Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘३२९३३२८१९१५१’ मतलब मुंबई!
समर खडस, मुंबई, २ जानेवारी

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन भारतात अतिरेकी कारवायांसाठी पाठविण्यात येणाऱ्या आयएसआयच्या एजंट्सना किंवा भारतात प्रत्यक्ष दहशतवादी कृत्यांसाठी आलेल्या फिदायीन अतिरेक्यांना आयएसआयने तयार केलेल्या सांकेतिक लिपीचा आधार घेत पुढील

 

कारवाई करावी लागते. ही सांकेतिक लिपी गणिती असून त्याच भाषेतून इ-मेलद्वारे निरोप देण्याचे काम प्रत्येकाला करावे लागते. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाने नेपाळहून पकडलेल्या सबाउद्दीन व फईम अन्सारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये ही सांके तिक लिपी उघड झाली आहे.
या लिपीमध्ये उभ्या चार व आडव्या ११ चौकटींमध्ये अंक लिहिले जातात. त्यापुढे इंग्रजीतील ए ते झेड अक्षरे लिहिली जातात. ए हे अक्षर उभ्या ९ व आडव्या १ अंकासमोर येत असल्यास एकच्या जागी ९१ असा आकडा लिहिला जातो. अशाच प्रकारे आकडय़ांसाठी देखील वेगळा सांकेतांक तयार केला जातो. यात वर खाली आकडे लिहिले जातात. त्यात ५च्या समोर ० आणि २ च्या समोर ३ असेल तर ५२ या आकडय़ासाठी संकेतांक तयार होतो ०३. अशाच प्रकारे ए ते झेड ही २६ अक्षरे १३ च्या दोन जोडय़ांमध्ये विभागून ए साठी सी, बी साठी ओ अशा तऱ्हेने संकेतलिपी तयार केली जाते. तसेच काही विशिष्ट गोष्टींसाठी ठराविक शब्दकोश तयार केला जातो. यात शस्त्रांसाठी ‘प्रोजेक्ट फाईल’ किंवा ‘रकम’, फिदायीनसाठी ‘मोटरबाईक किंवा हमझा’, अ‍ॅक्शनसाठी ‘व्हिसा’ किंवा ‘रकम खर्च करनेकी जगह’, नेपाळसाठी ‘रावी’, बांगलादेशसाठी ‘राबिया’, काश्मीरसाठी ‘ननिहाल’, पाकिस्तानसाठी ‘आमिर की जगह’ असा तो शब्दकोश असतो. हे शब्द साधारणत: दूरध्वनीवरून बोलताना वापरले जातात. जेणे करून दूरध्वनी जर टॅप केला गेला तर संभाषणाची उकल होण्यास वेळ जावा. इ-मेल आयडी तयार करण्याच्याही विशिष्ट पद्धती अतिरेकी वापरतात. यात पाकिस्तानात बसलेले आयएसआयचे अधिकारी किंवा लष्कर वा जैश ए मुहम्मदचे म्होरके हे एकच आयडी व पासवर्ड वापरत असतात. दर दिवशी ठराविक वेळी हा इमेल प्रत्येकाने उघडून पहायचा असतो. प्रत्यक्षात मेल पाठविले जातच नाहीत. म्हणजे ज्याला मेल पाठवायचा तो सांकेतिक भाषेमध्ये मेल लिहितो व सेव्ह करून इमेल बंद करतो. ठराविक वेळी दुसऱ्याने तोच इमेल पासवर्ड देऊन उघडला की हा सेव्ह केलेला मेल त्याच्या समोर येतो. या मेलची उकल (डिकोड) करण्याचा तक्ता समोर ठेवून यातील निरोप पुन्हा इंग्रजीमध्ये तयार केला जातो, अशी क्लृप्ती अतिरेकी वापरत असल्याचेही या चौकशीमध्ये सांगितले आहे.