Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

एक गोष्ट रॉक संगीताच्या ध्यासाची
हनी ड्रिपर

रॉक संगीत हे १९४० चा उत्तरार्ध ते १९५० चा पूर्वार्ध या काळात अमेरिकेतल्या विशेषत: कृष्णवर्णीय गायक-वादक- संगीतकारांनी जोपासलेलं, वाढवलेलं आणि पुढे अवघ्या जगाला ज्यानं डोलायला- नाचायला- वेडं व्हायला लावलं असं घटित.
या रॉक एन रोल संगीतालाच केंद्रस्थानी ठेवून ‘हनी ड्रिपर’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या कापूस उत्पादक राज्यांपैकी एक अलाबामा. काळ १९५० चा. टायरॉन (डॅनी ग्लोव्हर) या कृष्णवर्णीय पियानोवादकाचा ‘हनी ड्रिपर’ हा बार. आता डबघाईला आलेला. दारू, चिकन पुरवणाऱ्यांची बिलं थकली आहेत, विजेची थकबाकी आहे, टायरॉन कर्जबाजारी झाला आहे आणि ‘हनी ड्रिपर’मध्ये ग्राहक येईनासे झाले आहेत. कापसाच्या शेतात मजुरी करणारे कृष्णवर्णीय मजूर आणि गोरे सैनिक जातात ते समोरच्या ‘एस अ‍ॅण्ड स्पेड्स’ या प्रतिस्पर्धी बारमध्ये. तिथे चालू असतं रेकॉर्डेड संगीत. ‘हनी ड्रिपर’मध्ये लाइव्ह गीत संगीत सादर करणाऱ्या वृद्ध बर्थाला कुणी विचारीतही नाही आणि ‘हनी ड्रिपर’ ओस पडत चाललेलं. एके काळी स्वत: गायिका असलेली आणि आता शेरीफच्या बायकोकडे घरकाम करणारी टायरॉनची डिलायला आणि टायरॉन यांच्या नाटय़ातही त्यामुळे तणाव आलेला आहे. हे सगळं निरीक्षण करते आहे त्यांची १७ वर्षांची मुलगी- ‘हनी ड्रिपर’ चालवायला मदत करणारी.

आऊटसोर्सिग- हळुवार, गमतीदार असंही!
आऊटसोस्र्ड

‘आऊटसोर्सिग’ हा शब्द आजच्या ग्लोबल बिझिनेसच्या क्षेत्रातला महत्त्वाचा शब्द! एकीकडे अमेरिकेसारख्या बलाढय़, साधनसंपन्न देशाला ‘आऊटसोर्सिग’मुळे धडकी भरली आहे, तर दुसरीकडे भारत, चीनसारख्या विकसनशील देशांना ‘आऊटसोर्सिग’मुळे समृद्धीची नवी दारं खुणावताहेत. ‘आऊटसोर्सिग’च्या या ग्लोबल ‘चमत्कारा’चा वापर दिग्दर्शक जॉन जेफकोटनं ‘आऊटसोस्र्ड’ या प्रसन्न विनोदपटाच्या रूपात केला आहे. पाश्चिमात्यांना भारताच्या दर्शनानं बसणारे सांस्कृतिक धक्के हा तसा यापूर्वीही हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांनी हाताळलेला विषय. (ताजं उदाहरण- गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘दार्जिलिंग एक्स्प्रेस’ हा पडेल अमेरिकन.) पण ‘आऊटसोस्र्ड’ या चित्रपटात हेच वास्तव अतिरंजित न करता खरोखरी आपल्या वास्तव स्वरूपात मांडलं गेलं आहे आणि तरीही ते पुरेसं रंजक, चांगलंच हास्योत्पादक झालं आहे. मुख्य म्हणजे त्यासाठी ‘आऊटसोर्सिग’ या अगदी ताज्या अशा बिझिनेस संकल्पनेचा केलेला वापर.

दृश्यात्मकता आणि भावनाटय़ाचा भव्य समतोल
ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियातल्या विशाल पसरलेल्या माळरानांचं अंगावर येणारं उजाडपण, त्यात हजारो गाईंच्या कळपांच्या राखणीची परीक्षा घेणारी परिस्थिती यांचं भव्य चित्रण ‘ऑस्ट्रेलिया’ या चित्रपटाचा प्रेक्षकांच्या मनावर पडणारा पहिला प्रभाव. भव्य दृश्यात्मकता प्रेक्षकांचा ताबा घेतेच; परंतु ऑस्ट्रेलियातल्या आपल्या या हजारो गाईंना प्रतिस्पध्र्याकडून गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी लेडी सारा अ‍ॅशली या तरुण ब्रिटिश विधवेने केलेला विलक्षण प्रयत्न, या प्रयत्नात तिला मिळालेली ड्रोव्हर (ह्यू जॅकमन) या रांगडय़ा गोऱ्या गडय़ाची आणि नला (ब्रॅण्डन वॉल्टर्स) या अ‍ॅबओरिजिनल छोटय़ा मुलाच्या मिळालेल्या साथीचे भावनाटय़देखील तितक्याच प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. नला हा सात-आठ वर्षांचा मुलगा अ‍ॅबओरिजिनल नोकराणीला फ्लेचर याअत्याचारी गोऱ्या मालकापासून झालेला मुलगा. म्हणजे त्याची ओळखही तशी अधांतरी आहे; परंतु गोऱ्या सरकारी यंत्रणेकडून त्याला मिळणारी वागणूक अ‍ॅबओरिजिनल मुलांना मिळणारीच आहे. १८६९ ते १९६९ हे शतक ऑस्ट्रेलियाच्या वासाहतिक इतिहासात ‘स्टोलन जनरेशन’चं शतक म्हणून ओळखलं जातं. ‘स्टोलन जनरेशन’ हे गोऱ्या अत्याचारी वसाहतवाद्यांनी कायद्याच्या नावाने स्थानिकांवर केलेल्या अत्याचारांचं प्रतीक.

ब्रिटनीचे ‘इंडियन कनेक्शन’?
‘ब्रिटनी स्पीअर्स’ने तिच्या बॅडपॅच कालावधीतही आपल्याविषयीच्या बातम्यांचा तुटवडा कधी वृत्तपत्रांना पडू दिला नव्हता. आता ‘वुमनाईझर’ने पुन्हा एकदा नंबर वन बनलेल्या ब्रिटनीविषयीच्या बातम्यांचा खच अमेरिकेतील गॉसिप कॉलम्समध्ये दिवसेंदिवस पडत आहे. नव्या वर्षांत नखे खाण्याचं सोडण्याच्या संकल्पापासून ते कुठल्याशा निवड चाचणीत अमेरिकेतील सर्वाधिक प्रभावशाली सेलिब्रिटी होण्याचा मान तिला दोनेक दिवसाआड मिळत आहे. त्यातच तिने गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय नृत्य दिग्दर्शक संदीप सोपारकर याची जोधपूर येथे गुप्त भेट घेतल्याची बातमी आली, आणि अमेरिकी बातमीपत्रांनी तिच्या नव्या ‘इंडियन कनेक्शन’बाबतचे तर्क मीठ-मसाला लावून छापले. ब्रिटनी खरोखरच भारतात आली होती का, याविषयी आपल्याकडल्या आंग्ल दैनिकांनी (आठवडाभर पानेच्या पाने पुरतील अशा बातम्या, लेख हातून निसटल्याची खंत करीत) भल्या मोठय़ा, लेखाच्या आकाराच्या बातम्या दिल्या. जगभरातील जवळजवळ साऱ्या वृत्तपत्रांनी ब्रिटनीचं नवं प्रेमप्रकरण संदीप सोपारकरसोबत जोडून टाकलं. या बातमीत किती तथ्य आहे ते खुद्द संदीप आणि ब्रिटनीलाच ठाऊक, पण ब्रिटनी सध्या आपल्या ‘वुमनाईझर’च्या टुअरसाठी खरंच गंभीर असल्याचे दिसत आहे. आपली प्रिय मैत्रीण मॅडोनाने वापरलेले प्रसिद्धीचे सर्व ‘फॉम्र्यूले’ तिने वापरायला सुरुवात केली आहे. मॅडोनाने आपल्या नव्या आल्बमच्या प्रमोशन टुअरमध्ये वापरलेल्या ‘डान्स स्टेप्स’ ब्रिटनीने ‘सर्कस’च्या प्रमोशनच्या पहिल्याच कार्यक्रमापासून वापरायला सुरुवात केली आहे. अगदी मॅडोनाच्या टुअरचे व्यवस्थापन करणारा दिग्दर्शकही तिने आपल्यासाठी निवडला आहे. काही कालावधी नृत्याचे धडे देणाऱ्या संदीप सोपारकरचे मॅडोनाने तिच्यासमोर तोंडभर कौतुक केले होते. त्यामुळेच, आपल्या ‘सर्कस’ आल्बममधील ‘वुमनाईझर’नंतरच्या व्हिडीयो आल्बमसाठी ब्रिटनीला संदीप सोपारकर हाच नृत्य दिग्दर्शक हवा आहे. त्यासाठी तिचा संदीप सोपारकरशी गेले काही दिवस संपर्क होत होता आणि कुणालाही खबर न लागू देता ब्रिटनी भारतात येऊन निघून गेल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनीच्या भारतात येण्याविषयी खुद्द संदीपने कितीही नकार दिला असला, तरी या बातमीने संदीप सोपारकर हे नाव मात्र अमेरिकेत ब्रिटनीइतकंच लोकप्रिय बनलंय.
मॅडोनाची नवी ‘इनिंग’
गाय रिचीशी अकरा वर्षांंच्या सहवासाअखेर घेतलेल्या घटस्फोटानंतरची मॅडोनाची ही नवी इनिंग नव्हे, तर तिच्या चित्रपट लेखन- दिग्दर्शनाची नवी इनिंग. अर्थात घटस्फोट घेण्यापूर्वीच गाय रिचीच्या मार्गदर्शनाखालीच तिने ‘फिल्थ अ‍ॅण्ड विस्डम’ हा सिनेमा बनवला होता म्हणे. या सिनेमाला २००८ च्या ‘वर्स्ट’ सिनेमातही स्थान मिळालं नाही, आणि बहुतांशी सिनेसमीक्षकांनीही चित्रपटाला अनुल्लेखाने मारलं. प्रत्यक्षात या सिनेमाविषयी लिहिताना किंवा बोलताना समीक्षकांपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत तिच्या ‘पॉप स्टार’पदाचा आणि तिचं वादग्रस्त जगण्याचा इतका पगडा होता, की मॅडोना सिनेमातून काहीच चांगलं देऊ शकणार नाही, असे आधीच तिच्याविषयी बोलले जात होते. त्या पूर्वग्रहाचा परिणाम चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इतका झाला, की मॅडोनाच्या घटस्फोटांच्या अफवेची चर्चा गेल्या वर्षांच्या सुरुवातीला होत होती, तितकी हाईपही या चित्रपटाच्या वाटय़ाला आली नाही. परिणामी तिच्या गाण्यांच्या चाहत्यांकडूनही हा चित्रपट स्वीकारला गेला नाही. आपल्याकडे हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता नाहीच, कारण अमेरिकेतील बॉक्स ऑफिसच्या यशापयशावर इथल्या चित्रपटाचं येणं न येणं ठरतं. तरी सध्या डीव्हीडीच्या मार्केटमध्ये अधिकृत आणि अनधिकृत अशा सर्व सोर्समध्ये तो सहज उपलब्ध आहे. ‘फिल्थ अ‍ॅण्ड विस्डम’मध्ये लेखक, दिग्दर्शक, निर्माती या सर्व भू्मिका वठवलेल्या मॅडोनाने कॅमेरासमोर येण्याचं पूर्णपणे टाळलं आहे. या चित्रपटानंतर ‘आय अ‍ॅम बिकॉझ वी आर’ नावाच्या एका माहितीपटाची निर्मितीही तिने केली, आणि आता नव्या चित्रपटाच्या लिखाणात व्यग्र आहे. गायिका म्हणून ज्यावेळी मॅडोनाची प्रसिद्धी घटत जाईल, तेव्हा तिच्या दिग्दर्शनाच्या नव्या इनिंगचाच तिला फायदा होणार आहे, असं तिच्यावर टीका करणारे म्हणताहेत. तेव्हा दिग्दर्शिका म्हणून मॅडोनाचं नाव घेतलं जाईल की नाही, हे तिने दिलेल्या एखाद्या हिटवरूनच ठरेल, आणि त्या हिट चित्रपटाचा विषय कोणता असेल याची सध्या ब्लॉगर्समध्ये चर्चा आहे. नव्या आल्बमच्या प्रसिद्धीच्या आठ कॉन्सर्ट टुअरमधूनही अनेक वेगळे अनुभव तिला आले आहेत, त्यावर तर तिचा नवा सिनेमा आधारला नसेल?
मायकल जॅक्सनचं आजारपण
नसेल मायकल जॅक्सनबाबत गेल्या वर्षांच्या अखेरीस दोन भल्या मोठय़ा बातम्या होत्या. एक म्हणजे त्याचं मुस्लिम धर्म स्वीकारणं आणि दुसरी तो दुर्धर रोगाने आजारी असून आठवडय़ाभरातच त्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो याची. यातली पहिली खरी असली, तरी दुसरी मात्र अनेकांना काही काळ तापदायक ठरली होती. टाइम, न्यूजवीक यांच्यापासून आघाडीची मासिके, साप्ताहिकांमध्ये डेडलाईन टळून जात असतानाच त्याच्यावरील मृत्यूलेख, विशेष पानांची तजवीज करण्यात बराच वेळ जात होता. तेवढय़ात ही बातमी अफवा असल्याचे मायकल जॅक्सनच्या प्रवक्त्याने जाहीर केले आणि या सर्व माध्यमांनी सुटकेचा निश्वास टाकत, आपलं काम (पुढे कधीतरी वापरता येईलच म्हणून ) संग्रहात जमा केलं. मायकल जॅक्सनने नुकताच एका बडय़ा कंपनीसोबत वर्ल्ड टुअरचा करार केला असून, नव्या वर्षांत तो या कंपनीच्या कार्यक्रमांमध्ये झळकणार आहे. याशिवाय त्याच्यावर एक माहितीपटही बनविला जाणार आहे, ज्यात त्याच्या आयुष्यातील सर्व घटनांची माहिती खुद्द मायकल जॅक्सन देताना दिसणार आहे. या सगळ्या त्याच्याविषयीच्या ताज्या बातम्या असल्या तरी आजारपणाची बातमी फुटल्यानंतर स्वत मायकल जॅक्सन अजूनही प्रसिद्धी माध्यमांच्यासमोर आला नाही. त्यामुळे त्याचं आजारपण खरं की खोटं, याविषयीचा पडदा अजूनही उठलेला नाही.
पंकज भोसले