Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

आता मागेल त्याला ब्रॉडबँड सेवा
सोपान बोंगाणे
ठाणे शहरान या इंटरनेटच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, या क्षेत्रात उतरलेल्या अन्य खासगी कंपन्यांच्या तुलनेत एमटीएनएलने उचललेला वाटा सर्वाधिक आहे. विश्वासार्हता, वाजवी दर आणि तत्पर सेवा या त्रिसूत्रीच्या बळावर एमटीएनएलची ब्रॉडबँड ही इंटरनेट सेवा तब्बल ४४ हजार ४०० ग्राहकांच्या घरात जाऊन पोहोचली असून, आता तर मागेल त्याला तात्काळ ब्रॉडबँडची जोडणी देण्याची जय्यत तयारी झाल्याने, येत्या एक वर्षांत त्यात आणखी किमान २५ हजार ग्राहकांची भर पडण्याची शक्यता आहे.

दंड वसुलीतून महावितरण बनले करोडपती
भांडूपला पाच, तर कल्याणला तीन कोटींची कमाई

संजय बापट

वीज गळती रोखण्यासाठी राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) वर्षभरात राबविलेल्या धडक मोहिमेला मुंबई- ठाणे जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, कल्याण परिमंडळाने साडेतीन, तर भांडूप परिमंडळाने पाच कोटी रुपये दंडापोटी वसूल करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही अलीकडच्या काळात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पुलोत्सव सोहळ्यासाठी डोंबिवलीकर सज्ज
डोंबिवली/प्रतिनिधी - पुलोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी आणि त्यानिमित्ताने शहरात येणाऱ्या दिग्गज मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी पुलोत्सव समितीसह डोंबिवलीकर रसिक सज्ज झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. ९ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे होणार आहे.

..अन् आश्रमशाळांतील मुले सुखावली
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्याच्या आश्रमशाळांतून पुरवठादार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालणाऱ्या अनागोंदी कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या श्रमजिवी संघटनेच्या जाहीर पंचनाम्यांचा आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे. सर्वच आश्रमशाळांतील सडके-कुजके धान्य अचानक गायब होऊन त्याजागी आता उत्कृष्ट प्रतीचे धान्य, खाद्यतेल, कडधान्ये, साबण आणि भाजीपाल्याचा पुरवठा सुरू झाल्याने आश्रमशाळांतील आदिवासी मुले चांगलीच सुखावली आहेत.

कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांचा निषेध
शिवरायांबद्दल वादग्रस्त उद्गार

दापोली/वार्ताहर

खेड येथे कुणबी सेनेने भव्य शक्तिप्रदर्शन करीत कोकणसह राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये कुणबी समाजाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे संकेत दिले. या पाश्र्वभूमीवर या मागास समाजाला स्वतंत्र चार टक्के आरक्षण मिळण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली.

भिवंडी-अंबाडी रस्त्याचे ठेकेदाराने वाजविले तीनतेरा
रतनकुमार तेजे

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ व मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ला जोडणारा भिवंडी-अंबाडी हा १८ कि.मी.चा रस्ता आयडियल रोड बिल्डर्स या कंपनीला १० वर्षांच्या कराराने ‘खासगीकरण अंतर्गत बांधा-वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर देण्यात आला होता. त्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी संपली. या घटनेला तीन महिने होत आले तरीही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रीतसर हस्तांतरित केला गेलेला नाही. या रस्त्याची दुरुस्ती करून तो चांगल्या स्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करायला हवा होता. मात्र या ठेकेदाराने रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न करता अतिशय खराब अवस्थेत सोडून देऊन आपली कायदेशीर जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडी मोठय़ा अडचणीत आला आहे.

एनसीसी सक्तीचे करण्याची सूचना
ठाणे/प्रतिनिधी

देशभरातील १० कोटी विद्यार्थ्यांपैकी केवळ आठ लाख विद्यार्थी एनसीसीमध्ये सहभागी असून, देशाच्या सर्वच भागात हिंसक कारवाया वाढत चालल्याने अंतर्गत सुरक्षेला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयात एनसीसीचे प्रशिक्षण ऐच्छिक न ठेवता सक्तीचे करावे, अशी सूचना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सीमेपलीकडून प्रत्यक्ष हल्ला झाल्यास त्यास चोख प्रत्युत्तर देण्यास सैन्यदल सक्षम आहे. मात्र माओवादी, नक्षलवादी, उल्फा बंडखोर, तसेच पाकप्रशिक्षित अतिरेक्यांनी देशाच्या विविध भागात घातलेल्या थैमानामुळे देश अस्थिर होण्याची भीती वाढली आहे.

सिद्धगडाच्या घळीतील इतिहासाचे रक्तरंजित पान!
सुभाष हरड

शहापूर : २ जानेवारी १९४३ ची अमंगल पहाट.. सारा सह्याद्रीचा परिसर साखरझोपेत असताना पहाटे ५.३० च्या सुमारास ऐतिहासिक सिद्धगडाची घळी हुतात्म्यांच्या रक्ताने न्हाऊन निघाली. ब्रिटिश कॅप्टन डी. एस. पी. हॉलने क्रांतिवीरांवर केलेल्या गोळीबारात १९४२ च्या ‘चले जाव’च्या लढय़ातील क्रांतिवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य लाभले. मुरबाड तालुक्याच्या इतिहासाचे रक्तरंजित पान ठरलेल्या आणि हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या सिद्धगडच्या धारातीर्थी भूमीत नतमस्तक होण्यासाठी गर्दी जमते. येथील बोरवाडी परिसरातील गर्द वनराई क्षणभर आपल्याला अस्तित्व विसरायला लावते, असे हे पावन धारातीर्थ. भारतीय स्वातंत्र्याच्या लढय़ात १९४२ च्या लढय़ाचे मोल सर्वांना ज्ञात आहेच. या लढय़ात खेडय़ा-पाडय़ातील जनता उत्स्फूर्तपणे उतरली होती.

शांततेसाठी ठाण्यात अतिरुद्र महाअनुष्ठान
ठाणे/प्रतिनिधी
राज्यात आणि देशांत शांतता आणि आर्थिक स्थिरता नांदावी यासाठी जगद्गुरू शंकराचार्य शृंगेरी पीठाच्या वतीने येथील घंटाळी देवी मैदानात अतिरुद्र महाअनुष्ठानचे आयोजन करण्यात आले आहे. आज सुमारे १२५ ब्राह्मणांच्या सहभागाने या अनुष्ठानाला प्रारंभ झाला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील शांतता धोक्यात आली आहे. त्यातच आर्थिक मंदीच्या लाटेमुळे अस्थिरता निर्माण झाली असून, समाजाला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र शांतता आणि स्थिरता यावी यासाठी हे अतिरुद्र महाअनुष्ठान आयोजित करण्यात आले असून ते ११ दिवस चालेल, असे आयोजक विवेकशास्त्री गोडबोले आणि नगरसेवक विलास सामंत यांनी सांगितले. समारोप १२ जानेवारी रोजी होणार आहे.

डोंबिवलीच्या विद्यार्थ्यांचे यश
डोंबिवली : पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत डोंबिवलीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ठाणे जिल्हा आर्चरी संघटना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या पुढाकाराने विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. आदर्श विद्यालयाची पल्लवी ससाणे, प्राजक्ता नाईक, रसिका त्र्यंबके, सिस्टर निवेदिता शाळेची सुबोधित घोष, कौस्तुभ चक्रवर्ती, पियुष वानखडे यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक उदय नाईक, गोपाळ सूर्यवंशी, राजेंद्र शेटय़े, चिंतामणी पाटील यांनी मार्गदर्शन केले.

वीणा शिंदेचे वक्तृत्व स्पर्धेत यश
शहापूर/वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘कर्मवीर विद्या प्रबोधिनी’च्या माध्यमातून आयोजित वक्तृत्व स्पर्धेत रायगड विभागातून डोळखांब (ता. शहापूर)च्या न्यू इंग्लिश स्कूलच्या वीणा शिंदे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. वाशी येथे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत वीणाने समाजसुधारक महर्षी शाहू महाराज या विषयावर विचार मांडले. तिचा या स्पर्धेत कोकण विभागातून द्वितीय क्रमांक आला.

यंत्राद्वारे वाळूचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई
वाडा/वार्ताहर

यंत्राद्वारे वाळूचे उत्खनन करण्यास बंदी असताना वाडा तालुक्यात राजरोसपणे यंत्राद्वारे वाळूचे उत्खनन सुरू होते. याबाबत तक्रार झाल्यानंतर वाडय़ाचे उपविभागीय अधिकारी डॉ. जयप्रकाश फड यांच्या नेतृत्वाखाली नदीपात्रात धाडी टाकून १५ फावडा मशीन जप्त केल्या. शासनाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात यंत्राद्वारे वाळूच्या उत्खननास बंदी घातली आहे, असे असताना देखील वाडा तालुक्यातील पिंजाळ, वैतरणा व तानसा या नद्यांमध्ये राजरोसपणे फावडा मशीनद्वारे वाळूचे उत्खनन केले जात होते. महसूल विभागाकडून सूचना देऊनही यंत्राद्वारे वाळू उत्खनन करण्याचे न थांबविल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी पिंपळास, गातेस, शिरसाड या गावांतील नदीपात्रात धाडी टाकून १५ फावडा मशीन जप्त केल्या. जप्त केलेल्या फावडा मशीनची जबाबदारी घेण्यास अजूनपर्यंत कोणीही पुढे आलेला नसल्याने, संबंधितांवर कारवाई करण्यास दिरंगाई होत आहे. जप्त केलेल्या एका फावडा मशीनची किंमत साधारणपणे १५ ते २० हजार रुपयांच्या आसपास असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.

ठाणेवैभव-रोटरी ठाणे मिडटाऊन बालनाटय़ स्पर्धेत ए.के. जोशी विजयी
ठाणे/प्रतिनिधी : ठाणेवैभव आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. नरेन्द्र बल्लाळ स्मृती आंतरशालेय बालनाटय़ स्पर्धेत ए. के. जोशी शाळेने सादर केलेली ‘बंध नको सुर धुंदीला’ या एकांकिकेने पहिले पारितोषिक पटकावले.गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या स्पर्धेत एकूण आठ शाळांनी भाग घेतला होता. वसंत विहार शाळेने सादर केलेली ‘एक छोटीसी बात’ ही एकांकिका उपविजयी ठरली. गडकरी रंगायतनमध्ये रोटरीते प्रांतपाल बन्सी धुरंधर आणि अभिनेत्री समिरा गुजर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. मुलांमधील सवरेत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक ‘एक छोटीसी बात’ आणि निकुंज हिवरकरने, तर उपविजेतेपद ए.के. जोशीच्या प्रियाज नाबरने पटकावले. ‘बंध नको’मधील भूमिकेसाठी मधुरा जोशीने मुलींमधील अभिनयाचे बक्षीस मिळविले. सावित्रीबाई थिराणी विद्यामंदिरच्या ‘जीवनसत्वाचे भांडण’ या एकांकिकेत काम करणाऱ्या ऋतुजा खरोटे हिला उपविजयी ठरविण्यात आले. दिग्दर्शनाचे पारितोषिक प्रियांका भांगले यांना ‘बंध नको सुर धुंदीला’ या एकांकिकेसाठी मिळाले. शिवाई विद्यालयाच्या ‘हादसा’चे दिग्दर्शन करणाऱ्या भिलारे, जाधव आणि घोरड उपविजयी घोषित झाल्या.

बदलापूरमध्ये रविवारपासून राष्ट्रीय कीर्तन महोत्सव
बदलापूर/वार्ताहर : अंबरनाथ तालुका आध्यात्मिक उत्सव समितीच्या वतीने यंदाही राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बदलापूरच्या गांधी चौकातील संत ज्ञानेश्वर माऊली खुल्या नाटय़गृहात ४ ते ११ जानेवारी या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक आमदार किसन कथोरे यांनी दिली. महोत्सवाचे यंदा ७वे वर्ष आहे. आध्यात्मिक उत्सवातून राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारी दिंडी काढण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व वारकरी आणि शैक्षणिक संस्थांच्या देखाव्यासह रविवार, ११ जानेवारी रोजी दिंडी काढण्यात येणार आहे. विविध भजनी मंडळाची भजने, तसेच प्रवचनांसह राज्याचे वनमंत्री बबनराव पाचपुते यांचे प्रवचन ७ जानेवारी रोजी होणार आहे. सप्ताहामध्ये रोज विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत. रविवार, ११ रोजी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे.