर’सोबत माफक ‘ड्रामा’ देणाऱ्या जुन्या वेस्टर्नपटांसारखी. हा चित्रपट अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियात प्रदर्शित झाला. अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी १६६ मिनीटांचा भला मोठा कालावधी घेणाऱ्या या चित्रपटाला नाकारले असले, तरी युरोपात मात्र चित्रपट तुफान चालत आहे. ऑस्ट्रेलियाने यंदाच्या जगातल्या सवरेत्कृष्ट चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाला अग्रभागी ठेवून नंतर इतरांचा विचार केला आहे. क्वान्टम ऑफ सोलॅसनंतर यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक व्यवसाय या चित्रपटाने केला आहे. ज्यांना ‘आऊट ऑफ अफ्रिका’, ‘नाऊवेअर इन अफ्रिका’ सारखे ऑस्कर मिळविणारे संयत पिरिएड सिनेमा पाहण्याची आवड असेल, त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया पर्वणी ठरेल. तर लुहरमन यांच्या शैलीशी परिचय नसणाऱ्यांनाही तो एक वेगळा आणि भव्य अनुभव असेल.
चित्रपट : ‘ऑस्ट्रेलिया’
दिग्दर्शक : बझ लुहरमन
कलाकार : निकोल किडमन, ह्यू जॅकमन

विनोदाचे बादशहा अशोक सराफ यांच्या ‘एक डाव धोबीपछाड’ने होत आहे.
अशोक सराफ यांनी चित्रपटनिर्मितीचा ‘एक डाव’ टाकल्याने नव्या वर्षांच्या सुरुवातीला प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच हीट ठरेल, असं मऱ्हाटी इंडस्ट्रीतल्या लोकांना वाटतेय. ‘अशोक सराफ म्हंजे इनोदी शिणुमा आणि फर्मास असा ‘बत्तीशी’ किंवा ‘खळखळाट’पर्यंत अव्वल दर्जाचा इनोद बघाया मिळनार’ अशी जणू खूणगाठच सर्वानीच बांधलेली असते. या चित्रपटाद्वारे सराफ पती-पत्नी निर्माता-कार्यकारी निर्माती या भूमिकेत शिरले आहेत. आपला चित्रपट खेडय़ापाडय़ांतील शिणुमाप्रेमींनाही पाहता यावा म्हणून त्यांनी झी टॉकीजची साथ घेतली आहे. काय असंल ‘धोबीपछाड’ची ष्टोरी??? जरा डोकं खाजवलं तर दादा दांडगे या प्रमुख व्यक्तिरेखेभोवती शिणुमा घुमतो हे लगेचच कळेल. पण दादा दांडगे व अन्य सर्वच व्यक्तिरेखा एकमेकांना ‘धोबीपछाड’ करतात, शिच्युएशनल कॉमेडी हाय असं म्हटलं जातंय. दादा दांडगे प्रेमात पडतात अशी ष्टोरी हाय. हा चित्रपट हीट झाला तर मऱ्हाटी शिणुमाची २००९ ची नांदी जोरदार व्हनार असं बोललं जातंय. आता घोडामैदान काय फार लांब नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यांत ‘एक डाव धोबीपछाड’ प्रदर्शित करण्याचा निर्णय झी टॉकीजने घेतलाय. त्यामुळे २००९ ची सुरुवात ‘हीट’ ने होणार असं मानलं जातंय. बघूया, घोडामैदान जवळच आहे.

‘शंभर करोड’
नावावरून खरे तर या चित्रपटाविषयी थोडीफार कल्पना येते. ही कथा आहे एका उद्योगपतीची. त्याच्याकडे १०० कोटी संपत्ती आहे. त्या संपत्तीवर एका नेत्याचा डोळा आहे. संपत्ती लाटण्यासाठी त्याच्या मुलीला सून करून घेण्याचा त्या नेत्याचा डाव असतो. त्यात तो यशस्वी होत नाही. भरीस भर म्हणून चित्रपटात तीन खूनही होतात. हे खून कोण व का करतात? त्या शंभर कोटी रुपयांचे काय होते या आशयावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटात सर्वकाही आहे. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स.. थोडक्यात हा एक मसाला चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती, कथा व संवाद अशोक लोंढे यांचे असून पटकथा आनंद मोरे व आबा गायकवाड यांची आहे. भीमाशंकर तोरणकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. समीर धर्माधिकारी, रमेश भाटकर, मोहन जोशी, दिपाली सय्यद, पंकज विष्णू, उपेंद्र लिमये यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘लो बजेट’च्या विळख्यातून आता मराठी चित्रपट बाहेर येतोय. या चित्रपटाचे चित्रीकरण कुल-मनालीमध्ये करण्यात आले आहे. सध्या बहुतेक मराठी चित्रपटात
दिसणारे एक आयटम सॉँगही यात आहे पण बाकीचा मसाला हा जुनाच आहे. त्यामुळे थेट जाऊन चित्रपट पाहायचा की परिक्षण वाचून मगच चित्रपटाला जायचे, याचा निर्णय मात्र प्रेक्षकांनीच घ्यायचा आहे.
संकलन - सुनील डिंगणकर,
सुनील नांदगावकर, पंकज भोसले

‘डिस्कव्हरी’वर ‘एव्हरीथिंग यू नीड टू नो अबाऊट’
माणसाच्या मेंदूचे वजन केवळ तीन पौंड असते आणि त्याचा ८० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो, हे तुम्हाला माहीत होत का? किंवा पृथ्वीला दोन वेळा गिळंकृत करू शकेल एवढय़ा मोठय़ा आकाराचे वादळ सध्या गुरू ग्रहावर आलेले आहे. याबद्दल काही माहिती होती का? केवळ हेच नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान, निसर्ग या विषयीची आश्चर्यकारक माहिती ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवरून दर रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘एव्हरीथिंग यू नीड टू नो अबाऊट’ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या रविवारी दाखविण्यात येणाऱ्या भागात माणसाला मदत करणाऱ्या मानवनिर्मित यंत्रमानवांविषयी माहिती देण्यात येणार आहे. माणसाला ग्रासणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांमध्ये यंत्रमानवांची खूप मदत होत आहे. युद्धाचे मैदान असो किंवा एखाद्या रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर.. प्रत्येक ठिकाणी हे रोबोट्स तेवढेच उपयोगी ठरतात. ११ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या तपासकार्यात मदत करणारे ‘मिनी ड्रॉयड्स’ आणि वास्तवातील ‘रोबोकॉप’ही या भागात पाहायला मिळणार आहेत.
प्रतिनिधी