Leading International Marathi News Daily                                    शुक्रवार, २ जानेवारी २००९

नववर्षांलाच आसाम हादरले!
बॉम्बस्फोटात पाच ठार, ५० हून अधिक जखमी

गुवाहाटी, १ जानेवारी / पी.टी.आय.
आसाममध्ये मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांमध्ये ८८ जण ठार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्याची सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या आगमनाच्या आधी गुवाहाटीत फुटिरवादी गटांनी घडवून आणलेल्या तीन बॉम्बस्फोटांत पाचजण ठार झाले असून ५० जखमी झाले आहेत. नवीन वर्षांच्या प्रारंभी हे स्फोट उल्फा अतिरेक्यांनीच घडवून आणले असल्याची माहिती पोलीस महासंचालक जी. एम. श्रीवास्तव यांनी दिली. अमल दास आणि कमल शेख अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.
बिरुबारी येथे दुपारी साडे तीन वाजता पहिला स्फोट झाला. कचराकुंडीत हा बॉम्ब दडविण्यात आला होता. त्यानंतर दुपारी साडे पाच वाजता दुसरा स्फोट भूतनाथ वसाहतीत सायकल बॉम्बच्या मदतीने चिदंबरम येण्याच्या मार्गावर घडवण्यात फुटिरवादी यशस्वी झाले. यात चार महिलांसह २० जण जखमी झाले. तिसरा स्फोट भांगागड या अपमार्केट व्यावसायिक संकुल परिसरातील बिग बझारमध्ये झाला. यात उपरोक्त दोन नागरिक ठार झाले. पंतप्रधान मनमोहनसिंग हे उद्या शिलॉंगच्या दौऱ्यावर जाताना काही काळ येथे थांबून सुरक्षेचा आढावा घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुरक्षा दलांच्या हलगर्जीपणामुळेच हे बॉम्बस्फोट झाल्याची कबुली मुख्यमंत्री तरूण गोगई यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी स्फोट घडवून आणणाऱ्या शक्तीच्या या कृत्याचा निषेध केला असून मृतांच्या कुटुंबियाप्रती सहानभूती व्यक्त केली आहे.

ओबामाही घरासाठी ‘वेटिंग लिस्ट’वर
वॉशिंग्टन, १ जानेवारी/पी.टी.आय.

अमेरिकेचा अध्यक्ष हा एकप्रकारे ‘स्वामी तिन्ही जगांचा’च असतो. जगातील सर्वाधिक सामथ्र्यशाली आणि संपन्न देशाच्या अध्यक्षाचा रुबाब तो काय सांगावा? त्याच्या प्रवासासाठी जगात एकमेवाद्वितीय असलेले बोईंग विमान, त्याच्यासाठी तैनात असणाऱ्या लिमोझीन्स.. असे बरेच काही त्याच्याबाबतीत सांगितले जाते. अर्थात ते खरेच आहे. मात्र अमेरिकेच्या होऊ घातलेल्या अध्यक्षाला काही दिवसांसाठी अधिकृत निवासस्थान मिळण्यात अडचणी आल्याने नाईलाजाने त्याला भाडय़ाच्या हॉटेलचा आश्रय घ्यावा लागला या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवेल काय?
परंतु हे असे घडले आहे खरे. अमेरिकेचे ‘प्रेसिडेंट इलेक्ट’, अर्थात अध्यक्षपदी निवडून आलेले बराक ओबामा यांचा शपथविधी अजून व्हायचा आहे. आता पुढची किमान चार वर्षे (किंवा कदाचित आठ वर्षे) त्यांना वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिलवरील व्हाइट हाऊसमध्ये राहायचे आहे. परंतु सध्या तेथे ‘श्रीयुत जॉर्ज बुश’ नावाचे गृहस्थ राहात आहेत. त्यांची मुदत संपेपर्यंत तेथे राहायला जाता येणार नाही. पण मुलींच्या (१० वर्षांची मलिया आणि ७ वर्षांची साशा) शाळा सुरू होण्याची वेळ आल्याने वॉशिंग्टनमध्ये राहणे तर आवश्यक आहे. या परिस्थितीत ओबामा यांनी आपल्याला व्हाइट हाऊसशेजारच्या ‘ब्लेअर हाऊस’मध्ये तात्पुरते राहू द्यावे, अशी विनंती प्रशासनाला केली. परंतु ‘किमान १५ जानेवारीपर्यंत ब्लेअर हाऊस ‘रिझव्‍‌र्ह्ड’ आहे. सबब तेथे राहता येणार नाही’ असा स्पष्ट खुलासा प्रशासनाने करून टाकला. प्रशासनाच्या या नकाराने नाईलाज झालेल्या ओबामा यांना अखेर मग हॉटेलचा आश्रय घेण्यावाचून पर्यायच उरला नाही.

बॉलीवूडचे तारे राजकारणाच्या जमिनीवर!
समर खडस
मुंबई, १ जानेवारी

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली असून त्याच्या तालावर सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शाहरूख खान उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी जाहीर केल्यानंतर आता आमीर खान, संजय दत्त, अक्षय कुमार, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर आदी नावांबाबतही काँग्रेस, भाजप, सपा व बसपाचे ‘स्पीनडॉक्टर्स’ जोरदार लॉिबग करत आहेत. संजय दत्त हा मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असल्याने त्याला काँग्रेस पक्ष उमेदवारी देण्यास तयार नाही. मात्र समाजवादी पक्षाने त्याला लखनौमधून उमेदवारी देण्याची तयारी दर्शविल्याने आता संजय दत्त हे लखनौमधील सपाचे उमेदवार असणार, असे सपाच्या गोटातून ठामपणे सांगितले जात आहे. मात्र संजय दत्तच्या निकटवर्तीयांच्या मते भाजपची उमेदवारी नक्की झाल्याशिवाय संजूबाबाचा निर्णय पक्का होणार नाही. कारण अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागी लालजी टंडन यांना उमेदवारी मिळाली तरच संजय दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मात्र स्वत: वाजपेयीच जर पुन्हा निवडणूक लढविणार असतील तर संजय दत्त याला लखनौ मतदारसंघात काहीही रस नसल्याचे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
काँग्रेस पक्षातून तर शाहरूख खानच्या बरोबरीने अक्षय कुमार व राज बब्बर यांच्यासाठीही मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यापैकी राज बब्बर यांना उमेदवारी देण्याचे नक्की झाले आहे. त्यांचा सध्याचा आग्रा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांच्यासाठी काँग्रेस शेजारील फिरोजाबाद मतदारसंघातून मोर्चेबांधणी करीत आहे. ‘ सिंग इज किंग’ अक्षय कुमारला दिल्लीतील ज्या मतदारसंघातून त्याचे सासरे राजेश खन्ना निवडणूक लढवित असत त्याच ठिकाणहून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र दिल्लीमधून शीला दीक्षित यांच्या मुलालाही लोकसभा लढविण्याची इच्छा असल्याने अक्षयकुमार याला कदाचित पंजाबमधीलही एका मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे नक्की होईल. या सगळ्या मोर्चेबांधणीमध्ये सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे बहुजन समाज पक्षाचे आमीर खान याच्यासाठी सुरू असलेले लॉबिंग हे आहे. आमिर खान यानेही अमिताभ बच्चन याच्याप्रमाणे पवना धरण परिसरामध्ये घेतलेल्या जमिनीसाठी उत्तर प्रदेशातून शेतकरी असल्याचे घेतलेले प्रमाणपत्रच बसपाला आमिर खानला पटविण्यासाठी कारणीभूत झाल्याचे बोलले जाते. आमीर खानचे हे प्रमाणपत्र जर सरकारने रद्द केले तर त्यालाही पवना धरण परिसरातील जमिनीवर पाणी सोडावे लागू शकते हे लक्षात घेऊन आमीर खानला निवडणुकीत वापरण्याची कल्पना बसपाच्या गोटात जोरात आहे.

अंबानी बंधूंमध्ये सलोख्याची चिन्हे!
* फोर्ब्सच्या सूचीत जगातील सर्वाधिक तोटय़ाचे धनी अनिल अंबानी
मुंबई, १ जानेवारी / प्रतिनिधी

एकमेकांतून विस्तवही जात नसलेले उद्योगपती मुकेश व अनिल अंबानी बंधू आज गोव्यामध्ये एकत्र आले होते. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या एकत्र येण्यामागे निमित्त होते ते बहिण दिप्ती साळगावकर यांच्या लग्नाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसाचे. गेल्या महिन्याभरात दोन्ही अंबानी बंधू तिसऱ्यांदा एकत्र आल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. दोघांच्या मनोमिलन झाल्याच्या वावडय़ाही यानिमित्ताने उठल्या आहे. याआधी २८ डिसेंबर रोजी पिता धीरुभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त मुकेश व अनिल अंबानी एकत्र आले होते. तसेच संसदेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी जागतिक मंदीच्या परिणामांबाबत विचानमंथन करण्यासाठी गेल्या महिन्याच्या सुरुवातीस बोलविलेल्या बैठकीलाही उभयतांची उपस्थिती होती. दरम्यान, गेल्या वर्षी सर्वाधिक वेगाने संपत्ती-निर्माण करणारा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत म्हणून बहुमान पटकावणारे भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यंदा मात्र सरलेल्या वर्षांतील सर्वाधिक तोटय़ाचे धनी ठरले आहेत. अमेरिकेच्या प्रतिष्ठित फोर्ब्स नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या सूचीत अनिल अंबानी यांना सरलेल्या वर्षांत तब्बल ३० अब्ज डॉलरचा तोटा सोसावा लागला आहे. फोर्ब्सच्या ‘बिलियनेअर ब्लोअप्स ऑफ २००८’ सूचीत अनिल अंबानी यांनी अव्वल स्थान पटकावले असून, त्यांची एकंदर संपत्ती गेल्या वर्षांच्या मार्चमधील ४२ अब्ज डॉलरवरून आता १२ अब्ज डॉलरवर घसरल्याचे नमूद केले आहे.

बीडजवळ झालेल्या विचित्र अपघातात दहा ठार; १९ जखमी
बीड, १ जानेवारी/वार्ताहर

दशक्रिया विधी आटोपून परतणाऱ्या पिकअप मॅक्स जीपला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने दोन्ही वाहने बाजूच्या खड्डयात गेली. तर याच वेळी पाठीमागून येणारी कार या वाहनावर धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात भनकवाडी येथील दहा जण ठार तर १९ जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
या घटनेत भनकवाडी येथील मनोहर पिराजी इरकर (वय ६०), विठ्ठल राघू सोंसाळे (वय ६५), बापू कोिडबा भोंडवे (वय ५५), सुरेश ज्ञानोबा सोंसाळे (वय २५), पोपट अप्पा सोंसाळे व बलभीम अप्पा सोंसाळे (सर्व रा. भानकवाडी, ता. शिरूर कासार) तर रामभाऊ यादव रानमरे (वय ६५, रा. धनगरवाडी, ता. जामखेड), दिगंबर हरी कोकाटे (वय ६०) आणि विठ्ठल रंगनाथ नागड (वय ५५, रा. डिघूळ, ता. जामखेड) ठार झाले.

जागावाटपाच्या दबावतंत्रात आगामी संघर्षांची बीजे !
अयोग्य वेळी पसरट विधाने केल्याने विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील या महाराष्ट्र मंत्रिमंडळातील दोन मुरब्बी राजकारण्यांच्या विकेट गेल्या वर्षी गेल्या. या पाश्र्वभूमीवर वर्षांच्या मावळतीला पुन्हा एकदा अशाच स्वरूपांच्या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात वादाचे तरंग निर्माण होणे हा योगायोग म्हणायचा की, संबंधित राजकारण्यांची लगीनघाई ? पुन्हा एकदा राजकीय योगायोगाची बाब म्हणजे देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या म्हणजे काँग्रेस आणि भाजपच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षांनी ही विधाने केली आहेत. त्यापैकी पहिली राजकीय सनसनाटी मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी माजवली. बोरिवलीतील एका पत्रकार परिषदेत शेट्टी यांना मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचे तुमचे संभाव्य उमेदवार कोण असतील, असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी राम नाईक, पूनम महाजन आणि किरीट सोमय्या यांची नावे जाहीर केली.

‘बीअरमॅन’ला जन्मठेप
मुंबई, १ जानेवारी / प्रतिनिधी

गुन्हेवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि प्रत्यक्षदर्शीनी दिलेली जबानी ग्राह्य धरून शिवडी येथील सत्र न्यायालयाने आज ‘पिसाट खुनी’ रवींद्र कंट्रोले उर्फ ‘बीअरमॅन’ला तीन खुनांप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दक्षिण मुंबईत ऑक्टोबर २००६ ते जानेवारी २००७ यादरम्यान सातजण गूढरीत्या मृत्युमुखी पडल्याचे आढळले. त्यापैकी तिघांचा निर्घृण खून केल्याचा आरोप कंट्रोलेवर ठेवण्यात आला. ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला त्याच्या मृतदेहाजवळ बीअरचा कॅन आढळून आला असल्याने या खुन्याला ‘बीयरमॅन’ म्हणून ओळखण्यात येत होते.

महानगरपालिका आता हायटेक: मोबाईलवरून भरा बिल !
मुंबई, १ जानेवारी / प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका आता ‘हायटेक’ झाली असून पाणी व मालमत्ता कर आता मोबाईलवरून भरण्याची सोय पालिकेने मुंबईकरांना उपलब्धकरून दिली आहे. पालिकेने यासेवेसाठी ‘इट्झकॅश’ या कंपनीशी करार केला आहे. पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी आज ही माहिती दिली. पाणी व मालमत्ता कराचे देयके गृहनिर्माण संस्थांना पाठवली जातात. मात्र आता प्रत्येकालाच आपले बिल भरता येणे शक्य झाले आहे. शिवाय गृहनिर्माण संस्थाही या माध्यमातून बिल भरू शकतात. आपल्या थकित बिलाबाबत जाणून घेण्यासाठी ५७५७५ या क्रमांकावर आपली आवश्यक माहिती पाठविल्यास हा संदेश पालिकेच्या नियंत्रण कक्षात जाईल. तिथून संबधित खात्याकडे ही माहिती पाठविली जाईल आणि लागलीच आपल्या बिलाविषयी सविस्तर माहिती आपल्याला मोबाईलवरच मिळेल. त्यानंतर याच क्रमांकावर ‘इट्झकॅश’ कंपनीच्या कॅश कार्डाचा वापर करून बिल भरता येईल, असे फाटक यांनी सांगितले. या सोयीमुळे मुंबईकरांना बिल भरणे शक्य होईल आणि पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा दावा त्यांनी केला. पालिकेच्या सहआयुक्त व्ही. राधा यांनी या खात्याची जबाबदारी स्वीकारल्या नंतर तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारात वापर करण्याचा आग्रह धरला होता.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी

दिवाळी २००८