Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मारुतीची पंचविशी

 

आपल्याकडे चार चाकी वाहानांच्या उद्योगात क्रांती करणाऱ्या मारुती उद्योग लि. या कंपनीच्या पहिल्या मोटारीच्या उत्पादनास पंचविस वर्षे झाल्याच्या घटनेची विशेष कुणी दखल घेतली नाही. खरे तर मारुतीच्या स्थापनेच्या वेळी खूप मोठा गदारोळ व राजकारण झाले होते. मारुतीचा इतिहासच मोठा रंजक आहे. मात्र या ऐतिहासिक मारुतीच्या पंचविशीकडे विशेष कुणी लक्ष दिले नाही. कदाचित मारुतीची मालकी आता सरकारी नसून सुझुकी या जपानी कंपनीकडे असल्याने या घटनेची दखलही घेतली नसावी.
सर्वसामान्यांना परवडेल असे चार चाकी वाहन असावे अशी इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांची इच्छा होती. त्यातून त्यांनी ही कंपनी स्थापन केली. आता हीच संकल्पना टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मांडल्यावर तिचे भरभरून कौतुक झाले. मात्र त्यावेळी संजन गांधी यांनी ही संकल्पना मांडताच त्यांना राजकारण्यांच्या रोषाचे बळी व्हावे लागले. त्यावेळी मोटारींची बाजारपेठ अतिशय मर्यादीत होती. ७० च्या दशकात जेमतेम ४० हजार मोटारींची विक्री होत असे. आतासारखे मध्यमवर्गीयांनी मोटारीची खरेदी करणे हे त्यांच्या कधीच आवाक्यात नव्हते. मुंबईतील प्रीमियर ऑटोमोबाईल्स व अ‍ॅम्बेसिडरची निर्मिती करणारी बिर्ला समूहाची कंपनी अशा दोनच प्रमुख कंपन्या होत्या. प्रीमियरने आपल्या मोटारी फियाट या जागतिक पातळीवरील नामवंत कंपनीच्या सहकार्याने बाजारात आणल्या होत्या. या कंपनीने आपल्या स्थापनेपासून ते कंपनी बंद होईपर्यंत एकच आपले मॉडेल ग्राहकांच्या माथी मारले होते. अ‍ॅम्बेसिडर हे मॉडेल मंत्र्यांपासून ते सरकारी अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. अर्थातच त्याकाळी मोटारीची खरेदी हे सर्वसामान्यांसाठी केवळ एक स्वप्नच होते. या पाश्र्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी चार चाकी वाहन असावे ही संकल्पना सर्वात प्रथम संजय गांधींनी मांडली. त्यावेळी त्यांनी अशा प्रकारच्या मोटारीची किंमत पंचवीस हजार रुपये निश्चित केली, त्यावेळी एवढी स्वस्तात गाडी मिळते का असा सवाल करुन टिकेचा भडिमार संजय गांधींवर झाला. अर्थातच यात इंदिरा गांधींच्या विरोधकांचा पुढाकार होता. सुरुवातीला संजय गांधी यांनी ही मोटार जपानची नामवंत वाहन कंपनी सुझुकीच्या तांत्रिक सहकार्याने सुरु केली. संजय गांधींनी याची किंमत पंचवीस हजार ठरविली असली तरी नंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरु होईपर्यंत त्याची किंमत ५० हजारांच्या घरात गेली. असे असले तरी अन्य मोटारींच्या तुलनेत मारुती स्वस्तच होती. संजय गांधींनी ज्येष्ठ पत्रकार खुशवंतसिंग यांना या मोटारीत बसवून सफर केली होती. त्यावेळी खुशवंतसिंगांना ही मोटार खुपच आवडली. त्यांनी या मोटारीची भरभरुन स्तुतीही केली. या स्तुतीनंतर खुशवंतसिंग हे संजय गांधींचे चमचे असल्याची इंदिरा गांधींच्या विरोधकांनी टिका केली होती. अल्पावधीत ही मोटार लोकप्रिय झाली. मोठय़ा प्रमाणावर या मोटारीची बुकिंग झाली. सर्वसामान्यांची मोटार म्हणून मारुती अल्पावधीत लोकप्रिय झाली असताना राजकारणी व उच्चभ्रू या मोटारीकडे तुच्छतेनेच पहात.
आणीबाणीनंतर आलेल्या जनता पार्टीच्या सरकारने संजय गांधींची ही मोटार टार्गेट केली आणि त्यांच्या विरोधात अनेक खटले भरले. यामुळे मारुतीच्या प्रकल्पाची भरारी घेत असलेली ही गाडी पंक्चर झाली. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या आणि मारुतीने खऱ्या अर्थाने आता भरारी घेतली. मारुती लि. ही संजय गांधी यांची कंपनी सरकारने ताब्यात घेतली. या कंपनीचे नामकरण मारुती उद्योग लि. असे करण्यात आले. गुरगाव येथे असलेली कंपनीची २९८ एकर जमीन व सर्वच मालमत्ता सुमारे पाच कोटी रुपयांना खरेदी केली. ही कंपनी सरकारच्या मालकीची झाली. संजय गांधी म्हणजेच गांधी कुटुंबियांना यातून कसलाही आर्थिक लाऊ झाला नाही. मात्र संजय गांधींनी स्थापन केलेली ही कंपनी हा ठसा मारुतीवर कायम राहिला. सरकारने ही कंपनी ताब्यात घेतल्यावर हा प्रयोग फसणार अशी अनेकांची अटकळ होती. एक तर सुरुवातीपासूनच या कंपनीपुढे काही ना काही तरी आव्हाने उभी राहिली. आणीबाणीनंतर तर ही कंपनी पूर्ण डबघाईला आली. इंदिरा गांधी जर पुन्हा सत्तेवर आल्या नसत्या तर ही कंपनी पूर्णत: इतिहासजमा झाली असती. पण पुढे चालून ही कंपनी वाहन उद्योगातील एक आघाडीची कंपनी व्हायची होती. परंतु २५ वर्षांपूर्वी हे जर कुणी भविष्य वर्तविले असते तर त्याला मुर्खात काढले असते. इंदिरा गांधींना संजयचा हा ड्रीम प्रोजेक्ट यशस्वी करायचा निर्धार होता. त्यामुळे त्यांनी आपल्या विश्वासातील आय.ए.एस. अधिकारी आर.सी. भार्गव यांची नियुक्ती मारुतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केली. मारुतीच्या सुरुवातीचा काळ हा मोठा कसोटीचा होता. याच काळात भार्गव यांनी मारुतीची पायाभरणी केली. मारुतीच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात मारुतीच्या संचालकांमध्येही मतभिन्नता होती. गांधी घराण्याचे कंपनीच्या संचालक मंडळातील प्रतिनिधी अरुण नेहरु यांच्या मते मारुतीने दरवर्षी किमान एक लाख मोटारी विकल्या पाहिजे होत्या. तर कंपनीचे दुसरे एक संचालक सुमंत मुळगावकर (जे टेल्कोचे अध्यक्ष होते) यांनी मारुतीने मोटारींची निर्मिती न करता ट्रक तयार करावेत अशी सूचना केली होती. अर्थात मारुतीने मोटारींचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतल्यावर मुळगावकर यांनी राजीनामा दिला. मारुतीशी सहकार्य करण्यास सुरुवातीला रेनॉल्ट व वॉक्सव्ॉगन इच्छुक होत्या. परंतु नंतर काही ना काही कारणाने त्यांचे नाव मागे पडले आणि सुझुकी प्रकाशझोतात आली. मारुती-सुझुकी ही संयुक्त कंपनी असली तरी मारुती या नावानेच सुरुवातीपासून ओळखली गेली आणि हेच नाव त्यांचे लोकप्रिय झाले. मारुतीची बाजारातील एन्ट्री ही भारतीय वाहन उद्योगात अगदी योग्य वेळी होती. प्रीमियर पद्मिनी व अ‍ॅम्बेसिडर या मॉडेलला विटलेल्या भारतीय ग्राहकाला एक चांगला पर्याय मारुतीच्या रुपाने मिळाला आणि महत्त्वाचे म्हणजे स्वस्त आणि मस्त असी ही मोटार होती. पाच ते सात हजारात त्यावेळी स्कूटर मिळत होती. त्यातुलनेत ५० हजारात मोटार उपलब्ध झाली. मारुतीने झपाझप आपली बाजारपेठ काबीज करण्यास प्रारंभ केला. मारुतीची ही भरारी एवढी जबरदस्त होती की त्यात प्रीमियरसारखी कंपनी जमीनदोस्त झाली. मारुती ही सरकारी कंपनी म्हणून पुढे आली असली तरी तिच्यात सरकारीपण कधीच नव्हते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने खासगीकरणाच्या नावाखाली या कंपनीतील आपले भांडवल सुझुकी या कंपनीला विकले आणि आता ही कंपनी पूर्णत: सुझुकीच्या मालकीची झाली. मारुतीच्या या प्रवासाला आता पंचवीस वर्षे झाली आहेत. मारुतीचा हा प्रवास म्हणजे आपल्या देशातील वाहन उद्योगाचाच प्रवास आहे.

गॉसिप कॉर्नर
सत्यमचे प्र्वतक राजू यांना आता कंपनीतून बाहेर पडण्याशिवाय अन्य काही पर्याय राहिलेला नाही. त्यांनी आपणच प्र्वतित केलेल्या कंपन्या ताब्यात घेण्याचा बनाव करुन सत्यमच्या राखीव निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्वच प्रकार त्यांच्या आंगलटी आला आहे. आता त्यांनी आपल्याकडे असलेल्या सत्यमच्या नऊ टक्के समभागांपैकी चार टक्के समभाग वित्तंसस्थांकडे गहाण टाकले आहेत. शिल्लक राहिलेले पाच टक्के समभाग चांगली किंमत आल्यास विकण्याची तयारी ठेवली आहे. सत्यम ही उत्कृष्ट कंपनी असल्याने राजू यांचा वाटा खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. एच.पी. या कंपनीने सर्वात जास्त रस यात दाखविला आहे, असे समजते. यासाठी त्यांनी राजू यांना बाजारभावापेक्षा जास्त किंमत देण्याची तयारी केल्याचे समजते. जर समजा एच.पी.चा हा प्रयत्न फसला तर काही पी.ई. फंडांनी सत्यम कंपनीच्या भांडवल खरेदीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राजू यांचा वाटा कोण खरेदी करतो हा भाग दुय्यम आहे, त्यांची हकालपट्टी होणार हे महत्त्वाचे आहे.