Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

नवी मुंबईत मेट्रो, मोनो की लाइट रेल?
वर्षभरात निर्णय घेणार

नवी मुंबई/प्रतिनिधी

नवी मुंबईत मेट्रो, मोनोरेल, तसेच लाइट रेल यापैकी दळणवळणाचा कोणता पर्याय अधिक योग्य ठरेल, यासाठी नवी मुंबई महापालिकेने अभ्यासाची प्रक्रिया वेगाने सुरू केली असून, जागतिक पातळीवर अशा पद्धतीच्या सव्‍‌र्हेक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या तीन नामवंत संस्थांनी यासाठी इच्छा प्रदर्शित केल्याने या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे. नवी मुंबई परिसरात हार्बर रेल्वे सुरू झाल्याने या शहराच्या विकासाला मोठी गती मिळाल्याची इतिहासात नोंद आहे.

पाटणा-वास्को नवी गाडी पनवेल- कल्याणमार्गे धावणार!
पनवेल/प्रतिनिधी : पनवेल प्रवासी संघ, रेल्वे सल्लागार समिती सदस्य, खानदेशवासीय संघ व बोहरी समाज संघटना यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षांच्या रेल्वे बजेटमध्ये मंजुरी मिळालेल्या पाटणा- वास्को या नव्या गाडीला (क्र. २७४२) अखेर नुकताच मुहूर्त मिळाला. केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पाटणा स्थानकावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
ही गाडी-पनवेल-कल्याण- नाशिकमार्गे धावणार असल्याने रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई परिसरातील प्रवाशांना पनवेलहून नाशिक अथवा आणखी पुढे जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. पनवेल परिसरातील खानदेशवासीय, उत्तर भारतीय, बोहरी समाज तसेच नाशिकवासीय प्रवाशांसाठी ही नवी गाडी अतिशय लाभदायक ठरणार आहे

जेएनपीटी वर्कर्स संघटनेचा आंदोलनाचा इशारा
उरण/वार्ताहर : कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत तडजोड न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. शांती पटेल प्रणित न्हावा-शेवा पोर्ट अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनने जेएनपीटी प्रशासनाला दिला आहे.
जेएनपीटी कामगारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात जेएनपीटी प्रशासन टाळाटाळ करीत आहे. यामुळे अनेक वर्षांंपासून रिक्त असलेली पदे अद्याप जेएनपीटीने भरली नाहीत. पर्यवेक्षकांच्या रिकाम्या जागाही भरण्याचे सौजन्य जेएनपीटीने दाखविले नाही. मृत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबतही जेएनपीटीकडून चालढकलपणा केला जात आहे. टेक्निशियन कामगारांचा पगार वाढविण्याचा प्रश्नही अद्याप जेएनपीटीने ताटकळत ठेवला आहे. यामुळे कामगार न्याय्य हक्कांपासून वंचित राहिले असल्याचा आरोप न्हावा-शेवा पोर्ट अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी महादेव घरत यांनी जेएनपीटीला दिलेल्या पत्रकात केला आहे. त्याचप्रमाणे कामगारांसाठी इन्सेटिव्ह स्कीम राबवून सध्याच्या दरात सुधारणा करावी, जेएनपीटी बंदरात चालणारी कोणतीही कामे ठेकेदारी पद्धतीवर न देता जेएनपीटी कामगारांकडूनच करून घ्यावीत, प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, कंत्राटी कामगारांच्या सेवा-सुविधा नियमित कराव्यात, घरबांधणी, कर्ज योजना तसेच इतर सर्व कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, कामगारांना बढतीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, कामगार बदल्यासंबंधीचे योग्य नियम बनवून पक्षपातीपणाचे धोरण बदलावे आदी कामगार हिताच्या मागण्या कामगार संघटनेने जेएनपीटी अध्यक्ष एस. एस. हुसैन यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. एस. के. शेट्टे, अ‍ॅड. जयप्रकाश सावंत, विद्याधर राणे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जेएनपीटी अधिकाऱ्यांशी भेटीगाठीही घेऊन चर्चाही सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्यापही कामगारांच्या मांगण्याची पूर्तता झालेली नाही. या मागण्या जलदगतीने पूर्ण व्हाव्यात, अन्यथा जेएनपीटी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जनरल सेक्रेटरी महादेव घरत यांनी जेएनपीटीला दिला आहे.

नवी मुंबईत ८६ मद्यपींवर वाहतूक पोलिसांची कारवाई
बेलापूर/वार्ताहर : ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. २९ ते ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ऐरोली ते पनवेल, उरण परिसरात मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या ८६ मद्यपींविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
सध्या हे सर्वजण अटकेत असून, न्यायालयात हजर केल्यावर त्यांना जामीन होईल की तुरुंगवास याची माहिती प्राप्त होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत नऊ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली होती.

‘शहराच्या विकासासह अपघातांच्या समस्येकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे’
बेलापूर/वार्ताहर : नवी मुंबई हे २१ व्या शतकातील आधुनिक शहर असून, या शहराच्या विकासासह वाढत्या अपघातांच्या समस्येकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी वाशी येथे केले. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कळसकर पुढे म्हणाले की, आपली पिढी छोटय़ा कटुंब पद्धतीकडे वाटचाल करत असल्याने प्रत्येकाने जीवाचे मोल समजून घेतले पाहिजे. नवी मुंबईत रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण दिवसाला किमान दोन इतके असून, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एका पाहणी अहवालात दहशतवादी कारवायांमध्ये एका वर्षांत ५५ हजार लोक मृत्युमुखी पडल्याची नोंद असून, रस्ते अपघातात एक लाख ३० हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. यावरून अपघातांची गंभीरता कळून येते. रस्ते अपघातांबाबत जनजागृती व्हावी म्हणून नवी मुंबईतील सव्वा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या, तसेच सर्व महाविद्यालयांतून याबाबत पथनाटय़ सादर करून चालूवर्षी तरुणांमध्ये जागृती केली जाणार आहे. २६ जानेवारीला विद्यार्थ्यांची वाशी ते नेरुळ पामबीच मार्गावर सायकल फेरी काढून अपघातांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे कळसकर म्हणाले. नवी मुंबईतील रस्ते अद्ययावत करून तसेच उड्डाणपुलाचे जाळे निर्माण करून हे शहर तीन वषार्ंत वाहतूक कोंडी मुक्त करू, असे आश्वासन माजी महापौर संजीव नाईक यांनी यावेळी दिले. महापौर अंजनी भोईर, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तिवार, परिवहन व्यवस्थापक जितेंद्र पापळकर हे याप्रसंगी उपस्थित होते. आभारप्रदर्शन सहाय्यक प्रशिक्षक परिवहन अधिकारी कृष्णदेव जाधव यांनी केले.