Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९
ग्रंथविश्व

रश्दींची मोहिनी

कथानकात सर्वधर्मसमभावाच्या कथा आहेत. सर्वधर्माच्या लोकांना खुलेपणाने धर्मावर चर्चा करण्यासाठीचा स्पेशल मंडप असल्याचे वर्णन आहे. राजांच्या लढायांची, महालातली वर्णने आहेत. खुलेआम मुभा असलेल्या वेश्यांचे किस्से व रसभरीत वर्णने आहेत.

 

मुघलांचा इतिहास, ऑटोमन साम्राज्य कसे मुघलांचे मूळ आहे, अशी बरीच ऐतिहासिक माहिती आहे.
‘द एनचान्ट्रेस ऑफ फ्लोरेन्स’ या कादंबरीचे लेखक सलमान रश्दी हे एक अजब रसायन असलेले साहित्यिक असून कायम वादात व प्रसिद्धीच्या झोतात राहाणारे आहेत. त्यांच्या ‘मिडनाइटस् चिल्ड्रन’ या कादंबरीला २००८ मध्ये पहिल्या ४० वर्षांतले ‘बुकर ऑफ बुकर’ प्राइझ मिळाले आहे. (दरवर्षी बुकर प्राइझ देतात. पहिल्या २० वर्षांतले बुकर ऑफ बुकर याच पुस्तकाला १९९३ मध्ये मिळाले होते. आताचे आहे पहिल्या ४० वर्षांतले!) ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यापासून सतत चार महिने सर्वत्र बेस्ट सेलर लिस्टवर पहिल्या क्रमांकावर होती. ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकात सैतानाबद्दल लिहून इस्लाम विरोधक म्हणून खोमेनींचा रोष ओढवल्यानंतर त्यांना कैक वर्षे भूमिगत राहावे लागले होते. (त्यांच्या सुरक्षा रक्षकाने त्या काळातल्या आठवणींचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात सलमान रश्दी त्याच्याकडून त्यांच्या घरात राहण्याचा भत्ता, दरदिवसाचे १० पौंड, कसे वसूल करीत हेही लिहिले आहे.) शिवाय ‘पेज थ्री’वरही हा लेखक कायम असतो. भूमिगत असताना त्यांनी पद्मालक्ष्मी या भारतीय मॉडेलशी लग्न केले व आता ते कृत्रिम पाय लावलेल्या मॉडेल व अ‍ॅथलीटबरोबर लग्नाच्या खटपटीत आहेत.
प्रस्तुत कादंबरीच्या कथानकाची सुरुवात चाच्यांच्या बोटीवरच्या जादुगारापासून होते. तो जादूने बोटीवरची लपवलेली जडजवाहिरे चोरतो, दडवतो व अकबराच्या दरबारी पोहोचतो. त्याचा मुख्य उद्देश अकबराला एक गुपित सांगण्याचे असते. ते म्हणजे तो अकबराचाच तुर्की भाऊ आहे व मायाजाल पसरवून मोहिनी घालणारी राजकन्या तुझ्याकडे येणार आहे, तुला वश होणार आहे; पण तिच्यावरच्या शापामुळे तुझे सर्वस्व तुला गमवावे लागणार आहे..! कथेदरम्यान अकबराचा दरबार, नवरत्ने, त्याच्या बायका वगैरेंची दिलखुलास विस्तृत वर्णने आहेत. ‘जोधा’ ही अकबराची राणी कायम अदृश्य असते असे कथानकात आहे. (आशुतोष गोवारीकरांना ही कथा आधी मिळती तर कदाचित त्यांच्या ‘जोधा-अकबर’ सिनेमावर एवढे रणकंदन माजते ना!) कथानकात अकबराची धर्मासंबंधीची मते आहेत. सर्वधर्मसमभावाच्या कथा आहेत. सर्वधर्माच्या लोकांना खुलेपणाने धर्मावर चर्चा करण्यासाठीचा स्पेशल मंडप असल्याचे वर्णन आहे. राजांच्या लढायांची वर्णने आहेत. महालातली वर्णने आहेत. खुलेआम मुभा असलेल्या वेश्यांचे किस्से व रसभरीत वर्णने आहेत. मुघलांचा आद्य इतिहास फ्लोरेन्सहून (इटली) कसा सुरू होतो, ऑटोमन साम्राज्य (तुर्काचे) कसे मुघलांचे मूळ आहे, अशी बरीच ऐतिहासिक माहिती आहे.
सबंध कादंबरीभर रश्दींची नेहमीची, तरुणांच्या ओठांवर असणारी सहज संवादशैली आहे. इतिहासातली वर्णने टर उडवल्यासारखी असली तरी ते संदर्भ इतिहास, संस्कृती, चित्रकला वगैरेंवरच्या ८५ पुस्तकांवरून घेतलेले असून आठ वेबसाइटचीही मदत त्यांनी घेतली आहे. न्यूयॉर्कच्या हंटर कॉलेजात हटरेग फेलोशिपवर या पुस्तकाचे लिखाण झाले म्हणूनही हा संदर्भसूचीचा प्रपंच करावा लागला असावा. स्त्री-पुरुष संबंधांवरची वर्णने कामसूत्राप्रमाणे कामुक व रंजक आहेत. धर्मावरची भाष्ये, स्वत: सलमान मुसलमान आहेत म्हणून- तेच करू जाणोत- इतकी बेधडक आहेत. आणि सबंध कादंबरीभर शैलीदार इंग्रजीचे तुषार वर्षत राहतात!
‘इतिहास’ आणि ‘कादंबरी’ यांचे वाचकांवर होणारे वेगवेगळे परिणाम आपल्याला माहीत आहेत. जेम्स लेनने इतिहासावर संशोधन करून इतिहासातल्या व्यक्तींच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेवर शिंतोडे उडविले की बऱ्याच जणांच्या अस्मिता सरसावतात. पण याच ऐतिहासिक साधनांवर आधारून कुणी कादंबरीच्या आडून असेच लिहिले असते तर कळलेही नसते! रश्दींच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’च्या वेळी नेमके असेच झाले. पुस्तक प्रसिद्ध होऊन काही महिने लोटले तरी त्यात इस्लामविरोधी मजकूर आहे हे कोणाला माहीत नव्हते. खुशवंत सिंगांनी वाचून त्यावर बंदी येऊ शकते असे म्हटल्यावर मुसलमान जागे झाले व इराणच्या खोमेनींनी त्यावर ‘रश्दीवधा’चा फतवा काढला. प्रस्तुत कादंबरीतही लेखकाचा तोच खाक्या आहे. इतिहास व काल्पनिक पात्रे यांची सरमिसळ करीत कुणा बिगर- मुसलमानाला खालील परिच्छेद लिहिण्याची हिम्मतच झाली नसती : (पृ. १७९- १८६ चे स्वैर भाषांतर..)
‘ती सांगू लागली : उस्कूब येथे सुलतानाचा बालक कँप असायचा. ‘देवशिरमेकर’ नावाचा कर बालकांमागे द्यावा लागायचा. तुमच्यातली उत्कृष्ट बालके निवडून, त्यांना नीट तालीम देऊन त्यांना ऑटोमन रिक्रूट म्हणून जथ्यात सामील करायचे. त्यांच्यापासून ख्रिश्चनिटी हिसकावून त्यांना नवीन पायजमा घातल्यासारखा इस्लाम चढवायचा. बेकताशी नावाचा दरवेश त्यांना अरेबिक शिकवून अल्ला व प्रेषिताविषयी सर्व घोकून घेई. मग ते तुम्हाला ताब्यात ठेवतील. या पद्धतीला सुलतानाची मेटॅमॉफरेसिस राज्यपद्धती म्हणत. (मेटॅमॉफरेसिस म्हणजे किडय़ामुंगीपासून मोठ्ठा प्राणी तयार करणे) आपल्या हीरोला उस्मान अली सुलतानाने असे आपला उजवा हात बनवले व नाव दिले पाशा अर्कालिया, द तुर्क!.’ पाशा म्हणाला लोक मला मानतील? दुसरा माणूस म्हणाला त्यांचे प्रेम क्षणभंगूर असते. तर त्याला तू भीतीची जोड दे. फक्त भीतीच टिकणारी असते आणि प्रेमाबरोबर भीती चांगली घुसळून ठेवावी.’
केवळ काल्पनिक कथानक म्हणून पाहिले तर हे पुस्तक मोहक, लयबद्ध कवितेसारखे लिहिले आहे. ठिकठिकाणी रश्दींच्या विनोदीवृत्तीच्या खुणा दिसतात. जसे : ‘हेरातमध्ये जरा पाय लांबवले तर नक्कीच एखाद्या कवीला लाथ बसायची!’ तसेच अप्रतिम सुभाषिते (बहुधा मॅचिव्हिलीची) खूप ठिकाणी पेरलेली दिसतात. जसे : ‘रागातला राजा एखाद्या देवाने चूक केल्यासारखा दिसतो’, ‘बायका पुरुषांविषयी खूपच कमी विचार करतात. आपल्या पुरुषांबद्दल तर खूपच कमी. म्हणूनच चांगल्या बायकांना पायाखाली ठेवावे’, ‘जीजस म्हणतो, जग हा एक सेतू आहे. तो पार करा पण त्यावर घर बांधू नका’, ‘अकबराच्या आदर्श मंदिरात वादविवाद हाच देव आहे,’ ‘जगाच्या मध्यवर्ती ठिकाणी माणूस हवा, देव नाही. जर देवाला माणसाने घडवले असेल तर माणूसच त्याचे विसर्जन करू शकतो’, ‘एकाकीपण ही भटकणाऱ्यांची नियती आहे. तो जिथे जातो तिथे परकाच असतो. त्याचे असणे फक्त त्याच्या इच्छेच्या शक्तीत असते.’
अकबराच्या काळातली कादंबरी असल्याने त्यात येणाऱ्या भारतीय संदर्भामुळे वाचताना आपलेपणा वाटतो. यातून कित्येक भारतीय वस्तू, परंपरा व रूढींची सगळ्या जगाला ओळख होते.
मुखपृष्ठावर व मलपृष्ठावर अप्रतिम मुघल तैलचित्रे आहेत व त्यामुळे पुस्तक देखणे झाले आहे. सलमान रश्दींची ‘एनचान्ट्रेस.’ वाचकांवर नक्कीच ‘मोहिनी’ घालते.
रुण भालेराव
‘द एनचान्ट्रेस ऑफ फ्लोरेन्स’
लेखक : सलमान रश्दी;
प्रकाशक : जोनाथन केप, लंडन;
पृष्ठे : ३६०, किंमत : २५० रुपये.