Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

क्रीडा

या पराभवाचे दु:ख बाळगू नका!
शेन वॉर्न यांची फुंकर

मेलबर्न, १ जानेवारी/ वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांसारख्या संघांकडून पराभूत झाल्याचे दु:ख ऑस्ट्रेलियाने बाळगू नये, असे मत ऑस्ट्रेलियाचा निवृत्त फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे.
हेराल्ड सन या वृत्तपत्रातील स्तंभात वॉर्नने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांची गेल्या वर्षभरातील कसोटी सामन्यातील कामगिरी उत्तम होती. त्यामुळे अशा संघांकडून पराभूत झाल्याचे दु:ख ऑस्ट्रेलियाने बाळगू नये. २००५ मध्ये अ‍ॅशेस मालिकेतील पराभवासारखेच हे पराभव होते. २००५ मध्ये आम्हाला पराभूत करताना इंग्लंड संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले होते.

भारतास जगज्जेता म्हणणे चुकीचे ठरेल -गांगुली
नवी दिल्ली, १ जानेवारी/पीटीआय

भारतीय क्रिकेट संघास जगज्जेता संघ म्हणणे घाईचा निर्णय होईल. या संघात सुधारणांना आणखी वाव आहे, असे मत आहे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे!
कसोटीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यात चुरस आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची संभाव्य जगज्जेता संघ म्हणून गणना केली जात आहे. या संघास जगज्जेता म्हणणे सध्या तरी खूप घाईचा निर्णय होईल, असे सांगून गांगुली म्हणाला की, वेगवेगळ्या वातावरणात व वेगवेगळ्या खेळपट्टय़ांवर जेव्हा परदेशात खेळतील तेव्हाच त्यांच्या कौशल्याची खरी कसोटी ठरेल. ऑस्ट्रेलियाची गेल्या तीन-चार महिन्यांतील कामगिरी खराब असली तरी आयसीसी क्रमवारीत अजूनही ते आघाडीवर आहेत.

ली पुन्हा नव्या जोमाने परतेल -मॅकग्रा
मेलबर्न, १ जानेवारी/पीटीआय

गतवर्षी वैयक्तिक आयुष्यातील दु:खामुळे खचलेल्या वेगवान गोलंदाज बेट्र लीच्या पायाच्या घोटय़ावर या आठवडय़ात शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु या साऱ्यातून तो लवकरच सावरेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा आपल्या आगमनाची ग्वाही देईल, असा विश्वास माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये फक्त एक बळी वाटय़ाला आलेल्या लीच्या मागे आता डाव्या घोटय़ाच्या दुखापतीचा ससेमिरा लागला आहे. येत्या आठवडय़ात या दुखऱ्या घोटय़ावर शस्त्रक्रिया होणार आहे.

स्मिथ एकदिवसीय मालिकेला मुकणार
जोहान बोथा नवा कर्णधार नील मॅकेन्झी संघात कायम

सिडनी, १ जानेवारी / पीटीआय

दक्षिण आफ्रिकेला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन ट्वेन्टी२० सामन्यांची तसेच पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची मालिका दुखापतग्रस्त कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या गैरहजेरीत खेळावी लागणार असून त्याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व जोहान बोथावर सोपवण्यात आले आहे, असे संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आज सांगितले. स्मिथच्या जागेसाठी नील मॅकेन्झीला संघात कायम राखण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध यानंतर मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी स्मिथ पूर्ण तंदुरुस्त राहावा यासाठी आम्ही सिडनीच्या शेवटच्या कसोटीनंतर त्याला मायदेशी पाठवण्याचे ठरवले असल्याचेही आर्थर म्हणाले.

गंभीर ‘टॉप टेन’मध्ये कायम
आयसीसी कसोटी क्रमवारी

दुबई, १ जानेवारी / पीटीआय

भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दहावे स्थान कायम राखले असून ऑफ स्पिनर हरभजन सिंगच्या मानांकनात एक स्थानाने प्रगती झाली आहे. रिलायन्स मोबाईल आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत हरभजन सिंग सातव्या स्थानावर आहे.

वॉनच्या समावेशासाठी पिटरसनने दिली राजीनाम्याची धमकी
लंडन, १ जानेवारी/पीटीआय

येत्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंड संघात माजी कप्तान मायकल वॉन याचा समावेश न करण्यात आल्याबद्दल कप्तान केविन पिटरसन याने कप्तानपद सोडण्याची धमकी दिली होती. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे इंग्लिश क्रिकेट प्रशासन यंत्रणेला जबरदस्त हादरा बसला आहे. पिटरसन आणि प्रशिक्षक पीटर मूर यांच्यातील संबंध सलोख्याचे नसल्याचे संकेत सातत्याने मिळत होते. मायकल वॉन यांना देण्यात येत असलेल्या वागणुकीमुळे पिटरसन नाराज झाला आहे. चार कसोटींच्या मालिकेसाठी पीटरसनला वॉनची संघात गरज होती. इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष गाईल्स क्लार्क यांच्याशी पिटरसनने या संदर्भात बोलण्यासाठी तातडीची भेट मागितली असल्याचे वृत्त आहे. ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण पिटरसनने राजीनाम्याची धमकी देण्यापर्यंत चिघळले आहे. एक तर प्रशिक्षक मूर राहतील किंवा मी कप्तानपदी राहीन, अशी भूमिका पिटरसनने घेतली असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. यामुळे इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष क्लार्क यांच्यापुढे गहन समस्या उद्भवली आहे. कप्तानाच्या पाठीशी उभे राहायचे का प्रशिक्षकाच्या या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. आगामी वर्षी अ‍ॅशेस जिंकण्यासाठी पिटरसनला माजी कप्तान वॉनची साथ हवी आहे. इंग्लंडच्या अ‍ॅशेस जिंकण्याच्या मोहिमेत वॉनचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे पिटरसनला वाटते. इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी संचालक मॉरिस यांचा मात्र प्रशिक्षक मूर यांना पाठिंबा आहे. आज एका बैठकीत त्यांनी वॉर्नविरुद्ध मतप्रदर्शनही केले. वॉन आणि मूर यांचे संबंधदेखील सलोख्याचे नव्हते असे म्हटले जाते.

नववर्षांत जगज्जेते होण्याचा श्रीकांत यांचा संकल्प
नवीदिल्ली, १ जानेवारी/ वृत्तसंस्था

नववर्षांत नव्या यशासाठी नवा ध्यास करण्याचा संकल्प प्रत्येकजण करीत असतो आणि याला भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांतही अपवाद नाहीत. त्यांनी या वर्षांचाच संकल्प केलेला नाही तर २०१० वर्षांसाठीही संकल्प केलेला आहे. या वर्षांत एकदिवसीय क्रमवारीमध्ये भारताला जगज्जेते बनविण्याचा तर २०१० मध्ये कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकाविण्याचा श्रीकांत यांचा संकल्प आहे. मला असे वाटते की, भारतीय संघ हा अव्वल क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि त्यांना त्यांच्यात मातीत पराभूत करून अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी धडपडत असलेल्या दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांपेक्षा समतोल वाटतोय. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर भारतीय संघ चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे भारताने विजयाचा धुमधडाका असाच चालू ठेवल्यास २००९ मध्ये भारत एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला मागे सारून जगज्जेता बनू शकतो. तसेच २०१० वर्षांमध्ये भारत कसोटी सामन्यांच्या क्रमवारीमध्येही अव्वल स्थानावर पोहोचू शकतो. हे दोन्हीही मैलाचे दगड गाठण्याचे स्वप्न निवड समिती उराशी बाळगून आहे, असे श्रीकांत यांनी सांगितले. मार्च-एप्रिल दरम्यान होणााऱ्या न्यूझीलंड दौऱ्याबद्दलही श्रीकांत सकारात्मक आहेत. ते यासंदर्भात म्हणाले की, भारतीय संघ सातत्याने उत्तम कामगिरी करतो आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना यापूर्वी त्यांच्याच मातीत धूळ चारली असल्याने न्यूझीलंडचा दौरा भारतासाठी कठीण नसेल.

‘हेराल्ड सन’च्या जागतिक संघात सचिन, धोनी, गंभीर आणि इशान्त
मेलबर्न, १ जानेवारी/ पीटीआय

२००८ च्या कामगिरीच्या जोरावर ‘हेराल्ड सन’ या ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्राने जागतिक कसोटी संघ निवडला असून यामध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, यशस्वी कर्णधार मह्ेंद्रसिंग धोनी, भारतासाठी ‘रन मशिन’ ठरलेला सलामीवीर गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाज इशान्त शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. या संघात सर्वाधिक खेळाडू भारतीय संघातून निवडले गेले आहेत. ‘हेराल्ड सन’ ने कर्णधार मह्ेंद्र सिंग धोनीची तुलना ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टबरोबर केली असल्याने त्याला या संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले नसून त्याला उपकर्णधारपद देण्यात आलेले आहे. तर या संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रलियाला त्यांच्याच मातीत धूळ चारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ याला मिळाला आहे. त्याचबरोबर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची या वर्षांतील कामगिरी पाहता त्याला या यंघातून वगळणे अशक्यप्राय असल्याचे ‘हेराल्ड सन’ तर्फे सांगण्यात आले आहे. सलामीवीर गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाज इशान्त शर्मा यांचा पहिल्यांदाच या संघात समावेश करण्यात आला आहे. ‘हेराल्ड सन’ च्या जागतिक संघात कर्णधार रिकी पाॅिन्टंग आणि मिशेल जॉन्सन या दोनच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
‘हेराल्ड सन’ चा विश्व संघ पुढीलप्रमाणे :
ग्रॅमी स्मिथ (द.आफ्रिका), गौतम गंभीर (भारत), रिकी पाॅिन्टंग (ऑस्ट्रेलिया), सचिन तेंडुलकर (भारत), शिवनारायण चंदरपॉल (वेस्ट इंडिज), ए.बी. डी’व्हिलियर्स (द.आफ्रिका), महेंद्र सिंग धोनी (भारत, यष्टीरक्षक), इशान्त शर्मा (भारत), मिचेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया), डेल स्टेन (द.आफ्रिका), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), बारावा खेळाडू -: केव्हिन पीटरसन (इंग्लंड).

पाँटिंगला साक्षात्कार
मेलबर्न, १ जानेवारी/पीटीआय

गेल्या १३२ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच ‘व्हाइटवॉश’च्या सावटाखाली वावरणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगला आता साक्षात्कार झाला आहे. अन्य संघांच्या नव्या कल्पना स्वीकारण्याची ऑस्ट्रेलियाला गरज असल्याचे पाँटिंगला वाटते आहे. अन्य संघ आमच्या कामगिरीचे गेली १० ते १२ वष्रे अनुकूल करीत आहेत. आता अन्य संघांचे डावपेच आणि व्यूहरचनांचे अनुकरण करण्याची जबाबदारी आमची आहे, असे पाँटिंग म्हणाला.

सायमन्ड्स एकदिवसीय संघात परतण्याची ऑस्ट्रेलियाला आशा
मेलबर्न, १ जानेवारी / पीटीआय

अ‍ॅन्ड्रय़ू सायमन्ड्सच्या दुखापतग्रस्त गुडघ्यावर आज आर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असली तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी हा अष्टपैलू क्रिकेटपटू ऑस्ट्रेलिया संघासाठी उपलब्ध राहील, अशी आशा ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात झालेल्या पराभवादरम्यान ऑस्ट्रेलियाचा हा अष्टपैलू गुडघ्याच्या दुखापतीने बेजार होता आणि या दुखापतीमुळेच त्याने येत्या शनिवारपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यातून माघारही घेतली. व्ॉकावर झालेल्या पहिल्या कसोटीपासूनच सायमन्ड्सला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११ व १३ जानेवारीला होणाऱ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याला तो मुकणार असला तरी १६ जानेवारीला पहिल्या लढतीने सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपर्यंत तो तंदुरुस्त होईल, अशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आशा आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया संघ न्यूझीलंडविरुद्धही एकदिवसीय मालिका खेळणार आहे. अ‍ॅन्ड्रय़ू सायमन्ड्सच्या दुखापतीवर येत्या आठवडय़ात आमचे लक्ष राहणार असून तो एकदिवसीय संघाच्या निवडीसाठी उपलब्ध राहील, अशी आशाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली.

पंजाब गोल्ड कप स्पर्धेसाठी पाकऐवजी न्यूझीलंड?
नवी दिल्ली, १ जानेवारी/पीटीआय

चंदिगड आणि जालंधर येथे ३१ जानेवारीपासून होणाऱ्या चार राष्ट्रांच्या पंजाब गोल्ड कप हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तानऐवजी न्यूझीलंड संघाचा समावेश होण्याची शक्यता आहे. अर्थात न्यूझीलंड संघाने अद्याप आपला सहभाग निश्चित केलेला नसला तरी माजी ऑलिम्पियन आणि पंजाब क्रीडा खात्याचे संचालक परगट सिंग यांनी मात्र कुठल्याही परिस्थितीत न्यूझीलंड संघ या स्पर्धेत निश्चित खेळेल असे ठामपणे म्हटले आहे. हॉकी महासंघाच्या हंगामी समितीने न्यूझीलंडला अधिकृतपणे निमंत्रण पाठविले असून येत्या एक-दोन दिवसांतच त्यांच्याकडून याला मान्यता मिळेल, असे परगटसिंग यांनी म्हटले आहे.
पूर्वघोषित कार्यक्रमाप्रमाणे खरं तर जर्मनी, नेदरलॅण्ड आणि यजमान भारतासह पाकिस्तान संघ या स्पर्धेत खेळणार होता. मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाक यांच्यातील क्रीडा संबंधात तणाव निर्माण झाला व भारतीय क्रिकेट संघाने आपला पाकिस्तान दौराही रद्द केला. पाकिस्तान हॉकी फेडरेशन या स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठविण्यास उत्सुक आहे; पण याबाबतचा अंतिम निर्णय मात्र त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्याच हातात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंतिम निर्णय विदेश मंत्रालय घेणार
कराची : जानेवारीच्या अखेरीस भारतात होणाऱ्या चौरंगी हॉकी स्पध्रेत पाकिस्तानचा संघ न खेळण्याची शक्यता आहे. परंतु या दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय विदेश मंत्रालय घेईल, असे पाकिस्तान हॉकी महासंघाने आज स्पष्ट केले.पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष कासिम झिया यांनी आज इस्लामाबादमध्ये क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली.