Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

मारुतीची पंचविशी
आपल्याकडे चार चाकी वाहानांच्या उद्योगात क्रांती करणाऱ्या मारुती उद्योग लि. या कंपनीच्या पहिल्या मोटारीच्या उत्पादनास पंचविस वर्षे झाल्याच्या घटनेची विशेष कुणी दखल घेतली नाही. खरे तर मारुतीच्या स्थापनेच्या वेळी खूप मोठा गदारोळ व राजकारण झाले होते. मारुतीचा इतिहासच मोठा रंजक आहे. मात्र या ऐतिहासिक मारुतीच्या पंचविशीकडे विशेष कुणी लक्ष दिले नाही. कदाचित मारुतीची मालकी आता सरकारी नसून सुझुकी या जपानी कंपनीकडे असल्याने या घटनेची दखलही घेतली नसावी. सर्वसामान्यांना परवडेल असे चार चाकी वाहन असावे अशी इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांची इच्छा होती. त्यातून त्यांनी ही कंपनी स्थापन केली. आता हीच संकल्पना टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मांडल्यावर तिचे भरभरून कौतुक झाले. मात्र त्यावेळी संजन गांधी यांनी ही संकल्पना मांडताच त्यांना राजकारण्यांच्या रोषाचे बळी व्हावे लागले.

ठंडी के साइड इफेक्टस् !
यंदा अंमळ उशीराने अवतरलेल्या थंडीचा बघताबघता असा काही कडाका सुरू झाला की त्यामुळे जुनेजाणते नाशिककर ‘नॉस्तेल्जिया’त रममाण झाल्याचे आणि नवतरुणांनी तर या थंडीलाही ‘ट्रेंडी’ बनवून टाकल्याचे चित्र दिसत आहे. सध्याच्या गारठलेल्या वातावरणात सर्वतोमुखी थंडीचाच विषय असून सलग दुसऱ्या वर्षी पाच ते सहा अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानामुळे बदलत्या काळातील जीवनमानावर होणारे ‘साईड इफेक्टस्’ ठळकपणे अधोरेखीत होत आहेत. गप्पांसाठी हवापाण्याचा विषय तसा हक्काचा. पण, वातावरणात अपेक्षेनुसार बदल झाला नाही किंवा अपेक्षेहून अधिक बदल झाला, की मात्र हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. नेमकी हीच स्थिती सध्या नाशिक व परिसरात दिसून येते. आठवडाभरापूर्वीपर्यंत येथे थंडीचा मागमूसही नसल्याने ‘थंडी म्हणजे काय रे भाऊ’ असे विचारण्याची वेळ येऊन ठेपली होती.

तन रामरंगी रंगले..
ही गोष्ट आहे १८९० मधली. भारतात ब्रिटिश राजवट होती. १८५७ चे पहिले स्वातंत्र्यसमर मोडून काढण्यात ब्रिटिशांना यश आले होते. पण त्याला वीस वर्षेही होत नाहीत तोच म्हणजे १८७५ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी पेटविलेली क्रांतीची मशाल १८८३ मधील त्यांच्या मृत्यूनंतरही धगधगत होती. १८९० या वर्षीच महात्मा फुले यांचे निधन झाले होते. देशात स्वातंत्र्य चळवळ सुरू असतानाच तिला समांतर अशी जी एक व्यापक चळवळ सुप्तपणे उमलत होती, तिचे ते उद्गाते होते. ही चळवळ होती जातीपातीमुक्त समाजासाठी. अशा समाजाचे स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य, ही त्यामागची भावना होती. आमच्या संतांच्या अभंगांतूनही जातीपातींच्या वेडाचारावर टीका होतीच पण तिला सामाजिक वा राजकीय चळवळीचे स्वरूप नव्हते. पुण्यात १८४८ साली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर जातीभेदाविरोधात आणि सामाजिक अन्यायाविरोधात त्यांचे कार्य अधिकाधिक व्यापक होत गेले. पण देशात इतक्या घडामोडी घडत असताना आणि सामाजिक चळवळी व्यापक होत असताना मध्यप्रदेशात (म्हणजे सध्याच्या छत्तीसगढमध्ये) जातीपातीविरोधात त्या तुलनेत एक लहानगी ठिणगी निर्माण झाली. १८९० मध्ये परशुराम या दलिताला मंदिरप्रवेश नाकारला गेला. त्याने दुखावलेल्या परशुरामने मग नवीन पंथच काढला. त्याचे नाव ‘रामनामी समाज’. कोणत्याही मंदिरात जायचे नाही, कर्मकांडांत ब्राह्मणांचे वर्चस्व स्वीकारायचे नाही, घरात मूर्तीपूजा करायची नाही मात्र अंगभर रामनाम गोंदवून घ्यायचे, घरात भिंतीवरही नाम लिहायचे आणि ‘रामचरितमानस’ हा जणू धर्मग्रंथ मानायचा, ही प्रथा या समाजात सुरू झाली. जातीभेदाची झळ बसल्यावर तो धर्मच नाकारण्याऐवजी त्या धर्माचे आग्रही पालन करणारा हा पंथ भारतातील जात-पंथांच्या इतिहासातला अपवादच ठरावा. सध्या मात्र हा समाज दुर्मिळ होत चालला आहे. एकूणच भारतीय जनमानसावर पाश्चात्य प्रभाव वाढत असल्याने अंगभर रामनाम गोंदविण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. प्रथा म्हणून हातावर रामनाम गोंदवून घेणारे मात्र आहेत. अमेरिकेतील हवाई विद्यापीठातील रामदास लाम्ब यांनी या समाजावर ‘रॅप्ट इन द नेम- रामनामीज, रामनाम अँड अनटचेबल रिलीजन इन सेंट्रल इंडिया’ हा ग्रंथच लिहिला आहे. या समाजाची ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रामनाम डॉट नेट’ नावाची स्वतची वेबसाइटही आहे.
उमेश करंदीकर