Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

प्रादेशिक

‘सेन्सेक्स’चा वर्षांरंभी दिलासा
मुंबई, १ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने आज नव्या वर्षांचे उमद्या उत्साहात स्वागतच केले नाही, तर सरलेल्या दशकभरातील सर्वात मोठय़ा वाढीची नोंदही केली आहे. सेन्सेक्सने आज झालेल्या व्यवहारात २.६६ टक्क्यांची म्हणजे २५६ अंशांची वाढ नोंदविली, जी २००१ सालापासून सुरू झालेल्या दशकातील वर्षांरंभी नोंदविली गेलेली सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

राष्ट्रवादीने काँग्रेसला पाडले तोंडघशी
मुंबई, १ जानेवारी / खास प्रतिनिधी

नगर, धुळे महापौरपदासह सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीला मदत केली असताना राष्ट्रवादीने मात्र ‘पुणे पॅटर्न’चा वापर करीत काँग्रेसला तोंडघशी पाडले आहे. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उभय काँग्रेसमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महापौर व अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडी करण्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने ठरविले होते.

अपघात घटले; मद्यपी वाढले
मुंबई, १ जानेवारी / प्रतिनिधी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा नववर्षांच्या साधारणत: आठवडाभर आधीपासूनच शहरात कोणत्याही भीषण रस्ते अपघाताची नोंद नव्हती. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा आनंद द्विगुणित झाला होता. मात्र थर्टी फर्स्टच्या रात्री नऊशेहून अधिक चालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने पोलिसांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. शहरात जागोजागी नाकेबंदी करून थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांविरुद्ध मोहिम राबविली. वाहतूक पोलिसांनी या मोहिमेदरम्यान ५४१ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली.

विदेशी पर्यटकांची संख्या ६० टक्क्यांनी घटली
मुंबई, १ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात पर्यटनाकरिता येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या ६० टक्क्यांनी घटली असल्याची कबुली पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सचिव जॉयस शंकरन यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र देशातील पर्यटकांच्या संख्येत विदेशी पर्यटकांची संख्या केवळ एक टक्का असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करीत नाही, असेही ते म्हणाले.

बारावीची परीक्षा २६ फेब्रुवारीला; तर दहावीची ५ मार्चला
मुंबई, १ जानेवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा २६ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत तर, दहावीची लेखी परीक्षा ५ ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा ६ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत तर दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा १२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाच्या राज्यातील आठ विभागीय मंडळामार्फत एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येईल.

भाजपच्या ‘लगीनघाई’ला शिवसेनेकडून चाप!
मुंबई, १ जानेवारी /खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान दृष्टीपथात आलेले असले तरी लगीनघाई झाल्याप्रमाणे मुंबईतील भाजपच्या लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करणाऱ्या भाजपाला शिवसेनेने चाप लावला आहे. जागांचे कोणत्याही प्रकारे वाटप झालेले नसून याबाबतची चर्चा युतीच्या नेत्यांत झालेली नाही, अशा आशयाचे पत्रक शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांनी तातडीने प्रसिद्धीला दिले आहे.

डझनभर पाकिस्तान्यांनी रचला मुंबई हल्ल्याचा कट
दाऊदच्या सहभागावर मात्र पोलिसांचे मौन

मुंबई, १ जानेवारी / प्रतिनिधी

जवळपास डझनभर पाकिस्तानी नागरिकांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ला रचल्याची माहिती आज पोलीस उपायुक्त राकेश मारिया यांनी दिली. या हल्ल्याच्या पद्धतीवरून हा हल्ला करण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने कट रचणाऱ्यांना मदत रचली होती, असे म्हटले जात असताना पोलिसांनी मात्र या हल्ल्यातील दाऊदच्या सहभागाविषयी मौन बाळगले आहे.

चोरावर मोर!
मुंबई, १ जानेवारी / प्रतिनिधी

‘चोराच्या घरी चोरी’ हे ऐकायला जरा विचित्र वाटते ना? पण मलबार हिल पोलिसांनी एका प्रकरणासंदर्भात ‘चोर पे मोर’ही उक्ती प्रत्यक्षात अनुभवली. पहिल्या चोराने चोरलेले पसे दुसऱ्या चोराने चोरून पहिल्याला चकवा दिला. पण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या दोन्ही चोरांना गजाआड करून त्यांचे मनसुबे उधळून लावले.

‘अतिरेक्यांची घुसखोरी’ विषयावर गोरेगावात कर्नल पेंडसे यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, १ जानेवारी/प्रतिनिधी

मुंबईवरील हल्ल्यानंतर एनएसजी, ब्लॅक कॅट कमांडो आदी शब्दांविषयी मुंबईकरांविषयी औत्सुक्य निर्माण झाले. परंतु लष्कराचे सर्वसामान्य जवान, विशेषत: काश्मीर, ईशान्य भारत, सियाचीन आदी सीमावर्ती आणि सतत अशांत, धुमसत्या भागामध्ये तैनात असणारे जवान, त्यांचा दिनक्रम, त्यांच्या कुटुंबियांची घालमेल आदी अनेक गोष्टींची सर्वसामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते. ही माहिती व्हावी तसेच लष्कर आणि एकूणच सुरक्षाव्यवस्थेविषयी जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने गोरेगावात शनिवार, ३ जानेवारी रोजी पुण्यातील कर्नल (निवृत्त) जयंत पेंडसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोरेगाव (पूर्व) येथील पांडुरंगवाडी पहिल्या गल्लीतील उद्यानात सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार असून त्यानंतर प्रश्नोत्तरेही होणार आहेत. जागरूक नागरिकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थिती लावावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

डोंबिवलीत आज राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, १ जानेवारी / प्रतिनिधी

मराहाष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे उद्या, २ जानेवारी रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. सांस्कृतिक कार्य, सहकार, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उप सभापती वसंत डावखरे, राज्य मंत्री सुरेश वरपुडकर, ठाण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष रेखा पष्टे, कल्याण-डोंबिवलीचे महापौर रमेश जाधव, उप महापौर नरेंद्र पवार, अभिनेता आणि खा. गोविंदा, खा. आनंद परांजपे, खा. दामु शिंगडा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. विजय दिवाण, गुलाम रसूल, शुभा जोशी, भवानी शंकर, दत्ता केशव, रामकृष्ण बेलूरकर, गंगाराम कवठेकर, शाहीर योगेश, झेलम परांजपे, बाबी कलींगण, पांडुरंग सोमाजी भलावी आणि प्रकाश खांडगे यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

बीड नाटय़संमेलन आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात!
मुंबई, गुरुवार, १ जानेवारी
(नाटय़-प्रतिनिधी) :

अलीकडेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र व्यथित झालेला आहे. या मानसिक धक्क्यातून सावरून नाटय़-संमेलनाची पूर्वतयारी करण्यासारखी मन:स्थिती नसल्यामुळे बीड नाटय़ परिषदेने पूर्वनियोजित तारखांनुसार जानेवारीच्या अखेरीस बीड येथे होणारे ८९ वे नाटय़-संमेलन पुढे ढकलले आहे. आता ते १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी संपन्न होईल. १३ फेब्रुवारीला नाटय़-संमेलनाच्या पूर्वसंध्येपासून संमेलनाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, त्यात मनोरंजनाच्या भरगच्च कार्यक्रमांचा अंतर्भाव आहे. नाटय़-संमेलनास महाराष्ट्रातील रंगकर्मीचा भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

वेतन कपातीविरोधात ३४ कामगार संघटना एकत्र
मुंबई, १जानेवारी/प्रतिनिधी

जगावर आलेल्या आर्थिक मंदीची झळ कामगार वर्गाला मोठय़ा प्रमाणावर बसत असल्याने कामगारांच्या नोकरीवर गदा येऊ नये व त्यांना मिळत असलेल्या वेतनात कपात केली जाऊ नये या मागणीसाठी येत्या तीन जानेवारी रोजी मुंबई-महाराष्ट्रातील ३४ प्रमुख कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समिती तर्फे एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत तातडीने कपात करण्यास सुरुवात झाली.त्याविरोधात लढय़ाचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ४.०० वाजता मध्य रेल्वे वर्कशॉप हॉल, परळ येथे परिषद घेण्यात येणार आहे.