Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

जी व न द र्श न
संकेतचिन्ह

प्रेषित हज़्‍ारत ईसा (येशू) जन्मल्यापासूनच त्यांचा व

 

त्यांनी आणलेल्या धर्माचा प्रेषित मोझेस (मूसा) यांना मानणाऱ्या यहुदी लोकांकडून विरोध सुरूच होता, येथपावेतो की ते त्यांचे प्राण घेण्यापर्यंत पोहोचले व कटकारस्थान करून त्यांना सुळावर लटकविण्याकरिता क्रूर रोमनांच्या हवाली केले. परंतु कुरआनच्या कथनानुसार ,‘‘खरे पाहता प्रत्यक्षात यांनी त्याला ठारही केले नाही की क्रुसावरदेखील चढवले नाही, परंतु मामला यांच्याकरिता संदिग्ध बनविण्यात आला आणि ज्या लोकांनी यासंबंधी मतभेद दर्शविले आहेत तेदेखील खरे पाहता शंकेत गुरफटले आहेत. यांच्याजवळ यासंबंधी काहीच ज्ञान नाही, केवळ अनुमानाचे अनुसरण आहे. त्यांनी ‘मसीह’ला खचितच ठार केले नाही, किंबहुना अल्लाहने त्यांना आपल्याकडे उचलून घेतले.’’ (अन्निसा : ४ : १५७)
प्रेषित हज़्‍ारत ईसा मसीहचे तारुण अत्यंत निर्मळ, प्रेमळ आणि प्रभावशाली होते. लोकांनी त्यांना कितीही विरोध केला असला तरी संदेश पोहोचविण्याकरिता ते कधीही कमी पडले नाहीत. जेव्हा ते प्रेषित म्हणून बनी इस्राईलपाशी आले तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मी तुमच्या पालनकर्त्यांकडून तुम्हापाशी संकेतचिन्ह घेऊन आलो आहे. मी तुमच्यासमोर मातीपासून पक्ष्याच्या आकाराचा एक पुतळा तयार करतो आणि त्याला फुंकर मारतो. तो अल्लाहच्या आदेशाने पक्षी बनतो. मी अल्लाहच्या आज्ञेने जन्मजात आंधळय़ाला व महारोग्याला बरे करतो आणि त्याच्या आज्ञेने मृताला जिवंत करतो. मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही काय खाता आणि आपल्या घरात काय साठा करून ठेवता. यात तुमच्यासाठी पुरेशी निशाणी जर तुम्ही श्रद्धावंत असाल.’’ पुढे म्हणण्यात आले आहे, की ‘‘पहा! मी तुमच्या पालनकर्त्यांकडून तुम्हापाशी संकेत घेऊन आलो आहे. म्हणून अल्लाहचे भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळा.’’ (आलिइमरान- ३ : ४९-५१)
पवित्र कुरआनात मदर मॅरी (मरयम) व ईसा मसीह (येशू ख्रिस्त) यांचा कुरआनातील ११४ अध्यायांपैकी ३२ हून अधिक अध्यायातून उल्लेख करण्यात आला आहे.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
मकरसंक्रांती

आपण सामान्यपणे १४ जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा करतो. ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे इष्टमित्र आणि शेजारीपाजारी यांना आवाहन करताना आपण कधी हा विचार करतो का की हा सण नेमका कशासाठी आहे.?
आकाशदर्शनातून कळते, की या सुमाराला सूर्य धनु राशीतून मकर राशीत शिरतो. सूर्याच्या आकाशातील मार्गाला अनुसरून (वास्तविक सूर्य फिरत नसून पृथ्वी फिरते, पण आपल्याला पृथ्वीवरून पाहत असल्याने सूर्य फिरताना दिसतो.) राशीचक्र करण्यात आले. त्यातील बारा राशींपैकी मकर ही एक. पण मकरसंक्रांतीला महत्त्व आले ते सूर्याच्या फिरण्यातील एका टप्प्यामुळे! पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या तुलनेत पाहिले तर सूर्याचा आकाशात फिरण्याचा मार्ग कधी उत्तरेकडे असतो तर कधी दक्षिणेकडे. अशा वेळी सूर्य उत्तरायणात किंवा दक्षिणायनात असतो असे म्हणतात. २२ डिसेंबरला दरवर्षी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे वळतो. याचा अर्थ त्याची अधिकाधिक दक्षिणेकडे जायची प्रवृत्ती संपून तो उत्तरेकडे सरकू लागतो. सुमारे १७०० वर्षांपूर्वी मकरसंक्रांतीला घडत असे. याचा अर्थ त्या काळी मकरसंक्रांत जानेवारी १४ ऐवजी डिसेंबर २२ ला होत असे. पण आज तसे नाही..याचे कारण काय?
कारण शोधायला आपल्याला पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या आसाकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा आस उत्तर-दक्षिण असून ध्रुव ताऱ्याच्या दिशेने असतो. त्यामुळेच ध्रुव तारा इतर ताऱ्यांप्रमाणे आकाशात पूर्व ते पश्चिम न फिरता एका जागी स्थिर दिसतो. असे असल्यानेच ध्रुवाची आख्यायिका अस्तित्वात आली.
पण पृथ्वीचा आस अंतराळात स्थिर नसून एखाद्या भोवऱ्याच्या आसाप्रमाणे त्यात कोनीय गती असते. सुमारे २६००० वर्षांनी एका कोनाच्या गतीने एक फेरी पूर्ण करून तो पूर्वीच्या ठिकाणी येतो. त्यामुळे २००० वर्षांनी ‘गामा सेफिया’ हा तारा ध्रुव ताऱ्याची जागा घेईल, कारण पृथ्वीचा आस त्याच्या दिशेने असेल. याचा अर्थ सूर्य कुठल्या राशीत केव्हा आहे याचे गणित हळूहळू बदलते, २६००० वर्षांत ३६५ दिवसांनी. म्हणून एकेकाळी २२ डिसेंबरला होणारी मकरसंक्रांत आज २३ दिवसांनी १४ जानेवारीला येते.
जयंत नारळीकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
भाई कोतवाल

एक डिसेंबर १९१२ रोजी उगवलेला आणि केवळ फंदफितुरीमुळे दोन जानेवारी १९४३ रोजी इंग्रजांच्या जाळ्यात अडकून वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी सिद्धगडावर अकाली निखळून पडलेला तेज:पुंज तारा म्हणजे हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मणराव ऊर्फ भाई कोतवाल. फायनलच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पुढे वकील झालेले, पण तत्पूर्वी काही काळ सरकारी नोकरीत कारकुनी केलेले भाई गरिबांची पिळवणूक सहन न झाल्याने लोकसेवेसाठी रायगड जिल्ह्य़ात ग्रामीण भागात उतरले. त्यांनी शेतकरी बांधवांसाठी शाळा काढल्या, धान्य साठवण्यासाठी धान्यकोठय़ा निर्माण केल्या. ४२च्या लढय़ाच्या काळात भाईंनी ‘आझाद दस्ता’ नावाच्या संघटनेमार्फत अनेक धाडसी कामे केली. कॉलेजात असताना गव्हर्नरच्या हत्येची योजना आखणाऱ्या भाईंनी बंदुकीच्या धाकावर प्रति सरकार स्थापन करण्याचाही प्रयत्न केला. पण एका विश्वासू सहकाऱ्याच्याच फितुरीमुळे सिद्धगडावर भाईंना इंग्रजांनी वेढले. गोळीबाराला न जुमानता भाई लढले, पण एका गोळीने वेध घेतल्याने भाई बेशुद्ध पडले. इंग्रज अधिकारी हॉलने जवळ जाऊन बंदुकीची नळी डोक्याला लावून चाप ओढला आणि एक धगधगता अंगार थंड झाला. ल्ल संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
रुईचा हार गुलाबाचे फूल

टेकडीवर मारुतीचे मंदिर होते. वृद्धांना, प्रौढांना, तरुणांना मुलांना टेकडीवर फिरणे आनंदाचे वाटे. सेजल आणि ऊर्मी दोघी छोटय़ा मैत्रिणी टेकडीवर फिरायला जायच्या. नाना रंगांचे पक्षी, सुऽर्रऽऽकन धावणाऱ्या खारी, रंग बदलणारे सरडे, फुलपाखरे, रानफुले त्यांचे मित्र झाले होते. त्या रोज मारुती मंदिरात जायच्या. आप्पा पुजारी त्यांनी आणलेली फुले मारुतीला वाहून म्हणायचे, ‘देवा, लेकरांची पूजा स्वीकारा.’ एकदा सेजल म्हणाली, ‘‘आप्पा, मी गुलाब आणला तर रुईच्या हारात घालाल? माझ्या घरापाशी टप्पोरी कळी आलीय.’’
‘‘नक्की घालेन हं पोरी’’ आप्पा म्हणाले.
‘‘मग देव प्रसन्न होईल माझ्यावर?’’ सेजलने विचारले.
‘‘का नाही होणार? तुला चांगली बुद्धी देईल. यशस्वी होशील.’’
‘‘अय्या, खरंच! उद्या फूल उमलले की लगेचच आणेन मी.’’ सेजल आनंदली.
‘‘वाग वा! ती कळी माझ्या घरापासच्या झाडावर आहे’’ ऊर्मी किंचाळली.
सेजल तणतणली, ‘‘मुळीच नाही. ते रस्त्यावरचं झाड आहे.’’
दुसऱ्या दिवशी सेजल सूर्योदयापूर्वीच उठली. घाईने रानटी गुलाब वेलीपाशी आली. पाहते तर ऊर्मीने उडी मारून फूल तोडले आणि ती टेकडीकडे निघाली होती. सेजलला अश्रू आवरेनात. तीही टेकडी चढू लागली.
‘‘आप्पा फूल आणंलय. रुईचा हार ओवू?’’ ऊर्मीने देवळात शिरत विचारले.
‘‘हो बाळा, तू सेजल ना? वयामुळे चेहरे नीट दिसत नाहीत हल्ली’’ आप्पा म्हणाले.
ऊर्मी दचकली. गप्प झाली. एव्हाना टेकडी चढून सेजल देवळापाशी पोहोचून खांबाआड उभी होती. भरल्या गळय़ाने, अपराधी चेहऱ्याने ऊर्मी म्हणाली, ‘‘होय आप्पा, मी सेजलच आहे’’ ते ऐकून सेजल पुढे होत म्हणाली, ‘‘आप्पा मी नाही. ऊर्मीने आणलंय ते फूल. तिनेच केलाय हार.’’
त्या मैत्रिणींचे प्रेम पाहून आप्पा म्हणाले, ‘‘रडू नका. डोळे पुसा. अगं, चुका होतात. भांडणे होतात, पण मैत्री अधिक महत्त्वाची. ती जपावी.’’ जेव्हा आपण इतरांचा हेवा करतो तेव्हा न कळत स्वत:ला दु:खी करतो. जेव्हा इतरांच्या यशात आपण सामील होतो, तेव्हा समोरच्याचा आनंद आपल्याही मनात उतरतो. अभिमान वाटावा अशा तुम्ही केलेल्या पाच गोष्टींची यादी करा.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com