Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

विशेष लेख

युरोची दशकपूर्ती

 

युरोपातील देशांचे समान चलन ‘युरो’ सुरू होण्याच्या घटनेला एक जानेवारी २००९ रोजी १० वर्षे झाली. अशा प्रकारे एकापेक्षा जास्त देशांनी एकत्र येऊन आपले चलन समान ठेवण्याची घटना जगातील पहिलीच होती. १० वर्षांपूर्वी युरोचा जन्म झाला त्या वेळी युरोपातील ११ देशांनी आपले चलन रद्द करून युरोचा स्वीकार केला होता. टप्प्याटप्प्याने गेल्या दशकात या चलनाचा स्वीकार केलेल्या देशांची संख्या धीम्या गतीने का होईना वाढली. १६वा देश स्लोव्हाकिया याने कालपासून युरोचा स्वीकार केला आहे.
युरोच्या स्थापनेच्या वेळी असलेल्या ११ सदस्य देशांवरून ही संख्या १६वर गेली. असे असताना ब्रिटनने मात्र नेहमीच युरोच्या संदर्भात हातचे राखून व्यवहार केला. काही ना काही निमित्त करून ब्रिटनने युरोचा स्वीकार केला नाही. भविष्यातही ते या चलनाचा स्वीकार न करता पौंडाच्या रूपाने आपले स्वतंत्र अस्तित्व जपतील, याबाबत शंका नाही.
युरोचा जन्म झाला त्या वेळी अमेरिकन डॉलरला एक मोठे आव्हान उभे राहील, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु असे गेल्या १० वर्षांत झालेले नाही. नजिकच्या काळात तसे काही होण्याची चिन्हे नाहीत. अर्थात युरोचा भविष्यात आणखी किती देश स्वीकार करतील त्यावर डॉलरला आव्हान उभे राहू शकते. सध्याचा विचार करता युरोने पौगंडावस्था पार करून तारुण्यात प्रवेश केला आहे.
युरोच्या स्थापनेमागचा उद्देश पूर्णत: नाही तरी अंशत: यशस्वी ठरला आहे, असे युरोचा आतापर्यंतचा लेखाजोखा मांडताना म्हणता येईल. मुळातच युरोची स्थापना ही जागतिक पातळीवरील एक ऐतिहासिक घटना होती. युरोपातील देशांचे एक समान चलन असावे अशी संकल्पना सर्वात प्रथम १९५७ साली मांडण्यात आली. युरोपातील बरेचसे देश अतिशय लहान आहेत. लोकसंख्येचा विचार करता आपल्याकडील एखाद्या जिल्ह्य़ाच्या लोकसंख्येएवढा काही देशांचा जीव असेल. या पाश्र्वभूमीवर युरोपातील देशांचा विकास झपाटय़ाने होण्यासाठी तसेच या देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढीस लागण्यासाठी एक समान चलन असण्याची गरज भासू लागली होती. पुढे दहा वर्षांनी या संकल्पनेला आकार मिळण्यास प्रारंभ झाला. १९७० साली तेल संकट आले आणि डॉलर कमकुवत झाल्याने युरोपला त्याचे मोठे परिणाम भोगावे लागले. यातून बोध घेऊन जर्मनी, डेन्मार्क यांनी समान चलन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. १९७९ साली युरोपीयन मॉनिटरी सिस्टीम आखण्यात आली. युरोप ही एक सामायिक बाजारपेठ असावी या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या; परंतु यातून ठोस काहीच होत नव्हते. समान चलन असणे हा पुढचा भाग झाला.
समान चलनासाठी समिती स्थापन होई आणि त्यांचा अहवाल सादर झाल्यावर पुढे विशेष काहीच हालचाल होत नसे. परंतु १९९१ साली या संकल्पनेला मूर्त स्वरूप आले आणि समान चलन स्थापण्याबाबत दहा देशांनी सहकार्य करारावर सह्य़ा केल्या. अर्थात ब्रिटन व डेन्मार्क यांनी या करारापासून दूर राहाणेच पसंत केले. माद्रिद येथे १९९५ साली युरोपीय कौन्सिलच्या बैठकीत समान चलनाला ‘युरो’ असे नाव देण्याचे ठरले. ब्रिटनने यात सहभागी होण्यासाठी पाच अटी घातल्या. अर्थात ब्रिटनच्या अटी पाहता त्यांना वगळून युरो जन्माला घालण्याचा निर्धार युरोपीय देशांनी घेतला.
१९९८ साली बेल्जियम, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, इटली, आर्यलड, लेक्झमबर्ग, नेदरलँड, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल व फिनलंड या ११ देशांनी युरोत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक देशाच्या चलन विनिमयाचे दर ठरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आखण्यात आली. युरोचा ज्या ११ देशांनी स्वीकार केला त्या देशांचे आर्थिक पतधोरण समान ठेवण्यात आले आणि युरोचा जन्म झाला. पुढील वर्षी डेन्मार्कमध्ये युरोला सामील होण्यासाठी सार्वमत घेण्यात आले. याला ५३ टक्के नागरिकांनी विरोध केल्याने युरोच्या वृद्धीला पहिला झटका बसला. मात्र यानंतर २००१ मध्ये ग्रीसने युरो स्वीकारले.
युरोच्या जन्मामुळे युरोपला खरोखर फायदा झाला का? सध्याच्या मंदीवर युरोमुळे मात करता येईल का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आता आली आहे. युरोमुळे डॉलरला एक मोठे आव्हान निर्माण झालेले नाही, हे वास्तव आपण मान्य करू. मात्र समान चलनामुळे तोटय़ापेक्षा फायदाच जास्त झाला आहे, असे ठामपणे म्हणता येईल. १० वर्षांचा सरासरी अनुभव लक्षात घेता डॉलरच्या तुलनेत युरोचे मूल्य नेहमीच कमी राहिले. याचा फायदा पर्यटकांना तसेच निर्यातदारांना झाला. परंतु अमेरिकेतील सध्याच्या मंदीमुळे या निर्यातीचा विशेष फायदा युरोपीय देशांना मिळवता येणार नाही, हे वास्तवदेखील मान्य करावे लागेल.
युरोच्या जन्मापासून ते २००७ सालापर्यंत १.६ कोटी रोजगारनिर्मिती झाली. तर बेरोजगारी नऊ टक्क्यांवरून सात टक्क्यांवर घसरली. युरोझोनमधील देशांची अर्थसंकल्पीय तूट ०.६ टक्क्यांवर घसरली. याउलट ब्रिटनच्या सरकारला अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करात कपात करावी लागली. अर्थात रोजगारनिर्मिती व अर्थसंकल्पीय तूट कमी होणे याचा युरोमुळे फरक पडला नसला तरी अंशत: युरोचा यात वाटा आहे. त्याचबरोबर युरोपातील मोठय़ा देशांना युरोचा सर्वाधिक फायदा झाला आहे. त्या तुलनेत लहान देशांची याबाबत गळचेपी झाली आहे, असेच म्हणावे लागते.
युरो या चलनाचा वापर ३५ कोटींहून अधिक लोकसंख्या करत आहे. तरीही डॉलरचे महत्त्व युरोमुळे कमी झालेले नाही. मात्र युरोपातील छोटय़ा देशांची आर्थिक ताकद युरोमुळे निश्चितच वाढण्यास मदत झाली. ‘युरोप’ ही सामायिक बाजारपेठ अस्तित्वात आली आहे. युरोने जगात एक नवी आर्थिक ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच पहिल्या दशकातच युरो एक आघाडीचे चलन म्हणून आपले स्थान पटकावील, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
युरोच्या जन्मातून युरोपाने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे, हे नजरेआड करता येत नाही. अजूनही युरोपीय देशांत राजकीय-आर्थिक सहकार्य अपेक्षेएवढे वाढलेले नाही. ते जसे वाढेल तशी युरोची ताकद वाढत जाणार हे निश्चित. सध्या जग आर्थिक मंदीच्या लाटेवर येऊन थडकले आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी युरोची मोठी मदत होणार आहे. हेच जर या देशांनी स्वतंत्र चलन ठेवूनच वाटचाल केली असती तर मंदीची त्यांना कदाचित जास्त झळ सोसावी लागली असती. युरोपातील देश कितीही विकसित असले तरी आता तेथील अर्थव्यवस्था कुंठीत झाल्या आहेत. येथील देशांचा सरासरी विकास दर दोन टक्क्यांहून जास्त नाही. अशा स्थितीत युरोपला आपला विकासवेग वाढवायचा असेल तर युरोशिवाय अन्य पर्याय नाही.
युरोचा स्वीकार करण्याकडे जसा युरोपातील देशांचा कल वाढत जाईल तशी या चलनाचीही ताकद वाढत जाणार आहे. प्रामुख्याने ब्रिटनसारखा देश जर आपला अहंकार दूर सारून युरोत सहभागी झाला तर युरोची ताकद निश्चितच वाढेल. कदाचित सध्याची मंदी अधिक तीव्र झाल्यास ब्रिटनला युरोचा आधार वाटू लागेल आणि भविष्यात युरोत ब्रिटन सहभागी झाल्यास चित्र पालटू शकेल.
अर्थात या सर्व जर-तरच्या गप्पा झाल्या; परंतु भारतासारख्या आशियाई देशांनी युरोपासून प्रेरणा घेऊन आशिया खंडासाठी समान चलन सुरू करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सार्क देशांच्या परिषदेत याबाबत सूतोवाचही केले होते; परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही.
आता तर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याने आशिया खंडात समान चलन सुरू करण्याच्या विचारालाही ब्रेक लागला आहे. युरोपात मात्र मात्र युरोचा प्रयोग अंशत: का होईना यशस्वी झाला आहे.
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com