Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

आरटीओचे अर्ज आता टच स्क्रीनवर!
कैलास कोरडे

ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात टच स्क्रीनआधारित नवीन किऑस्क गुरुवारी बसविण्यात आले. सोमवारपासून कार्यान्वित होणाऱ्या या किऑस्कच्या माध्यमातून आरटीओतील कामकाजाशी संबंधित सर्व छापील अर्ज नागरिकांना मिळू शकणार आहेत. कोणत्याही अर्जासाठी नागरिकांना वारंवार आरटीओ कार्यालयांत खेटे घालावे लागू नयेत म्हणून अंधेरी व वडाळा आरटीओतही लवकरच या प्रकारचे किऑस्क बसविले जाणार आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कर, परवाने, खटले, वाहन नोंदणी यासंबंधी सुमारे २०० अर्ज आरटीओ कार्यालयांतून दिले जातात.

प्रवास होणार अधिक सुखकर?
शशिकांत कोठेकर

रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर गर्दीतून वाट काढण्यापेक्षा 'स्कायवॉक' वरून आरामात वॉक करीत घर गाठायचे, मुंबईच्या वाहतूक कोंडीतून प्रवास करताना
वातानुकू लित बसने आरामदायी प्रवास, लोकलच्या भयानक गर्दीपेक्षा एसी लोकलने प्रवास, मुंबईत घर नाही अशांना किमान भाडय़ाची घरे मुंबईत , मुंबईतील बहुतांशी महत्वाचे रस्ते रूंद झालेले असे सारे आशादायक चित्र येत्या वर्षांत पाहायला मुंबईकरांना हरकत नाही. सरकारी पध्दतीने ही कामे रेंगाळली नाही, तर २००९ या वर्षांत मुंबईकरांचा दगदगीचा प्रवास काहीसा सुखद होण्याची चिन्हे दिसू शकतील, अशी अपेक्षा आहे. मुंबईतील तब्बल ४६२ किमी रस्त्यांचे रूंदीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

गिरिकंदरी, रानीवनी मन रंगले
गिर्यारोहण, वन्यजीव यांची आवड असलेल्यांची संख्या वाढली आहे.. म्हणूनच या क्षेत्रातील ‘हॅपनिंग्ज’चा वेध घेणारे नवे कोरे सदर..
कशाला तडफडायला जाता त्या डोंगरांवर, त्या उजाड किल्ल्यांवर काय आहे पाहण्यासारखे, त्या सुळक्यांवर चढताना नुसती दुखापत होईल, हिमालयात डोंगरावर जाऊन गोठून मरायचे का तुम्हाला? हे आणि असेच कैक प्रश्न प्रत्येक भटक्याला, गिर्यारोहकाला हमखास ऐकावे लागतात; पण हाडाच्या डोंगरवेडय़ाचे सांगणे इतकेच असते, की तुम्हीपण या एकदा आमच्याबरोबर मग पाहा, निसर्ग दोहातांनी कशी मुक्त उधळण करतोय, उजाड डोंगरावरच्या एखाद्या पुरातन किल्ल्याचे निर्जीव दगडदेखील मग तुमच्याशी हितगुज करतील, इतिहासाची साथ देतील.

गुरूवर्य बाबा बेलसरे; एक अलौकिक व्यक्तिमत्त्व
गुरूवर्य बाबा बेलसरे यांना मी जून १९६८ मध्ये प्रथम भेटलो. पहिल्या भेटीतच त्यांनी मला आपलसं केलं.
बाबा म्हणजे श्रीगोंदवलेकर महाराजांना लाभलेला सव्यसाची अर्जुनच. प्रचंड बुद्धिमत्ता, तीक्ष्ण तर्कसामथ्र्य, तीव्र स्मरणशक्ती व दांडगी चिकाटी हे बाबांचे प्रमुख गुण. सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार ‘अभ्यासेनतु कौंतेय’ या ब्रीदाने स्वत:च्या अंतरंगात त्यांनी बदल घडवून आणला. शारीरिक व प्रापंचिक दु:खांना न जुमानता ध्येय साध्य केले. असामान्यत्वात नकळत रूपांतरित झाले. श्रीमहाराजांचे गुण अभ्यासता शेवटी ते श्रीमहाराजमयच झाले. ‘पिकलिया शेंदे, कडूपण गेले’ या अवस्थेचा अनुभव त्यांनी घेतला.

सोनालीचा संकल्प
प्रतिनिधी

इंडियन आयडॉलच्या नवीन वर्षांतील पहिल्या भागाची थीम होती.. विवाहाची गाणी. नेहमी प्रमाणे सगळ्या स्पर्धकांनी चांगल्या प्रकारे आपली कला सादर केली. पण पूर्णपणे वराच्या वेषात आलेल्या चँगने सर्वानाच चकीत केले. त्याचा लग्न करायचा विचार आहे का अशीच शंका सगळ्यांच्या मनात येत होती. योग्य मुली पुढे येऊ शकतात! पण त्याच्या साठी मुलगी बघणे जरा कठीणच आहे. कपिलने तर आधीच कोणला तरी पसंत केले आहे. मोहित आणि प्रसनजीत यांना अशी मुलगी हवी आहे की जी नवऱ्यापेक्षा सासू-सासऱ्यांवर जास्त प्रेम करील!
इंडियन आयडॉलच्या या भागात परीक्षकांना नवीन वर्षीचा संकल्प काय आहे याबद्दल विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांची कोणीही अपेक्षा केली नव्हती. जावेद अख्तर म्हणाले की अनू मलिकची इच्छा म्हणजे त्याला जे स्पर्धक आवडत नाहीत, त्यांना फासावर लटकवायचे! यावर जावेद साहेबांना येत्या वर्षांत अनू मलिक जास्तच आवडायला लागेल, असे उत्तर अनु मलिकने दिले. कैलाश खेरने सांगितले की दरवर्षी एक अल्बम काढण्यापेक्षा दोन वर्षांतून एकदा आल्बम काढणार म्हणजे तो अल्बम विशेष ठरेल. आपण कधीच नवीन वर्षांचा संकल्प करत नसल्याचे सोनोली बेंद्रेने सांगितले. जावेद अख्तर म्हणाले की,१ जानेवारीला सोनालीचा वाढदिवस असतो त्यामुळेच तिला संकल्प करण्यासाठी वेळ मिळत नाही.

मंगेश पाडगावकर यांचे 'माझे जीवनगाणे' गिरगावात
प्रतिनिधी : महाराष्ट्रभूषण कवी मंगेश पाडगावकर यांचे 'माझे जीवनगाणे' हा कार्यक्रम गिरगावातील साहित्यसंघात रविवार ४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. मंगेश पाडगावकर त्यांच्या कविता कार्यक्रमात सादर करणार असून गप्पांमधून पाडगावकरांचा कवितेचा प्रवास उलगडला जाणार आहे. श्रावणात घननिळा, लाजून हसणे, शब्द शब्द जपून ठेव, तुझे गीत गाण्यासाठी, भातुकलीच्या खेळामधली, माझे जीवनगाणे यासारखी अवीट गाणी रसिकांना या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत. सारेगमपच्या महागायिका संगीता चितळे गाणी गाणार असून त्यांच्या जोडीला आनंद सावंत गाणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन आनंद सहस्त्रबुद्धे करणार आहेत. कार्यक्रमाची तिकीटे साहित्य संघ मंदिरात सुरू असून कार्यक्रमाचे आयोजन सुशीला परांजपे धर्मदाय न्यास तसेच सोहम प्रतिष्ठान यांनी केले आहे.