Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९

विविध

सशस्त्र दलांसाठी स्वतंत्र वेतन आयोग
सरकारचा निर्णय

नवी दिल्ली, १ जानेवारी/खास प्रतिनिधी

नववर्षांचा पहिला दिवस सेनादलांसाठी खूषखबर घेऊन आला आहे. सशस्त्र दलांसाठी स्वतंत्र वेतन आयोग स्थापन करण्याचा मनमोहन सिंग सरकारने निर्णय घेतला असून लष्करातील लेफ्टनंट कर्नल तसेच नौदल आणि वायुदलातील त्यांच्या समकक्ष १२ हजारांहून जास्त अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात पे बँड चारच्या दर्जाचे वेतन देण्याचीही घोषणा आज पंतप्रधानांच्या कार्यालयातर्फे करण्यात आली.

बँकॉकमधील भीषण आगीत ६० जणांचा मृत्यू, २०० जखमी
नवीन वर्षांचे स्वागत करतानाच दुर्घटना

कौलालंपूर, १ जानेवारी/पी.टी.आय.

थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका प्रसिद्ध नाइटक्लबला आज पहाटे लागलेल्या आगीत अनेक परदेशी नागरिकांसह एकूण ६० जण जळून मृत्युमुखी पडले तर किमान २०० जण जखमी झाले आहेत. या नाइट क्लबमधील मंडळी नवीन वर्ष साजरे करण्यात मग्न असतानाच ही भीषण दुर्घटना घडली.

विमान व रेल्वे सेवा खंडित; नववर्षांत दिल्लीवर दाट धुक्याचे आक्रमण
नवी दिल्ली, १ जानेवारी/खास प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीत आज नव्या वर्षांचे स्वागत गडद धुक्याने केले. बर्फाळ वाऱ्यामुळे गारठविणारीथंडी आणि सूर्यकिरणांचा लवलेश नसलेल्या वातावरणात आज दिल्लीत नववर्षांची पहाट उजाडली. गेल्या आठवडय़ापासून पार विस्कळीत झालेले हवाई व रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक आजच्या दाट धुक्याने आणखीच मोडीत काढले. परिणामी मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांकडे जाणाऱ्या विमान व रेल्वे सेवेला चांगलाच फटका बसला.

पाकिस्तानने अतिरेक्यांना भारताच्या हवाली करावे, मुखर्जी यांची मागणी
नवी दिल्ली, १ जानेवारी/खास प्रतिनिधी

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानने भारताच्या हवाली करावे, अशी मागणी करीत परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानवर पुन्हा दबाव आणला आहे. दहशतवाद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी भारताला पाकिस्तानशी प्रत्यर्पण करार करण्याचीही आवश्यकता नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

संसदेचे अधिवेशन फेब्रुवारीच्या अंतिम आठवडय़ात
नवी दिल्ली, १ जानेवारी/खास प्रतिनिधी

नव्या वर्षांतील संसदेचे पहिले अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी सरकारला नव्या आर्थिक वर्षांतील वित्तीय तरतुदी लेखानुदान प्रस्तावाद्वारे पारित करणे आवश्यक असून त्यासाठी हे अधिवेशन बोलविण्यात येईल. प्राप्त माहितीनुसार २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पाच दिवसांचे संसदेचे अधिवेशन बोलविण्यात येईल. चौदाव्या लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन ठरेल. त्यानंतर युपीए सरकार लोकसभा विसर्जित करून निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी करेल. पंधराव्या लोकसभा निवडणुकांची घोषणा त्यानंतर लगेच म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा एप्रिलच्या तिसऱ्या-चौथ्या आठवडय़ात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंधराव्या लोकसभेची स्थापना ३१ मे २००९ पर्यंत व्हावयाची आहे.

राजीव माथूर आयबीच्या संचालकपदी रूजू
नवी दिल्ली, १ जानेवारी / पी.टी.आय.

गुप्तचर विभागाचे नवे संचालक म्हणून राजीव माथूर यांनी आज सूत्रे हाती घेतली. राजीव माथून १९७२च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी गुप्तचर विभागात ३० वर्षांची सेवा केली आहे. ते १५ वर्षे वॉशिंग्टनमध्ये होते. गुप्तचर विभागाचे संचालक पी.सी. हलदर ३१ डिसेंबरला निवृत्त झाले असून त्यांच्या जागी माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नेमणूक समितीने माथूर यांच्या नियुक्तीला हिरवी झेंडी दाखवली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यात गुप्तचर यंत्रणेला अपयश आल्याची प्रचंड टीका होत आहे. या पाश्र्वभूमीवर माथूर यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याकडे संचालकपदाची जबाबदारी येणे महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. गुप्तचर यंत्रणेपुढे दहशतवादी कारवायांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. माथूर यांच्या निवृत्तीला दोन वर्षे बाकी आहेत.

‘एफबीआय’ पथक चौकशीसाठी अजमल कसाबच्या गावात
इस्लामाबाद, १ जानेवारी/पी.टी.आय.

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्या पंजाब प्रांतातील खेडय़ात ‘एफ.बी.आय.’च्या (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) पथकाने आज भेट देऊन चौकशी केली.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात फरीदकोट येथे कसाबचे घर आहे. तेथे जाऊन ‘एफबीआय’च्या पथकाने चौकशी केल्याची माहिती राजनैतिक सूत्रांनी दिली. अजमल कसाब हा पाकिस्तानी असल्याचा कोणताही पुरावा ‘एफबीआय’ला मिळाला नाही असे जे वृत्त पाकिस्तानी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दिले होते. त्यात काही अर्थ नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. ‘एफबीआय’कडून तेथे अद्याप चौकशी, तपास सुरूच असून काही निष्कर्ष काढायला अजून वेळ लागेल. घाईघाईने निष्कर्ष काढला जाणार नाही, असे या सूत्रांनी सांगितले; मात्र अधिक माहिती देण्यास नकार दिला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकही ठार झाले होते. पाकिस्तानात चौकशीसाठी आलेल्या ‘एफबीआय’ पथकाचे नेतृत्व ‘एफबीआय’च्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक विल्यम रॉबर्ट हे करीत असल्याचे वृत्त आहे. परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.