Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

राज्य

जन्मदात्रीच्या संमतीनेच बालकाची विक्री झाल्याचा न्यायालयात गौप्यस्फोट
ठाणे, १ जानेवारी/प्रतिनिधी

जन्मदात्या मातेच्या संमतीने सव्वा महिन्याच्या बालकाला वसईतील ख्रिश्चन दाम्पत्याला एक लाख १७ हजारात विकल्याचा गौप्यस्फोट डॉ. भन्साली पिता-पुत्रांच्या वकिलाने न्यायालयात केल्याने एकच खळबळ उडाली. स्नेहा गावकर हिच्या नावे बँकेत जमा केलेल्या ९० हजारांच्या ठेवींचे लेखी पुरावे सादर करण्यात आल्याने आरोपींना पोलीस कोठडी नाकारण्यात आली.

लाचखोर प्राप्तिकर अधिकारी आळतेकर यांना पोलीस कोठडी
कोल्हापूर, १ डिसेंबर / प्रतिनिधी

करदात्याला प्राप्तिकराच्या परताव्याची रक्कम परस्पर त्याच्या घरच्या पत्त्यावर धनादेशाद्वारे पाठवून द्यावयाची असताना प्राप्तिकर अधिकारी नीलिमा जवाहर आळतेकर यांनी शशिकांत नार्वेकर यांना नोटीस काढण्याचे कारणच काय ? असा सवाल उपस्थित करीत मुख्य सरकारी वकील सुरेश कांबळे यांनी लाचखोर श्रीमती आळतेकर यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. विशेष न्यायाधीश एस.एम.गव्हाणे यांनी ही मागणी मान्य करीत तीन जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली.

औद्योगिक विकास महामंडळाला एक कोटी १९ लाख रुपयांचा फटका
माजी मुख्यमंत्र्यांच्या शैक्षणिक संस्थेला भूखंड वाटप

चंद्रशेखर बोबडे
नागपूर, १ जानेवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थेला कमी दरात दिलेल्या भूखंडामुळे महामंडळाला १कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले, असा ठपका ‘कॅग’च्या (नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या) अहवालात ठेवण्यात आला आहे. मार्च २००७ ला संपलेल्या आर्थिक वर्षांचा महालेखापरीक्षकांचा अहवाल नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. हा अहवाल माजी मुख्यमंत्र्यांच्या संस्थेविषयी असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

शहर चकाचक, पण ग्रामीण भागाचे काय?
केंद्र व राज्याच्या राजकारणात सातत्याने संधी मिळूनही जिल्ह्य़ाच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी सर्वच पक्षाच्या पुढाऱ्यांनी ‘सोयीचे’ राजकारण केल्यामुळे सर्वसामान्यांची ‘गैरसोय’ कायम आहे. गुरु-ता-गद्दी सोहळ्यानिमित्त आलेल्या निधीमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असला तरी ग्रामीण भागातील मूलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी ‘राजकारण’ बाजूला ठेऊन सर्वच पक्षाच्या पुढाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांच्या सीमांवरील नांदेडची राजकारणातील ओळख शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच. जिल्ह्य़ाच्या काही भागात मुबलक पाणी असतानाही कृषिपूरक व्यवसायाला बहार आलीच नाही.

अस्तित्वात नसलेल्या नदीवर धरण
आकपुरी नदीच नसल्याची कासावारांची कबुली

यवतमाळ, १ जानेवारी / वार्ताहर

यवतमाळ जिल्ह्य़ात आकपुरी नावाची नदीच अस्तित्वात नसल्याची कबुली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार यांनी दिली आहे. ‘अस्तित्वात नसलेल्या नदीवर ३५ कोटी रुपयाचे धरण’ या मथळ्याचे वृत्त ‘लोकसत्ता’त झळकल्यावर विदर्भभर चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावून माहिती घेतली, तेव्हा नदी अस्तित्वात असल्याचा दावा मंत्र्यांसमोर करण्यात आला होता.

‘अपात्र’ कंपन्यांना औषध खरेदीचे कंत्राट?
मुस्तफा आतार
पुणे, १ जानेवारी

वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांसाठी ‘दरनिश्चिती’वरील (रेट क ॉन्ट्रॅक्ट- आरसी) कंपन्यांकडून औषधे खरेदी केली जात असून, या आरसीच्या यादीत ‘अपात्र’ औषध कंपन्यांचाही समावेश करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण खात्यामार्फत औषधांचा पुरवठा केला जातो. या रुग्णालयांना औषध पुरवठय़ासाठी कंत्राटदार अथवा औषध पुरवठादार निश्चित करण्यात येतो. पुरवठादारास ‘आरसी’च्या यादीत समाविष्ट केले जाते. या प्रक्रियेसाठी वैद्यकीय शिक्षण खात्यात ‘आरसी सेल’ हा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

लघुउद्योजकांना संरक्षणासाठी स्वतंत्र सचिवालय -मुख्यमंत्री
दापोली, १ जानेवारी /प्रतिनिधी

राज्यातील लघुउद्योजकांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सरकारने आता स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे शेतीपूरक प्रक्रिया उद्योगांना अधिक बळकटी येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केले.
कोकण कृषी विद्यापीठातर्फे आयोजित राज्यस्तरीय पालवी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री सुनील तटकरे, दुग्धविकासमंत्री रवीशेठ पाटील, कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजय कोलते, हुसेन दलवाई आदी नेतेमंडळी उपस्थित होती.

विहिरीत पडलेल्या रानगव्याला जीवदान
चंद्रपूर, १ जानेवारी/ प्रतिनिधी

नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला तीस फूट खोल विहिरीत पडलेल्या एका रानगव्याला क्रेनच्या मदतीने बाहेर काढून त्याचे प्राण वाचवण्यात वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले. रानगव्याला वाचवण्याची ही मोहीम ४० तास चालली.ब्रह्मपुरी वन परिसरातील अडय़ाळ टेकडीजवळील घनदाट जंगलात फिरणारा एक रानगवा परिसरातील एका विहिरीत बुधवारी पहाटे पडला. सकाळी लोक शेतात जात असताना त्यांना विहिरीत गवा पडल्याचे दिसले. गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती वन विभागाच्या ब्रह्मपुरी कार्यालयाला दिली. यानंतर उपवनसंरक्षक संजय ठवरे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तीस फूट खोल व भरपूर पाणी असलेल्या विहिरीत पडलेला गवा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. ठवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गव्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. गव्याच्या नाकातोंडात पाणी जात आहे हे बघून वरून दोराचा फास खाली सोडून त्याच्या गळय़ात अडकवण्यात आल्याने गव्याचे तोंड पाण्याबाहेर राहू शकले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी डिझेल इंजीन आणून विहिरीतील पाणी उपसणे सुरू केले. पाणी बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर क्रेन बोलावण्यात आली. क्रेनच्या टोकाला जाड दोराचा फास तयार करून तो आत सोडण्यात आला. गव्याभोवती फास आवळल्यानंतर त्याला अतिशय कौशल्याने बाहेर काढण्यात आले. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी वन अधिकाऱ्यांना तब्बल चाळीस तास लागले.उपवनसंरक्षक संजय ठवरे त्यांचे सहकारी सहाय्यक वनसंरक्षक शिंगाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. वाळके व सोरते आणि सुमारे पन्नास कर्मचारी तहान भूक विसरून या बचाव मोहिमेत सामील झाले होते. आज सकाळी या रानगव्याला बाहेर काढल्यानंतर जंगलात सोडण्यात आले. या आधी विहिरीत पडलेल्या व वजनाने हलके असलेल्या अनेक प्राण्यांना वन खात्याने जीवनदान दिले आहे.