Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

व्यक्तिवेध

 

आपल्या शारीरिक व्याधीची जराही तमा न बाळगता केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून सतत धडपडणारे आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला शिक्षकांच्या मागण्या मान्य करायला लावणारे, तसेच सर्व शिक्षकांना आपल्या मागण्यांसाठी संघटित करण्याचा ध्यास शेवटपर्यंत बाळगणारे अब्बास इनामदार सरत्या वर्षांच्या सायंकाळी शांत झाले. आणीबाणीच्या काळात आणीबाणीचे खंदे समर्थन करणाऱ्या डांगेवादी विचारांच्या मोजक्याच मंडळींमध्ये ‘मास्तरां’चा समावेश होता. आपण शिक्षकी पेशाचे जे व्रत अंगीकारले आहे, ते निष्ठेने पार पाडले पाहिजे, हा त्यांचा बाणा होता आणि तसे करताना त्यांनी आपल्या विचारसरणीच्या बळावरे खऱ्या अर्थाने नवी पिढी घडविली. केवळ पुस्तकी गणिते शिकविण्यावर भर न देता मुलांना ‘माणूस’ म्हणून घडविण्याचे ध्येय त्यांनी बाळगले. याच ध्येयातून त्यांनी घडविलेली पिढी आज विविध क्षेत्रांत प्रगती करीत आहेत. मुंबईच्या विख्यात वेलिंगकर इन्स्टिटय़ूटचे प्रा. डॉ. उदय साळुंके असोत, की वैद्यकीय क्षेत्रांत केवळ आपल्या शहरात- राज्यात किंवा देशातच नव्हे तर परदेशातही मोठय़ा इस्पितळांमध्ये रुग्णांवर उपचार करणारे प्रसाद दळवी असोत.. त्यांच्यासारखे अनेक दिग्गज आज मास्तरांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झाले आहेत आणि होत आहेत. कोणताही विद्यार्थी हा निव्वळ ‘विद्यार्थी’ नसून आपला मुलगा आहे / मुलगी आहे, या भावनेने त्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींवर अपरंपार माया केली. त्यात कधी हात आखडता घेतला नाही. ‘‘मुले मस्ती करणार नाहीत तर काय पालक-शिक्षक मस्ती करणार का?’’ असा सवाल शाळेच्या प्रशासनाला करतानाच आपला धाक मात्र त्यांनी विद्यार्थ्यांवर कायम ठेवला. ‘अभ्यासाच्या वेळी अभ्यास’ असे सांगणारे इनामदार मास्तर जांब या सातारा जिल्ह्य़ातील छोटय़ाशा गावातून ७० च्या दशकात मुंबईच्या कुर्ला उपनगरातील नेहरूनगर वसाहतीत आले. गावी कम्युनिस्ट पक्षाचे काम करताना क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्यापासून अनेकांशी त्यांचे संबंध आले. त्याच आक्रमक साम्यवादी विचारांचा वसा घेऊन ते येथे आले. न्यू इंग्लिश स्कूल (आताचे शां. कृ. पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय) मध्ये चौथीच्या शिष्यवृत्ती वर्गावर ते गणित शिकवू लागले. परीक्षा जवळ आली आणि अर्धागवाताने ते गंभीर आजारी झाले. आपल्या आजारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अक्षरश: आजार गुंडाळून ठेवत रात्रीचा दिवस त्यांनी केलाच, पण आव्हान स्वीकारीत संपूर्ण वर्गाला शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा विक्रम त्यांनी केला. त्यांच्या या मेहनत घेण्याच्या वृत्तीमुळेच विद्यार्थ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता शेवटपर्यंत कायम राहिली. विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या ‘मुंबई खासगी प्राथमिक शाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटने’ने आगळा सत्कार करीत मानवंदना दिली. आपल्या घरात अंधार आहे, याचे जराही वैषम्य न बाळगता ते म्हणत असत ‘‘माझे विद्यार्थी हेच माझे दिवे आहेत.. आणि त्यांच्या प्रकाशात मी कायम न्हाऊन निघालो आहे,’’ असा विचार करणाऱ्या या विद्यार्थीप्रिय सरांना विद्यार्थ्यांची आदरांजली!