Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९
अग्रलेख

स्वदेशी दहशतवाद!

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे आसाममध्ये आगमन होण्याआधी एक दिवस आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम गुवाहाटीत पोहोचले त्याच दिवशी त्यांच्याच मार्गावर लागोपाठ तीन बॉम्बस्फोट करण्यात आले. हा योगायोग नव्हता. नववर्षांच्या प्रारंभीच आसाममध्ये सुरक्षाव्यवस्था किती ढिसाळ बनू शकते, ते दहशतवाद्यांनी दाखवून दिले. हे सर्व बॉम्बस्फोट काही तासांच्या अंतराने,

 

परंतु काळोख पडण्याच्या सुमारास घडले आहेत. आसाम आणि बॉम्बस्फोट यांचे नाते विचित्र आहे. आसाममध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त येऊन धडकले, की आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्या त्याचा संबंध बांगलादेशी दहशतवाद्यांशी लावून मोकळय़ा होतात, परवाही तसेच घडले. ‘हरकत उल जिहाद अल् इस्लाम’ (हुजी) ही दहशतवाद्यांची संघटना बांगलादेशातून आपल्या कारवाया चालवते, म्हणून तिला ‘हुजी (ब)’ म्हणूनही ओळखण्यात येते. गुवाहाटीत हे बॉम्बस्फोट ‘हुजी’नेच घडवल्याचे गृहीत धरून सगळय़ा बातम्या पसरवण्यात आल्या पण प्रत्यक्षात बॉम्बस्फोट ‘उल्फा’ संघटनेच्या दहशतवाद्यांनी केल्याचे उघड झाले आहे. ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ म्हणून परिचित असणाऱ्या या संघटनेला आसामचे स्वायत्त राष्ट्र हवे आहे. ‘नॅशनॅलिस्ट सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड’ या दहशतवाद्यांच्या संघटनेशी तसेच म्यानमारमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांशी त्यांचे संबंध आहेत. ‘उल्फा’ या संघटनेवर १९९० मध्ये केंद्र सरकारने बंदी घातली आहे. अमेरिकेने मात्र या संघटनेला ‘अन्य दहशतवादी’ असा दर्जा दिला आहे. सांगायचा मुद्दा हा, की ही संघटना ज्यांना मुस्लिम दहशतवादी म्हणून ओळखण्यात येते, त्यांची नाही. दहशतवादी म्हटले, की तो मुस्लिमच असला पाहिजे, हा समज खोडून काढणाऱ्या या दहशतवादी संघटनेला आसाममध्ये अनेक वर्षे चाललेल्या बांगलादेशींविरुद्धच्या आंदोलनातूनच प्रेरणा मिळाली आहे. ‘आसू’ म्हणजेच ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’ या संघटनेने आसाममध्ये असणाऱ्या परभाषकांविरुद्ध आंदोलन चालवले. राजस्थानातून आसाममध्ये जाऊन स्थायिक झालेल्यांविरुद्धही ते काही काळ चालले, पण नंतर १९७१च्या बांगलादेश मुक्तियुद्धाच्या काळात आसाममध्ये जीव वाचवायला आलेल्या बांगलादेशींविरुद्ध पेटले. बांगलादेशातून हिंदूही आसाममध्ये पळून आले, पण त्यांना ‘आसू’ने आपला हिसका दाखवला नाही. आसाममध्ये सर्वात मोठे हत्याकांड नेल्लीमध्ये झाले. १८ फेब्रुवारी १९८३ रोजी नेल्ली परिसरातल्या एकूण दोन हजार १९१ जणांना या ‘आसामी’ दहशतवाद्यांनी ठार केले. या हत्याकांडात ठार झालेल्यांचा अनधिकृत आकडा पाच हजारांवर आहे. त्या नराधमांनी ठार केलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुले यांचा सर्वाधिक समावेश होता. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत जाहीर केली. सरकारनेही या मृतांकडे पाहताना आपपरभाव ठेवला होता, हे उघड झाले. त्या हत्याकांडाची चौकशी करून पोलिसांनी ६८८ जणांवर गुन्हे दाखल केले. पैकी ३७८ जणांना पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. आसाममध्ये त्या वेळी निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, म्हणून ‘आसू’च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा नेल्ली हत्याकांड हा एक भाग होता. या विद्यार्थी संघटनेचे म्हणणे असे होते, की जोपर्यंत मतदारयाद्यांची पूर्ण फेररचना होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. ते चुकीचे नव्हते, पण तरीही त्यासाठी त्यांना दहशतवादाचा आधार घ्यायची गरज नव्हती. या हत्याकांडात भाग घेणारे नेमके कोण होते, ते पुढे स्पष्टच झाले. आसामच्या विद्यार्थी आंदोलनातून निर्माण झालेल्या आसाम गण परिषदेने निवडणुकाही जिंकल्या आणि पुढे प्रफुल्लकुमार महंत यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये सत्तेवर आलेल्या सरकारने नेल्लीच्या हत्याकांडात भाग घेणाऱ्या गुन्हेगारांवर भरलेले खटले काढून घेतले आणि दहशतवादाला एक प्रकारे अभय देऊन ते मोकळे झाले. हा ‘राजाश्रय’ आजकाल सगळीकडेच बोकाळला आहे. याच आसाम गण परिषदेला विश्वनाथ प्रतापसिंग यांनी तसेच पुढे भाजपनेही आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. आसाममध्ये सत्तेवर आलेल्या या पक्षाचे दुसरे एक नेते भृगुकुमार फुकन हे गृहमंत्री बनल्याने दहशतवादी शक्तींना मोकळे रान मिळाले. आसाममध्ये अधिकृतरीत्या खंडणीबहाद्दर निर्माण झाले. दहशतवाद्यांपासून संरक्षण मिळवायचे असेल तर टाका पैसे, असा उद्योग आरंभण्यात आला. त्यातून मग दहशतवाद्यांच्या अधिकृत शाखा आसामभर पसरल्या. आसाममध्ये पुढे ज्या चकमकी झडल्या, त्या तद्दन जातीयवादी होत्या. बोडो-आदिवासी, कुकी-कारबी, बिहारी-आदिवासी, बोडो-मुस्लिम असे कितीतरी संघर्ष पेटले आणि सूडचक्र सुसाट सुटले. बोडो-आदिवासी संघर्षांत कोक्राझार जिल्हय़ात पाचशेहून अधिक जणांना मृत्यूने गाठले. त्या वेळी दोन लाख निर्वासित झाले. पैकी कित्येकजण आजही निर्वासितांचेच जीवन जगत आहेत. पंजाबमध्ये वा काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने बाहेरच्या राज्यातून विशेषत: बिहारमधून आलेल्या मजुरांवर दहशतवाद्यांनी हल्ले चढवले, तसेच ते आसाममध्येही परक्या मजुरांवर ‘उल्फा’च्या दहशतवाद्यांनी चढवले. ‘उल्फा’मध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांना बांगलादेशात प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. प्रशिक्षण देणाऱ्यांमध्ये ‘आयएसआय’ या पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर संघटनेच्या हस्तकांचा समावेश होता. स्वाभाविकच यापैकी निवडक दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये नेऊनही प्रशिक्षण देण्यात आले, असा ‘हिंदू-मुस्लिम समझोता’ तिथे घडून आला. दहशतवादी टोळय़ांमधल्या उपटसुंभ शक्तींमध्ये तो घडला. बांगलादेशात शेख हसिना यांच्या अवामी लीगचे सरकार याआधी अस्तित्वात होते, तेव्हा त्या सरकारने ‘उल्फा’विरुद्ध पावले उचलली होती. त्या संघटनेचे सोनाली बँकेतले खातेही त्यांच्या सरकारने जप्त केले. तेव्हा आपला बाडबिस्तरा आवरून ‘उल्फा’ने भूतानला आपलेसे केले. शेख हसिनांचे सरकार जाताच ते पुन्हा बांगलादेशात परतले. आता पुन्हा सत्तेवर परतताच यापुढे कोणत्याही दहशतवादी संघटनेला आपल्या देशात स्थान असणार नाही, असे शेख हसिनांनी जाहीर केले. गुवाहाटीचे बॉम्बस्फोट त्यांच्यासाठीही होते. या दहशतवाद्यांना हिंदू दहशतवादी म्हणून ओळखता कामा नये, ही अनेक ‘विचारवंत हिंदूं’ची अपेक्षा असते. नक्षलवाद्यांनी तळागाळातल्यांना बळ मिळवून देण्यासाठी आणि मस्तवाल जमीनदारांना धडा शिकवायच्या हेतूने संघर्ष सुरू केला, पण त्यांच्यात काही खंडणीबहाद्दर निघाले. नक्षलवादी नावाने कारवाया करणाऱ्यांमध्ये धर्म मानणारे कदाचित कमी असतील, पण ते मुस्लिम दहशतवादी नक्कीच नाहीत. श्रीलंकेत ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम’ या संघटनेने तामिळांचे स्वतंत्र राष्ट्र व्हावे, म्हणून हिंसाचार माजवला. त्यांचा नेता व्ही. प्रभाकरन हा हिंदू, त्याच्याच आदेशावरून राजीव गांधींचा त्याच्या दहशतवाद्यांनी खून केला. इंदिरा गांधींचा खून शीख अतिरेक्यांनी केला. महात्मा गांधींचा खून हा एका धर्माध हिंदूने केला. तेव्हा अमुक एका जातिधर्मातच दहशतवादी निपजतो, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही, ते हास्यास्पदच आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात ज्यांचा हात असल्याचा आरोप सध्या केला जातो, ते सगळे विचाराने हिंदुत्ववादी आहेत. या अगदी अस्सल स्वदेशी असणाऱ्या दहशतवादी संघटनांचे प्रस्थ अलीकडच्या काळात खूपच वाढले आहे, त्याचाच परिणाम गुवाहाटीमधल्या बॉम्बस्फोटांमध्ये झाला आहे. चिदंबरम गुवाहाटीत उतरण्यापूर्वी झालेले हे बॉम्बस्फोट दुसरे काहीच सांगत नाहीत. आपल्याशिवाय दुसऱ्या कुणी ‘आपल्या’ राज्यात राहताच कामा नये, असे वाटणाऱ्यांकडून हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. ते देशाला, राज्याला आणि या देशाच्या एकात्मतेला खड्डय़ात घालणारे आहेत. या स्वदेशी दहशतवादाला परक्या दहशतवादी शक्तींबरोबरच आवर घालायला हवा, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर बनेल.