Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

जागावाटपाच्या दबावतंत्रात आगामी संघर्षांची बीजे !

 

अयोग्य वेळी पसरट विधाने केल्याने विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील या महाराष्ट्र मंत्रिमंडळातील दोन मुरब्बी राजकारण्यांच्या विकेट गेल्या वर्षी गेल्या. या पाश्र्वभूमीवर वर्षांच्या मावळतीला पुन्हा एकदा अशाच स्वरूपांच्या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात वादाचे तरंग निर्माण होणे हा योगायोग म्हणायचा की, संबंधित राजकारण्यांची लगीनघाई ? पुन्हा एकदा राजकीय योगायोगाची बाब म्हणजे देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या म्हणजे काँग्रेस आणि भाजपच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षांनी ही विधाने केली आहेत. त्यापैकी पहिली राजकीय सनसनाटी मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी माजवली. बोरिवलीतील एका पत्रकार परिषदेत शेट्टी यांना मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचे तुमचे संभाव्य उमेदवार कोण असतील, असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी राम नाईक, पूनम महाजन आणि किरीट सोमय्या यांची नावे जाहीर केली. ही बातमी जेव्हा शिवसेनेच्या गोटात गेली तेव्हा तर एकच खळबळ माजली. याचे कारण शेट्टी यांनी अशी नावे ‘जाहीर’ करणे म्हणजेच भाजपने दबावतंत्र सुरु केल्याची पहिली झलक आहे, याची जाणीव शिवसेना नेत्यांना झाली. मग ‘मातोश्री’वरून कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे फर्मान सुटले आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी तातडीने एक पत्रक प्रसारमाध्यमांसाठी धाडून दिले. ‘शेट्टी यांनी परस्पर काही उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली असली तरी अशा प्रकारचे कोणतेही जागावाटप झालेले नाही. युतीत बोलणी होऊनच जागा वाटप व उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची परंपरा आहे. शेट्टींच्या वक्तव्याने युतीत तणाव निर्माण होऊ शकतो’, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत यांचा खुलासा म्हणजे भाजपला दिलेली चपराक असून येत्या काळातील जागावाटपाबाबत जर दबावतंत्र वापरणार असाल तर शिवसेना ते जराही खपवून घेणार नाही, असा दिलेला हा इशारा आहे.
गेली दोन दशके मतभेद असूनही एकमेकांशी पटवून घेण्यावाचून पर्याय नसलेल्या युतीत यापुढे शिवसेना आक्रमक राहणार आहे, याचे हे पहिले दर्शन आहे. राऊत यांच्या खुलाशानंतर गोपाळ शेट्टी यांनी आपली बाजू मांडली आहे. पत्रकारांकडूनच काही नावे पुढे आल्यानंतर या नावांचा विचार केला जाऊ शकतो, असे आपण बोलल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या खुलाशापर्यंत जे काही राजकीय रामायण घडायचे होते ते घडून गेले आहे. आणि जागावाटपाच्या संघर्षनाटय़ातील पहिला प्रवेश साकारलाही आहे. खरे तर पत्रकारांकडून अशा प्रश्नांचे गुगली नेहमी टाकले जात असतात. त्यांचे ते कामच आहे. त्याला बळी पडायचे की नाही, हे राजकारणी नेत्यांनी सावधपणे ठरवायचे असते. अन्यथा अशा खुलासे- प्रतिखुलाशांची वेळ येते.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी याच वेळी राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाबाबत झालेल्या प्राथमिक वाटाघाटींचाच तपशील उघड केला. मुंबईत काँग्रेस ५ तर राष्ट्रवादी एक जागा लढवणार असल्याचे सिंह यांनी जाहीर केले. आघाडीतील भागीदार राष्ट्रवादी काँग्रेसला गृहित धरून सिंह यांनी ही घोषणा केली. सिंह यांच्या दृष्टीकोनातून हा राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा भाग असू शकतो. मात्र आपल्या लगीनघाईने काँग्रेसच्या राष्ट्रवादीबरोबरच्या स्थानिक पातळीवरील संबंधात कटुता येऊ शकते, याचा विचार सिंह यांनी केला असेल, असे वाटत नाही.
नव्या वर्षांच्या प्रारंभाला काही तास शिल्लक असतानाच दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची विधाने आगामी राजकीय संघर्षनाटय़ाची बीजे रोवून गेली आहेत !
रवींद्र पांचाळ