Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

ठंडी के साइड इफेक्टस् !

 

यंदा अंमळ उशीराने अवतरलेल्या थंडीचा बघताबघता असा काही कडाका सुरू झाला की त्यामुळे जुनेजाणते नाशिककर ‘नॉस्तेल्जिया’त रममाण झाल्याचे आणि नवतरुणांनी तर या थंडीलाही ‘ट्रेंडी’ बनवून टाकल्याचे चित्र दिसत आहे. सध्याच्या गारठलेल्या वातावरणात सर्वतोमुखी थंडीचाच विषय असून सलग दुसऱ्या वर्षी पाच ते सहा अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानामुळे बदलत्या काळातील जीवनमानावर होणारे ‘साईड इफेक्टस्’ ठळकपणे अधोरेखीत होत आहेत.
गप्पांसाठी हवापाण्याचा विषय तसा हक्काचा. पण, वातावरणात अपेक्षेनुसार बदल झाला नाही किंवा अपेक्षेहून अधिक बदल झाला, की मात्र हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. नेमकी हीच स्थिती सध्या नाशिक व परिसरात दिसून येते. आठवडाभरापूर्वीपर्यंत येथे थंडीचा मागमूसही नसल्याने ‘थंडी म्हणजे काय रे भाऊ’ असे विचारण्याची वेळ येऊन ठेपली होती. पण, त्यानंतर दोनच दिवसात तापमान एवढय़ा झपाटय़ाने खाली आले, की त्या तुलनेत आर्थिक मंदी, दहशतवाद, थर्टी फर्स्ट अन् नववर्ष असे चर्चेतले सगळेच विषय मागे पडले. विशेषत: जुनीजाणती मंडळी पूर्वीच्या आठवणी जागवू लागली. त्यातून सुरू झालेल्या तुलनेमुळे दोन-अडीच दशकांच्या काळात जीवनमान किती झपाटय़ाने बदलले आहे, त्याची जाणीव प्रकर्षांने होते.
थंडीची जाणीव होऊ लागताच पूर्वी ट्रंकेतल्या गाठोडय़ातून उबदार कपडे बाहेर काढले जात. साधारणपणे एकाच पठडीतले तसेच ठराविक दोन वा तीन गडद रंगांमधले लांब बाह्य़ांचे स्वेटर आणि मफलर एवढय़ावरच घरोघरच्या या सामग्रीला पूर्णविराम मिळायचा. त्यातही खरखरीत लोकरीचे टोचणारे मफलर सहसा नकोनकोसेच वाटत. त्यामुळे ज्यांना अगदी पर्यायच नाही, ती मंडळी मफलरचा वापर करीत. शिवाय, एकदा हे साहित्य खरेदी केल्यावर किमान पुढच्या चार -पाच वर्षांची निश्चिंती होत असे. त्या तुलनेत आताच्या तरुणाईचे ‘विंटर वेअर कलेक्शन’ पाहात रहावे असेच आहे. तऱ्हतऱ्हेच्या स्वेटर्सच्या जोडीला वूलन, लेदर, जीन्स पासून बनविलेली हाफ-फुल-शॉर्ट अथवा आणखीनच निरनिराळ्या प्रकारची जॅकेटस्, जर्सी, विंडचिटर्स त्याला सूट होतील अशा जीन्स वा कॉड्रा, डोक्यावरून जेमतेम कानाच्या शीर्षस्थानी स्पर्श करतील अशा फर वा वूलनच्या विविधरंगी ‘कानटोप्या’, स्कार्फ, विविध प्रकारच्या शाली, स्टोल्स अन् काय काय.. हा सारा जामानिमा साथीला असल्याने स्वत:ची हौस भागविण्यासाठी आताच्या जमान्यात थंडी हा देखील ‘इव्हेंट’ बनून जातो आणि थंडीच्या आडून चर्चा फिरत राहते ती नवीन ‘लुक’, फॅशन, ट्रेंड या मुद्यांभोवतीच ! थंडी म्हटल्यावर दुसरा महत्त्वाचा विषय येतो तो व्यायाम आणि खुराकाचा. पण, या संकल्पनांमध्येही आता बरेच अंतर पडले आहे. थंडीच्या मोसमात आधी दौड, नंतर तालीम हा पूर्वीचा शिरस्ता. आता मात्र ट्रॅक सूटस्, टी शर्टस्, स्लॅक्स यांनी जागोजागचे जॉगिंग ट्रॅक बहरू लागलेले दिसतात. शिवाय, ‘सिक्स वा एट पॅक अ‍ॅप्स’वाल्यांसाठी नॅशनल, इंटरनॅशनल चेनच्या महागडय़ा ‘जीम’ची सोय आहेच. मेथी व िडकाचे लाडू आणि दुधाचा ग्लास हा खुराकही आता इतिहासजमा होत असून ‘हेल्थ कॉन्शस’ मंडळींमध्ये त्याची जागा निरनिराळ्या पाल्यांचा रस व काढय़ांच्या डोसने घेतली आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते कितपत उपयुक्त आहे वा आपल्या प्रकृतिला त्यातील कोणते घटक उपकारक आहेत याचा विचार मग भलेही त्या क्रेझमध्ये विरून जावो.. याशिवाय, शेकोटय़ांपासून ‘सन बाथ’ पर्यंत थंडीशी निगडीत सगळयाच संकल्पना अमूलाग्र बदलत असून त्याविषयीची चर्चा बहुतेकदा कौतुकाच्या अंगानेच जाताना दिसते.
एकंदर, थंडीपासून बचाव करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा प्रवास आता तिचे ‘सेलीब्रेशन’ करण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. कारणे काहीही असोत, चर्चेचा नूर कसाही असो, कुणी त्यामुळे भूतकाळातील आठवणींत रममाण होवो अथवा कुणी त्या आडून स्वत:चे कौतुक करून घेवो, थंडीची गरमागरम चर्चा मात्र सध्या परिसरात सर्वत्र रंगत आहे आणि त्या माध्यमातून थंड हवेचे ठिकाण हा मध्यंतरी हरवत चाललेला लौकीक नाशिकला पुन्हा ठळकपणे प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्थात, पूर्वी बाराही महिने उल्हासित असणारे नाशिकचे हवामान तथाकथित विकासाच्या प्रक्रीयेतील अपरिहार्यतेमुळे आता पुन्हा निर्माण होणे संभव नसले तरी तूर्त कडाक्याच्या थंडीमुळे झालेली वातावरण निर्मितीही काय कमी आहे ?
अभिजीत कुलकर्णी
bhikul10@gmail.com