Leading International Marathi News Daily                                    शनिवार, ३ जानेवारी २००९

मंदीवर मात करण्यासाठी केंद्राचे
२० हजार कोटींचे आणखी एक पॅकेज

नवी दिल्ली, २ जानेवारी/खास प्रतिनिधी

जागतिक मंदीमुळे आर्थिक अरिष्टाचा सामना करणारे निर्याताभिमुख उद्योग, गृहबांधणी आणि लघु उद्योगांना दिलासा देत भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्ववत गतिमान करण्यासाठी आज केंद्र सरकारने २० हजार कोटींच्या दुसऱ्या बहुप्रतिक्षित आर्थिक पॅकेजची घोषणा केली. एका महिन्याच्या अंतरात जाहीर करण्यात आलेल्या या दुसऱ्या पॅकेजमध्ये सार्वजनिक खर्चात मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना आता भारतात पूर्वीपेक्षा जास्त गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. संकटात सापडलेल्या गृहबांधणी क्षेत्राला परदेशातून स्वस्त कर्ज मिळविणे शक्य व्हावे म्हणून केंद्राने बाह्य वाणिज्यिक उधारीचे धोरण शिथिल केले आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपात
मुंबई, २ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी
ओसरत चाललेल्या महागाईच्या दराच्या पाश्र्वभूमीवर, भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे आपल्या अल्पमुदतीचे व्याजाचे दर अर्थात रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात प्रत्येकी एक टक्क्यांची घोषणा आज सायंकाळी केली. त्याचप्रमाणे वाणिज्य बँकांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे राखून ठेवावयाचा निधी अर्थात कॅश रिझव्‍‌र्ह रेशो (सीआरआर)मध्ये अर्धा टक्क्यांनी कपात जाहीर केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्थेत २०,००० कोटी रुपयांचा निधी चलनासाठी खुला होणार आहे. नव्या निर्णयानंतर रेपो दर ५.५ टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो दर चार टक्क्यांवर आले असून, नव्या दराची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. सीआरआरमधील अध्र्या टक्क्यांच्या कपातीनंतर हे प्रमाण पाच टक्क्यांवर आले असून, त्याची अंमलबजावणी १७ जानेवारीपासून केली जाणार आहे.

‘३२९३३२८१९१५१’ मतलब मुंबई!
समर खडस, मुंबई, २ जानेवारी

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन भारतात अतिरेकी कारवायांसाठी पाठविण्यात येणाऱ्या आयएसआयच्या एजंट्सना किंवा भारतात प्रत्यक्ष दहशतवादी कृत्यांसाठी आलेल्या फिदायीन अतिरेक्यांना आयएसआयने तयार केलेल्या सांकेतिक लिपीचा आधार घेत पुढील कारवाई करावी लागते. ही सांकेतिक लिपी गणिती असून त्याच भाषेतून इ-मेलद्वारे निरोप देण्याचे काम प्रत्येकाला करावे लागते. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाने नेपाळहून पकडलेल्या सबाउद्दीन व फईम अन्सारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये ही सांके तिक लिपी उघड झाली आहे.

राणेंची राजकीय वाटचाल ६ जानेवारीला स्पष्ट होणार
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

काँग्रेस पक्षातून बाहेर न पडण्याबाबत माझे कुणी मन वळविण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस श्रेष्ठींपैकी कुणाशीही माझी चर्चा झालेली नाही तसेच माझ्याकडे कुणीही आलेले नाही, असे सांगत आज माजी महसूल मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या काँग्रेसमध्येच राहण्याच्या चर्चेला एका प्रकारे पूर्णविराम दिला. आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीविषयीची भूमिका आपण ६ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता जाहीर करू, असेही राणे यांनी स्पष्ट केले. ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. माणिकराव ठाकरे यांनी अलीकडेच ‘‘ज्यांची पक्षावर निष्ठा नाही ते पक्ष सोडून गेले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही’’ असे विधान केले होते, त्याबाबत ते म्हणाले की, हे प्रदेशाध्यक्ष गेल्या

गुगल-मायक्रोसॉफ्ट वादाचा जी-मेल यूजर्सना फटका
मुंबई, २ जानेवारी/प्रतिनिधी

जीमेलच्या यूजर्सना गेल्या तीन दिवसांपासून अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात यूजर आयडी इनव्ॉलिड दाखविणे, स्क्रिन काहीच न दिसणे आदी अडचणींचा समावेश आहे. इंटरनेट एक्सप्लोररच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करणाऱ्या यूजर्सचे जीमेल अकाऊंट सुरु होत नसल्याचा अनुभव येत आहे. याचे मूळ आहे ते मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्यातील व्यावसायिक वादामध्ये. मायक्रोसाफ्ट इंटरनेट एक्सप्लोजरच्या यूजर्सनी जीमेल सुरु केल्यास त्यांना ‘गेट फास्टर जीमेल, बॅड रीक्वेस्ट, एरर-४००’ असा संदेश येतो. मात्र एक्सप्लोरर न वापरता गुगलच्या ‘क्रोम’ किंवा मॉझिला कॉर्पोरेशनच्या ‘फायरफॉक्स’चा वापर केला तर जीमेल अकाऊंट सहज ओपन होते. यामुळे मागील वर्षांत रंगलेल्या गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या व्यावसायिक वादाचा हा फटका असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

हसन अलीला ५० हजार कोटी प्राप्तिकर भरण्याचा आदेश
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

पासपोर्ट घोटाळ्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आल्यानंतर आता पुण्यातील व्यावसायिक आणि स्टड फार्मचा मालक हसन अली खान हा कर चुकवेगिरीच्या विळख्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. आयकर खात्याने हसन अली खान याला एका महिन्यांत ५० हजार कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकर थकबाकी भरण्यास फर्मावले आहे. दरम्यान, बोगस दस्तऐवजाच्या सहाय्याने बेकायदेशीररीत्या दोन पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खान याची शिवडीच्या सत्र न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.

आयसीसीच्या पहिल्या क्रिकेट ‘हॉल ऑफ फेम’मध्ये गावसकर, कपिल आणि बेदी
सिडनी, २ जानेवारी/पीटीआय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या शतकमहोत्सवानिमित्त आज जाहीर करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या हॉल ऑफ फेम यादीतील ५५ माजी रथी-महारथी क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावसकर, कपिल देव आणि बिशनसिंग बेदी या तीन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आले आहे. आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यवाह हरून लॉर्गेट म्हणाले की, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या (एफआयसीए) सहकार्याने क्रिकेटमधील महान व्यक्तींचा सन्मान करण्याची यानिमित्त संधी मिळाली आहे. आयसीसीच्या शतकमहोत्सवानिमित्त खेळातील हॉल ऑफ फेम जाहीर करण्याचा निर्णय हे पूर्णता योजनाबद्ध पाऊल आहे, असे लॉर्गेट म्हणाले.

श्रीलंकेचा लिट्टेच्या बालेकिल्ल्यावर कब्जा
कोलंबो, २ जानेवारी/पी.टी.आय.

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (लिट्टे)चा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या किलिनोच्छी भागावर आज श्रीलंकेच्या लष्कराने जोरदार हल्ला चढवून ताबा मिळविल्याचे राष्ट्राध्यक्ष महिंदूा राजपक्षे यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील विशेष प्रसारणात जाहीर केले. गेल्या दोन दिवसांच्या संघर्षांत लिट्टेचे १००हून अधिक तामिळी बंडखोर मारले गेले आहेत. गेल्या २५ वर्षांपासून लिट्टेने तामिळींसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी लावून धरली असून त्यासाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. परंतु आज लष्कराने किलिनोच्छीत मुसंडी मारून ते ताब्यात घेतल्याने लिट्टेला हादरा बसला आहे. किलोनोच्छीची चारी बाजूंनी कोंडी करून लष्कराने हा भाग ताब्यात घेतला. यापूर्वी श्रीलंकेच्या लष्कराने जाफना ताब्यात घेतले होते. आता मुल्लाहेतिवू ताब्यात घेण्यासाठी लष्कर पुढे सरकत आहे. राष्ट्रपतींच्या या घोषणेनंतर काहीवेळातच राजधानी कोलंबोतील हवाईदलाच्या मुख्यालयाजवळ घडवून आणण्यात आलेल्या स्फोटात २ ठार तर ३०जण जखमी झाले.

ज्ञानेश्वर आगाशे यांचे निधन
पुणे, २ जानेवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व माजी रणजीपटू ज्ञानेश्वर चंद्रशेखर आगाशे (वय ७२) यांचे आज रात्री ससून रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. श्री सुवर्ण सहकारी बँकेचे ते माजी अध्यक्ष होते. बँकेत नुकत्याच झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांना २२ नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. बारा दिवसांपूर्वी मधुमेहाचा विकार बळावल्याने त्यांना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच आज रात्री त्यांचे निधन झाले. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या संघात रणजी क्रिकेट स्पर्धेत यष्टिरक्षक म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. वडील चंद्रशेखर आगाशे यांनी स्थापन केलेल्या बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट या कारखान्याची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली. त्यानंतर सुवर्ण सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. याच काळात बँकेत आर्थिक घोटाळा झाला. त्यात त्यांना अटक करण्यात आली होती.

सत्यम कॉम्प्युटरच्या ‘सुवर्ण मयूर’ पुरस्काराबद्दल प्रश्नचिन्ह
मुंबई, २ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

देशातील आयटी उद्योगातील चौथ्या क्रमांकाची कंपनी सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस लिमिटेडला तीन महिन्यांपूर्वी ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’मधील सर्वोत्तमतेसाठी प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठेचा ‘सुवर्ण मयूर पुरस्कार’ ताज्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर परत घेतला जाण्याचे संकेत मिळत आहेत. उद्योगजगतात हे मानाचे सन्मान बहाल करणाऱ्या ब्रिटनस्थित जागतिक संस्थेने पुरस्काराबाबत फेरविचार सुरू केल्याचे विश्वसनीयरित्या कळत आहे. सत्यमचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग राजू यांनी ज्या प्रकारे कंपनीच्या राखीव गंगाजळीचा वापर स्वत:च्याच मालकीच्या दोन कंपन्यांच्या खरेदीसाठी करण्याचा प्रयत्न केला; त्याविरोधात देशभरात गुंतवणूक वर्तुळात झालेला गहजब आणि कंपनी खात्याकडून सुरू झालेली चौकशी पाहता, सत्यमच्या व्यवस्थापनाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर ब्रिटनस्थित ‘वर्ल्ड कौन्सिल फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स’च्या संचालक मंडळाने सत्यमला सप्टेंबर २००८ मध्ये बहाल केलेल्या सन्मानाबद्दल फेरविचार आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. किमानपक्षी कंपनीकडून या प्रतिष्ठेचा पुरस्काराची जाहिरातबाजी आणि ब्रॅण्डिंगसाठी बडेजाव तरी केला जाणार नाही, असे फर्मान येणे अपेक्षित आहे.

बजाज कुटुंबियात अखेर तोडगा
मुंबई, २ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी
देशातील आघाडीचा औद्योगिक समूह बजाज मध्ये गेली सहा वर्षे सुरु असलेल्या कौटुंबिक वादावर अखेर तोडगा निघाला असून बजाज कुटुंबियांमध्ये मालमत्तेची वाटणी करण्यात आली आहे. बजाज कुटुंबियांमध्ये झालेल्या तोडग्यानुसार, बजाज हिंदुस्थान व बजाज कन्झुमर केअर या दोन कंपन्या शिशिर बजाज यांच्याकडे आल्या असून या कंपन्यांच्या संचालक मंडळातून राहुल, शेखर, मधुर व निरज बजाज हे राजीनामा देतील. तर अन्य बजाज ऑटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, मुकंद आयर्न लि., बजाज फिनसव्‍‌र्ह, बजाज होल्डिंग, हक्युलस्ट हॉईस या कंपन्या राहुल बजाज यांच्या नेतृत्त्वाखालील समूहाच्या ताब्यात येणार आहेत. या तोडग्यानुसार आज शिशिर बजाज व बजाज कुटुंबातील अन्य दोन सदस्यांनी बजाज इलेक्ट्रिकल्स मधून आपल्या पदांचे राजीनामे दिले.

धुळे आणि िपपळगाव-नाशिक-गोंडे टप्प्यांच्या चार व सहा पदरीकरणाला मंजुरी
नवी दिल्ली, २ जानेवारी/खास प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या ६० किमी टप्प्याच्या तसेच िपपळगाव-नाशिक -गोंडे या ९७.५ किमी टप्प्याच्या चार आणि सहा पदरीकरण करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प टप्पा-३ अ अंतर्गत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील ३८० ते ४४० किमी दरम्यानच्या ६० किमी अंतराचे ७५१.६८ कोटी रुपये खर्च करून चार व सहा पदरीकरण करण्यात येत आहे. त्यात रस्त्याच्या बांधकामापूर्वी पूर्ण करावयाच्या भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनस्र्थापनेवरील ७६.६५ कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. िपपळगाव-नाशिक-गोंडे या १६८.५ ते २६५ किमीदरम्यानच्या ९७.५ किमी लांबीच्या टप्प्याच्या सहा पदरीकरणावर ७९९.६७ कोटी खर्च होणार आहेत. त्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनस्र्थापनेवर होणाऱ्या ४७.१९ कोटी रुपये खर्चाचाही समावेश आहे. सरकारच्या वतीने पुरविण्यात येणारी व्हायबिलीटी गॅप फंडिंग एकूण प्रकल्प खर्चाच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या दोन्ही टप्प्यांसाठी निविदा मागविण्यात येतील. टोल टॅक्स वसुलीसाठी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील महामार्गाच्या बांधकामाला १८ वर्षांंची, िपपळगाव-नाशिक-गोंडे महामार्गावरील बांधकामाला २० वर्षांंची सवलत देण्यात आली आहे.

उत्तर भारत गारठला
अमृतसरमध्ये १ अंश तापमान
नवी दिल्ली, २ जानेवारी/पी.टी.आय.
या आठवडय़ाच्या सुरुवातीला उत्तर भारतासह संपूर्ण देशभरात थंडीने जोर धरला असून गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांत थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. काल रात्रीपासून थंडीने गारठल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या मोसमातील मृतांची संख्या सहा झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यात थंडीचा जोर वाढला असून पहाटे दाट धुक्यामुळे रस्ते वाहतूक, किमान व रेल्वेसेवांवरही त्याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. अमृतसरमध्ये मोसमातील सर्वाधिक कमी म्हणजे १ अंश से. इतके तापमान नोंदवले गेले तर चंदिगड ६.२, अंबाला- ३.५ हरियाणातील रोहटक येथे २ अंश से. इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वरसह ठाणे, मुंबई परिसरातही गारठा वाढू लागला असून पहाटे चांगल्या प्रकारे दव आणि धुके पडू लागले आहे.

‘पाकिस्तानने ठोस कृती करावी’
नवी दिल्ली : पाकिस्तानने आता नुसती पोकळ वक्तव्ये करण्याऐवजी ठोस कृती करावी, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी आज येथे केले. पाकिस्तानच्या हद्दीत आजही दहशतवाद्यांची ३३० प्रशिक्षणकेंद्रे सुरू आहेत. या छावण्या त्यांनी प्रथम समूळ उद्ध्वस्त केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

‘संशयितांना भारताच्या ताब्यात देणार नाही’
इस्लामाबाद : मुंबईवरील हल्ल्यातील संशयितांना भारताच्या ताब्यात दिले जाणार नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ‘जिओ टीव्ही’ या वृत्तवाहिनीला सांगितले. भारताबरोबर गुन्हेगार हस्तांतरण करारच झाला नसल्याने या संशयितांना ताब्यात देणे आमच्यादृष्टीने घातक ठरू शकते, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली.

नॅशनल कॉन्फरन्स ‘युपीए’त सहभागी होणार
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेससह आघाडी सरकार स्थापन करणार असलेला नॅशनल कॉन्फरन्स पक्ष केंद्रातील काँग्रेसप्रणीत ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ (युपीए)मध्ये सहभागी होणार आहे. कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी‘युपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रातील आघाडीतही सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बंगारप्पा पुन्हा काँग्रेसवासी होणार
नवी दिल्ली : कर्नाटकातून आधी भाजप आणि नंतर समाजवादी पार्टीच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून आलेले माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा आता लवकरच काँग्रेसमध्ये परतणार आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशपाठोपाठ कर्नाटकातही समाजवादी पार्टीला धक्का बसणार आहे. लवकरच ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपल्या नव्या इनिंग्जची सुरुवात करतील, असे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.

सेन्सेक्स १० हजाराजवळ
मुंबई, २ जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

केंद्र सरकार सध्याच्या मंदीवर उपाययोजना करण्यासाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता बाजारात व्यक्त झाल्याने सेन्सक्स शुक्रवारी ५५ अंशांनी बंद होऊन दहा हजारांवर मध्यंतरी स्थिरावला. बाजार बंद झाल्यावर केंद्राने आपले पॅकेज जाहीर केल्याने आता पुढील काही काळ बाजारात तेजीचे वातावरण राहील असा अंदाज आहे. आशिया व युरोपातील अनेक शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते त्यामुळे मुंबई शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण होते. ऑटो, रियल इस्ेटट, लहान व मध्यम आकारातील उद्योगांसाठी सरकार पॅकेज जाहीर करणार असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत होते.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी

दिवाळी २००८