Leading International Marathi News Daily
शनिवार, ३ जानेवारी २००९
  अनवट नायिकांचा पट
  माका तुजे जडले पिशें...
  इव्हन डार्कनेस् हॅज इटस वंडर्स...
  मग कोणाकडून?
  गेट सेट गो..
  विज्ञानमयी
  ।। नवसावित्रींसमोरील नवी आव्हानं।।
  आज सावित्रीबाई असत्या तर..
  येरण्याच्या सावित्रीबाई
  मोठ्ठी त्याची सावली...
  आठवणींचें तोरण
  सुट्टी म्हणजे ताण!
  राम श्रीमान कसा?
  आकड्यांचे कडे
  ए मेरी जोहराजबी..
  विक्रमी नर्तना

 

आपल्याकडच्या व्यावसायिक हिंदी चित्रपटांमध्ये बहुश: दिखाऊ, कचकडी आणि दुय्यमच स्त्रीपात्रं असतात. पण मधुर भांडारकरांच्या चित्रपटांतील प्रमुख व्यक्तिरेखा स्त्रियांच्या आहेत. त्यांच्या चित्रपटांतील स्त्री-व्यक्तिरेखांचं जगणंही अस्सल वास्तववादी असतं..
कलावंत ज्या समाजरचनेचा भाग असतो, त्या समाजाचे प्रतिबिंब त्याच्या कलाकृतीत जाणते-अजाणतेपणी पडत असते. मात्र, आपल्या भवतालाचा जाणीवपूर्वक अभ्यासकरून सातत्याने तो आपल्या कलाकृतींतून मांडणारे कलावंत मोजकेच असतात. मधुर भांडारकर हे आजच्या पिढीतलं अशांपैकी एक प्रमुख नाव. मधुर भांडारकर मुंबई शहरात जन्मले, वाढले. आपली दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण करत असताना मुंबईतल्या वैविध्यपूर्ण समाजघटकांशी त्यांचा संबंध आला आणि त्यातूनच या घटकांना चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांपुढे मांडण्याची ऊर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली असणार. या ऊर्मीतूनच प्रथम ‘चांदनी बार’ची निर्मिती झाली. ‘चांदनी बार’ला मिळालेल्या प्रतिसादानं त्यांना प्रोत्साहन मिळालं. आणि मग ‘पेज थ्री’, ‘कॉर्पोरेट’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, नुकताच प्रदर्शित झालेला ‘फॅशन’ आणि आता येऊ घातलेला ‘जेल’ अशा एकापाठोपाठ एक चित्रपटांची मालिकाच त्यांनी निर्माण केली. या चित्रपटांतून त्यांनी समाजातील विविध स्तरांतील लोकांचं जगणं, त्यांच्या विश्वाचं अंतरंग, त्यातील आर्थिक- सामाजिक व्यवहार तसंच त्यांचे मनोव्यापार यांचं अद्भुत चित्रण केलेलं आढळतं. मधुर भांडारकर यांच्या या चित्रपटांचं विश्लेषण अनेकदा केलं गेलंय. ‘पेज थ्री’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘चांदनी बार’ला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळालेत. एखादा दिग्दर्शक जेव्हा व्यावसायिक चौकटीत राहूनदेखील आपल्या विषयसूत्राशी प्रामाणिक राहून सातत्याने चित्रपटनिर्मिती करतो, तेव्हा त्याची केवळ दखल घेऊन चालणार
 

नाही, तर त्याच्या शैलीचा, त्याने चित्रपटांतून मांडलेल्या आशयाचा अभ्यास करणे हेदेखील गरजेचे ठरते.
एक महत्त्वाची नोंद करावीशी वाटते, ती म्हणजे- व्यावसायिक हिंदी चित्रपटांमध्ये पुरुष अभिनेत्यांना अधिक मार्केट असतानाही भांडारकरांच्या चित्रपटांत, ज्यांच्या दृष्टिकोनातून आपण चित्रपट पाहतो त्या प्रमुख व्यक्तिरेखा या स्त्रियांच्याच आहेत. ‘चांदनी बार’मध्ये तब्बू, ‘पेज थ्री’मधील कोंकणा सेन- शर्मा, ‘कॉपोर्रेट’मधील बिपाशा बासू, ‘फॅशन’मध्ये प्रियांका चोप्रा, कंगना रानावत व मुग्धा गोडसे. बहुतेकदा हिंदी चित्रपटांमध्ये स्त्री-व्यक्तिरेखा या दुय्यम दर्जाच्या असतात. त्यांचे व्यवसाय, शिक्षण आदीचा दिग्दर्शक सखोल विचार करतात, असं दिसत नाही. मधुर भांडारकर मात्र या सर्वच व्यक्तिरेखांना विशिष्ट चेहरा देतात. त्यांचा सामाजिक, आर्थिक स्तर दाखवतात. मात्र, या व्यक्तिरेखांना कुठेही ‘आदर्श पतिव्रता’वगैरे दाखवण्याचा अट्टहास ते धरत नाहीत. परिस्थितीपुढे नमणारी (चांदनी बार), परिस्थितीचं निरीक्षण करून त्या व्यवस्थेचा भाग बनू पाहणारी (पेज थ्री) आणि जाणीवपूर्वक, स्वेच्छेने परिस्थितीशी मिळतेजुळते घेणाऱ्या (कॉर्पोरेट, फॅशन) नायिका आपल्याला त्यांच्या चित्रपटांतून आढळतात. नायिकाप्रधान चित्रपटांची सद्दी संपलेली नाही. आजच्या बदलत्या समाजरचनेत वावरणाऱ्या स्त्रीचा खराखुरा चेहरा दाखविणाऱ्या नायिका आजही चित्रपटांतून (त्याही व्यावसायिक!) चित्रित केल्या जात आहेत, हेच मधुर भांडारकर यांच्या चित्रपटांतून ठळकपणे दिसतं.
‘चांदनी बार’मध्ये बारबालांच्या आयुष्याचा वेध घेणारी प्रवाही कथा मांडल्यानंतर उच्चभ्रू समाजातील बेगडी चेहऱ्यांची माणसं त्यांनी ‘पेज थ्री’मध्ये चित्रित केली. ‘पेज थ्री’नंतर कथेपेक्षा व्यक्तिरेखांच्या चित्रणावर मधुर भांडारकर जास्त भर देऊ लागले आहेत, हे चटकन जाणवतं. ‘पेज थ्री’, ‘ट्रॅफिक सिग्नल’मध्ये त्यांचं हे वैशिष्टय़ विशेषत्वानं नजरेत भरतं. अक्षरश: एखाद्याच संवादातून त्या व्यक्तिरेखेचे कंगोरे दाखविण्याची किमया ‘पेज थ्री’मध्ये त्यांनी साधलीय. उदाहरणादाखल- ‘देगी क्या?’ या दोनच शब्दांतून प्रदीप वेलणकरांनी उभा केलेला लंपट चित्रपट दिग्दर्शक असेल, किंवा मनोज जोशीने साकारलेला शोफर- या लहानशा व्यक्तिरेखाही ठसठशीतपणे पडद्यावर साकार होतात. ‘ट्रॅफिक सिग्नल’मध्ये तर चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत ट्रॅफिक सिग्नलच्या आसपास घुटमळणाऱ्या असंख्य लोकांची अर्कचित्रं आपल्याला पाहायला मिळतात. व्यक्तिरेखाटनाचं हे कौशल्य मधुर भांडारकरांनी ‘फॅशन’मध्येही अबाधित ठेवलंय. मात्र, ‘फॅशन’मध्ये तीन प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखांना अधिक वाव असल्यानं त्यातील इतर व्यक्तिरेखा तुलनेनं फिक्या वाटतात. समाजाच्या कनिष्ट व उच्चभ्रू स्तराचं चित्रण करणाऱ्या मधुर भांडारकर यांनी मध्यमवर्गीयांकडे अजून आपला मोर्चा वळवलेला नाही. (कदाचित भविष्यात त्यांची तशी योजना कागदावर तयारही असेल!) मात्र, मधुर भांडारकर व्यक्तिरेखा चित्रणात खूपच गुंततात. मात्र, कथेकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. भारतीय प्रेक्षकांना सिनेमात एक गोष्ट हवी असते. पडद्यावर मांडलेल्या व्यक्तिरेखांचा समर्पक शेवट दिग्दर्शकाला करावा लागतो. त्यासाठी मग चित्रपटाच्या शेवटच्या दोन रिळांमध्ये भांडारकर कथा सांगण्याची (व चित्रपट संपविण्याची) घाई करतात. ‘पेज थ्री’मध्ये अनाथ मुलांचे लैंगिक शोषण होत असताना पत्रकार मित्रांच्या मदतीने त्यांची पोलिसांनी केलेली सुटका, ‘ट्रॅफिक सिग्नल’मध्ये आत्मसन्मानाची जाणीव झालेला नायक व ‘फॅशन’मध्ये आपल्या व्यावसायिक प्रतिस्पर्धी मॉडेलची अनावस्था पाहून नायिकेत झालेलं परिवर्तन.. या गोष्टी चित्रपटांमध्ये स्वाभाविकपणे येत नाहीत, तर दिग्दर्शकाने प्रेक्षकांची मानसिकता ओळखून केलेली ती तडजोड वाटते. मधुर भांडारकरांनी आपल्या चित्रपटांतून चित्रित केलेली विश्वं ही सामान्य प्रेक्षकांच्या अनुभवकक्षेच्या बाहेरची असली, तरीही बऱ्याचदा दिग्दर्शक या विश्वांच्या अंतरंगात खोलवर शिरलाय, असं जाणवत नाही. रात्रीच्या पाटर्य़ामध्ये रमणारी माणसं दिवसा कोणत्या मानसिक ताणतणावांतून जात असतील? ‘फॅशन’च्या दुनियेमागचं अर्थकारण काय? ‘फॅशन’ची नायिका महिन्याभरात उच्चभ्रू वर्तुळात इतक्या सहजपणे कशी मिसळून जाते? (तिने तिच्या प्रियकराचं घर सोडताना सिगरेटचा घेतलेला झुरका- ती चेनस्मोकर असावी, असा भास निर्माण करतो!) तिला तिथे पोहोचण्यासाठी फार तडजोडी कराव्या लागत नाहीत का? ज्या प्रकारच्या ऑफर्स फॅशन डिझायनर तिच्या मित्राला देतो, तशा तिला का मिळत नाहीत?.. असे अनेक प्रश्न चित्रपट पाहताना पडतात.
समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचे चित्रणही मधुर भांडारकरांच्या चित्रपटांतून सातत्याने आलंय. ‘चांदनी बार’मध्ये नायिकेचा मुलगा रिमांड होममधील इतर मुलांच्या विकृतीचा बळी ठरतो. ‘पेज थ्री’मधील नायिकेचा प्रियकर आपली उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी समलिंगी संबंध ठेवतो. ‘ट्रॅफिक सिग्नल’मध्येदेखील वेश्याव्यवसाय करणाऱ्या पुरुषांचं चित्रण (की खिल्ली?) दिग्दर्शकाने केलंय. ‘फॅशन’ पाहताना तर त्या जगातले बहुतांशी सर्व पुरुष ‘गे’ असावेत, असा समज होतो. मात्र, या जगातल्या स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल दिग्दर्शक काही भाष्य करत नाही. ‘गे’ मित्राची मानसिकता व त्याची लैंगिक गरज लक्षात घेऊन त्याच्याशी लग्नाला सहज तयार होणाऱ्या नायिकेच्या लैंगिकतेचा विचार दिग्दर्शक अजिबात करत नाही, याचं आश्चर्य वाटतं.
अशा काही त्रुटी स्त्री-व्यक्तिरेखाप्रधान चित्रपट बनविणाऱ्या मधुर भांडारकर यांच्या चित्रपटांतून दिसून येत असल्या तरीही त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचं महत्त्व तसूभरही कमी होत नाही. म्हणूनच आजच्या पिढीतील दिग्दर्शकांमध्ये मधुर भांडारकर हे नाव वेगळं ठरतंय! त्यांच्या चित्रपटांतून वेगळं, अतिशय आव्हानात्मक जीवन जगणाऱ्या स्त्रिया भेटतात. सर्वसामान्य समाजाला हे जिणं नवखं असतं. त्या स्त्रियांच्या संघर्षांकडे दुर्लक्ष केलेल्या समाजाला या चित्रपटांनी अंतर्मुख व्हायला लावलं. किंबहुना असं जीवन जगणाऱ्या महिलांकडेही आस्थेने बघायचं असतं, ही नवी दृष्टी त्यातून मिळते..
संतोष पाठारे