Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

एम.पी.एस.सी.च्या घोळामुळे फौजदार बनण्याचे स्वप्न भंगते तेव्हा..
पुणे, १ जानेवारी/खास प्रतिनिधी

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे (एमपीएससी) सर्व अडथळे पार करून ‘त्या’ उमेदवारांची फौजदारपदासाठी निवड झाली.. प्रशिक्षणासाठी नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमीमध्ये बोलाविण्यात आले.. यशस्वी करिअरची स्वप्नं पाहातच त्यांनी नव्या वर्षांत पदार्पण केले.. पण लोकसेवा आयोगाचा भोंगळ कारभार आडवा आला अन् नववर्षांच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.. राखीव जागांच्या घोळामुळे या सर्व पन्नास उमेदवारांना तडकाफडकी घरी जाण्यास सांगण्यात आले!

अपघात रोखण्यासाठी जिल्ह्य़ााचा कृती आराखडा
पुणे, १ जानेवारी / प्रतिनिधी

जिल्ह्य़ामध्ये १८३ ठिकाणी वारंवार अपघात होतात असे आढळून आले असून या ठिकाणची वळणे, रस्ते, पुलांचे रुंदीकरण इत्यादी सुधारणांचा कृती आराखडा येत्या महिनाभरात तयार करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आज येथे बोलताना सांगितले. येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित २० व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. परिवहन राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

माहिती आयुक्तांमुळेच माहिती अधिकार कायद्याचा हेतू असफल - केजरीवाल
सुनील कडूसकर
पुणे, १ जानेवारी

देशातील बहुसंख्य माहिती आयुक्त माहिती अधिकार कायद्याची योग्यरीत्या अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करीत असल्याने या कायद्याचा हेतूच असफल झाला आहे. परिणामी या कायद्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा आयुक्तांविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे, असे परखड मत माहिती अधिकाराच्या क्षेत्रातील कार्याबद्दल मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आलेले कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी आज येथे व्यक्त केले.

शासकीय कार्यालये, सोसायटय़ांचा थकबाकीसाठी पाणीपुरवठा तोडला
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून २१ कोटी ५० लाखांची विक्रमी वसुली

पिंपपरी, १ जानेवारी/प्रतिनिधी

पाणीपट्टीची बिले आणि नोटिसा देऊनही त्याचा भरणा न केल्याने अखेर िपपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. अ प्रभाग कार्यक्षेत्रातील १७ लाखांची थकबाकी वसूल करण्यासाठी शासकीय कार्यालये, सोसायटय़ा, महाविद्यालये, हॉटेल्स, बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांचा पाणीपुरवठा पालिकेने आज तोडला. दरम्यान, पालिकेने डिसेंबरअखेर नऊ महिन्यांत २१ कोटी ५४ लाखांची विक्रमी वसुली केली आहे. अ प्रभाग कार्यालयाचे मुख्य अधिकारी पांडुरंग झुरे यांच्या आदेशानुसार थकबाकीमुळे आज अनेकांचा पाणीपुरवठा तोडण्यात आला.

पोलिसांची कडक भूमिका व नागरिकांच्या संयमाने ३१ डिसेंबरला गुन्ह्य़ात घट
पुणे, १ जानेवारी/ प्रतिनिधी

दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी घेतलेली कडक भूमिका व नागरिकांनी राखलेल्या संयमामुळे ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री शहरात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालविण्याचे गुन्हे मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले. त्याचप्रमाणे केवळ दोनच अगदी किरकोळ स्वरुपाचे अपघात झाले. यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट’च्या उत्साहावर मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आठवडय़ापूर्वीच नियोजन जाहीर केले होते.

चंद्रावरील विवरे व उपग्रहांचे दर्शन
पुणे, १ जानेवारी/प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षांच्या आरंभी अनेक पुणेकरांनी चंद्रावरील विवरे आणि अंतराळातील एम.आय.एल. स्टार व यू.ए.आर.एस. हे दोन उपग्रह आज दुर्बिणीच्या माध्यमातून पाहिले
गॅलिलीओ गॅलिली या शास्त्रज्ञाने, आकाशात दुर्बणि रोखून शनीची कडी, गुरुचे चंद्र व चंद्रावरील विवरे प्रथम पाहिली व सर्वसामान्यांच्या नजरेस आणून दिली. या घटनेला २००९ मध्ये सुमारे ४०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने पुणेकरांसाठी आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ वर्तकबाग येथे शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ कृष्ण यांनी दुर्बिणीतून चंद्रावरील विवरे पाहिली. ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने एस. एम. जोशी पूल व गाडगीळ पूल (झेड ब्रीज) तसेच वर्तक बाग येथे दुर्बिणी ठेवण्यात आल्या होत्या. खगोल शास्त्र व अंतराळ प्रेमींनी, ज्येष्ठ नागरिकांनी, युवकांनी व बालकांनी चंद्रावरील विवरे पाहिली. गॅलिलीओ यांनी अंतराळ निरीक्षणासाठी ज्या प्रकारची दुर्बिण वापरली होती त्या प्रकारची एक दुर्बिण व सध्या प्रचलित असलेली अंतर्वक्र आरशाची दुर्बिण अवकाश निरीक्षणासाठी ठेवल्या होत्या. वर्तक बागेतील कार्यक्रमात भारताच्या चांद्रयान मोहिमेत सहभागी असणारे शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ कृष्ण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. प्रकाश तुपे यांनंी केलेज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अध्यक्ष शेखर पाठक यांनी संस्थेची माहिती दिली. सुहास गुर्जर यांनी उपस्थितांचे आभार मानले व वर्षभरात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली.

आयुर्वेद महाविद्यालयांतील प्रवेशप्रकियेस मुदतवाढ नाही
पुणे, १ जानेवारी/प्रतिनिधी

राज्यातील ५८ आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रियेस वाढीव तारीख मिळाली नसल्याने जवळपास दीड हजारांच्या आसपास जागा रिक्त आहेत. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकत्रितरीत्या निवेदन पाठविण्यात येणार असून, त्यासाठी पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदन पाठविण्यासाठी पालकांनी एकत्रित येण्यासाठी एस. के. पाटील यांना ९३२६०८८४९२, तर बाळासाहेब पवार यांना ९९२१६७६६९६ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन क रण्यात आले आहे.