Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

पाडळसरे प्रकल्पाचा विषय अडगळीत
वार्ताहर / अमळनेर

विधानसभा निवडणुका जवळ आल्या की राजकारमी मंडळींना आठवण येमारा तालुक्यातील पाडळसरे प्रकल्पाचा विषय सध्या अडगळीत जमा झाला आहे. पाडळसरे प्रकल्पाच्या प्रश्नावरून सलग दोनवेळा आमदारकी डॉ. बी. एस. पाटील यांच्या पदरात पडली तेही सध्या विषयावर गप्पा असून आमदारकीच्या स्पर्धेत असणाऱ्यांकडूनही या विषयाला स्पर्श करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अमळनेर तालुक्याला वरदान ठरू शकेल असा निम्मा पाडळसरे प्रकल्प गेली काही वर्षांपासून रखडला आहे.

पाणीटंचाईमुळे संतप्त महिलांचा दुर्गावतार
पर्यायी जलवाहिनी उद्ध्वस्त

वार्ताहर / वणी

नववर्षांच्या स्वागताची धामधूम सगळीकडे सुरू असतानाच वणी येथे पाच दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे संतापलेल्या महिलांनी ग्रामपालिकेवर मोर्चा नेत आपला रोष प्रगट केला. यावेळी काही विशिष्ट भागात सुरळीत पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्याने संतापात आणखी भर पडली आणि त्यांनी थेट या भागातील पर्यायी जलवाहिनी उद्ध्वस्त केली.

राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत सावळीराम शिंदे विजेता
प्रतिनिधी / नाशिक

नाशिक ग्रामीण विभागातील पोलीस कर्मचारी सावळीराम शिंदे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. ११ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन त्यास गौरविण्यात आले. भास्कर कांबळेने व्दितीय तर पुणे येथील प्रदीपकुमारने तृतीय क्रमांक मिळविला. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. भविष्यात संधी मिळाल्यास नाशिकच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी येण्याची आपली तयारी असल्याचे पिल्ले यांनी यावेळी सांगितले.

..एवढे केले तरी पुरे
नाशिकला उद्योगनगरीचा दर्जा बहाल करण्यात येथे असणाऱ्या निरनिराळ्या ऑटोमोबाईल प्रकल्पांचा मोठा हातभार आहे. तथापि, मंदीच्या पाश्वभूमीवर सध्या बहुसंख्य उद्योग संकटात सापडले असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला तर त्याचा तडाखा सर्वाधिक बसला आहे. परिणामी, नाशिक व परिसरातील उद्योग विश्वावर अवकळा पसरू लागली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यासाठी नेमके काय करणे शक्य आहे, त्याबाबत कोणत्या उपाययोजना तातडीने हाती घ्यायला हव्यात याविषयी अपेक्षा व्यक्त करतानाच नाशिकच्या एकूणच उद्योग क्षेत्राचा नाशिक इंडस्ट्रीज् अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (निमा) माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी मांडलेला लेखाजोखा ..

‘थर्टीफर्स्ट’च्या रात्री केवळ चार मद्यपि वाहनचालक जाळ्यात
*‘ड्रिंक & ड्राइव’विरोधातील मोहिमेचा फज्जा * वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार
प्रतिनिधी / नाशिक

नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सरसावलेल्या अतिउत्साही मंडळींवर लक्ष देण्यासाठी रात्रभर अक्षरश खडा पहारा देत ‘ड्रिंक अॅण्ड ड्राइव’ नामक विशेष मोहिमेचे आयोजन करणाऱ्या पोलिसांना या कारवाईत मद्यसेवन करून वाहन चालविणारे केवळ चार चालक हाती लागले. अशी तपासणी करण्यासाठी आवश्यक असणारे अल्कोमीटर नावाचे उपकरण केवळ दोन एवढय़ाच संख्येने उपलब्ध असल्यामुळे वाहतूक शाखेला ही मोहीम र्सवकषपणे राबविता आली नसावी, असे सांगितले जाते.

रस्ते थर्ड क्लास; तर चालक सेकंड क्लास : चोक्कलिंगम
प्रतिनिधी / नाशिक

विनापरवाना वाहन चालविणे किंवा आपण किती वेगाने गाडी चालवू शकतो हे दाखविण्यासाठी वेगाची मर्यादा ओलांडणे असले प्रकार अलिकडे मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असून आपल्याकडे रस्ते थर्ड क्लास असले, तरी चालक सेंकड क्लास असतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस्. चोक्कलिंगम यांनी केले. या परिस्थितीत बदल करावयाचा असेल तर तरुणांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

स्वजलधारा योजनेतील अपहारप्रश्नी काँग्रेस-राष्ट्रवादीचा इशारा
वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ाच्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव स्वजलधारा योजनेतील अपहार उघडकीस येऊनही दोषींवर कारवाई करण्यात चालढकल होत असल्याच्या कारणावरून तसेच प्रकरण दाबण्याचा प्रकार होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते विनोद तराळ यांनी घोडसगाव स्वजलधारा योजनेत अपहार झाल्याबद्दल सहा डिसेंबर रोजीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे निवेदनात म्हटले आहे. तक्रार करून २४ दिवस उलटल्यावरही दोषींवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. घोडसगाव स्वजलधारा या पाणी योजनेच्या कामांचे मूल्यांकन १० लाख ३२ हजार ७६४ रूपये याप्रमाणे झाले आहे. लोकवर्गणीचा समावेश करून ९४ हजार रूपयांपेक्षा जास्तीचे काम झाले आहे. यात दुसऱ्या हप्त्याचा सहा लाख ९० हजार रूपयांचा धनादेश ठराविक खात्यात न टाकता जळगावच्या स्टेट बँकेच्या खात्यात टाकून सर्व रक्कम लगेच परस्पर काढण्यात आली. तराळ यांनी कार्यकारी अभियंत्याविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. बँकेत बनावट खाते उघडून कोणाचीही परवानगी न घेता परस्पर पैसे काढण्याचे कारस्थान केल्याचे मुद्दे देण्यात आले आहेत. पाणी पुरवटा विभागाचे कार्यकारी अभियंता हे दोषींना पाठिशी घालत असल्याचा आरोप तराळ यांनी केला आहे. कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दोन जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करतील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय गरुड, भिला सोनवणे यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.

शरद बालमहोत्सवास प्रचंड प्रतिसाद
प्रतिनिधी / नाशिक

महापालिका शिक्षण मंडळाच्या एकूण १२६ शाळांमधून जमा झालेल्या ४३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा चिवचिवाट, त्यांच्या करमणुकीसाठी मनोरंजक खेळांसह विविध बोधप्रद कार्यक्रम, विद्यार्थ्यांना आवरताना शिक्षकांची होणारी तारांबळ..
हे दृश्य होते मनपा शिक्षण मंडळातर्फे सिडको येथील राजे छत्रपती संभाजी स्टेडियममध्ये आयोजित शरद बाल महोत्सवाचे. प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे हे स्टेडियम प्रथमच पूर्णपणे भरल्याचे दिसून आले. महोत्सवाचे उद्घाटन महापौर विनायक पांडे व आयुक्त विलास ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण, राजेंद्र देसाई, अशोक सावंत, दत्तात्रय गोतिले हे उपस्थित होते. यावेळी मनपा शाळेतील हुशार, गरीब तसेच होतकरू पालक व आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसह ११५० शिक्षक व ३०० कर्मचारी या महोत्सवात सहभागी झाले होते. महोत्सवाच्या प्रारंभी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद लुटण्यास सुरूवात केली. सर्पमित्र माणिक कुमावत यांनी छायाचित्रांव्दारे विद्यार्थ्यांना सापांविषयीची माहिती दिली. नृत्य करण्यासाठी मिळालेली मुभा, बुध्दिबळ, सापसीडी यांसारखे खेळ, फुगे फोडण्यातील स्पर्धा, जोकरशी हस्तांदोलन, मेहंदी काढण्यात अनेक जण व्यस्त होते. शारीरिक कसरतींसह दातांनी दगड फेकणे, केसांनी सायकल उचलणे, डोक्यावर नारळ व फरशी फोडणे हे मर्दानी खेळ पाहून बालमंडळी थक्क झाली. महापालिकेतर्फे दिवसभर विनामूल्य मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून देण्यात आला होता. सकाळी अल्पोपहार, दुपारचे जेवण, पिण्याचे पाणी, फिरता दवाखाना आदी व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली होती.

अक्कलपाडा प्रकल्पाची जूनअखेर घळभरणी : पाटील
वार्ताहर / धुळे

तालुक्याला वरदान ठरणाऱ्या निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्पाच्या अंशत: घळभरणीचे जून अखेर नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत या प्रकल्पासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च झाला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व आमदार रोहिदास पाटील यांनी प्रकल्पाच्या पाहणीप्रसंगी दिली. साक्री तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पाच्या घळभरणीचे काम लवकरच करण्यात येणार असून त्या पाश्र्वभूमीवर पाटील यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत आ. द. वा. पाटील, कार्यकारी अभियंता सी. एन. माळी, जवाहर सूतगिरणीचे अध्यक्ष सुभाष देवरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर गर्दे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती दिलीप पाटील, जि. प. सदस्य सुरेश देसले उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी विविध कामांचा आढावा कार्यकारी अभियंता माळी यांच्याकडून घेतला. प्रकल्पास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता शासनामार्फत गेल्या मार्चमध्ये मिळाली आहे. अक्कलपाडा प्रकल्पावर डिसेंबर २००८ अखेर एकूण १४,९४४ एवढा खर्च झाला आहे. माती धरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर सांडव्यातील डाव्या भागाचे कामही ९० टक्के पूर्ण झाले आहे. उजव्या कालव्याचे काम ६० टक्के पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. अंशत: घळभरणीपूर्वी वसमार गावाचे स्थलांतर करणे आवश्यक असून नवीन पुनर्वसन गावठाणात ग्रामस्थांना प्लॉट वाटप करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पावरा उन्नती मंडळातर्फे वार्षिक स्नेहमेळावा
वार्ताहर / तळोदा

शहादा येथील सातपुडा परिसर आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळातर्फे चार जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता शिवनेरी कॉलनीत वार्षिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात समाजाशी निगडीत विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील समाजातील विजयी लोकप्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. २००८ मध्ये दहावी व बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्राप्त प्रवेशिकांच्या आधारे गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निश्चित करून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी पाठय़क्रमाच्या प्रथम वर्षांसाठी प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जाणार आहे. संबधितांनी त्यांना मिळालेले गुण, शाखा, शिक्षण घेत असलेली शिक्षण संस्था याबाबतच्या माहितीसह त्वरीत पावरा समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले यांच्याकडून कळविण्यात आले आहे.